गडचिरोली नक्षलवादी हल्ला : 'अनेक प्रमोद कर्तव्यावर गेले, मात्र कधी परतलेच नाहीत'

फोटो स्रोत, BBC/SharadBadhe
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
प्रमोद आता कधीच परतणार नाहीत. शुक्रवारी त्यांच्या मित्रांनी त्यांच्या अस्थी वैनगंगा नदीत विसर्जित केल्या. घाटावर जमलेले मित्र आणि आप्तेष्ट प्रमोद भोयर यांना अखेरचा निरोप देत होते.
इथून दोन किलोमीटर दूर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा गावावर दुःखाचं सावट आहे. याच गावात प्रमोद भोयर यांचं घर आहे. घरात बरीच गर्दी जमलीय.
1992च्या सप्टेंबर महिन्यातही कुरखेडामध्ये नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारचा एक स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटात या गावाने प्रदीप भोयर यांना गमावलं होतं.
प्रदीप महाराष्ट्र पोलिसात शिपाई होते आणि प्रमोदसुद्धा.
2 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
योगायोग म्हणजे प्रदीप हे प्रमोद यांचे काका होते. ही करुण कथा इथंच संपत नाही. प्रमोद यांच्या कुटुंबात दोन वर्षांपासून एकामागोमाग एक मृत्यू होत आहेत. आधी त्यांचे वडील महादेवजी आणि त्यानंतर भाऊ रवींद्र यांचा मृत्यू झाला.
प्रमोद यांचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. तीन महिन्यांपूर्वी त्यांना जुळी मुलं झाली. पण, त्यातलं एक बाळ जन्मताच दगावलं.
1 मे रोजी ते नेहमीप्रमाणे घरून कामावर जायला निघाले. मात्र, यानंतर ते घरी कधीच परत येणार नाहीत, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

फोटो स्रोत, BBC/SharadBadhe
गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यादिवशी वडसा गावातल्या शोकाकुल गावकऱ्यांनी आपली सर्व दुकानं बंद ठेवली आणि अंत्यदर्शनासाठी गर्दी केली.
घरी प्रमोद यांच्या आईवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आधी पती आणि त्यानंतर दोन तरणीताठी पोरं गमावल्याचं दुःख आता त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय.
त्यांना काही विचारण्याची माझीही हिम्मत झाली नाही. काही वेळाने स्वतःला थोडं सावरून त्या म्हणाल्या, "आता आमचं काय होणार? आमच्या घरात आता कुणीच कमावणारं नाही."
आत स्वयंपाकघरात प्रमोदच्या पत्नीला शेजारपाजारच्या बायकांनी गराडा घातला होता. त्या त्यांना धीर देत होत्या. त्यांच्या मांडीतलं तीन महिन्यांचं बाळही मोठमोठ्याने रडत होतं. त्यांना राहून राहून चक्कर येत होती.
...मग चूक कुणाची?
घरी प्रमोद यांचे मित्रही आले होते. ते सांगत होते, "आदल्या दिवशीच आम्ही प्रमोदला म्हटलं होतं, पम्या बरेच दिवस झाले तू सुट्टी घेतलेली नाही. आता महिनाभराची सुट्टी घे. दुसऱ्या दिवशी रजेचा अर्ज करणार असल्याचं तो म्हणाला होता. पण, आमचा पम्या आता कधीच परत येणार नाही. त्याने या जगातूनच कायमची सुटी घेतलीय."

फोटो स्रोत, BBC/SharadBadhe
विजय मेश्राम प्रमोद यांचे भावोजी आहेत आणि जवळच राहतात. घाटावर ते आणि प्रमोदच्या गल्लीतली मंडळी जमली आहेत. ते एकमेकांशी बोलत आहेत.
पोलीस महासंचालकांच्या वक्तव्यावर तिथे चर्चा सुरू होती. पोलिसांकडून चूक झाल्याची कबुली त्यांनी दिली होती.
नेहमी पोलीस शिपाईच नक्षलवाद्यांचं टार्गेट का ठरतात? मोठे अधिकारी का नाही, असा प्रश्न ही मंडळी विचारत होती.
बीबीसीशी बोलताना मेश्राम म्हणाले की कुरखेडामध्ये नक्षलवादी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती डीसीपींना मिळाली होती. "अशी गुप्त माहिती मिळूनही इतक्या मोठ्या संख्येने शिपायांना गाड्यांमध्ये कोंबून का पाठवण्यात आलं?", असा प्रश्न ते विचारतात.
असा घडला हल्ला
ज्या ठिकाणांवर भूसुरंग पेरले असण्याची शक्यता असते त्या ठिकाणावरून पोलिसांना गाड्यांमध्ये बसून जाण्यास मनाई असते, असं स्थानिकांनीही सांगितलं. मात्र, गडचिरोलीतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जवानांना कोणतीच सूचना दिलेली नव्हती, असे आरोप होत आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याविषयी ते सांगत होते की जवानांना एका गाडीत कोंबून पाठवल्यानंतर ते अधिकारी स्वतः एका खाजगी वाहनातून गेले.
गडचिरोलीला लागून असलेल्या छत्तीसगढमधल्या कांकेर जिल्ह्यातल्या 'काउंटर टेरेरिजम अँड जंगल वॉरफेअर कॉलेज'चे संचालक ब्रिगेडियर बी. के. पोवार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, कुठल्याही मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत पोलीस आणि सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं खुलेआम उल्लंघन करत असल्याचं सर्रास दिसंतय.
ते सांगतात, "कुठल्याही मोहिमेदरम्यान भूसुरुंग पेरून ठेवले असण्याची भीती असते, त्या मार्गावरून जवानांना वाहनांमध्ये पाठवू नये, हा नियम बंधनकारक आहे."

