राहुल कुल यांच्यावर संजय राऊतांचे 500 कोटींच्या मनी लॉंडरिंगचे आरोप, हे प्रकरण नेमकं काय?

फोटो स्रोत, Facebook
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान चर्चेत आला आहे.
याला कारण ठरलंय संजय राऊत यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याविरोधात ईडी, सीबीआय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली तक्रार.
संजय राऊत यांनी 25 एप्रिल रोजी मुंबईतल्या सीबीआय मुख्य कार्यालयाला पत्र लिहून राहुल कुल यांच्यावर 500 कोटीच्या मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊ.
भीमा पाटस सहकारी कारखान्यातून मनी लाँडरिंग झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांनी दौंडमध्ये भीमा पाटस सहकारी कारखाना 'गैरकारभार पोलखोल' सभा घेतली.
26 एप्रिल 2023 रोजी शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दौंड तालुक्यातल्या वरवंड गावात ‘भीमा सहकारी साखर कारखाना पाटस भष्ट्राचाराची पोलखोल' सभचं आयोजन करण्यात आलं होतं.
वरवंड गावापासून आठ किलोमीटरच्या अंतरावर पाटस इथे असलेला भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना आहे.
सभा सायंकाळी असली तरीही आधी संजय राऊत आणि सभेत सहभागी होणारे इतर नेते साखर कारखान्यात जाऊन, या सहकारी कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील असं नियोजन होतं.
कारखान्यात जाण्यासाठी प्रशासनाने कलम 144 लावून अडवणूक केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. कलम 144 असतानाही सभेला प्रचंड गर्दी झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
या सभेमध्ये केलेल्या भाषणात संजय राऊत यांनी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला. तसंच 500 कोटी मनीलाँडरिंगचे हे प्रकरण सरकार दडपत असून आता सीबीआयकडे हे प्रकरण पाठवले आहे असंही राऊत म्हणाले.
या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी मी त्यांची वेळ मागतोय पण ते वेळ देत नाहीयेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
ऐंशीच्या दशकात भीमा पाटस सहकारी कारखान्याची सुरुवात
कारखान्याच्या माजी संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार 1976 साली काँग्रसचे नेते मधुकर शितोळे यांनी तालुक्यातील इतर लोकांसोबत भीमा सहकारी साखर कारखाना या संस्थेची नोंदणी केली. तालुक्यातील लोकांनी शेअर्सच्या रुपाने त्याला हातभार लावला.

1980 साली कारखाना प्रत्यक्षपणे सुरु झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कारखाना सुरु झाला तेव्हा दौंडमधल्या सर्वपक्षीय लोकांचा त्यात सहभाग होता. या कारखान्याचे आता जवळपास 50 हजार सभासद आहेत.
साडेबाराशे टनांपासून सुरु झालेला हा कारखाना 2003 सालापर्यंत पाच हजार टनांपर्यंत गेला.
भीमा सहकारी साखर कारखान्याचे सध्याचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राहूल कुल यांचे वडील सुभाष कुल यांचं पॅनेल 1992 साली कारखान्यात निवडून आलं होतं. 2001 साली सुभाष कुल यांचं निधन झाल्यानंतर राहुल कुल या संस्थेचे अध्यक्ष बनले.
मागील काही हंगाम कारखाना बंद होता. 2022 मध्ये कर्नाटकातील निराणी कंपनीला हा कारखाना चालवण्यासाठी देण्यात आला.
कारखान्यातल्या गैरकारभार संदर्भात आरोप
संजय राऊत यांनी विधीमंडळाविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाकडून मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली. त्याचं अध्यक्षपद राहुल कुल यांच्याकडे सोपवण्यात आलं.
त्यानंतर संजय राऊत यांनी 13 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचं मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप केला आणि याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांचा रोख राहुल कुल यांच्याकडे होता.

पण संजय राऊत यांनी या प्रकरणात उडी घेण्याआधीपासूनच भीमा सहकारी साखर कारखान्यावर आर्थिक विस्कळीतपणाचे आरोप होत होते.
यासंदर्भात दौंडमधल्या कोर्टात केसही दाखल करण्यात आलेली आहे. 2002 ते 2007 या काळात कारखान्याचे संचालक असलेले नामदेव ताकवणे यांचा यात प्रमुख सहभाग आहे.
“2001 सालापर्यंत सुभाष अण्णा कारभार बघत होते. 2001 साली त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल कुल हे चेअरमन झाले. मी स्वत: 2002 साली संचालक म्हणून निवडून आलो. त्यावेळेस कारखान्याचा तोटा 51 कोटी होता. मग केंद्र सरकारने एक योजना आणली. सहकारी कारखान्यांची जी तुट होती त्याला समान हप्ते पाडून दिले.
51 कोटींसाठी 5-5 कोटींचे दहा महिन्यांसाठी हप्ते मिळाले आणि आमचा गाडा परत सुरु झाला. अशा पद्धतीने 2007 सालापर्यंत कारखाना सुस्थितीमध्ये होता. अगदी 2013-14 चा अहवाल पाहिला तर कारखाना सव्वा दोन कोटी रुपये नफ्यात आहे. 2014-15 नंतर पुन्हा घरघर लागली. तिथून पुढे त्याची गणितं बदलली. आत्ताच्या घडीला कारखान्यावर कर्ज किती हे अहवाल वाचूनही कळत नाही. कर्ज दडवलं आहे," असा आरोप ताकवणे यांनी केला आहे.
"जे दिसतंय त्यामध्ये 127 कोटी अनामत येईल याखाली अपहार केला आहे. 32 कोटींची साखर गायब केलेली आहे. 103 कोटी हार्वेस्टींगच्या नावाखाली काढले आणि विविध बँकांचे थकवले. जिल्हा बँकेचे 156 कोटी रुपये पेंडींग आहेत. या व्यतिरिक्त 35 कोटी नव्वद लाख एनपीडीसीने दिलेले त्याचं काय झालं ते माहिती नाही. त्याचा हिशोब दिला नाही. या सगळ्यामध्ये मी संचालक होतो तेव्हापासून काही गोष्टींची तक्रार करतोय,” असं नामदेव ताकवणे यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी सीबीआयला दिलेल्या तक्रारीत या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख आहे.
गैरव्यवहारप्रकरणी राहुल कुल यांची प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या सभेनंतर राहुल कुल यांनी 27 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचं खंडन केलं. संजय राऊत यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

“मनी लाँडरिंग हे आमच्या सारख्या साखर कारखान्यात दुरापास्त आहे, जिथे सभासद संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी का आरोप केले हे त्यांना विचारा. चौकशी व्हावी याला आमची काहीच हरकत नाही, असं राहुल कुल यांनी म्हटलं आहे.
"उद्या लोकशाहीमध्ये चौकशी केली जाऊ शकते. माझी इच्छा नाही. पण चौकशी झाली तर मला सहकार्य करणं भाग आहे. माझ्यावर फक्त संजय राऊतांनी आरोप केले. विधानसभेत एकही आरोप माझ्यावर झालेला नाही. मी बऱ्याच लोकांना घाबरत नाही.
"माझ्या दृष्टीने त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही. मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष झालो. खरंतर ही घटनात्मक जबाबदारी आहे. संजय राऊतांनी थोडा अभ्यास करावा. अशा व्यक्तीवर आरोप करणं हे लोकाशाहीला अभिप्रेत नाही,” असं राहुल कुल माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








