मोहम्मद शहा रंगीला : महिलांची रेशमी वस्त्रं परिधान करून दरबारात जाणारा बादशहा

रंगीला आणि नादिर शाह

फोटो स्रोत, MUSEE_GUIMET_PARIS

    • Author, जफर सय्यद
    • Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद

12 मे 1739 ची सायंकाळ. दिल्लीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शाहजहानाबादमध्ये चरागां (एक प्रकारचा दीपोत्सव) साजरा केला जात आहे, तर लाल किल्ल्यातही उत्सवाचं वातावरण आहे.

गरिबांना शरबत, पान आणि अन्नदान केलं जात आहे. फकिरांच्या झोळ्या पैशांनी भरल्या जात आहेत.

आज दरबारामध्ये इराणी बादशहा नादीर शहासमोर मुघल साम्राज्याचा तेरावा सम्राट मोहम्मद शहा बसलेला आहे. पण त्याच्या डोक्यावर शाही मुकूट नाही. कारण नादीर शहानं अडीच महिन्यांपूर्वी त्याच्याकडून साम्राज्य हिसकावलं होतं.

56 दिवस दिल्लीत राहिल्यानंतर नादीर शहाची इराणला परतण्याची वेळ आली आहे. भारताची जबाबदारी तो पुन्हा मोहम्मद शहाच्या ताब्यात देणार आहे.

शेकडो वर्षांपासून मुघलांनी साठवलेला खजाना नादीर शहानं अक्षरशः साफ केला. तसंच शहरातील धनदांडग्यांनाही कंगाल करून सोडंलं आहे.

पण, दिल्लीमधली तवायफ नूरबाई हिनं नादीर शहाला काहीतरी गोपनीय सांगितलं. या नूरबाईचा उल्लेख पुढंही येईलच.

मोहम्मद शहानं पगडीत असं काही लपवलंय की, त्यासमोर तुम्ही मिळवलेल्या या सर्वाची काहीही किंमत नाही, असं तिनं सांगितलं.

नादीर शहा धूर्त होता. सगळीकडं फिरून आलेला होता. त्यानं त्यावेळी खेळलेल्या चालीवरून त्याचा धूर्तपणा समोर येतो.

औरंगजेब

"इराणमध्ये आनंदाच्या क्षणी भाऊ आपसांत पगड्यांची अदला-बदली करतात अशी प्रथा आहे. आजपासून आपणही भाऊ बनलो आहोत. तर ही प्रथा आपणही पूर्ण करायला हवी," असं नादीर शहा मोहम्मद शहाला म्हणाला.

मोहम्मद शहाकडं त्याचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

रंगीला बादशहा

मोहम्मद शहा हा आलमगीर औरंगजेब याची सत्ता असताना 1702 मध्ये जन्मला होता. औरंगजेब त्याचा पंजोबा होता.

जन्माच्या वेळचं त्याचं नाव रोशन अख्तर होतं. पण 29 सप्टेंबर 1719 मध्ये शाही इमाम सय्यद ब्राद्रानने वयाच्या 17 व्या वर्षी त्याला सल्तनत-ए-तैमुरियाच्या तख्तावर बसवलं. त्यानंतर त्याला अबु अल फतह नसिरुद्दीन रोशन अख्तर मोहम्मद शहा हा किताब देण्यात आला.

पण त्याचं टोपणनाव किंवा रोजचं नाव 'सदा रंगीला' होतं. एवढं मोठं नाव कोण लक्षात ठेवणार म्हणून लोकांनी दोन्हीचं मिळून मोहम्मद शहा रंगीला असं नाव केलं. आजपर्यंत भारतात त्यांना याच नावानं ओळखलं जातं.

मोहम्मद शहाच्या जन्माच्या वेळी औरंगजेबानं भारतात अत्यंत कट्टर इस्लाम लागू केला होता. त्यावेळी काही कलाकार इस्लामच्या नियमांचं पालन करत नव्हते, असं म्हटलं जात होतं. ते कलाकार सर्वांत आधी या कठोर नियमांच्या तावडीत सापडले.

