छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 32 कथित माओवाद्यांचा मृत्यू, पोलिसांनी काय सांगितले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आलोक पुतुल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 32 कथित माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या वाढू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे.
रात्रीच्या वेळी शोधकार्यात अडथळे येत असल्यामुळे मृतांचा नेमका आकडा समोर आलेला नाही.
गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये भाजपचे विष्णू देव साय मुख्यमंत्री बनल्यानंतर, राज्यात माओवाद्यांच्या विरोधातील मोहिमेला वेग दिला आहे.
गृहमंत्री विजय शर्मा यांनी माओवाद्यांसमोर शांततेचा प्रस्ताव ठेवला तर त्याचवेळी माओवाद निर्मुलनासाठी सुरु असलेल्या हा मोहिमेलाही बळ देण्यात आलं आहे.
आत्तापर्यंत छत्तीसगढमध्ये 171 कथित माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. 2000 साली छत्तीसगढ राज्याची स्थापना झाल्यापासून, एका वर्षात मारल्या गेलेल्या माओवाद्यांची ही सगळ्यात मोठी संख्या आहे.


याच वर्षी 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यातील कालपर येथे झालेल्या चकमकीत 29 संशयित माओवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या चकमकीच्या घटनेनं हा आकडा मागे पडला आहे.

फोटो स्रोत, ALOK PUTUL
बस्तर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी काय सांगितलं?
बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, ही चकमक दुपारी 1 वाजता झाली.
अबुझमाडमधील थुलाथुली आणि नेंदूर गावांमध्ये ही चकमक झाली. हे ठिकाण नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर आहे.
ते म्हणाले की, "नक्षलविरोधी मोहिमेवर असताना पोलिसांच्या पथकाची माओवाद्यांशी गाठ पडली. या चकमकीत पोलीस जिल्हा राखीव रक्षक आणि एसटीएफचे जवान सहभागी झाले होते."
पोलिसांनी सांगितलं की, चकमकीनंतर माओवाद्यांच्या मृतदेहांसोबत शस्त्रांचा साठा देखील सापडला आहे. यामध्ये एके-47 रायफल आणि एसएलआरचा समावेश आहे.

फोटो स्रोत, TWITTER
मुख्यमंत्री विष्णू देव साय काय म्हणाले?
मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या कारवाईसाठी सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे. राज्यातील हे संकट दूर करण्यासाठी डबल इंजिन सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करून लिहिलं की, "नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठीची आमची लढाई, हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. आमचं डबल इंजिन सरकार यासाठी कटिबद्ध आहे. राज्यातून नक्षलवाद संपवणं हे आमचं लक्ष्य आहे."
मार्च 2026पर्यंत माओवाद संपवण्याचं लक्ष्य
गृहमंत्रालयाने देशातील माओवाद्यांच्या हिंसाचारात सातत्याने घट होत असल्याचा दावा केला आहे.
गृह मंत्रालयाच्या मते, 2004 ते 2014 पर्यंत माओवादी हिंसाचाराच्या 16,463 घटना होत्या आणि मागच्या दहा वर्षांमध्ये म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत 7,744 घटना घडल्या आहेत. म्हणजेच या चकमकींमध्ये 53 टक्क्यांनी घट झाली आहे.
2004 ते 2014 या काळात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकींमध्ये 6617 नागरिक आणि सुरक्षा दलातील सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये मृतांच्या आकड्यात 70 टक्के घट झाली असून, 2014 ते 2024मध्ये 2004 नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
त्याचप्रमाणे, सुरक्षा दलांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणांमध्ये 73 टक्के आणि नागरिकांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणांमध्ये 69 टक्के घट झाली आहे.
गृह मंत्रालयाचा दावा आहे की, 2010 मध्ये देशातील 107 जिल्हे माओवादाने प्रभावित होते. ती संख्या आता 42 पर्यंत कमी झाली आहे. पोलीस ठाण्यांची संख्या 456 होती, त्यांमध्ये नवीन 100 पोलीस ठाण्यांची भर घालण्यात आली आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
असं असलं तरी माओवादग्रस्त पोलीस ठाण्यांची संख्या 171 पर्यंत कमी झाली आहे. 2010 मध्ये माओवादामुळे 1005 लोकांचा मृत्यू झाला होता, 2023 मध्ये 138 लोकांचा मृत्यू झाला आहे.
या वर्षी ऑगस्ट महिन्यात रायपूरमध्ये माओवादग्रस्त राज्यांच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी माओवाद पूर्णपणे संपवण्यासाठी मार्च 2026 ही तारीख निश्चित केली होती.
या बैठकीत अमित शहा म्हणाले होते की, "आता डाव्या अतिरेक्यांच्या समस्येवर कठोर रणनीती आणि निर्दयीपणे हल्ला करण्याची वेळ आली आहे. या डाव्या अतिरेकवादामुळे आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेला धोका आहे, असे आपण सर्व मानतो. आमच्यासाठी हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे."
अमित शाह यांनी दावा केला होता की, "2022 मध्ये चार दशकांत पहिल्यांदाच मृतांचा आकडा 100 च्या खाली गेला. 2014 ते 2024 या काळात डाव्या दहशतवाद्यांकडून सर्वात कमी घटनांची नोंद झाली. याशिवाय टॉप 14 नक्षलवादी नेत्यांना ठार करण्यात आलं. याशिवाय सामान्य लोकांमध्ये डाव्या कट्टरतावादी विचारसरणीच्या जागी विकासाभिमुख विचार रुजवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत."
अमित शहा म्हणाले होते की, "मला विश्वास आहे की आमचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आम्हाला मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षल समस्येपासून पूर्णपणे मुक्त करायचे आहे."
2024 मधील मोठ्या चकमकी
- 2 सप्टेंबर रोजी दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सहा महिलांसह नऊ कथित माओवादी मारले गेले.
- 2 जुलै रोजी बस्तरच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच कथित माओवादी ठार झाले.
- 7 जून रोजी नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सात कथित माओवादी ठार झाले आणि तीन सैनिक जखमी झाले.
- 15 जून रोजी नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत आठ कथित माओवादी आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) जवान मारले गेले.

फोटो स्रोत, SALMAN RAVI/BBC
- 5 जून रोजी नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सहा कथित माओवादी ठार झाले.
- 23 मे रोजी सुरक्षा दलांनी नारायणपूर-विजापूर सीमेवर सात कथित माओवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता.
- पोलिसांनी सांगितले की, 10 मे रोजी बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीत 12 कथित माओवादी मारले गेले.
- 30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर तीन महिलांसह किमान 10 कथित माओवादी मारले गेले.
- 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 29 कथित माओवादी ठार झाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











