गडचिरोली : नक्षलवाद म्हणजे काय? याची सुरुवात कुठून झाली?

फोटो स्रोत, cpi Maoist
गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कमांडोबरोबर झालेल्या चकमकीत कोटगूल-ग्यारापत्तीच्या जंगलात 26 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर मुळात नक्षलवाद म्हणजे काय? ही संकल्पना समजून घेऊया.
भारतात माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये 1960 च्या दशकात झाली होती. माओवाद्यांना नक्षलवादी असंही म्हणतात, अशी माहिती बीबीसी न्यूजने इंडियाज माओइस्ट रिबेल्स या लेखात दिली आहे.
पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावात या भागात चारू मुजूमदार यांनी तेथील जमीनदारांविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनालाच पुढे नक्षलवाद असं संबोधलं जाऊ लागलं. 70 च्या दशकात या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केलं. सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली.

फोटो स्रोत, ANI
ही चळवळ दडपण्याचा पोलिसांकडून अनेकदा प्रयत्न झाला. गेल्या काही वर्षांत माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले. मध्य भारतातील अनेक भागात त्यांनी आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं आहे. या भागाला रेड कॉरिडॉर असं म्हणतात.
झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगढ, आणि आंध्र प्रदेश या भागात या चळवळीचा मोठा प्रभाव आहे.
देशातील 11 राज्यातील 90 जिल्ह्यांत ही चळवळ पसरली आहे असं प्रशासनाचं मत आहे. नक्षलवादी आणि प्रशासन यांच्या संघर्षांत आतापर्यंत 6000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
या चळवळीतील बंडखोरांच्या मते, ते स्थानिक आदिवासींच्या हक्कासाठी आणि ज्या लोकांकडे सरकारने लक्ष दिलं नाही अशा लोकांच्या हक्कासाठी हे लोक लढत आहेत.
काही मोठे हल्ले
- 24 एप्रिल 2017 ला सुकमा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात 25 CRPF जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल झालेल्या हल्ल्यात 10 ते 12 माओवादी ठार झाले होते.
- 11 मार्च 2017 ला झालेल्या हल्ल्यात छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यातील 12 जवानांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Bhamaragad Police
- 2 फेब्रुवारी 2017 ला झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात ओडिशा पोलिसांतील सात जवानांचा मृत्यू झाला होता. ही घटना कोरापूट भागात घडली होती.
- 19 जानेवारी 2016 मध्ये बिहारमधील औरंगाबाद भागात झालेल्या स्फोटात सीआरपीएफच्या CoBRA पथकाचे दहा कमांडो मारले गेले. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचाही मृत्यू झाला होता.
- 2016 मध्ये एका भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफच्या 7 जवानांचा मृत्यू झाला होता.
- 2015 मध्ये सुकमा विशेष कृती दलाचे सात सदस्यांचा मृत्यू झाला आणि 10 लोक जखमी झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
- 2014 च्या फेब्रुवारी महिन्यात, दंतेवाडात पाच पोलिसांचा मृत्यू झाला होता.
- 2014 मध्येच गडचिरोलीत झालेल्या हल्ल्यात सात पोलिसांचा मृत्यू झाला आणि दोन पोलीस जखमी झाले होते.
- गेल्यावर्षी सी-60 पथकाने केलेल्या हल्ल्यात 37 माओवाद्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