मोहम्मद शाह रंगीला

फोटो स्रोत, SAN_DIEGO_MUSEUM_OF_ART

फोटो कॅप्शन, नादिर शाहच्या हल्ल्यानंतर मोहम्मद शाह रंगीला अधिकतर पांढरे कपडे परिधान करायचे.

निकोलो मनूची नावाच्या एका इटालियन प्रवाशानं याबाबत एक रंजक उदाहरण लिहून ठेवलं आहे.

औरंगजेबाच्या काळात गायक आणि संगीतकार यांच्यावर बंदी लादली तेव्हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, असं ते सांगतात.

शेवटी कंटाळून एक हजार कलाकारांनी शुक्रवारी दिल्लीच्या जामा मशिदीपासून मिरवणूक (मोर्चा) काढला आणि अंत्ययात्रा काढल्याप्रमाणे रडत-रडत हा मोर्चा पुढं सरकत होता.

औरंगजेबानं पाहिलं तर, "ही कुणाची अंत्ययात्रा आहे, ज्यासाठी सगळे एवढं रडत दुःख व्यक्त करत आहेत?" असं त्यानं विचारलं.

त्यावर, "तुम्ही संगीत, गाण्याची हत्या केली आहे, त्याला दफन करायला जात आहोत," असं म्हणाले. त्यावर औरंगजेबानंही, "जरा खोल कबर खोदा," असं उत्तर दिलं होतं.

प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते, हा भौतिकशास्त्राचा नियमच आहे.

इतिहास आणि मानवी समाजावरही हाच नियम लागू होतो. एखादी गोष्ट जेवढी जास्त जोरानं दाबली जाते, तेवढ्याच शक्तीनं ती पुन्हा वर येत असते. त्यामुळंच औरंगजेबानंतरच्या काळात असंच काही झालं. या काळात दाबल्या गेलेल्या या सर्व कला मोहम्मद शहाच्या काळामध्ये तेवढ्या अधिक प्रखरपणे पुढं आल्या.

दोन विरुद्ध टोकं

याचं अत्यंत खास असं उदाहरण 'मरकए दिल्ली' मधून मिळते.

मोहम्मद शाह रंगीला

फोटो स्रोत, metmuseum

फोटो कॅप्शन, मोहम्मद शाह यांच्या काळात संगीताला प्रोत्साहन मिळाले.

मोहम्मद शहाच्या दरबारातील कली खाननं हे पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यानं अशी काही वर्णनं केली आहेत की, ती वाचल्यानंतर साक्षात त्या काळातील दिल्लीचा नजारा डोळ्यासमोर उभा राहतो.

केवळ बादशहाच नव्हे तर दिल्लीच्या लोकांचं जीवनही घड्याळ्याच्या लोलकाप्रमाणं झुलत होतं, हेदेखील या पुस्तकातून समोर येतं.

एकीकडं तर ते अगदी शाही जीवन जगायचे मात्र त्याचा कंटाळा आला की, फकिरांसोबत राहायचे.

त्याठिकाणीही काही दिवसांत मन भरलं तर ते पुन्हा शाही जीवनाकडं परतायचे.

'मरकए दिल्ली' पुस्तकामध्ये कदम शरीफ, कदम गाह हजरत अली, निजामुद्दीन औलियांचा मकबरा, कुतुब साहबची दरगाह आणि अशा अनेक ठिकाणांचा उल्लेख आहे. त्याठिकाणी अनुयायांची नेहमी गर्दी असायची.

मुस्लीम संत, फकिरांच्या मोठ्या प्रमाणावर कबरी असल्याचा उल्लेख या पुस्तकात केलेला आहे.

एकिकडं इथं दिल्लीत 'ग्यारवी शरीफ'चा धार्मिक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडं आकर्षक सजावट केली जाते, प्रचंड उत्हासाचं वातावरण असंत.

