नक्षल चकमक झाली, तर मग काडतुसं कुठे आहेत? हायकोर्टानं असे अनेक प्रश्न उपस्थित केलेलं प्रकरण नेमकं काय?

फोटो स्रोत, ANI
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
“एका प्रकरणात आधीच तुरुंगात असताना त्याच आरोपीला अटक दाखवून, नक्षलवादी चकमकीतील आरोपी म्हणून गोवण्यात आलं. तसंच पोलिसांनी सांगितलेल्या नक्षल चकमकीची घटनाही विश्वास ठेवण्यासारखी नाही.”
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं अशा प्रकारचं परखड मत नोंदवत, एका महिलेची नक्षलवादी चकमकीत पोलिसांवर गोळीबार केल्याच्या आरोपातून झालेल्या शिक्षेतून निर्दोष मुक्तता केली.
न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. हे प्रकरण नेमकं काय होतं? कोर्टानं पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीबद्दल काय निरीक्षण नोंदवलं? पाहूयात.
नेमकं काय घडलं होतं?
सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब फडतरे हे 20 मे 2019 ला गडचिरोलीतल्या अहेरीमधल्या प्राणहिता इथं नक्षलविरोधी मोहिमेसाठी तैनात होते.
त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक नीलेश चव्हाण आणि पोलीस नाईक गणपत सोयाम होते.
नानासाहेब फडतरे यांनी कोठी पोलीस मदत केंद्रात त्यावेळी एक तक्रार दिली होती. त्यानुसार, 60 पोलिसांचं पथक कोपर्शीजवळच्या जंगलात नक्षलविरोधी मोहीम राबवत होते.
यावेळी नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, असं पोलिसांनी सांगितलं. आम्ही घनदाट जंगलात असल्यानं झाडांच्या मागे लपलो. नक्षलवादी आणखी गोळीबार करण्याचे आदेश देत होते. आम्ही त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं. पण, त्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला, असंही त्यांनी सांगितलं.
त्यामुळं आपल्या बचावासाठी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. 15-20 मिनिटांच्या गोळीबारानंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले, असंही सांगण्यात आलं.
पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता तिथं एक कुकर, एक डिटोनेटर, वायरी आणि ब्लास्टींगचं साहित्य सापडलं होतं. ते सगळं साहित्य कोठी इथल्या पोलीस मदत केंद्रात आणून जप्त करण्यात आलं. यावरून नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


आधीच तुरुंगात असणाऱ्या आरोपीला दाखवली अटक
पोलीस निरीक्षक रघुनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. या प्रकरणात सात महिन्यानंतर 11 जानेवारी 2020 ला पार्वती शंकर मडावी या महिलेला अटक दाखवण्यात आली. पण, त्या महिला आरोपीला आधी 2017 च्या एका प्रकरणात अटक झाली होती.
ज्या दिवशी पोलिसांनी पार्वतीला अटक केल्याचं दाखवलं, त्या दिवशी ती न्यायालयीन कोठडीत होती. पोलिसांनी पार्वती आणि इतर अज्ञान नक्षलवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं.
या प्रकरणात फक्त पार्वतीला एकटीला अटक झाली होती. फरार नक्षलवाद्यांना अद्यापही अटक झालेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
सत्र न्यायालयानं पार्वतीविरोधात आरोपनिश्चिती केली. त्यानंतर आपण दोषी नसल्याचा दावा पार्वतीने केला होता. पण, तो फेटाळण्यात आला. सत्र न्यायलयानं भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 353, 148 आणि 149 या अंतर्गत पार्वतीला दोषी ठरवलं होतं.
तिला दहा वर्षे कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती. दंड न भरल्यामुळे तिची शिक्षा आणखी वाढविण्यात आली.
त्यानंतर तिनं सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.
पार्वतीच्या वकिलांचा युक्तिवाद
पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या कुठल्याही साक्षीदाराला पार्वती ओळखत नव्हती. आरोपीची ओळख परेड सुद्धा झालेली नव्हती.
पार्वतीनं पोलिसांवर गोळीबार केल्याचा कुठलाही पुरावा नाही. तसेच ती त्यावेळी लाहेरीच्या एका आधीच्या गुन्ह्यात तुरुंगात होती. मग तिला पुन्हा या प्रकरणात अटक कशी काय होऊ शकते? ती आरोपी नसून तिची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
पण, सरकारी वकिलांनी याचा जोरदार विरोध केला. आम्ही 9 साक्षीदार कोर्टात हजर केले आहेत. त्या सगळ्यांनी पार्वतीला पोलिसांवर गोळीबार करताना पाहिलं होतं आणि सत्र न्यायालयानंही पार्वतीला दोषी ठरवलं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.
त्यानंतर हायकोर्टानं निकाल दिला असून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली होती यावरही विश्वास ठेवू शकत नाही आणि हे अविश्वसनीय आहे, असं हायकोर्टानं म्हटलं आहे.
कहाणीच अविश्वसनीय – हायकोर्ट
हायकोर्टानं आदेशात म्हटलं की, पोलिसांनी एखाद्या नक्षलवाद्याला घटनास्थळी पाहिलं तर इतक्या अंदाधुंद गोळीबारात संबंधित नक्षलवादी जीवंत कसा राहिला? पोलिसांकडं शस्त्रं असलेल्या 60 कर्मचाऱ्यांची टीम होती.
नक्षलवादी दिसला असता तर पोलिसांच्या टीमनं त्याला गोळ्या घालून ठार केलं असतं. त्याला जीवंत कसं जाऊ दिलं? इतका गोळीबार झाला होता तर एकही नक्षलवादी किंवा पोलीस जखमी कसा झाला नाही? पंचनाम्यातही दोन्हीकडून अंदाधुंद गोळीबार झाल्याचे पुरावे कुठंही दिसत नाहीत.
गोळीबार झाला असता तर तिथं रिकामी काडतुसं सापडली असती. तसंच चकमक घनदाट जंगलात झाली होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मग झाडांच्या बुंध्यांवर तरी बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा दिसायल्या हव्या होत्या. पण, पंचनाम्यात तसं काहीच दिसत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी आरोपीची ओळख परेडही घेतली नाही. तसंच इतक्या घनदाट जंगलात चकमक झाली जिथं गोळीबारादरम्यान पोलिसांनी झाडांचा आसरा घेतला; त्या जंगलात पोलिसांनी आरोपीला कसं पाहिलं? पाहिलं तर मग नक्षलवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीला कुठलीही जखम न होता कसं काय सोडून दिलं? असे अनेक प्रश्न हायकोर्टानं उपस्थित केले.
तसंच पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी पाहिलं होतं यावर विश्वासच ठेवता येणार नाही. या घटनेत पार्वती त्या चकमकीत होती हे पूर्णपणे अविश्वसनीय आहे, असंही कोर्टानं म्हटलं.
पोलिसांनी नक्षल चकमकीबद्दलची सांगितलेली कहाणीही अविश्वसनीय आहे, असंही कोर्टानं म्हटलं आहे. संबंधित महिलेला आधीच एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. असं असतानाही तिला दुसऱ्या गुन्ह्यात गोवण्यात आलं, असं परखड मत हायकोर्टानं निकाल देताना व्यक्त केलं आहे.
हायकोर्टानं परखड निरीक्षण नोंदवत पोलिसांना सुनावल्यानंतर 'बीबीसी'ने गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी संपर्क साधला. पण, आम्ही सध्या यावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही असं ते म्हणाले. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांची बाजूही इथं मांडली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











