चांद्रयान-3 मोहिमेच्या एका वर्षानंतर भारतीय शास्त्रज्ञांना नेमकं काय-काय उलगडलं?

चंद्राचा पृष्ठभाग

फोटो स्रोत, ISRO

फोटो कॅप्शन, भारताच्या चांद्रयान मोहिमेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लाव्हारसामुळे तयार झालेल्या थराचे अवशेष आढळून आले.
    • Author, जॉर्जिना रन्नार्ड
    • Role, विज्ञान विषयक प्रतिनिधी

चंंद्राचा दक्षिण ध्रुव कधी काळी वितळलेल्या अवस्थेतील खडकांनी (म्हणजेच लाव्हारसाने) व्यापलेला होता, असा नवा खुलासा शास्त्रज्ञांनी केलाय.

या नव्या खुलाशामुळं 45 अब्ज वर्षांपूर्वी लाव्हारसातून चंद्राचं आवरण तयार झालं असल्याच्या सिद्धांताला बळकटी मिळाली आहे.

भारताने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवत इतिहास रचला होता.

इस्त्रोच्या या अवकाश मोहिमेला चांद्रयान 3 असं नाव दिलं गेलं होतं. या मोहिमेतून आता शास्त्रज्ञांना लाव्हारसाच्या महासागराचे अवशेष सापडले आहेत.

याआधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देशाला पोहचणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळं चंद्राचा हा भाग आतापर्यंत अज्ञात आणि अनाकलनीय होता. चांद्रयान 3 मोहिमेतून भारतीय शास्त्रज्ञांनी या गूढ भागाचं कोडं सोडवायला सुरुवात केली आहे.

चांद्रयान 3 च्या मोहिमेतून समोर आलेल्या या नव्या माहितीमुळं चंद्राच्या निर्मितीबाबत सांगितल्या जाणाऱ्या लुनार मॅग्मा ओशन थेअरी सिद्धांतावर (Lunar Magma Ocean theory) शिक्कामोर्तब झाला आहे.

लुनार मॅग्मा ओशन सिद्धांतानुसार 45 अब्ज वर्षांपूर्वी चंद्राची उत्पत्ती होत असताना हा भाग लाव्हारसाने व्यापला गेला होता‌.

कालांतराने तो थंड होत गेला आणि वेगवेगळे थर तयार झाले. वजनाने हलका असलेला फेरोअन एनोर्थोसाइट (ferroan anorthosite) खडक वरच्या थरात येऊन स्थिरावला‌. याच फेरोअन एनोर्थोसाईट या लाव्हा खडकांपासून चंद्राचं कवच तयार झालं.

चांद्रयान 3 च्या शास्त्रज्ञांना या मोहीमेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर याच फेरोअन एनोर्थोसाईट खडकाचे पुरावे आढळून आले आहेत.

आम्हाला मिळालेल्या या पुराव्यांवरून चंद्राची उत्पत्ती आणि उत्क्रांती नेमकी कशी झाली, हे नेमकेपणानं सांगता येणार असल्याचं, डॉ. संतोष वडावले म्हणतात.

संतोष वडावले हे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये शास्त्रज्ञ आहे. याच पुराव्यांना समोर ठेवून त्यांनी बुधवारी नेचर या वैज्ञानिक मासिकात आपला संशोधन प्रबंधही सादर केला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याआधी चंद्राला व्यापणाऱ्या लाव्हारस महासागराचे पुरावे अमेरिकेच्या अपोलो अवकाश मोहिमेत सापडले होते. पण हे पुरावे पुरेसे स्पष्ट नव्हते. शिवाय अपोलोचे निरिक्षण फक्त चंद्राच्या मध्यभागापुरते मर्यादित होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण (landing) करून तिथले भूशास्त्रीय पुरावे गोळा करणारा भारत हा एकमेव देश आहे.

चांद्रयान 3 वर देखरेख ठेवणं आणि त्याला सूचना देण्याची जबाबदारी प्राध्यापक वडावले व त्यांच्या सहकाऱ्यांवर होती.

याबाबत सांगताना ते म्हणाले की, “ते दिवस फार रोमांचक होते. कंट्रोल रूममध्ये बसून चंद्राच्या पृष्ठभागावरून रोव्हर फिरवण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी संधी होती.’’

23 ऑगस्ट, 2023 रोजी भारताच्या ‘चांद्रयान - 3’ मोहिमेने इतिहास घडवला. विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. या यानातून प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी खाली उतरवलं गेलं.

