Home Loan Defaulters : गृहकर्जाचे हप्ते चुकले तर काय कराल?

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऋजुता लुकतुके,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

"अशी वेळ कुणावर येऊ नये. एका स्त्रीला नेहमी वाटतं की, काही झालं तरी तिचं राहतं घर टिकावं!" 50 वर्षांच्या अंजली देशमुख बीबीसी मराठीशी बोलत होत्या तेव्हा त्यांना काही क्षण भावना अनावर झाल्या.

कारण, नुकतंच त्यांनी मोठ्या हौसेनं पुण्यात सहकारनगरमध्ये घेतलेलं तीन बेडरुम, हॉल आणि किचनचं घर विकलं होतं. आणि त्या इथं जवळच भाड्याच्या घरात राहायला आल्या. त्यांचं घर गृहकर्जाचे हप्ते थकत चालल्यामुळे त्यांना विकावं लागलं.

खरंतर त्यांचे यजमान अजय देशमुख पेशाने इंजिनिअर आणि त्यातही मास्टर डिग्री मिळवलेले. पुढे 2006मध्ये त्यांनी मुंबईच्या आयआयटीमधून डॉक्टरेटही केलं. आणि मूळातच संशोधन आणि शिकवण्याची आवड असल्यामुळे सुरुवातीपासून ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवत होते. डॉक्टरेट केल्यावर महाराष्ट्रातल्या चार कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणूनही काम केलं. पण, असा तगडा बायोडेटा असताना कोव्हिड काळात त्यांच्यावर ही वेळ आली. सांगण्याचा हेतू हा की, अशी वेळ कुणावरही येऊ शकते.

गृहकर्जाचा हप्ता बुडण्याचं प्रमाण वाढतंय

डॉ. अजय देशमुख यांनी 2012मध्ये 75 लाख रुपयांच्या वरचं घर घेतलं. आणि नूतनीकरणासाठीही 2 ते 3 लाख रुपये खर्च केला. त्यांच्यात शब्दांत सांगायचं तर,

"तेव्हाची इकॉनॉमी तशी होती. त्यामुळे कुणालाही वाटतंच घर असावं म्हणून घेतलं आम्ही मोठं घर. पण, सगळं बदलत गेलं."

2016मध्येच म्हणजे कोव्हिडच्या आधीच ते काम करत असलेल्या कॉलेजमध्ये आर्थिक अडचणी सुरू झाल्या. आणि कोव्हिड सुरू झाल्यावर पगारही वेळेवर मिळेना झाला. मग कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडत गेलं.

अंजली देशमुख यांनी तो अनुभव बीबीसीशी बोलताना सांगितला.

"पेमेंट दिलंच नाही त्या संस्थेनं. एक-एक वर्षं आम्ही स्वत:च्या पैशातून जे काही असेल, इकडून तिकडून घेऊन ते कॉलेजची कामं करत होतो. की, घर आपलं वाचेल. आणि ईएमआय जाईल."

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

घर म्हणजे हक्काचा निवारा. अलीकडच्या काळात देशमुख कुटुंबीयांप्रमाणेच अनेकांनी असा मालकीचा निवारा गमावलाय. कारण, कोव्हिड असो किंवा ढासळती अर्थव्यवस्था. पण, रिझर्व्ह बँकेचा अहवाल असं सांगतो की, कर्जाचे हप्ते बुडवणाऱ्यांचं प्रमाण प्रत्येक महिन्यात काही अंकांनी वाढतंय. आणि 2020च्या तुलनेत गृहकर्ज बुडित निघाल्याचं प्रमाण 15 टक्क्यांनी वाढलंय.

तर इंडियन क्रेडिट रेटिंग एजन्सीने तयार केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, 2021मध्ये 10 लाखांपेक्षा कमी कर्ज असलेली कर्ज बुडित जाण्याचं प्रमाण 4.44% होतं. तर 75 लाखांपेक्षा मोठ्या कर्जांसाठी हे प्रमाण 3 टक्के होतं. तर 35 ते 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी हेच प्रमाण 1.99% इतकं होतं. आधीच्या वर्षीच्या तुलनेत यात सरासरी 15 टक्क्यांची वाढ झालीय.

