छत्तीसगडमध्ये 29 माओवादी चकमकीत ठार झाल्याची पोलिसांची माहिती, नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, CHHATTISGARH POLICE
- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, रायपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
छत्तीसगडमधील माओवादग्रस्त भाग कांकेरमध्ये पोलिसांनी चकमकीत 29 माओवादी मारले गेल्याचा दावा केला आहे. या चकमकीत संरक्षण दलाचे तीन जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
याआधी 18 माओवादी मारले गेल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेरमधील छोटेबेटिया भागात मंगळवारी (16 एप्रिल) दुपारी संशयित माओवाद्यांशी चकमक झाली.
बस्तरमध्ये 19 एप्रिलला लोकसभेचं मतदान आहे आणि माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर ही चकमक झाली आहे.
पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं की, कांकेरमधील छोटेबेटिया भागात मंगळवारी (16 एप्रिल) दुपारी संशयित माओवाद्यांसोबत चकमक झाली.
पोलिसांचं म्हणणं आहे की, या चकमकीनंतर घटनास्थळावरून 29 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं निवेदन
छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शाह यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
त्यांनी म्हटलं, “आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारले गेले आहेत. आपल्या धाडसाने ही मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.”

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी पुढे म्हटलं की, “नक्षलवाद विकास, शांतता आणि तरुणांच्या उज्ज्वल भवितव्याचा सर्वांत मोठा शत्रू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे.”
“सरकारचं आक्रमक धोरण आणि सुरक्षा दलाच्या प्रयत्नांमुळे आज नक्षलवाद एका छोट्या भागापुरता मर्यादित झाला आहे. लवकरच छत्तीसगड आणि पूर्ण देश नक्षलवाद मुक्त होईल.”
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे?
पोलिसांचं म्हणणं आहे की, चकमकीत मारल्या गेलेले शंकर राव आणि ललिता माडवी हे डीवीसी रँकचे नक्षलवादी नेते होते. त्यांच्यावर प्रत्येकी 25-25 लाखांचं इनामही होतं.
पोलिसांनी घटनास्थळावरून चार ऑटोमॅटिक हत्यारं जप्त केली होती.
त्याआधी बस्तरचे पोलिस महासंचालक सुंदरराज पी यांनी म्हटलं होतं की, कांकेरमधील छोटेबेटिया मधल्या चकमक स्थळावरून 18 नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात एके 47 सह अनेक हत्यारं मिळाली आहेत.
या घटनेबद्दल विस्ताराने सांगताना पी सुंदरराज यांनी म्हटलं, “माओवादी आणि सुरक्षादलांच्या दरम्यान चकमक झाली. आम्ही 29 माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. एनसास, कार्बाईन आणि एके 47 सारखी हत्यारं मोठ्या प्रमाणावर जप्त केली आहेत.”
चकमकीत जखमी झालेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकृती ठीक आहे, असं सांगितलं जात आहे.

फोटो स्रोत, ALOK PUTUL
सीमा सुरक्षा दलाचे डीआयजी आलोक सिंह यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे आम्हाला मोठं यश मिळालं आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं की, हे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचं मोठं ऑपरेशन होतं. त्यांनी म्हटलं की, जिल्हा राखीव गार्ड आणि बीएसएफची टीम गेल्या दोन दिवसांपासून या मोहिमेत गुंतली होती.
आलोक सिंह यांनी म्हटलं होतं की, आम्ही आमची रणनीती बदलली. आम्ही अशा दिशेने हल्ला केला की, ज्याबद्दल नक्षलवादी विचारही करू शकत नव्हते.
त्यांनी पुढे सांगितलं की, या हल्ल्यात 29 माओवादी मारले गेले आहेत आणि मोठ्या संख्येने जखमीही झाले आहेत. जखमी माओवाद्यांच्या शोधासाठी लवकरच मोहिम चालवली जाणार आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीला ऐतिहासिक म्हटलं आहे.
छत्तीसगडच्या नक्षलवाद विरोधी इतिहासातलं हे सर्वांत मोठं यश असल्याचं त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, माओवादी लोकशाहीवर विश्वास ठेवत नाहीत आणि प्रत्येक लोकशाही प्रक्रियेमध्ये हिंसाचाराने अडथळा आणतात. यावेळीही असंच दिसत होतं. माओवादी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या प्रयत्नात होते.
विष्णुदेव साय यांनी म्हटलं की, बस्तर आणि कांकेर हे दोन्ही मतदारसंघ एकमेकांच्या जवळ आहेत. बस्तरमध्ये दोन दिवसांनी एक निवडणूक आहे. या आधीही माओवाद्यांनी बस्तरमध्ये निवडणुकीचा बहिष्कार आणि अन्य पद्धतीने निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचं कुचक्र रचतच राहिले होते. यावेळीही ते मोठं काहीतरी घडविण्याच्या प्रयत्नात होते, जो सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी निष्फळ केला.

फोटो स्रोत, ALOK PRAKASH PUTUL
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, आमचं सरकार माओवादी हिंसाचाराने प्रभावित क्षेत्रात ‘नियद नेल्लार’ सारख्या योजनांच्या माध्यमातून विकासासाठी तसंच लोकशाहीविरोधातील हिंसाचारावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार आमची प्राथमिकता बस्तरला नक्षलवाद मुक्त करण्याची आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, “बस्तरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिने हे मोठं यश आहे. हा हिंसाचार थांबावा हीच आमची इच्छा आहे. माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडावा ही आमची इच्छा आहे. त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावं. हिंसाचारावर कोणत्याही मार्गाने तोडगा निघणार नाही.”
नक्षलवाद विरोधी मोहीम

फोटो स्रोत, ANI
पोलिसांनी केलेल्या या कारवाईकडे या भागातील सर्वांत मोठ्या नक्षलवाद विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नक्षलवादी शंकर, ललिता, राजू यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन राबविण्यात आलं.
छत्तीसगढमध्ये या महिन्याच्या सुरूवातीलाच 3 एप्रिलला विजापूरमध्ये पोलिसांनी 13 माओवाद्यांना चकमकीत मारल्याचा दावा केला होता.
त्यानंतर 6 एप्रिलला बिजापूरमधल्याच पुजारी कांकेरमध्ये पोलिसांनी तीन माओवाद्यांना ठार केलं होतं.

फोटो स्रोत, ALOK PRAKASH PUTUL
केवळ बस्तरमध्येच या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 50 हून अधिक माओवादी मारले गेले आहेत.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधानसभेचे सभापती रमण सिंह यांनी या कारवाईला माओवादाविरोधील ऐतिहासिक यश म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं, “ही छत्तीसगड आणि देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी घटना आहे. नक्षलावादी हिंसाचार समाप्त करण्याच्या दिशेने उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.”
इतक्या मोठ्या संख्येनं माओवादी मारले जाण्याच्या घटनेकडे राज्य सरकार एक मोठं यश म्हणून पाहात आहे.