प्रग्यान रोव्हरने पुढचे 10 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमंती केली. प्राध्यापक वडावले आणि त्यांचे सहकारी 24 तास या रोव्हरवर देखरेख ठेवून त्याला सूचना (कमांड) देत होते.

चंद्राच्या दक्षिणेकडे 70 अंश वृत्तावरील पृष्ठभागावरची जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा ते प्रयत्न करत होते.

ही माहिती गोळा करण्यासाठी इस्त्रोने एक खास रोबोट बनवलेला होता. हा रोबोट उणे 10 अंश ते 70 अंश सेल्सिअसच्या तापमानात टिकाव धरू शकत होता.

खडकाळ आणि धुळीच्या पृष्ठभागावर सूचना न मिळाल्यास स्वतः स्वतःचे निर्णय घेऊन मार्गक्रमण करण्याची क्षमता या रोबोटमध्ये विकसित करण्यात आली होती.

प्रग्यान रोव्हर

फोटो स्रोत, ISRO

फोटो कॅप्शन, चांद्रयान 3 मोहिमेत प्रग्यान रोव्हरने 2023 च्या ऑगस्ट महिन्यात तब्बल 10 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भ्रमंती करत महत्वपूर्ण माहिती गोळा केली.

प्रग्यान रोव्हरवर बसवण्यात आलेल्या या रोबोटने चंद्राच्या पृष्ठभागावरील 23 वेगवेगळ्या ठिकाणच्या मातीचं निरिक्षण केलं. चंद्राच्या मातीची मूलभूत रचना अभ्यासण्यासाठी अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (alpha particle X - ray spectrometer) हे उपकरण प्रग्यान रोव्हरमधील या रोबोटवर बसवण्यात आलं होतं.

चंद्राच्या पृष्ठभागावरील पदार्थांमधली अणूरेणूंची रचना अभ्यासून उत्पन्न होणारी उर्जा मोजायचं काम अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर करतं. चंद्राच्या पृष्ठभागाखाली कोणती खनिजं दडलेली आहेत, याचा अंदाज त्यावरून लावता येतो.

40 अब्ज वर्षांपूर्वी एक अजस्त्र उल्का चंद्रावर येऊन आदळली होती, याचा उलगडाही शास्त्रज्ञांना या मोहिमेतून झाला. चंद्राच्या आजच्या भूशास्त्रीय रचनेवर या घटनेचा मोठा प्रभाव आहे.

या उल्कापातातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एटकेन (Aitken) नावाचे महाकाय खोरे (basin) तयार झाले. तब्बल 2500 किलोमीटर रूंद पसरलेले एटकेन खोरे हे सौर यंत्रणेतील सर्वात मोठे विवर (crater) आहे.

ज्या ठिकाणी भारताचं प्रग्यान रोव्हर अवतरलं होतं तिथून हे विवर 350 किलोमीटर लांब होतं.

पण, इथे मॅग्नेशियमचे अवशेष शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं. या उल्कापाताच्या धक्क्यामुळे चंद्राच्या आतल्या थरातील सामग्री उसळून वर आली.

लाल रेष

अंतराळासंबंधी इतर काही महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा :

लाल रेष

‘’या लघुग्रहानं चंद्राला मारलेली धडक इतकी जोरदार होती की, या एटकेन खोऱ्याच्या भूगर्भातील काही पदार्थ उसळूनवर आले आणि भूपृष्ठावर स्थिरावले. आम्हाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भूपृष्ठावर सापडलेलं मॅग्नेशियम याचाच परिणाम आहे,” असं भारताच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे प्रमुख प्राध्यापक अनिल भारद्वाज यांनी सांगितलं.

चांद्रयान 3 या मोहिमेतून चंद्राबद्दल बरीच मौल्यवान माहिती आपल्यासमोर आलेली आहे. लाव्हारहित महासागराच्या अस्तित्वाचा पुरावा ही त्यापैकीच एक आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा अंश शोधणे हे या मोहीमेचं अंतिम लक्ष्य आहे.

हा शोध म्हणजे चंद्रावर मानवी जीवन शक्य करून दाखवण्याचं मानवजातीनं बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जगभरातील अवकाश संस्था यासाठी प्रयत्न करत आहेत.

इस्त्रो ही भारतीय अवकाश संस्था 2025 किंवा 2026 साली पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याची मोहीम आखत आहे. चंद्राच्या भूपृष्ठावरील पदार्थ वेचून ते पृथ्वीवर परत आणणे आणि मग त्यांचा अभ्यास करणे, हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.