डोंबिवलीचा मराठी माणूस जो चक्क इंग्रजीत गातो हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत

फोटो स्रोत, Rahul ransubhe
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकलंय का? याचं उत्तर अनेकांकडून होय असंच येईल पण हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातलं इंग्रजी गाणं किंवा बंदिशी तुम्ही ऐकल्या आहेत का?
नाही ना... कारण भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिशी या हिंदी अथवा ब्रज भाषेतील असतात. तर इंग्रजीत ऐकण्याचा प्रश्न कुठून येईल.
पण एक गंमत सांगतो, इंग्रजीत बंदिशी रचून त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतून गाणारा एक अवलिया आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीय गायक किरण फाटक यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिशी इंग्रजीत भाषांतरीत केल्या आहेत. तसेच अनेक नव्या बंदिशीही त्यांनी इंग्रजीत रचल्या आहेत.
किरण यांनी वयाच्या 9 व्या वर्षापासून शास्त्रीय संगीत शिकण्यात सुरूवात केली. आज त्यांचं वय 66 वर्षं आहे.
तरीही त्यांची शास्त्रीय संगीताबद्दलची आवड तसूभरही कमी झाली नाही. शास्त्रीय संगीतात नवनवीन प्रयोग करण्याची आवड असल्याने त्यांनी हे इंग्रजी भाषेत बंदिशी भाषांतरीत करण्याचं शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला.
इंग्रजी बंदिशी
आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला इंग्रजी भाषेतच का बंदिशी रचाव्या वाटल्या तेव्हा ते म्हणाले, "आपल्या भारतात अत्यंत प्रतिभावान असे कलाकार होऊन गेले. त्यांनी आपल्या संगीतात अनेक बंदिशी रचल्या. परंतु या बंदिशींची भाषा ही उत्तरेकडची होती. म्हणजे ब्रज भाषा, हिंदी, उर्दू अशा भाषांमध्ये या बंदिशी रचल्या गेला. ब्रज भाषेला विविध फ्लेवर असतात."

फोटो स्रोत, Rahul ransubhe
"आता अकूलावे हा जो शब्द आहे याचा अर्थ तळमळणे.. परंतु अकुलावे हा शब्द आपल्या महाराष्ट्रातील किती लोकांना कळेल.. तर असे अनेक शब्द या बंदिशींमध्ये होते. तेव्हा मी असा विचार केला की, हे शब्द जर मराठी, हिंदी मुलांना कळत नाही. मग मी जर माझ्या देशाच्या सीमा ओलांडून जर इतर देशात गेलो तर त्यांना हे शब्द समजतील का?
"तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण जर इंग्रजीत बंदिशी केल्या तर... कारण मला वाटतं कुठल्याही शास्त्रीय संगीताला भाषेचं बंधन नसावं. भाषेच्या पलीकडे जाऊन शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे. त्यामुळे मी जगाची भाषा असलेल्या इंग्रजीत बंदिशी भाषांतरित करायचं ठरवलं," असं फाटक सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"सुरूवातीला मी भारतीय शास्त्रीय संगीतातील ज्या प्रसिद्ध बंदिशी होत्या त्या अनुवादित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी मग मी मराठी-इंग्रजी डिक्शनरी आणली. तसंच इंग्रजी मराठीही डिक्शनरी आणली. आणि मग त्यातले त्या त्या छटा असलेले शब्द निवडण्याचा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्या शब्दांना घेऊन मी काही इंग्रजी बंदिशी तयार केल्या. म्हणजे अनुवादीत केल्या," फाटक सांगतात.
इंग्रजीत बंदिशी भाषांतरित केल्यानं करावा लागला टीकेचा सामना
किरण यांना या इंग्रजीत बंदिश भाषांतरित केल्यामुळे अनेकांनी त्याचं कौतुक तर केलं मात्र त्यापेक्षा जास्त लोकांनी त्यांच्यावर टीका केल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, Rahul ransubhe
"या माझ्या इंग्रजी बंदिशींचं अनेकांनी कौतुक केलं, परंतु त्याच बरोबर अनेकांनी याला कडाडून विरोध केला. त्यावेळी माझ्या गुरूंनी मला सांगितलं, चांगल्या गोष्टींना सुरूवातीला विरोध होतो मात्र नंतर हळूहळू त्या गोष्टी लोक स्वीकारायला लागतात.. माझ्या बाबतीतही तसंच झालं. परंतु मग मी विचार केला की हे अनुवादित काही बरोबर वाटत नाही.
"त्यामुळे आपण स्वतःचं इंग्रजी बंदिशी रचूयात. त्यातून मी अनेक बंदिशी स्वतः तयार केला. आणि त्यामध्ये नवीन विषय घेण्याचा प्रयत्न केला. कारण भारतीय बंदिशीतील अनेक विषय हे कालबाह्य झालेले आहेत. त्यामुळे मी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न माझ्या इंग्रजी बंदिशीतून केला," असं किरण आवर्जून सांगतात.
मराठीतही बंदिशी रचल्या
इंग्रजीत बंदिशी रचल्यानंतर किरण यांनी आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीतही बंदिशी रचल्या आहेत. याबद्दल फाटक सांगतात, "अमृतातेही पैजा जिंके असं ज्ञानेश्वर सांगतात. त्यामुळे मी विचार केला आपण इंग्रजीत बंदिशी तर केल्या. मग आपण मराठीत बंदिशी का करू नये."