त्याचबरोबर, या दरम्यान संगीत क्षेत्राचीही भरभराट झाली. त्याला मोठं प्रोत्साहन मिळालं. शाही दरबारशी संबंधित अनेक संगीतकारांचाही उल्लेख पाहायला मिळतो.

नादिर शाह
फोटो कॅप्शन, नादिर शाहने 1739 मध्ये खैबर खिंड पार करुन भारतावर आक्रमण केलं होतं.

त्यातही अदा रंग आणि सदा रंग हे अत्यंत प्रसिद्ध होते. त्यांनी ख्याल (गायनाचा एक प्रकार) गायनाला एक नवी उंची मिळवून दिली. ती आजही कायम आहे.

"सदा रंग त्याच्या नखांनी वाद्याच्या तारा छेडताच त्याचे सूर जणू काळीज चिरून आरपार जायचे आणि तो गायला लागला की, प्रचंड आनंदाचा अनुभव मिळायचा," असं वर्णन मरकए दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे.

'मोहम्मद शाह रंगीले सजना तुम बिन कारी बदरया, तन ना सुहाए. 'मोहम्मद शाह रंगीले सजना, तुम्हारे बिना काले बादल दिल को नहीं भाते', ही त्या काळातली बंदीश आजही गायली जाते.

दरगाह कुलीने अनेक कव्वाल, ढोल वादक, सबूचा (वादनात वापरली जाणारी सुरई) वादक अशा शाही दरबाराशी संबंधित अनेक कलाकारांचा उल्लेख केला आहे.

हत्तींमुळं 'ट्राफिक जाम'

एवढं सगळं सुरू असताना त्या काळात, नृत्य कसं मागं राहणार. नूरबाईचा उल्लेख आधीही आला आहे. तिच्या कोठ्यासमोर धनदांडगे आणि श्रीमंतांच्या हत्तींची एवढी गर्दी असायची की जाण्यायेण्यासाठी जागाच नसे.

"तिच्या मैफिलीत जाण्याची सवय ज्याला लागली, त्याचं घरं उद्ध्वस्त झालं आणि ज्याला तिच्या मैत्रीची नशा झाली तो तिथंच चकरा मारत राहिला. त्याठिकाणी अनेकांनी संपत्ती लुटवली, तसंच अगणित लोक तर तिच्यासाठी पूर्णपणे कंगाल झाले,'' असं मरकए दिल्लीमध्ये म्हटलं आहे.

नूरबाईने नादीर शहा बरोबरही संबंध प्रस्थापित केले होते. अशाच एखाद्या एकांताच्या भेटीमध्ये तिनं कोहिनूरचं गूढ नादीर शहाला सांगितलं असावं, अशी दाट शक्यता आहे.

ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार थियो मॅटकॉफ यांनी त्यांच्या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. मात्र अनेक इतिहासकारांना याबाबत शंका आहे, हेही जाणून घेणं गरजेचं आहे.

दिल्ली में क़त्ल-ए-आम
फोटो कॅप्शन, कहा जाता है कि क़त्ल-ए-आम में दिल्ली के तीस हज़ार लोग मारे गए थे

याकाळात ती एवढी प्रसिद्ध झाली होती जणू संपूर्ण हिदुस्तानच्या स्मृतीत तिचं नाव तेव्हा कोरलं गेलं असावं. दरगाह कुली खान यांनी आणखी एका तवायफ अद बेगमचं असंच काहीसं वर्णन केलं आहे.

"अद बेगम दिल्लीतील अशी प्रसिद्ध बेगम आहे जी पायजमाच परिधान करत नाही. त्याऐवजी ती फुलं पानांची नक्षी पायावर काढून घेते. ही कलाकारी एवढी सुंदर असते, की ते रोमच्या विणलेल्या कापडासारखं भासतं. अशाच पोशाखात ती अमेरिकन असलेल्या मैफिलींमध्ये जाते आणि विशेष म्हणजे तिनं पायजमा घातला आहे की पायावर चित्रं काढली आहेत, हे कुणालाही कळत नाही. जोपर्यंत हे गूढ उकललं नव्हतं, तोपर्यंत कोणालाही त्याबाबत कळलं नाही."