फोटो स्रोत, BBC/SharadBadhe
1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातल्याच दादानगर गावाजवळ रस्त्याच्या बांधकामाची 36 वाहनं पेटवून दिली होती.
मध्यरात्री ही घटना घडली आणि सकाळ उजाडताच नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान मारले गेले. 36 वाहनं पेटवणं, ही घटना तर होतीच. शिवाय, सापळाही होता.
अभ्यासकांच्या मते नक्षलवाद्यांना पूर्ण कल्पना होती की मोठ्या प्रमाणावर गाड्या पेटवल्यावर पोलीस आणि सुरक्षा दलाचा मोठा फौजफाटा येणार. झालंही तसंच. सकाळी घटनास्थळाकडे जाणाऱ्या जवानांनी भरलेल्या वाहनाला नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून उडवलं.
पोलिसांचे जवान सांगतात प्रत्येक घटना सारखीच असते. मात्र, कुठल्याच घटनेतून धडा घेतला जात नाही. त्यामुळे जवानांचा बळी जातोय. कारण अधिकारी गाडीतून जातात तेव्हा 'रोड ओपनिंग पार्टी' काम करते. रस्त्यात पेरलेले भूसुरुंग निकामी करणे, म्हणजे रोड ओपनिंग. मात्र, जवान जातात तेव्हा रोड ओपनिंग केलं जात नाही.
प्रमोद यांच्या एका मित्राने म्हटलं, "याच कारणामुळे असे अनेक प्रमोद आहेत जे कर्तव्यावर गेले, मात्र कधी परतलेच नाही."
युद्धभूमीसारखी परिस्थिती
ज्या रस्त्यावर हा हल्ला झाला, तिथंही आम्ही पोहोचलो. दोन गाड्यांमध्ये बसून सुरक्षा दलाचे जवान या रस्त्यावरून जात होते. या रस्त्याला सध्या बंद करण्यात आलं आहे. इथून पुढे काही अंतरावर झालेल्या हल्ल्यात 15 जवानांचा मृत्यू झाला होता.
या रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करण्यात आली आहे.

या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी दिला आहे. इतक्या मोठ्या संख्येनं जवानांना इथं तैनात करण्यात आलं आहे, त्यामुळे हीच ती कारवाई असू शकते.
"या रस्त्यावरून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, कारण ऑपरेशन चालू आहे. कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे, सर्चिंग चालू आहे," असं इथं तैनात एका जवानानं आम्हाला सांगितलं.
ज्या रस्त्यावर हा हल्ला झाला, त्यातील जंगल एका बाजूनं छत्तीसगड तर दुसरीकडे मध्य प्रदेशला जाऊन मिळतं.
"आम्ही या भागात नेहमीच येतो. याच भागात काम करतो," असं दुसऱ्या एका जवानानं आमच्याशी बोलताना सांगितलं.

या ठिकाणी काम करण्याच्या आव्हानाविषयी त्यांनी सांगितलं की, "आमच्यासाठी हा पूर्णपणे डोंगराळ प्रदेश आहे. हा खूप टफ प्रदेश आहे. इथून पळून जाणं नक्षलवाद्यांना सोपं जातं. तर त्यांना शोधणं आमच्यासाठी अवघड काम असतं."
भुसुरुंगाविषयी ते सांगतात, "मुख्यालयापासून आम्ही पायी निघू शकत नाही. जवळपास दीडशे किलोमीटर आम्हाला चालावं लागेल, यातच पाच ते सहा दिवस जातील."
रखरखत्या उन्हात जवान इथं पहारा देत आहेत. इथेच एका ठिकाणी डिमायनिंगची प्रक्रिया सुरू होती.
"आमचे जवळपास 15 सहकारी या हल्ल्यात मारले गेले आहेत. आम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. त्यामुळे ते गेल्याचं दु:ख तर आहे, पण नक्षलवाद्यांची भीती आमच्या मनात नाहीये. या हल्ल्याचा कधी ना कधी आम्ही बदला नक्की घेऊ," असं ते पुढे सांगतात.
भीतीमुळे गावं रिकामी
सध्या हा परिसर पूर्णपणे युद्धभूमी बनला आहे. नक्षलवादी आणि जवान असा दोन्ही बाजूंकडून संघर्ष सुरू आहे. यामुळे अनेक गावं रिकामी करण्यात आली आहेत. लोक भीतीमुळे गाव सोडून गेले आहेत.
यानंतर आम्ही जिथं नक्षलवाद्यांनी 27 वाहनं जाळली त्या कुरखेडा भागातील दादापूर गावात पोहोचलो. अख्खं गाव रिकामं असल्याचं आमच्या लक्षात आलं. भीतीमुळे ग्रामस्थ घर सोडून गेले होते.

फोटो स्रोत, Ani
याच भागात रस्ते निर्मितीसाठी तैनात मशीन आणि ट्रक नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. या भागात रस्त्याच्या बांधकामाला नक्षलवाद्यांचा विरोध होता.
नक्षलवाद्यांनी पेटवून दिलेले ट्रक, मशीन आणि त्यातून निघणारा धूर स्पष्टपणे दिसून येतो. नक्षलवाद्यांनी जवळपास 27 वाहनं जाळली, असं सांगितलं जात आहे.
याच गावातल्या घरांवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)नं 50 बॅनर लावले आहेत. याद्वारे त्यांनी रस्ते बांधणीला विरोध केला आहे. हा विरोध आठवडा आम्ही साजरा करत आहोत, असं त्यांनी म्हटलंय.
गेल्या वर्षी महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 दलानं 40 नक्षलवाद्यांना ठार केलं होतं, असंही त्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








