'आम्हाला मुलं आवडत नाहीत असं नाही, पण मुलांशिवाय आमचं आयुष्य सुखी आहे'

कपल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आदर्श राठौड
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

"मी तिला म्हणालो, हे बघ मला मुलं नको आहेत. तू तुझी स्वप्न मारून टाकावीत किंवा नंतर माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकावा अशी माझी इच्छा नाही."

नोएडातील एका वृत्तवाहिनीमध्ये काम करणारा निशांत म्हणतो की, श्वेताला प्रपोज करण्यापूर्वीच तिला मी हे सगळं सांगितलं होतं.

मूळ नाव उघड न करण्याच्या अटीवर त्याने हे सांगितलं.

निशांत पूर्वी एका मुलीसोबत नात्यात होता, पण त्याचं नातं याच कारणावरून तुटलं की त्याला लग्न हवंय, पण मुलं नको आहेत.

यावेळीही असंच काही घडेल अशी भीती निशांतला वाटत होती. पण श्वेताने तिलाही 'मुलं नको' असं सांगितल्यावर त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

आज दोघांच्याही लग्नाला पाच वर्षं पूर्ण झाली आहेत. पण पोटी मूलबाळ नसतानाही ते दोघं त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत.

‘चाइल्ड फ्री’ आणि ‘चाइल्ड लेस’ यातील फरक

ज्या प्रौढांना आत्ता मुलं होत नाहीत पण भविष्यात मुलं हवी आहेत किंवा इच्छा असूनही मुलं होऊ शकत नाहीत त्यांना 'चाइल्डलेस' म्हणजेच अपत्यहीन म्हणतात.

अनेक वेळा काही वैद्यकीय समस्यांमुळे लोक मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे जोडीदार न मिळणे किंवा लग्न न होणे यासारख्या सामाजिक कारणांमुळे एखादी व्यक्ती अपत्यहीन राहू शकते.

याउलट, असे काही प्रौढ असतात ज्यांनी स्वतःच्या इच्छेने मूल नको असं ठरवलेलं असतं त्यांना 'चाइल्ड-फ्री' असं म्हणतात.

सोप्या शब्दात समजून सांगायचं तर ज्यांना स्वतःहून मुलं नको आहेत त्यांना अपत्य मुक्त किंवा चाइल्ड-फ्री असं म्हणता येईल. आणि ज्यांना काही कारणाने मुलं होत नाहीत त्यांना अपत्यहीन म्हणजेच चाइल्ड लेस म्हटलं जाईल.

'चाइल्ड-फ्री' हा शब्द 1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून वापरला जातोय. पण 1970 च्या दशकात या प्रवृत्तीला गती मिळाली. स्त्रीवाद्यांनी याचा वापर स्त्रियांमध्ये फरक करण्यासाठी वापरला.

चाइल्ड समोर फ्री हा शब्द वापरण्यात आला जेणेकरून त्यात मुक्तीची भावना निर्माण होईल. आणि मुलांना जन्म न देऊन त्यांनी आपली कर्तव्य पार पाडली नाहीत, असं वाटायला नको.

एलिझाबेथ हिंट्झ या अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठात संवादशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत आणि त्यांनी चाइल्ड-फ्री विषयावर बरंच संशोधन केलं आहे.

त्या सांगतात की, "बऱ्याचदा संशोधनांमध्ये चाइल्ड-फ्री आणि चाइल्ड- लेस एकाच श्रेणीत ठेवल्यामुळे तुलनात्मक माहिती गोळा करण्यात अडचण येते. तरीही सोशल मीडियाच्या या युगात 'चाइल्ड-फ्री' ही ओळख झपाट्याने वाढू लागली आहे, कारण मुलं नको असा निर्णय घेतलेले लोक स्वतःहून पुढे येत आहेत."

संशोधनातून असं समोर येतं की, स्वेच्छेने मुलं नको असलेल्या लोकांची संख्या पाश्चिमात्य देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

प्यू रिसर्च सेंटरने 2021 मध्ये अमेरिकेत एक संशोधन केलं होतं. यामध्ये मुलं नसलेल्या 18 ते 49 वयोगटातील 44 टक्के लोकांनी सांगितलं की, भविष्यात मुलं जन्माला घालू असं आम्हाला वाटत नाही. 2018 च्या संशोधनात असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या 37 टक्के होती.

