3.7 अब्ज वर्षं प्राचीन जागेवर चंद्रयान-3 उतरलं आणि चंद्र-पृथ्वीचं नवं नातं समोर आलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नंदिनी वेलास्वामी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
23 ऑगस्ट 2023 ला चंद्रयान-3 हे भारताचं अवकाश यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलं.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला.
चंद्रायान-3 उतरलं त्या जागेवर भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोच्या वैज्ञानिकांनी एक नवा अभ्यास केला आहे.
ही जागा 3.7 अब्ज वर्ष जुनी असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.
3.7 अब्ज वर्षांपुर्वीच पृथ्वीवर पहिला सूक्ष्मजीव सापडला असल्याचं जगभरातल्या वैज्ञानिकांनी याआधीच सिद्ध केलं आहे.
त्यामुळे पृथ्वी आणि चंद्राचं नातं किती ऐतिहासिक आणि जुनं आहे याचा अंदाज यावरून येऊ शकतो.
इस्रोच्या या संशोधनाबद्दल माहिती देणारा एक अहवाल 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
हा अभ्यास काय सांगतो आणि तो का महत्त्वाचा आहे ते आपण समजून घेऊ.
अभ्यासात काय सापडलं?
चंद्रावर आपलं यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन हे देश आपलं यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात यशस्वी झाले आहेत.
चंद्रयान-3 जिथं उतरलं त्या जागेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'शिवशक्ती पॉईंट' असं नाव दिलं.
हा शिवशक्ती पॉईंटच 3.7 अब्ज वर्ष जुना असल्याचं समोर आलं आहे.
2016 ला 'नेचर' नियतकालिकातच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात ग्रीनलँडमध्ये एकपेशी सूक्ष्मजिवांचे काही जीवाश्म सापडल्याचं सांगितलं आहे. हे जीवाश्म असेच 3.7 अब्ज वर्ष जुने आहेत.


हे सूक्ष्मजीव म्हणजे पृथ्वीवर राहणारे सर्वात जुने सजीव आहेत.
"चंद्र आणि पृथ्वी यांचे किती जवळचे संबंध आहेत हे समजण्यासाठी या शोधाची मदत होईल," मायिलसामी अन्नादुराई, इस्रोमधले एक माजी शास्त्रज्ञ सांगतात.

"चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणं हीच एक मोठी गोष्ट आहे. त्यात आता हा भाग भौगोलिकदृष्ट्या किती जुना आहे हे समजतंय. हा शोध इतका महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे की 'नेचर' सारख्या नियतकालिकात प्रसिद्ध झालाय," ते पुढे म्हणाले.

या बातम्याही वाचा:

संशोधन कसं केलं गेलं?
इस्रोच्या अहमदाबादमधल्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमधे काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. त्यासाठी शिव शक्ती पॉईंटच्या मॉर्फोलॉजिकल और टोपोग्राफिक वैशिष्ट्यांचा त्यांनी अभ्यास केला.
ॲडव्हान्स इमेजिंग इक्विपमेंट म्हणजे चांगल्या दर्जाच्या फोटोंचा वापर करून इस्रोचे वैज्ञानिक चंद्रावरच्या दगडांचा आणि खड्ड्यांचा सतत अभ्यास करतच असतात.
अतिशय हाय रिझोल्यूशन फोटोंमधून तयार झालेल्या डेटामधून वैज्ञानिक अवकाश यान उतरलं तिथल्या जमिनीचा आकार, पोत आणि इतर वैशिष्ट्यांचा अभ्यास करतात.
या अभ्यासातून त्या जागेचा एक भौगोलिक नकाशा बनवण्यातंही वैज्ञानिकांना यश आलं आहे.