हा काळ म्हणजे मीर तकी मीर यांच्या तारुण्याचा काळ होता. त्यामुळं पुढं दिलेला शेर त्यानं तिच्यासाठीच लिहिला असावा अशी शक्यता आहे...

'जी फट गया है रश्क से चसपां लिबास केक्या तंग जामा लिपटा है उसके बदन के साथ'

या काळात मोहम्मद शहाचा दिनक्रम प्रामुख्यानं पुढीलप्रमाणे होता, सकाळच्या वेळी मनोरंजनासाठी हत्तींच्या लढाया पाहायच्या.

त्याचदरम्यान जर कुणी काही तक्रार घेऊन आलंच, तर तीही ऐकली जायची. दुपारच्या वेळी कलाकार, शिल्पकार यांच्या कलेचा आनंद लुटणं. सायंकाळनंतर नृत्य, संगीत याच्या मैफिली आणि रात्रीच्या वेळी...

बादशहाला आणखी एक विचित्र आवड होती. महिलांचा पोशाख परिधान करायला त्याला आवडायचं. अनेकदा महिलांची रेशमी वस्त्रं परिधान करून तो दरबारात जायचा.

त्यावेळी त्यांनं मोती लावलेले बूट परिधान केलेले असयाचे. मात्र, नादीर शहाच्या हल्ल्यानंतर तो बहुतांश वेळा पांढरा पोशाखच परिधान करायचा, असं काही पुस्तकात म्हटलं आहे.

औरंगजेबाच्या काळात पूर्णपणे दाबली गेलेली मुघल चित्रकलादेखील या काळात चांगलीच गाजली.

त्या काळातील प्रसिद्ध चित्रकारांमध्ये निधा मल आणि चित्रमन यांचा समावेश होता. मुघलकालीन चित्रकलेच्या सुवर्णकाळातील त्यांची चित्र होती, असं म्हणणंही वावगं ठरणार नाही.

शहाजहान नंतर प्रथमच दिल्लीत मुघल चित्रकारांचा नवा काळ सुरू झाला. त्या काळातील शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे फिक्कट रंगाचा वापर.

मोहम्मद शाह रंगीला
फोटो कॅप्शन, दारू आणि अफीमच्या व्यसनाने मोहम्मद शहाला निष्क्रिय केलं होतं.

त्याशिवाय आधीच्या काळामध्ये मुघलकालीन चित्रांमध्ये संपूर्ण चित्र पूर्णपणे भरलेलं असायचं. मोहम्मद शहाच्या काळात मात्र त्यात साधेपणा राहावा यासाठी चित्रात रिकाम्या जागा सोडण्याचा विचार समोर आला. त्यामुळं संपूर्ण चित्रावर नजर फिरत राहायची.

याच काळातलं एक चित्र अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यात मोहम्मद शहा रंगीला, त्यात एका दासीबरोबर सेक्स करताना दिसत आहे. बादशहा नपुंसक (नामर्द) असल्याची अफवा दिल्लीमध्ये पसरली होती. ती दूर करण्यासाठी हे चित्र वापरण्यात आलं असं म्हटलं जातं.

आजच्या काळात त्याला 'पॉर्न आर्ट' म्हटलं जातं.

सोन्याची चिमणी

अशाने राज्य कसं चालणार आणि कोण चालवणार? हळुहळू अवध, बंगाल आणि दख्खन सारख्या सुपीक आणि अधिक उत्पन्न असलेल्या भागातील नवाब हेच त्यांच्या भागांचे बादशहा बनले.

दक्षिणेमध्ये मराठ्यांनी पाय पसरायला सुरुवात केली होती. त्यामुळं साम्राज्याच्या (सल्तनत-ए-तैमुरिया) चिंधड्या उडू लागल्या. मात्र नादीर शहाच्या रूपानं या साम्राज्याला सर्वात मोठा फटका बसला आणि त्यानं हे साम्राज्य उध्वस्त करून टाकलं.