त्यापैकी काहींनी आरोग्याशी संबंधित कारणं सांगितली तर काहींनी सांगितलं की, त्यांना एकट्याने मूल वाढवायचं नाहीये. पण निम्म्याहून अधिक लोकांनी सांगितलं की त्यांना मुलं जन्मालाच घालायची नाहीयेत.

त्याचप्रमाणे इंग्लंड आणि वेल्समध्ये, यूगॉव या संस्थेने 2020 मध्ये संशोधन केलं होतं. यात असं दिसून आलं की, 35 ते 44 वयोगटातील ज्या लोकांना मुलं नाहीयेत त्यातील अर्ध्याहून अधिक लोकांना भविष्यातही मुलं नको आहेत.

पण यामागे काय कारण असू शकतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चाइल्ड-फ्री श्रेणीत असेही काही लोक आहेत ज्यांना कधीच मुलं नको होती. तर काही लोक असे आहेत ज्यांनी खूप वर्षानंतर मुलं जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर ते ठाम आहेत.

असेही काही लोक आहेत ज्यांना कधी कधी वाटतं की आपल्याला मुलं नको आहेत तर कधी कधी वाटतं की ती हवी आहेत.

निशांत आणि श्वेता पहिल्या श्रेणीत मोडतात. कारण मूल न जन्माला घालण्यामागे त्या दोघांचीही समान कारणं आहेत.

श्वेता म्हणते, "इतर बरेच जण असं करतात म्हणून आम्हाला मुलं नकोत असं नाहीये. आणि आम्हाला मुलं आवडत नाहीत असंही काही नाही. पण मुलांशिवाय आमचं आयुष्य सुखी आहे आणि आम्हाला कशाचीही कमतरता जाणवलेली नाही."

दिल्लीतील मानसशास्त्रज्ञ डॉ. पूजा शिवम जेटली सांगतात की, मुलं न होऊ देण्यामागे अनेक कारणं असतात.

त्या सांगतात, "काही लोकांना असं वाटतं की त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही किंवा त्यांना मित्र किंवा कुटुंबीयांचा पाठिंबा नाही. काही लोक गर्भधारणा आणि बाळंतपणाशी संबंधित धोक्यांमुळे अस्वस्थ असतात. दुसरीकडे, काहींना असं वाटतं की ते फक्त स्वतःची आणि त्यांच्या जोडीदाराचीच जबाबदारी घेऊ शकतात. अशा परिस्थितीत ते मुलांसाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतात."

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

बरेच लोक 'चाइल्ड-फ्री' राहण्याचा पर्याय निवडतात यामागे आणखीन एक कारण असल्याचं डॉ. जेटली सांगतात.

त्या सांगतात, "आजच्या तरुण पिढीसाठी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव सर्वांत महत्त्वाचे असतात. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायचं आहे. त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. एक जोडपं माझ्याकडे आलं होतं. यात मला मूल हवंय की नको हे ठरवताना त्या महिलेला अडचण येत होती तर तिच्या जोडीदाराला मूलच नको होतं. तो म्हणाला की त्याला जगभ्रमंती करायची आहे, पण मुलांसोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य होणार नाही."

शिवाय त्या जोडप्याला असं वाटत होतं की, जगाची परिस्थिती देखील अशी नाही की इथे मूल जन्माला घालवं.

खूप लोक असाच विचार करतात. 2021 मध्ये प्यू रिसर्चने केलेल्या संशोधनात, मुलं नसलेल्या नऊ टक्के लोकांनी सांगितलं की, जगाच्या परिस्थितीमुळे त्यांना भविष्यात मुलं जन्माला घालायची नाहीत. पाच टक्के लोकांनी यासाठी हवामान बदलाचा हवाला दिला.

चाइल्ड फ्री लोकांच्या अडचणी

27 वर्षीय मार्सेला मुनोज यांचं 'चाइल्ड-फ्री मिलेनियल' नावाने टिकटॉक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब हँडल आहे. त्या आपल्या कंटेंट मधून सांगतात की त्यांना मूल का नकोय.

