छत्तीसगड: हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर आरोपीचं घर जाळलं, संपूर्ण प्रकरण काय?

हेड कॉन्स्टेबल तालिब शेख आणि त्यांची पत्नी मेहू फैज

फोटो स्रोत, FB/ TALIB SHAIKH

फोटो कॅप्शन, हेड कॉन्स्टेबल तालिब शेख आणि त्यांची पत्नी मेहू फैज
    • Author, आलोक पुतूल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, रायपूरहून

छत्तीसगडमध्ये हेड कॉन्स्टेबलने कारवाई केल्यानंतर एका व्यक्तीने पोलीस कॉन्स्टेबलची पत्नी आणि मुलगी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. 13 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्यानंतर छत्तीसगडमधील सूरजपूर येथे निदर्शनं सुरू असून आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाची चर्चा देशभर होताना दिसत आहे. काय आहे हे प्रकरण?

छत्तीसगडच्या सूरजपूरमध्ये हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि त्याच्या मुलीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी कुलदीप साहू आणि आणखी चार लोकांना अटक केली आहे.

बुधवारी एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष सी.के.चौधरी यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय विश्वकर्मा उर्फ गोल्डी, फूल सिंह उर्फ रिंकू सिंह आणि सूरज साहू यांनाही अटक करण्यात आली आहे.

एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष सी.के.चौधरी यांच्या अटकेवर छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणाला पहिल्या दिवसापासूनच राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे.

अटकेच्या एक दिवस आधी सी.के.चौधरी यांनी एक व्हीडिओ जारी करून सांगितलं होतं की भाजप सरकार या प्रकरणी काँग्रेसला उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने हत्येचा आरोपी कुलदीप साहूच्या घराला आणि गोदामाला आग लावली होती.

जमावाने अनेक गाड्याही जाळल्या आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही मारहाण केली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सोमवारी (14 ऑक्टोबर) पोलिसाच्या पत्नी आणि मुलीच्या हत्येच्या बातमीनंतर या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अरुण साव म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत राज्य सरकार अतिशय गंभीर आहे, जिथेही अशा प्रकारच्या घटना होत होत तिथे योग्य कारवाई केली जात आहे. सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही.”

संपूर्ण प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री (13 ऑक्टोबर) सूरजपूर मध्ये कुलदीप साहू नावाच्या एका व्यक्तीबरोबर पोलिसांचा वाद झाला. त्यानंतर कुलदीपने एका दुकान उघडलं आणि तेलाची कढई हवाल घनश्याम सोनवानीवर ओतली.

पोलिसांच्या मते जेव्हा पोलिसांनी कुलदीपला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पळाला.

सूरजपूरचे पोलीस अधीक्षक एम.आर. अहिरे म्हणाले, “रात्री कुलदीपला शोधायला हेड कॉन्स्टेबल तालिब शेख निघाले तेव्हा तलवार घेऊन फिरत असलेल्या कुलदीप साहूने तालिब शेख यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. तालिब शेख यांनी याआधीही कुलदीपच्या विरोधात कारवाई केली होती. त्यामुळे तो नाराज होता.”

आरोपी कुलदीप साहू

फोटो स्रोत, FB/ KULDEEP SAHU

फोटो कॅप्शन, आरोपी कुलदीप साहू

पोलिसांच्या मते जेव्हा तालिब शेख त्यांची ड्युटी संपवून घरी आले तर त्यांनी पाहिलं की त्यांच्या घराचा दरवाजा तुटला आहे. घरात रक्त पसरलं होतं. त्यांची पत्नी मैहू फैज आणि 16 वर्षांची मुलगी घरी नव्हती. तालिब शेख यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पत्नी आणि मुलीचा शोध सुरू झाला.

पोलीस अधीक्षक अहिरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की शहराच्या विविध भागात तपास सुरू असताना कारमधून पळत असलेल्या कुलदीप सिंहच्या गाडीवर त्यांनी गोळी झाडली. तरीही तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. “कारमध्ये आम्हाला रक्ताचे डाग सापडले होते,” अहिरे म्हणाले.

सोमवारी सकाळी (14 ऑक्टोबर) तालिब शेख यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह घरापासून 5 किलोमीटर दूर असलेल्या जूर-पीढा मार्गावर एका नाल्यात सापडला.

आरोपी ‘सराईत गुन्हेगार’ असल्याची पोलिसांची माहिती

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तालिब शेख यांच्या पत्नी आणि मुलीच्या हत्येची माहिती मिळताच परिसरात तणाव निर्माण झाला.

त्यानंतर शेकडोंच्या संख्येने जमावाने सूरजपूर शहर बंद केलं आणि कुलदीप साहूच्या घराला आणि गोदामाला आग लावली. जमावाने अनेक गाड्यांची तोडफोड केली आणि आग लावली.