शफीकुर्रहमान यांनी 'तुजके नादरी' मध्ये नादीर शहानं भारतावर हल्ला करण्याची अनेक कारणं सांगितली आहेत.

भारतीय गायक 'नादरना धीम-धीम' म्हणत आमची खिल्ली उडवतात किंवा 'आम्ही हल्ला करायला नाही तर आमच्या आत्याला (फुफी) भेटायला आलो होतो,' अशी काहीही कारणं असायची. हा झाला गमतीचा विषय, पण खरी कारणं फक्त दोन होती.

पहिलं कारण : सैन्याचा विचार करता, भारत कमकुवत होता. दुसरं कारण : संपत्तीचा विचार करता, खजाने भरलेले होते.

घसरण झाल्यानंतरही काबूलपासून बंगालपर्यंत मुघल बादशहाचंच नाणं चालायचं. त्याची राजधानी दिल्ली हे त्या काळातलं जगातलं सर्वांत मोठं शहर होतं. दिल्लीची 20 लाखांची लोकसंख्या ही लंडन आणि पॅरिसच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिक होती. जगातील सर्वांत श्रीमंत शहरांमध्ये दिल्लीचा समावेश होता.

त्यामुळंच नादीर शहा 1739 मध्ये प्रसिद्ध खैबर खिंडीच्या मार्गाने भारतात प्रवेश करण्यासाठी आला. मोहम्मद शहाला नादीर शहाचं सैन्य पुढं सरकत असल्याचं वारंवार सांगतिलं जात होतं. पण तो प्रत्येकवेळी एकच उत्तर द्यायचा :- 'हनूज दिल्ली दूर अस्त' म्हणजे 'दिल्ली अजून दूर आहे, आतापासून काळजीचं काय कारण?'

मोहम्मद शाह रंगीला
फोटो कॅप्शन, केवळ दोन मुघल राजा अकबर आणि औरंगजेब यांचा कार्यकाळ मोहम्मद शाह रंगीला याच्यापेक्षा मोठा होता.

नादीर शहा दिल्लीपासून शंभर मैलाच्या अंतरावर पोहोचला तेव्हा मुघल बादशहाला आयुष्यात पहिल्यांदाच सैन्याचं नेतृत्व करावं लागलं. सैन्याची संख्या लाखोंमध्ये होती. पण त्यातही आचारी, संगीतकार, सेवक, कलाकार, खजीनदार आणि इतर कर्मचाऱ्यांचीच संख्या जास्त होती. प्रत्यक्ष लढणाऱ्या सैन्याची संख्या केवळ एका लाखापेक्षा थोडी जास्त होती.

त्या तुलनेत इराणी फौज ही जेमतेम 55 हजारांची होती. पण एकीकडं युद्धामध्येच लहानाचे मोठे झालेले नादीर शहाचे सैनिक आणि दुसरीकडं मैफिली आणि गमती-जमतीमध्ये रमलेले मुघल सैनिक. कर्नालच्या मैदानात झालेल्या या लढाईचा निकाल तीन तासांतच लागला. नादीर शहानं मोहम्मद शहाला कैद केलं आणि विजयी मुद्रेत त्यानं दिल्लीत प्रवेश केला.

नरसंहार (कत्ल-ए-आम)

दुसऱ्या दिवशी इद-उल-जुहा होती. दिल्लीच्या मशिदींमध्ये नादीर शहाच्या नावाची प्रार्थना झाली आणि टंकसाळांमध्ये त्याच्या नावाची नाणी पाडायला सुरुवात झाली.

काही दिवसांतच शहरात अफवा पसरली की, एका तवायफने नादीरशहाची हत्या केली आहे.

दिल्लीतील लोकांना ते खरं वाटलं. त्यांनी शहरात तैनात असलेल्या इराणच्या सैनिकांच्या हत्या करायला सुरुवात केली. त्यानंतर जे काही घडलं त्याच्या क्रौर्याचा उल्लेख इतिहासाच्या पानांमध्ये करण्यात आला आहे.