त्या सांगतात, "ज्यांना मुलं आहेत त्यांच्यासोबत मी कधीच भेदभाव करत नाही. माझ्या अनेक मित्रांना मुलं आहेत. पण मला आनंद आहे की लोक आता पालक होण्याआधी विचार करतात."

मुनोज त्यांच्या टिक टॉकवर मजेशीर कंटेंट टाकतात. पण त्या अनेक गंभीर पैलूंवर चर्चा करतात.

उदाहरणार्थ, त्यांचे काही फॉलोवर्स आहेत ज्यांना मुलं नको आहेत. पण चाइल्ड-फ्री राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची मैत्री तुटेल किंवा त्यांचे पालक निराश होतील, अशी भीती त्यांना वाटते.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

निशांत आणि श्वेताच्या बाबतीतही तेच झालं. मुलांना जन्म न देणं हा समाजाची बंधनं तोडणारा निर्णय आहे. पण तरीही त्यांना त्यांची खरी ओळख उघड करायची नाही.

कारण स्पष्ट करताना निशांत म्हणतो, "आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत पण वृद्ध आई-वडिलांना दुखवायचं नाहीये. एकदा मी घरी याबद्दल बोललो तर बरेच दिवस घरात तणाव होता. त्यामुळे आम्ही घरी सांगून टाकलं की आत्ताच काही आम्ही निर्णय घेणार नाही, त्यावर नंतर विचार करू."

समाजाच्या टीकेचे धनी

रेडीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'ग्लोबल चाइल्ड-फ्री' नावाचा एक ग्रुप आहे. 15 लाखाहून जास्त लोक याचे सदस्य आहेत.

इथे चाइल्ड-फ्री लोक त्यांचे अनुभव सांगतात. काहींचं म्हणणं आहे की, त्यांना पालकांकडून, अगदी अनोळखी लोकांकडून देखील टोमणे ऐकावे लागतात. 'तुम्ही तुमच्या करिअरकडे जास्त लक्ष देत आहात नाहीतर तुमचं मत बदलेल' असं म्हटलं जातं.

चाइल्ड फ्री कंटेंट क्रिएटर मुनोज यांनाही त्यांच्या कंटेंटसाठी ऑनलाइन द्वेषाचा सामना करावा लागतो. काहीजण म्हणतात की तू बालविरोधी आहेस, स्वार्थी आहेस, तुला पश्चाताप होईल, एकटी मरशील, म्हातारपणात तुझी काळजी कोण घेईल, तुला खरं प्रेम कधीच मिळणार नाही, वगैरे. धार्मिक संदर्भ देऊन त्यांना टोमणे मारले जातात.

प्राध्यापक एलिझाबेथ हिंट्झ म्हणतात की, चाइल्ड फ्री लोकांना समाजातील लोकांच्या टोमण्यांचा आणि टीकेचा सामना करावा लागतो, खास करून महिलांना.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणतात, "मुलांना जन्माला घालण्याचा निर्णय अनेकदा स्त्रियांवर जबरदस्तीने लादला जातो. मातृत्व आणि स्त्रीत्व एकमेकांत गुंफलेलं आहे. अशा परिस्थितीत जीवनातील परंपरांचं पालन करण्याचा दबाव महिलांवर अधिक प्रमाणात असतो. आणि ज्या देशांमध्ये लैंगिक समानतेवर भर दिला जातो, तिथेही अशीच परिस्थिती आहे."

परंतु तज्ज्ञांना आशा आहे की, आगामी काळात चाइल्ड-फ्री असणं खूप सामान्य गोष्ट असेल. जेव्हा जास्त लोक चाइल्ड-फ्री लोकांना भेटतील तेव्हा ते स्वार्थी आहेत किंवा स्वतःचाच विचार करतात हे समज दूर व्हायला मदत मिळेल.

पण या परिस्थितीत कसा आणि किती बदल होणार हे त्या ठिकाणच्या माध्यमांवर, तेथील राजकीय आणि धार्मिक वातावरणावरही अवलंबून असेल.

हेही वाचलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, Conjuntivitis: डोळे येणं म्हणजे काय? त्यापासून वाचायचं कसं? | सोपी गोष्ट 909

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)