जमावाला पांगवायला गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यासमवेत अन्य अधिकाऱ्यांना जमावाच्या रोषाचा सामना करावा लागला. काही अधिकाऱ्यांबरोबर धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची माहिती आहे.

कुलदीप साहूबद्दल बोलताना पोलीस अधीक्षक एम. आर. अहिरे म्हणाले, “हा पोलिसांच्या कुटुंबावर झालेला हल्ला आहे आणि दहशतवादी कृत्य आहे. पोलीस हे अजिबात सहन करणार नाही.”

रद्दी गोळा करण्याचं काम करणारा कुलदीप साहू हा ‘सराईत गुन्हेगार’ असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी सांगितलं की गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कुलदीप साहूला छत्तीसगडच्या सूरजपूर, कोरबा, कोरिया. बलरामपूर, रामानुगंज, मनेंद्रगढ-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्याशिवाय मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यांतून तडीपार केलं होतं.

या जिल्ह्यात त्याला प्रवेशबंदी होती. मात्र तडीपारीचा काळ पूर्ण होण्याआधी सूरजपूरला परत आल्यामुळे कुलदीप साहूला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कुलदीप जामिनावर होता.

ताज्या घटनेनंतर कुलदीप साहूच्या कुटुंबीयांनी सांगितलं की गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात कुलदीप साहूचा संदीप साहूचं काही लोकांशी भांडण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी संदीप साहूला पोलिसांनी कथितरित्या बेदम मारहाण केली. त्यानंतर कुलदीप पोलिसांवर नाराज होता.

लाल रेष

छत्तीसगड संदर्भातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष

‘कायदा नावाची काही गोष्ट राहिलेली नाही’

सूरजपूरच्या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी एक्स वर लिहिलं, “सूरजपूर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि मुलीची हत्या ही छत्तीसगडमधील कमकुवत कायदा सुव्यवस्था ही तिथल्या बिघडलेल्या परिस्थितीची द्योतक आहे. पोलिसांचंच कुटुंब सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं किती कठीण आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. ते कायम सुशासनाचा भोंगा वाजवत राहतात आणि त्यांच्या राज्यात जनता अजिबात सुरक्षित नाही.”

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, “छत्तीसगडमध्ये हे काय होत आहे? शांततेचं नंदनवन म्हणवलं जाणाऱ्या आमच्या प्रदेशात कायदा सुव्यवस्था संपलेली दिसत आहे. सुरजपूरमध्ये हेड कॉन्स्टेबलच्या पत्नीची आणि मुलीची हत्या केली. त्याआधी एका हवालदारावर गरम तेल ओतलं होतं. कायदा सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास इतका उडाला आहे की ते स्वत: न्याय करायला निघाले आहेत. घर जाळल्याच्या घटना ऐकून मी व्यथित झालो आहे.”

ते पुढे म्हणाले, “कवर्धाच्या लोहारीडीहमध्ये सुद्धा हेच झालं होतं. याआधी लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला आग लावली होती. मी सगळ्यांना शांततेचं आवाहन करतो आणि कायदा हातात घेऊ नका अशी विनंती करतो. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात येण्याची अपेक्षा आहे.”

भूपेश बघेल म्हणाले की, जनता आता स्वतःचा न्यायनिवाडा करायला निघाली आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भूपेश बघेल म्हणाले की, जनता आता स्वतःचा न्यायनिवाडा करायला निघाली आहे.

छत्तीसगड भाजपाच्या एका हँडलवरून केलेल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं की राज्याची अंतर्गत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेसमोर काँग्रेस हेच सर्वांत मोठं आव्हान आहे.

त्यात म्हटलं होतं, “काँग्रेसशी धागे दोरे नाहीत अशी कोणतीच दुर्घटना राज्यात नाही. राज्याची अंतर्गत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेसमोर काँग्रेस हेच मोठं आव्हान आहे. काँग्रेस राज्यात अराजक माजवण्याचं काम करत आहे. प्रत्येक गुन्हेगाराची ओळख पटवून त्याला कडक शिक्षा देण्याचा संकल्प सरकारने केला आहे.”

त्यावर काँग्रेस प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला म्हणतात, “पहिल्या दिवसापासून या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुलदीप साहू काँग्रेसशी निगडित असल्याचं म्हटलं होतं मात्र त्यात भाजप सरकारला यश मिळालं नाही तर कुलदीपला अटक केल्यानंतर एनएसयूआयच्या जिल्हाध्यक्षाला अटक केली. ते सतत सूरजपूरमध्येच होते. गुन्हेगार एकामागोमाग एक गुन्हे करत राहिले आणि पोलीस त्यांना संधी देत राहिले. आता आपल्या जबाबदारीपासून पळण्यासाठी ते काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. ”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.