"सूर्य पूर्णपणे उगवलाही नव्हता. त्याआधीच नादीर शहा दुर्राणी घोड्यावरून लाल किल्ल्यातून बाहेर आला. त्यानं चिलखत घातलेलं होतं. डोक्यावरही लोखंडी कवच आणि कमरेला तलवार होती. त्याच्याबरोबर कमांडर आणि जरनैल होते. अर्धा मैल अंतरावर असलेल्या चांदनी चौकातील रोशनउद्दौला मशिदीकडं तो निघाला. मशिदीच्या परिसरातील विशाल अंगणात उभा राहिला आणि त्यानं तलवार म्यानातून काढली."

हा त्याच्या शिपायांसाठी इशारा होता. त्यानंतर सकाळी नऊ वाजता नरसंहार (कत्ल-ए-आम) सुरू झाला. शिपायांनी घरा-घरांत जाऊन भेटेल त्याला मारायला सुरुवात केली.

एवढं रक्त वाहिलं होतं की, अक्षरशः नाल्या भरून वाहू लागल्या होत्या. लाहौरी दरवाजा, फैज बाजार, काबुली दरवाजा, अजमेरी दरवाजा, हौज काजी आणि जोहरी बाजार हे भाग मृतदेहांनी भरले होते.

हजारो महिलांवर बलात्कार झाले. शेकडोंनी विहिरींमध्ये उड्या मारून जीव दिले. इराणी शिपायांकडून अत्याचार होऊ नये म्हणून, अनेकांनी स्वतःच बायका-मुलींची हत्या केली.

इतिहासातील विविध दाखल्यांचा विचार करता त्या दिवशी दिल्लीतील 30 हजार जणांची हत्या करण्यात आली होती. अखेर मोहम्मद शहानं पंतप्रधानांना नादीर शहाकडे पाठवलं. पंतप्रधान अनवाणी पायानं नादीर शहासमोर गेले आणि एक शेर त्याच्यासमोर सादर केला. तो शेर असा होता -

'दीगर नमाज़दा कसी ता बा तेग़ नाज़ कशी... मगर कह ज़िंदा कनी मुर्दा रा व बाज़ क़शी'

(तुला हत्या करण्यासाठी आता कोणीही शिल्लक उरलेलं नाही. आता तर मेलेल्यांनाच परत जीवंत करून पुन्हा त्यांची हत्या करावी लागेल.)

त्यानंतर नादीर शहानं त्याची तलवार म्यान केली आणि त्याच्या शिपायांनीही हिंसाचार थांबवला.

नरसंहार थांबला आणि लूट सुरू झाली. शहराची वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी करण्यात आली. सैनिकांना शक्य तेवढी संपत्ती लूटण्याचे आदेश देण्यात आले. संपत्ती लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर प्रचंड अत्याचार केले जात होते.

शहरात काहीही शिल्लक राहिलं नाही, म्हणून मग नादीर शहाचा मोर्चा शाही महालाकडं वळला. नादीर शहाच्या दरबारातील इतिहासकार मिर्झा महदी अस्त्राबादी यांनी त्याचं वर्णन केलं आहे.

'काही दिवसांतच मजुरांना शाही खजाना रिकामा करण्याचा आदेश देण्यात आला. त्यात हिरे, मोत्यांचे जणू समुद्र होते. सोन्या चांदीच्या खाणी होत्या. एवढी संपत्ती होती जी त्यांनी स्वप्नातही पाहिली नव्हती. शाही खजान्यातून कोट्यवधी रुपये नादीर शहाच्या खजान्यात पाठवण्यात आले. दरबारातील नवाब, राजे, बड्या हस्तींनी कोट्यवधींचं सोनं, दागिने खंडणीच्या रुपात दिले,' असं त्यांनी लिहलं आहे.

