KBC : 'करोडपती' बनल्यानंतर किती बदललं बस्तरच्या शिक्षिकेचं आयुष्य?

फोटो स्रोत, SONY
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रायपूरहून
छत्तीसगडमधील बस्तर नक्षलग्रस्त भाग म्हणून परिचयाचा आहे. मात्र, यावेळी केबीसी सीझन 12 मध्ये कोट्यधीश बनलेल्या अनुपा दास यांच्यामुळे बस्तरचं नाव चर्चेत आहे.
अनुपा दास म्हणतात, "मी गेल्या 20 वर्षांपासून एखाद्या स्पर्धकाप्रमाणे 'कौन बनेगा करोडपती'ची तयारी करत होते. अखेर मी केबीसीमध्ये पोहोचले. इतकंच नाही तर एक कोटी रुपये जिंकलेसुद्धा. माझ्यासाठी हे स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नाही."
बस्तरमधल्या एका शाळेत शिक्षिका असणाऱ्या अनुपा केबीसी सीझन 12 मध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या तिसऱ्या महिला स्पर्धक आहेत. याआधी याच सीझनमध्ये दिल्लीच्या नाझिया नसीम आणि हिमाचल प्रदेशातील कांगडाच्या आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा यांनी एक कोटी रुपये जिंकले होते.

फोटो स्रोत, SONY
42 वर्षांच्या अनुपा दास बस्तर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या जगदलपूरमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या घराजवळच शाळा आणि एक पुस्तकालय होतं. पुस्तकालयात त्या नेहमी जात.
प्रशासकीय स्पर्धा परीक्षेची तयारी
अनुपा यांनी भौतिक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. गेल्या 13 वर्षांपासून त्या आसनाच्या उच्च माध्यमिक शाळेत भौतिकशास्त्र विषय शिकवतात.
त्यांचे वडील दिनेश चंद्र दास ज्योतिषाचार्य आहेत. आई सरस्वती दास काही वर्षांपूर्वीच बँकेतून निवृत्त झाल्या आहेत.

फोटो स्रोत, ANUPA DAS
जगदलपूरमध्ये आई-वडिलांसोबत राहणाऱ्या आणि तीन बहिणींमध्ये सर्वात थोरल्या असणाऱ्या अनुपा दास यांनी सुरुवातीला प्रशासकीय स्पर्धा परीक्षांचीही तयारी केली. मात्र, त्यात त्यांना यश मिळालं नाही.
त्या म्हणतात, "शिक्षकी व्यवसाय माझ्यासाठी खूप सन्माननीय होता. शिवाय, मला लहान मुलांची आवड आहे. म्हणून मी या व्यवसायात आले."
जेव्हा लग्न मोडलं…
2009 साली अनुपा यांचं लग्न झालं. मात्र, महिनाभरातच ते लग्न तुटलं.
अनुपा संगतात, "तो माझ्यासाठी अत्यंत वाईट काळ होता. त्यावेळी खूप कमी लोकांनी आम्हाला धीर दिला. मला आणि माझ्या कुटुंबालाच दोष देण्यात आला. माझे आई-वडील, कुटुंबातले इतर सदस्य आणि शाळेतील विद्यार्थ्यांमुळेच मी सामान्य आयुष्याकडे पुन्हा वळू शकले. लग्नशिवायसुद्धा आयुष्य असू शकतं, हे मला कळलं. आम्ही तो कठीण काळ अनुभवला आणि अनेक कठीण परीक्षांनाही सामोरे गेलो. कदाचित त्यामुळेच मला केबीसीपर्यंत पोहोचण्याचा आणि जिंकण्याचा मार्ग दिसला."