कर्जाचे हप्ते चुकणं हे दुष्टचक्र

यात काळजी करण्यासारखी गोष्ट ही की, कर्ज बुडण्याचं प्रमाण 25 ते 35 वर्षं वयोगटात सर्वाधिक आहे. आणि त्या पाठोपाठ ते 35 ते 45 वर्षं वयोगटात आहे. गृहकर्ज क्षेत्रात गेली अनेक वर्षं कार्यरत असलेले मध्यस्थ मोहित गोखले यांनी आपली काही निरीक्षणं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली.

"तरुणांची स्वप्नं मोठी असतात. त्यामुळे मोठी नोकरी, मोठं घर या स्वप्नातून ते मोठी घरं घेतात. पण, अलीकडे अर्थव्यवस्था बदलतेय. आणि खासकरून कोरोनाच्या काळात अनेकांना रोजगारही गमवावा लागलाय. तर सरकारने काढलेल्या मोरेटोरिअम या योजनेचाही अर्थ कित्येकांना समजला नाही. मोरेटोरिअममुळे कर्जाच्या हप्त्यातून काही महिन्यांसाठी लोकांची सुटका झाली. पण, तीच रक्कम पुढे तुमच्या मुद्दलात समाविष्ट करण्यात आली त्यामुळे उलट हप्ता किंवा कर्जाची मुदत वाढली. आणि ते भरणं अनेकांना कठीण जाऊ लागलं."

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

आणखी एक मुद्दा त्यांनी स्पष्ट केला. तो म्हणजे कर्जाच्या हप्त्याच्या परतफेडीचं नियोजन.

"एखादा हप्ता चुकला तर तुम्ही एका दुष्टचक्रात अडकता. कारण, तुमचे इतर घरखर्च, मुलांच्या शिक्षणाच्या फी यात तुमचा पैसा आधीच जात असतो. तिथे लोक कर्जाच्या हप्त्याला तेव्हा कमी महत्त्व देतात. आणि मग आणखी हप्ते चुकत जातात. अशी कर्ज मग बुडित होण्याच्या मार्गाने जातात. कधी कधी तर असलेली कर्जं फेडण्यासाठी जास्त दराने नवी वैयक्तिक कर्जं घेण्याकडे लोकांचा कल जातो. आणि यात माणूस अक्षरश: फसतो." गोखले यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला.

तीन हप्ते थकले की सुरू होतो बँकेचा तगादा

गृहकर्जाचा एखादा हप्ता चुकला तर दंडाची रक्कम भरून तुम्ही कर्ज नियमित सुरू ठेवू शकता. पण, तीन सलग हप्ते चुकले की, बँक ते थकित कर्ज म्हणून जाहीर करते. आणि त्यानंतर तुमचा खरा कठीण काळ सुरू होतो.

बँक रीतसर नोटीस बजावून थकित रकमेच्या वसुलीसाठी कारवाई सुरू करते. तुमचा क्रेडिट किंवा सिबिल स्कोअर बिघडून बँकेच्या इतर आर्थिक व्यवहारांसाठीची तुमची विश्वासार्हता कमी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे वसुली एजंट्सचा तगादा सुरू होतो.

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

तुमचं कर्ज वसूल होण्यातलं नाही असं बँकेला वाटलं तर ते सरफेसी (SARFAESI - सेक्युरटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सेक्युरिटीज् इंटरेस्ट अॅक्ट) कायद्याअंतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करू शकते. यात तुम्हाला 60 दिवसांची अंतिम नोटीस काढली जाते. आणि कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याचे निर्देश देण्यात येतात. ही रक्कम नाही भरता आली तर बँकेकडे तारण म्हणून ठेवलेला ऐवज लिलाव करण्याचा किंवा हमी दिलेल्या व्यक्तींकडून कर्जवसुली करण्याचा अधिकार राहतो.