ही संपत्ती इराणला नेणं सोपं व्हावं म्हणून महिनाभर शेकडो मजूर हे सोन्या चांदीचे दागिने, भांडे आणि इतर सामान वितळून त्याच्या विटा तयार करत होते.

'तुजक-ए-नादरी' मध्ये शफीकुर्रहमान यांनी याचं अत्यंत विस्तारानं वर्णन केलं आहे. 'एखादी अशी वस्तू घ्यायची राहिली असेल, तर आमच्याबरोबर नक्की पाठवून द्या त्याची परवानगी आम्ही मोहम्मद शहाला दिली आहे. लोक ओरडून ओरडून रडत होते. आमच्या शिवाय लाल किल्ला सुना (रिकामा) वाटेल असं म्हणत होते. पण हे खरंच होतं, लाल किल्ला आम्हालाही सुना-सुनाच वाटत होता.'

नादीर शहानं भारतातून किती संपत्ती लुटली असेल बरं. इतिहासकारांनी लावलेल्या एका अंदाजानुसार त्यावेळी या संपत्तीची किंमत अंदाजे 70 कोटी होती. आजच्या काळाशी हिशेब लावला तर, ही रक्कम 156 अब्ज डॉलर म्हणजेच दहा लाख पन्नास हजार कोटी रुपये होते. मानवी इतिहासाचा विचार करता हा सर्वांत मोठा सशस्त्र दरोडा होता.

उर्दू शायरीचा सुवर्णकाळ

मुघलांची दरबारातील कामकाजाची आणि सरकारी भाषा ही फारसी होती. पण सामान्य नागरिकांवरचा दरबाराचा वचक कमी होऊ लागला, तशी लोकांची बोली भाषा असलेली उर्दू लोकप्रिय होत गेली. त्यामुळं मोहम्मद शहा रंगिला यांच्या काळाला उर्दू शायरीचा सुवर्णकाळ म्हटलं जाऊ शकतं.

मोहम्मद शहा बादशहा बनताच या सुवर्णकाळाची सुरुवात झाली होती. बादशहाच्या साल-ए-जुलूस (उत्सव) मध्ये म्हणजे 1719 च्या दरम्यान वली दख्खनी यांचा दीवान (गझलांचा संग्रह) दिल्लीत पोहोचला. त्या गझलांनी दिल्लीमध्ये शायरीची अशी काही लहर उठली की लोकांना उर्दूची (त्याकाळी उर्दूला रेख्ता, हिंदीत दख्खणी म्हटलं जात होतं) जादू कळली. तसंच उर्दूमध्ये अशी शायरीही होऊ शकते हेही लोकांच्या लक्षात आलं.

पाहता पाहता उर्दू शायरी प्रचंड लोकप्रिय झाली. दर्जेदार शायर पुढं आले. त्यात शाकीर नाजी, नजझमुद्दीन अबूर, शदफउद्दीन मझमून आणि शाह हातिम अशी त्यातील काही प्रमुख नावं आहेत.

मिर्झा रफी सौदा हे शाह हातिम यांचेच शिष्य होते. आजही त्यांच्या उर्दू लिखानाला तोड नाही. सौदा यांचेच समकालीन असलेल्या मीर तकी मीर यांच्या गझलांची बरोबरही आजवर कुणाला करता आलेली नाही. त्याच काळातील दिल्लीत मीर दर्द यांची खानकाह (मठ किंवा आश्रम) आहे. मीर दर्द यांना आजही उर्दूचे सर्वांत मोठे शायर म्हटलं जातं. त्याचप्रमाणं याच काळातील मीर हसन यांची 'सहर-उल-बयान' ही मसनवी (अनेक शेर असलेली कविता) आजही सर्वोत्तम आहे.

हे सगळे पहिल्या फळीतील शायर होते. पण त्या काळात दुसऱ्या फळीतही इतर अनेक चांगले शायर होते. पण या मोठ्या नावांमुळं त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. कदाचित दुसऱ्या काळात ते असते तर ते सर्वच फार मोठे शायर झाले असते.