फोटो स्रोत, ISRO
या नकाशात तीन वेगवेगळ्या प्रकारचे भूप्रदेश दिसतात. मोठे उंचवटे असलेला खडबडीत प्रदेश, गुळगुळीत सपाट प्रदेश आणि थोडे लहान उंचवटे असलेला खडबडीत प्रदेश असे हे तीन प्रकार.
यापैकी सपाट गुळगुळीत भूप्रदेशावर चंद्रयान-3 उतरलं आहे.
या जागेत नेमके किती आणि कसे खडक आहेत? हे तपासण्यासाठी एक सखोल सर्वेक्षण वैज्ञानिकांनी हाती घेतलं.
त्यात चंद्रयान उतरलं त्या जागेवरून दक्षिणेकडे 14 किमी अंतरावर 540 मीटर व्यास असलेला एक खड्डा सापडला.
त्याच्या आजुबाजुला पश्चिम दिशेला छोट्या दगडांचे तुकडे पडले होते. ते जवळच असलेल्या दुसऱ्या 10 मीटर व्यास असलेल्या खड्ड्याचे असावेत.
या छोट्या दगडांचा अभ्यास करून या भागाचं वय मोजलं आहे.
याच भागात 'शॉम्बर्गर' या चंद्रावरील खड्ड्याचे तुकडे असण्याचाही वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे?
या जागेचं वय समजून घेतल्यानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भौगोलिक इतिहासाबद्दल बरीच माहिती मिळणार आहे.
यासंदर्भात बीबीसी तमिळशी बोलताना शास्त्रज्ञ टी.वी. वेंकटेश्वरन म्हणाले, "चंद्रयान-3 या अवकाश यानाकडून मिळालेली ही अनपेक्षित माहिती आहे. धुमकेतूच्या वर्षावामुळे चंद्र तयार असा झाल्याची माहिती आपल्याला आधीपासूनच होती. पण त्याचा आणखी अभ्यास करून चंद्राचा भौगोलिक इतिहास समजून घेता येईल."
वेन्कटेश्वरन यांनी सांगितल्याप्रमाणे चंद्र कसा तयार झाला याचे तीन सिद्धांत मांडले जातात. पहिल्या सिद्धांतानुसार, चंद्र आणि पृथ्वी एकाचवेळी तयार झालेत.
दुसऱ्या सिद्धांतानुसार, चंद्र आणि पृथ्वी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी तयार झाले. काही कारणांनी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला आणि तिच्याच कक्षेत फिरू लागला.
तर तिसऱ्या सिद्धांतानुसार, पृथ्वीला दुसरा मोठा धुमकेतू येऊन धडकल्याने तिचा एक भाग वेगळा झाला आणि त्याचं चंद्रात रुपांतर झालं.

"या तिसऱ्या सिद्धांतावर जास्त विश्वास ठेवला जातो. पण इतर दोन सिद्धांत चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीत," वेंकटेश्वरन सांगत होते.
शिवाय, पृथ्वीकडे तोंड असलेल्या चंद्राच्या भागाची भौगोलिक रचना झाकलेल्या भागापेक्षा खूप वेगळी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
"चंद्रावर पृथ्वीसारखेच ज्वालामुखी होते हे आपल्याला माहीत आहे. पण ते कधी नष्ट झाले ते माहीत करून घ्यायचं आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातलं नेमकं नातं काय, चंद्र कसा तयार झाला आणि त्याची भौगोलिक रचना नेमकी कशी आहे याबद्दल अनेक सवाल आहेत. इस्रोच्या या शोधानं त्यातल्या अनेकांच्या उत्तराकडे जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे," वेंकटेश्वरन उलगडून सांगत होते.
'नेचर' नियतकालिकातच नोव्हेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, चंद्राच्या झाकलेल्या बाजुवर लाखो वर्षांपुर्वी एक ज्वालामुखी होता. हा अभ्यास अमेरिकन आणि चिनी वैज्ञानिकांनी केला होता.
आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीवरून चंद्रयान उतरलं तो भाग अतिशय पुरातन आहे एवढाच निष्कर्ष निघतो. पृथ्वीवर जीवन तयार होण्याशी त्याचा कोणताही संबंध लावता येणार नाही, असं वेंकटेश्वरन म्हणतात.
चंद्रयान-3 ची कामगिरी
चंद्रावर उतरलेल्या या अवकाश यानाचे दोन महत्त्वाचे भाग आहेत. एक, विक्रम लँडर हे अवकाश वाहन आणि दुसरं प्रागयान हा रोव्हर किंवा भटका रोबोट.
इस्रोने लँडरवर तीन तर रोव्हरवर दोन उपकरणं बसवली आहेत.
त्यामाध्यमातून चंद्राच्या ध्रुवावर सापडणारी रसायनं, वाळू, तापमान, प्लास्मा आणि भूकंपाच्या लाटा अशी भरपूर माहिती पृथ्वीवर भारताकडे पाठवली जाते.

फोटो स्रोत, ISRO
"हे सगळं मानवजातीला पहिल्यांदा समजत आहे. याआधी कुणीही केली नाही अशी कामगिरी चंद्रयान-3 करतंय," वीरा मुथूवेल, चंद्रयान-3 प्रकल्पाच्या संचालक, या प्रकल्पााला एक वर्ष झाली तेव्हा बीबीसीशी बोलताना सांगत होत्या.
सल्फरचा शोध, भुकंप, ध्रुवावरच्या मातीचं तापमान आणि वातावरणातील प्लाझ्मा असे अनेक महत्त्वाचे शोध लावत चंद्रयान- 3 ने मोठी कामगिरी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











