गावात SBI ची शाखा सुरू झाली, लाच घेऊन नोकऱ्या दिल्या आणि सगळं काही बनावट निघालं!

- Author, आलोक प्रकाश पुतुल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
छत्तीसगडच्या छापोरा गावातील लोकांना जबर धक्का बसलाय. हा धक्का या गावातल्या एका बँकेच्या शाखेनं दिला आहे. ऐकायला-वाचायला थोडं आश्चर्य वाटेल, पण या गावात स्टेट बँकेची एक बनावट शाखा सुरू करत काही जणांनी गावकऱ्यांना फसवलं आहे.
छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूर शहरापासून साधारण 200 किलोमीटरच्या अंतरावर हे छापोरा गाव आहे.
या बँकेत ज्योती यादव नावाच्या व्यक्ती काम करत होत्या. त्या मूळच्या इथल्याच जवळच्या बनबरस गावातल्या रहिवाशी. त्यांना तर अजूनही विश्वास बसत नाहीय की, आपण एका बनावट बँकेत काम करत होती.
ज्योती यादव असो वा छापोरा गावातील रहिवाशी असो, सगळेचजण अशाच धक्क्यात आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात अनिल भास्कर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तसंच, अनिलच्या इतर आठ सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे.
अशी सुरू झाली स्टेट बँकेची बनावट शाखा
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात छपोरा गावात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावानं एक शाखा सुरू झाली.
आता बँकेची कामं गावातच होतील, या कारणानं लोकांनाही आनंद झाला. पण हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही.
गेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही अधिकाऱ्यांनी पोलिसांना सोबत घेऊन या कथित बँकेवर छापेमारी केली. यावेळी ही बँक बनावट असल्याचं समोर आलं आहे.
स्टेट बँकच नाही, तर कुठल्याही बँकेसोबत या कथित बँकेचा कुठलाही संबंध नसल्याचं लक्षात आलं.


बँक बनावट असल्याचं कसं समोर आलं?
स्टेट बँकेद्वारे कुठलीही व्यक्ती, खासगी संस्था किंवा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना कियोस्क म्हणजे बँकिंग सेवा चालविण्यासाठी परवानगी दिली जाते. त्यासाठीच या गावातील अजय अग्रवाल यांनी अर्ज केला होता.
अजय सांगतात, गावात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू झाली हे समजल्यावर मला धक्काच बसला.
आमच्या गावात स्टेट बँकेला शाखा सुरू करण्याची गरज का पडली असेल? असा प्रश्न पडला.
गावातल्या लोकांनी भेट दिली तर तिथं कर्मचारी काम करताना दिसले. बँकेत अत्याधुनिक सुविधांसह कर्मचारी डेस्कवर काम करत होते.

गावातल्या लोकांनी या बँकेत अकाऊंट सुरू करण्यासाठी विचारलं असता, आता सर्व्हरचं काम सुरू असून लवकरच खातं उघडायची प्रक्रिया सुरू होईल असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं.
यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक फिल्ड ऑफिसर चंद्रशेखर बोदरा आणि अजय अग्रवाल यांनी या बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली, तेव्हा त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बड्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली तर त्यांना देखील धक्का बसला.
दुसऱ्या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी स्थानिक पोलिसांसोबत या बँकेत पोहोचले, तर ही बँक बनावट असल्याचं समोर आलं. पण या कथित बँकेचा मॅनेजर पंकज साहू फरार झाला होता.

ही कथित बँक असल्याचं कळताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
स्टेट बँकेच्या कोरबा इथल्या विभागीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक जीवराखन कावडे यांनी 27 सप्टेंबरला तक्रार दाखल केली. त्यानुसार, 18 सप्टेंबरला ही कथित शाखा सुरू करण्यात आली होती. यामध्ये 6 कर्मचारी काम करत होते आणि त्यांना जॉईनिंग लेटर पण दिलं होतं.
पोलिसांनी अनिल भास्कर नावाच्या व्यक्तीला अटक केली असून बँकेत नोकरी देण्याच्या नावावर त्यानं वेगवेगळ्या UPI आयडीवरून 6 लाख 60 हजार रुपयांचा लोकांना गंडा घातला.
या पैशांच्या माध्यमातून त्यानं आय-20 गाडी देखील घेतली. तसेच त्यानं त्याच्या इतर सहकाऱ्यांची माहिती दिली असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आरोपींविरोधात याआधीही फसवणुकीचे गुन्हा दाखल आहेत. रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली सात लाख रुपयांची फसवणक केल्याचा गुन्हा बिलासपूर जिल्ह्यात दाखल आहे.
बनावट बँकेत नोकरी देण्यासाठी लाचही घेतली!
सहा लोकांना या बँकेत नोकरी देण्यात आली होती. ते सहाही लोक हे अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्याकडून नोकरीसाठी लाचही घेण्यात आली.
याच बँकेत काम करणाऱ्या ज्योती यादव सांगतात की, “माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीनं मला या बँकेच्या नोकरीबद्दल माहिती दिली होती. त्यानुसार मी पोहोचले तेव्हा ऑनलाइन फॉर्म भरून घेतला. शैक्षणिक कागदपत्रं अपलोड केले आणि माझे बोटांचे ठसे देखील घेतले.
या नोकरीसाठी त्यांनी अडीच लाख रुपये माझ्याकडून घेतले. मला ऑफर लेटर आणि त्यानंतर नियुक्ती पत्र देखील दिलं होतं.”

बँकेच्या शाखेत त्यांची नियुक्ती होत असून त्यांना तिथं प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे, असं ज्योती यांना सांगण्यात आलं.
त्या पुढे म्हणतात, मला एका क्षणालाही वाटलं नाही की माझी फसवणूक होत आहे. नोकरी लागल्यामुळे मी आनंदी होते. पण, आता सगळं संपलं आहे.

कोरबा जिल्ह्यातील भवरखोला गावातल्या संगीता कंवर सांगतात, मला माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीनं या नोकरीबद्दल माहिती दिली. मी तिथं पोहोचले, तेव्हा मला पाच लाख रुपयांची मागणी केली.
मी माझे दागिणे गहान ठेवून एक लाख रुपये जमा केले. हे पैसे कमी असल्यानं मी 5 टक्के व्याजानं पैसे गोळा केले आणि अडीच लाख रुपये भरून नोकरी मिळवली.
या नोकरीसाठी त्यांना पोलीस व्हेरिफिकेशनसाठी उरगा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं होतं. पण तिथं कोणालाही संशय आला नाही.
फक्त नोकरी देण्याच्या नावावर पैसे उकळण्यासाठी ही बँक उघडली नसून बँक उघडण्याचा नेमका उद्देश काय आहे? याचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