असा झाला शेवट

प्रचंड मद्यपान आणि अफूच्या सवयीनं मोहम्मद शाहनं स्वतःचंच साम्राज्य खिळखळं करून टाकलं होतं. त्यामुळं त्यांचं आयुष्यही फार राहिलं नाही.

मोहम्मद शहा 46 वर्षांचा असताना एक दिवस अचानक त्याला तीव्र संतापामुळे झटका आला. उपचारासाठी त्याला लगेचच हयात बख्श बागमध्ये नेलं. पण वैद्यांनाही त्याला वाचवता आलं नाही. रात्रभर बेशुद्ध राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निधन झालं. निजामुद्दीन औलिया यांच्या मकबऱ्यात अमीर खुसरोजवळ दफन करण्यात आलं.

ती तारीख म्हणजे 15 एप्रिल 1748. मोहम्मद शहासाठी हे एका अर्थानं चांगलंच झालं. कारण त्याचवर्षी नादीर शहाचा सुभेदार अहमद शहा अब्दालीनं भारतावर हल्ले सुरू केले होते.

बाबर, अकबर किंवा औरंगजेबाशी तुलना करता मोहम्मद शहानं लढाईत कर्तृत्व गाजवलं नव्हतं हे स्पष्टच आहे. नादीर शहा विरोधात कर्नालच्या लढाईशिवाय दुसऱ्या कोणत्याही लढाईतही त्यानं नेतृत्वच केलं नव्हतं.

मुघलांचं वैशिष्ट्य असलेली जहांबानी आणि जहांगीर यांच्यासारखी शक्तीही त्याच्याकडं नव्हती. त्यामुळं त्याला मर्द-ए-अमल नव्हे तर मर्द-ए-महफिल म्हटलं जायचं. पंजोबा औरंगजेबांच्या तुलनेत मोहम्मद शहा युद्ध कलेचा नव्हे तर इतर मनोरंजनाच्या कलांचा प्रेमी होता.

असं सर्व असलं तरी मुघल साम्राज्याच्या पतनाला मोहम्मद शहा एकटा कारणीभूत होता का, तर आमच्या मते तरी तसं नाही. औरंगजेबानं स्वतः कट्टर विचारसरणी, अत्यंत कठोर प्रशासन आणि विनाकारण सैन्य वाढवण्याचा अट्टहास या कारणांमुळं साम्राज्याचं नुकसान सुरू केलं होते.

निरोगी शरीरासाठी चांगल्या आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे चांगल्या समाजासाठी शक्तिशाली सैन्याबरोबर आनंदी आणि उत्साही वातावरण गरजेचं असतं. एकीकडं औरंगजेबानं तलवारीवर जोर दिला तर त्याचा पणतू मोहम्मद शहानं केवळ मैफिलींवर. दोन्हींचा परिणामही सर्वांसमोर आहे.

ही सर्व तत्कालीन परिस्थिती होती. तरीही प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच बाहेरील आक्रमणं आणि दरबारातील अंतर्गत कट कारस्थानं यातही मुघल साम्राज्याचा सांभाळ करणं हा मोहम्मद शहाच्या राजकीय यशाचा पुरावा आहे.

त्याच्यापूर्वी केवळ अकबर आणि औरंगजेब यांनाच मोहम्मद शहापेक्षा जास्तकाळ गादीवर राहाता आलं होतं. त्यामुळं मोहम्मद शहाला मुघलांचा अखेरचा शक्तिशाली बादशहादेखील म्हणता येऊ शकतं. कारण त्यानंतर आलेले बादशहा हे दरबारातील अधिकारी, रोहिले, मराठे आणि शेवटी इंग्रज यांच्या हातातील केवळ बाहुलं बनलेले होते.

मोहम्मद शहानं त्याच्या काळात काहीही केलं असलं तरी, भारतीय संस्कृतीमध्ये कलेला प्रोत्साहन देण्याचं त्यानं केलेलं काम मोठं असून त्याकडं दुर्लक्ष करणं हे न्याय्य ठरणार नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)