सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप साँग शूट, नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, VIRAL VIDEO GRAB
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसीसाठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आणि मुख्य इमारतीमध्ये अनधिकृतपणे रॅप साँग शूट केल्याप्रकरणी पुण्यातील शुभम जाधव या रॅपरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉकसन नावाचं यूट्यूबवर चॅनेल आहे. त्यावर हे रॅप गाणे अपलोड करण्यात आले होते. या गाण्यांमध्ये शुभम जाधव हा गाण्याचं सादरीकरण करतोय.
तर त्याच्यासोबत काही सहकारीही दिसत आहेत. पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये शुभमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
शुभम जाधवचं हे रॅप साँग काही दिवसांच्या आधी व्हायरल झालं. त्या गाण्यात काही शिवराळ शब्दांचा वापर करण्यात आला आहे. तर काही दृश्यांमध्ये शुभमच्या हातात पिस्तूल आणि तलवार सारखी हत्यारं दिसतंय.
तसंच काही दृश्यांमध्ये विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधल्या एका खोलीत आलिशान खुर्च्यांवर बसून शुभम रॅप म्हणताना दिसतोय.
गाणं व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या विद्यार्थी शाखेकडून विद्यापिठाला एक पत्र लिहिण्यात आलं आणि अशा प्रकारचे शुटिंग करायला विद्यापीठाने परवानगी कशी दिली यासंदर्भात विचारणा करण्यात आली.
“ते गाणं मी पाहिलं युट्यूबवर. मी विद्यापीठाला तक्रार आपली जागा या रॅप साँग साठी उपलब्ध करुन दिली यासंदर्भात तक्रार केली होती. मुळ मुद्दा हा होता की, इतकी प्रतिष्ठित वास्तू, इतका ऐतिहासिक वारसा असलेली जागा कशी काय उपलब्ध करुन दिली आणि ही परवानगी कुणी आणि कशी दिली हा आमचा प्रश्न होता.
"त्यानंतर विद्यापीठाच्या लक्षात आलं की त्यांच्याकडून मोठी चूक झालेली आहे. त्यानंतर त्यांनी त्या मुलांवर दबाव टाकला की ते गाणं डिलीट करा. त्यांनी परवानगी दिली नसल्याचं सांगून जबाबादारी झटकली. खरी परिस्थिती अशी आहे की, त्या इमारतीमध्ये निवेदन द्यायला जरी जायचं असलं तरीही तीन वेळा सुरक्षा तपासणी होते.
"अशा परिस्थितीमध्ये सहा- सात तासांचं शूट दहा-बारा मुलं सगळा लवाजमा घेऊन विनापरवानगी कसं काय करू शकतात हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे,” असं राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे आकाश झांबरे-पाटील यांनी सांगितलं.
विद्यापिठाकडून पोलिसांत तक्रार
यानंतर विद्यापीठाकडून चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
संबंधितांनी कोणाचीही परवानगी न घेता अनधिकृत पणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सरस्वती हाॅल मध्ये अनधिकृत चित्रिकरण केल्याचं त्या तक्रारीत म्हटलं होतं.
तसंच या गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा वापर करुन चित्रीकरणात तलवार, रिव्हाॅल्वरचा वापर केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.
विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शुभम जाधवला चौकशीसाठी बोलावलं होतं.

फोटो स्रोत, VIRAL VIDEO GRAB
“विद्यापीठाची परवानगी घेतली नाही अशी तक्रार विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली होती. परवानगी न घेता त्यांनी बिल्डिंगमध्ये प्रवेश केला आणि शुटिंग केलं असं त्यात आहे. त्या अनुषगांने आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
तसंच गाण्यात अश्लील शब्दांचा वापर असल्याने इंफाॅर्मेशम टेक्नोलाॅजी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
विद्यापीठाचं म्हणणं आहे की आम्ही परवानगीच दिलेली नाही. परवानगी दिलेली असेल तर ती लिखित स्वरूपात नाहीये.
"तोंडी परवानगी देण्याबद्दल जर पुढच्या व्यक्तीने मान्य केलं तर ठीक आहे. पण ते तर नाकारत असतील तर परवानगी असल्याचे कागदपत्रे काय आहेत? त्यामुळे प्रथमदर्शनी गु्न्हा दाखल केला आहे. अधिक चौकशी झाल्यानंतर आरोप सिद्ध होतात का ते समोर येईल,” अशी माहिती चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी पंधारे यांनी दिली.
रॅपर शुभम जाधवचं काय म्हणणं आहे?
विद्यापीठात शुटिंगची परवानगी दिली होती असा दावा रॅपर शुभम जाधव याने माध्यमांशी बोलताना केला आहे.
विद्यापीठातील रजिस्ट्रारकडून तोंडी परवानगी मिळाली होती असा दावा त्याने केला आहे.

फोटो स्रोत, VIRAL VIDEO GRAB
“विद्यापीठाची परवानगी नव्हती हा आरोप खोटा आहे. माझ्याकडे शूट करण्यासाठी लेखी नाही तर तोंडी रीतसर परवानगी मिळाली होती. मी परवानगी घेऊनच गाणं शूट केलं. रजिस्ट्रार प्रफुल्ल पवार यांनी मला तोंडी परवानगी दिली होती.
त्यांच्याकडे आम्ही लेखी परवानगी मागायला गेलो होतो. एक पत्र घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावर त्यांची तोंडी परवानगी मिळाली. आम्ही सहा-तास शूट केलं आहे. रविवारी संध्याकाळी सहा ते नऊ असं आम्ही शूट केलं.
"माझं गाणं अश्लील नाहीये. काही वेब सिरिज पाहिल्या तर त्यात शिव्यांचा भडिमार आहे. शिव्या देणं गुन्हा असेल तर पोलीस चौक्या कमी पडतील,” असं शुभम जाधवने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश
याप्रकरणी विद्यापीठाने एक प्रेस रिलिज काढून चौकशी समिती स्थापन केली असल्याचं म्हटलं आहे.
विद्यापीठ पातळीवर चौकशी करण्यासाठी माजी पोलीस महासंचालक डाॅ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याच विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.
या समितीमध्ये विद्यापीठातील सिनेट सदस्यही आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