म्हणूनच ही वेळ न येऊ देणं महत्त्वाचं. त्यापूर्वी पावलं उचलली गेली पाहिजेत.

अजय देशमुख यांनी यावर स्वत:हून मार्ग काढला तो राहतं घर विकण्याचा. आणि नोकरी बदलून इतरही काही जोड उद्योग सुरू करण्याचा. घर हातचं गेलं तरी त्यांच्याकडे एक मोठी साधनसंपत्ती होती शिक्षण, बुद्धी आणि कौशल्य. घर विकून त्यांनी आलेले पैसे बँकेला परत केले. काही संस्थांमध्ये लेक्चर द्यायला सुरुवात केली. आणि काही पुस्तकांवरही काम सुरू केलं. आणि घरातले इतर खर्च भागवतानाही त्यांनी दोन्ही मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिलं. कारण, शिक्षण आणि कौशल्य हीच तुमची खरी मालमत्ता असते.

"काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते. पेशन्स ठेवावा लागतो. हे महत्त्वाचं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही काय दिशेनं प्रयत्न करता हे पाहावं लागतं. म्हणजे आर्थिक संकट आलं तर पहिलं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटची तयारी करावी लागते. त्यामुळे त्यातून लवकर बाहेर पडता येतं. आणि ते भांडवल इतर कामांसाठीही तुम्ही वापरू शकता." त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

देशमुख यांनी वेळेवर हे पाऊल उचललं असं म्हणावं लागेल. कारण, बँकेनं जप्ती आणेपर्यंत वाट पाहिली असती तर राहतं घरही गेलं असतं. आणि बँकेच्या लिलावात रक्कमही फारशी हाती लागत नसल्यामुळे ते नुकसानही झालं असतं.

गृहकर्जाचे हप्ते बुडले तर काय कराल?

तसं तर कर्ज देणारी बँक आणि कर्ज घेणारी व्यक्ती या दोघांसाठीही गृहकर्ज सगळ्यात सुरक्षित कर्ज मानलं जातं. कारण, तारण म्हणून घर ठेवलेलं असतं. आणि नोकरी, पगार यांचा अभ्यास करूनच ते तुम्हाला दिलेलं असतं. पण, अलीकडे नोकऱ्या जाण्याचं आणि पगारकपातीचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे कदाचित कर्जाच्या वेगळ्या नियोजनाची गरज भासू लागली आहे.

पैसे

फोटो स्रोत, Getty Images

अजय देशमुख यांच्याप्रमाणे वेळेवर पावलं उचलण्याचं महत्त्व बँकिंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांनीही बोलून दाखवलं.

"आपण हप्ते भरू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर बँकेबरोबर तुमचा संवाद असणं जास्त महत्त्वाचं. आणि तुम्ही वेळेत पुढचा धोका ओळखणंही महत्त्वाचं. बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून शक्य झाल्यास कर्जाची वेळेत पुनर्रचना केली तर आर्थिक संकट आटोक्यात राहतं. आणि बँका सुरूवातीला तसं सहकार्य करतातही. फक्त वेळेवर आर्थिक भान आलं पाहिजे. आणि त्यादृष्टीने पावलं उचलली पाहिजेत."

बँकेबरोबरचा तुमचा संवाद आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे. एकतर बँकेनं एकदा कायदेशीर प्रक्रिया सुरू केली तर त्यात खूप वेळ जातो. आणि त्या काळात व्याज तुमचं वाढणार असतं. घर लिलाव जरी करायचं झालं तरी त्यात वेळ जातो. आणि अशा प्रकारे विकलेल्या घराला किंमतही बाजारभावाप्रमाणे येत नाही.

त्यामुळे बँकेबरोबर कर्जाच्या पुनर्रचनेसाठी वाटाघाटी आणि घर तुमचं तुम्ही विकून पुन्हा भांडवल उभं करणं हे तज्ज्ञांच्या मते योग्य मार्ग आहेत. त्याचबरोबर आर्थिक गणित पुन्हा ताळ्यावर आणण्याचे प्रयत्न करणंही महत्त्वाचं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)