फोटो स्रोत, Rahul ransubhe
"पूर्वी याच लोकांनी मराठीवर टीका केली होती, की यामध्ये बंदिशी करता येत नाही. यात जोड अक्षरं असतात. यात बोल आलाप घेता येत नाही. बोल ताना घेता येत नाही. त्यामुळे हे सर्व आरोप मी खोडून काढण्यासाठी मराठीत बंदिशी लिहिल्या आणि त्याचे जागोजागी कार्यक्रम केले. विशेष म्हणजे या बंदिशींवर कोणीही टीका केली नाही. उलट लोकांनी याचं कौतुकच केलं," हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवतो.
ग्वाल्हेर घराणं
किरण फाटक हे मुळचे ग्वाल्हेर घराण्याचे गायक. त्यांना हा शास्त्रीय गायनाचा वारसा कुटूंबाकडूनच मिळाला आहे. आपल्या लहानपणाबद्दल ते सांगतात,

फोटो स्रोत, Rahul ransubhe
"माझं गाण्यातलं घराणं म्हणजे ग्वाल्हेर घराणं. ग्वाल्हेर घराण्याचे माझे वडील होते, काका होते, आत्या होती. माझी आजीही मोठी किर्तनकार होती. त्यामुळे ग्वाल्हेर घराण्याचं बाळकडू आम्हाला पहिलेच मिळालं होतं.
"ग्वाल्हेर घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, या गायकीत आलाप, बोल आलाप, ताना, बोल ताना हे जे सर्व शास्त्रीय गायनातले घटक आहेत, ते समप्रमाणात असतात. असं होत नाही की, बोल जास्त आणि आलाप कमी, किंवा ताना जास्त आणि आलाप कमी. हे सर्व सम प्रमाणात या गायनात वाटलेले असतात."
शास्त्रीय संगीतामध्ये विविध प्रयोग
किरण यांनी आतापर्यंत लहानापासून जेष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले आहे आणि त्यांचे हे कार्य अजूनही अव्याहतपणे सुरू आहे. शास्त्रीय गायन शिकवण्यासोबतच त्यांनी अनेक पुस्तकांचेही लेखन केले आहे.

फोटो स्रोत, Rahul ransubhe
यामध्ये त्यांनी 14 शास्त्रीय संगीतावरील पुस्तकं, 5 आध्यात्मिक पुस्तकं आणि 5 सामाजिक काव्यसंग्रह लिहिली आहेत. त्यांची ही पुस्तकं देशात तसेच विदेशातही वाचली जातात असं ते सांगतात. सध्या ते संगीत थेरेपीवर संशोधन करत आहे. याचे प्रयोग गोव्याला सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले.
सध्याचा काळ हा शास्त्रीय संगीतासाठी उपयुक्त
"भारतीय शास्त्रीय संगीत हे स्वराधिष्ठीत असल्याने ते अमर आहे. आणि सध्याच्या जनरेशनबद्दल बोलाल तर हे आता वाढतच जाणार. कारण आज ज्या तरुणांना शास्त्रीय गायनाची आवड आहे ते युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हवे ते राग, हवा तो गायक पाहू आणि ऐकू शकतात.
"तसेच इंटरनेटवर रागसंगीताबद्दल जगभारतील तज्ज्ञ मंडळींचे लेख, त्यांचं संशोधन एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे ते घर बसल्या हवी ती माहिती मिळवू शकत आहेत. त्यामुळे मला वाटतं इथून पुढचा जो काळ आहे तो भारतीय शास्त्रीय संगीतासाठी अधिक उपयुक्त आहे," असं फाटक सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