फोटो स्रोत, SONY
प्रशासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतानाच केबीसीने त्यांचं लक्ष वेधलं. केबीसीसाठी निवड झाल्याचं कळताच घरातल्या सर्वांनाच आनंद झाल्याचं त्या सांगतात. मात्र, निवड झाल्यानंतर हॉटसीटपर्यंतचा मार्ग सोपा नव्हता.
केबीसमध्ये हॉटसीटपर्यंत येण्यासठी त्यांना दोन दिवस वाट बघावी लागली. त्या म्हणतात, "मी गेल्या 20 वर्षांपासून केबीसीची तयारी करत होते. मात्र, प्रतिक्षेचे हे दोन दिवस त्या 20 दिवसांपेक्षाही मोठे वाटले."
फास्टेस्ट फिंगर राऊंडच्या पहिल्या टप्प्यात त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. दुसऱ्या टप्प्यात तर त्यांचं उत्तर चुकलं.
अनुपा सांगतात, "दुसऱ्या टप्प्यात जी स्पर्धक हॉट सीटवर पोहोचली ती प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप वेळ घेत होती. ती बरंच बोलतही होती. त्यामुळे मला संधी मिळेल की नाही, अशी धाकधूक वाटत होती. तिसरा फास्टेस्ट फिंगर टप्पा झाल्यवर मी मान खाली घालूनच बसले होते. अमितजींनी माझं नाव घेतलं तेव्हा मी वर बघितलं. माझा विश्वासच बसत नव्हता."
'7 कोटी रुपयांसाठी प्रयत्न केले नाही'
अनुपा दास यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली. मात्र, दहाव्या प्रश्नाला त्यांना दोन लाईफ लाईन वापराव्या लागल्या. स्कीट आणि ट्रॅप या ऑलंपिकमधल्या कुठल्या क्रीड प्रकाराचा भाग आहेत, या प्रश्नावर त्यांनी शूटिंग असं उत्तर दिलं आणि त्यांचं उत्तर योग्य होतं.
एक कोटी रुपये जिंकल्यानंतर सात कोटी रुपयांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तराबाबत साशंकता असल्याने त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, SONY
त्या म्हणतात, "सात कोटी रुपयांच्या प्रश्नाबाबत मला वाईट वाटत नाही. मला जे उत्तर वाटत होतं ते योग्य होतं, तरीही मी ते दिलं नाही, याचं दुःख नाही. माझा स्वभाव जरा चंचल आहे. मात्र, त्या दिवशी मी शांतपणे खेळले. सात कोटींच्या प्रश्नाच्या उत्तराबाबत मी साशंक होते आणि म्हणून मी तो प्रश्न सोडला."
अनुपा पुढे म्हणतात, "त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं होतं, असं अनेकांनी मला म्हटलं. पण खेळत असताना मला सारखं वाटत होतं की 1 कोटी ते 7 कोटींमधलं अंतर कमी आहे आणि 3 लाख 20 हजार आणि 1 कोटी यातलं अंतर खूप जास्त आहे. त्यामुळे तशा परिस्थिती मला जे मिळालं असतं त्यावर समाधानी वाटण्यापेक्षा गमावल्याचं दुःख जास्त वाटलं असतं. मला ते दुःख नको होतं. मात्र, जे उत्तर मला वाटत होतं तेच बरोबर होतं याचाही मला आनंद आहे."
केबीसीच्या शूटिंगनंतर अनुपा बस्तरला परतल्या. त्यांच्या आईला कॅन्सर आहे. त्यांच्या उपचारासाठी त्या सध्या मुंबईत आहेत.
याशिवाय, आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या विद्यार्थिनींची मदत करण्याची त्यांची इच्छा आहे. अनुपा यांना शिकण्याची-शिकवण्यााची गोडी आहे. त्यांनाा मुलांसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र, सध्या त्यांचं सगळं लक्ष आईच्या उपचारावर आहे.
"नक्षलवाद ही बस्तरची ओळख नाही"
अनुपा दास म्हणतात, "सध्या माझ्या आईची प्रकृती बरी नाही आणि सध्या हेच माझं प्राधान्य आहे. येणारी पाच-दहा वर्षं किंवा कितीही वर्षं लागली तरी ती पूर्णपणे बऱ्या होत नाही तोवर मी तिची सुश्रुषा करेन. शिवाय, माझे विद्यार्थी आणि माझ्या बहिणींची मुलं हे देखील माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत."
केबीसीमध्ये 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले? या प्रश्नाचं उत्तर देताना अनुपा म्हणतात, "पूर्वी लोक माझ्याकडे दुर्लक्ष करायचे आणि आता मी नसले तरीही माझ्याविषयी बोललं जातं. हा सध्या मोठा बदल झालाय."

फोटो स्रोत, SONY
अनुपा यांचा कर्मावर विश्वास आहे. कर्म केलं तर नशीबही साथ देतं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या म्हणतात, "आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे केलेला प्रयत्न तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर नेतो. फक्त प्रयत्न प्रामाणिक असायला हवे आणि धीर ठेवायला हवा. यश मिळायला उशीर होऊ शकतो, मात्र ते मिळतंच."
देशभरात बस्तरची जी नकारात्मक प्रतिमा आहे ती बदलायला हवी, असंही अनुपाा यांना वाटतं.
त्या म्हणतात, "नक्षली हिंसाचार बस्तरविषयीचा अपप्रचार आहे. माझं बस्तर नक्षलवादी हिंसाचाराने होरपळलेल्या बस्तरहून वेगळा आहे. बस्तरचं नाव घेताच मला वाऱ्याची गार झुळूक आठवते. हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इथे शांत आणि आनंदी लोक राहतात. काही भागात हिंसाचार आहे. मात्र, ती संपूर्ण बस्तरची ओळख असू शकत नाही. ही चुकीची प्रतिमा बदलण्याची गरज आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








