महाडिक विरुद्ध सतेज पाटील: एकेकाळी मैत्री असलेल्या दोन कुटुंबातून आता विस्तव का जात नाही?

अप्पा महाडिक
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'आमचं ठरलंय कंडका पाडायचाय....'

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग मॅच दरम्यान एक पोस्टर झळकलं.

मागे काही नाही आणि पुढे काही. केवळ मुंबई इंडियन्सचा झेंडा आणि 'कंडका पाडायचाय.'

आयपीएलचे प्रसारण देशभरात होत असले तरी देशातील फक्त एकाच जिल्ह्यातील लोकांना हा संदर्भ माहीत होता. त्याचं कारण म्हणजे, राजाराम साखर कारखान्याची निवडणूक.

या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सतेज उर्फ बंटी पाटील गटाचं हे घोषवाक्य होतं. प्रचारगीताचे बोल हेच होते, 'आमचं ठरलंय कंडका पाडायचा.'

कंडका पाडणं म्हणजे उसाचे कांडांचे तुकडे करणे. मग या कंडका पाडण्यावरुन कोल्हापूर आणि ऊसाच्या पट्ट्यात अनेक वाक्प्रचार तयार झाले.

महाडिक आणि पाटील या दोन नावाच्या भोवती कोल्हापूरचं सहकार क्षेत्रातलं राजकारण फिरत राहतं आणि कोल्हापूरच्या राजकारणाचा कणा हा सहकारच आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

साखर कारखान्याची निवडणूक पण पूर्णच राज्याचं लक्ष वेधून घेणारी. गेल्या वेळी कोल्हापुरातच गोकुळ दूध महासंघाची निवडणूक झाली आणि तिने देखील असंच राज्याचं लक्ष खेचून घेतलं होतं.

आणि आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि कोल्हापूरच्या हवेत शड्डू, कंडका, वाघ, डरकाळी हे शब्द घुमू लागले.

'जंगलात वाघ एकच असतो', याची आठवण दहा-बारा दिवसांपूर्वीच महादेवराव (आप्पा) महाडिकांनी आपल्या भाषणातून करून दिली होती.

तर त्यांच्या विरोधात बोलताना सतेज पाटील म्हणाले, 'या स्टेजवरूनच नाही तर बिंदू चौकात येऊन सांगेन की महाडिक भ्यालेत, भ्यालेत, भ्यालेत.'

ही निवडणूक प्रचंड चर्चेची ठरली. महाडिक विरुद्ध पाटील म्हटल्यावर चर्चा तर होणारच.

आप्पा महाडिक
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

12,000 सभासद संख्या असलेल्या साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आणि 25 एप्रिलला महाडिकांचे सर्व म्हणजे 21 च्या 21 उमेदवार निवडून आले.

आपल्या विजयावर बोलताना आप्पा महाडिक म्हणाले, 'ज्याला शड्डू मारता येत नाही तो मला शड्डू मारायला शिकवतोय,'

दुध असो की साखर या भोवती राजकारण फिरत असलं तरी या ठिकाणी गोडवा असेल असं म्हणण्याची सोय नाही.

कदाचित कुठल्याही ठिकाणच्या राजकारणबद्दल असं खात्रीने म्हणता येणार नाही पण महाडिक विरुद्ध पाटील या राजकारणात मात्र झणझणीतपणा आहे.

कधीकाळी दोन्ही कुटुंबात जवळीक होती. धनंजय महाडिक आणि सतेज पाटील म्हणजेच मुन्ना महाडिक - बंटी पाटील हे जवळचे मित्र होते. पण आताची त्यांची एकमेकांबद्दलची वक्तव्यं ऐकली तर तुम्हाला त्यांच्यातील नात्याची कल्पना येईल.

असं म्हटलं जातं की 'कोल्हापूरकर जे आहे ते थेट बोलतो.' कदाचित त्यामुळे असेल की ते एकमेकांबद्दल बोलताना, 'आमचे वैचारिक मतभेद आहेत, मतभेद असले तरी आमचे मनभेद नाहीत,' अशा शाब्दिक खेळात ते अडकत नाहीत.

पण ही तीव्र राजकीय स्पर्धा आणि टोकाचा संघर्ष सुरू कसा झाला हे आपण पाहू. या संघर्षात अनेक व्यक्तिरेखा असल्या तरी ज्या तिघांच्या राजकीय महत्त्वांकाक्षांमुळे त्याला आताचं स्वरूप कसं आलं ते आपण पाहू. सुरुवात आपण महाडिकांपासून करू.

'माझं नाव महादेव आहे, माझ्यावर फक्त तोच संकट आणू शकतो'

महादेवराव महाडिक अर्थात आप्पा हे 82 वर्षांचे तरुण म्हणूनच कोल्हापुरात ओळखले जातात. 82 व्या वर्षी शड्डू ठोकणाऱ्या आप्पांसाठी राजकारण हा आखाडाच आहे.

म्हणून विरोधकांबद्दल बोलताना ते त्याच भाषेत बोलतात आणि मित्रांबद्दल बोलताना देखील ते कुस्तीच्याच भाषेत बोलतात.

माझ्यासमोर कोणता नेता टिकणार नाही हे म्हणायचं तर या प्रमाणभाषेत बोलणार नाहीत.

ते थेट म्हणतील, 'मी फुकून उडवून टाकीन.'

त्यांच्या या शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत आणि लोकांना देखील हे वारंवार ऐकायला आवडतात. म्हणूनच तर जेव्हा पत्रकार त्यांच्याशी बोलतात तेव्हा ते मुद्दामहून आठवण करून देतात, 'आप्पा तुम्ही म्हणाला होता ना मागे...' की लगेच आप्पा ते आठवतात आणि त्यासारखं आणखी एक वाक्य फेकतात.

पण ही तर आताची गोष्ट झाली. पूर्ण राज्यावर प्रभाव गाजवू शकतील असे एक से एक बडे नेते राज्यात असताना आप्पा महाडिकांचा राजकारणात प्रवेश कसा झाला?

आप्पा महाडिकांचा राजकारणात प्रवेश कसा झाला याबद्दल कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार गुरुबळ माळी सांगतात. "80च्या दशकात, राजाराम कारखान्याचे चेअरमन भगवानराव पवार यांनी आप्पा महाडिकांची नियुक्ती कारखान्याचे स्वीकृत तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर ते अरुण नरके, पी. एन. पाटील यांच्या संपर्कात आले. हळूहळू त्यांचा कारखान्याच्या राजकारणावर जम बसला. त्यांच्याच साथीने ते गोकुळ दूध महासंघात गेले."

आप्पा
फोटो कॅप्शन, महादेवराव महाडिक

सध्या गोकुळ महासंघाची वार्षिक उलाढाल 2300 कोटी रुपयांची आहे.

कोल्हापूरमध्ये आनंदराव पाटील चुयेकर यांनी 1963 साली हा सहकारी दूध संघ स्थापन केला. पश्चिम महाराष्ट्रातील इतर सहकारी संस्थांप्रमाणे गोकुळ हे देखील आर्थिक सत्ताकेंद्र झाले. त्यामुळं गोकुळ दूध संघावर ज्याची सत्ता त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असं समीकरण तयार झालं.

पण गोकुळवर पकड इतकी थोडी सहजासहजी मिळणार? महाडिक हे आनंदराव चुयेकरांच्या मर्जीतले नव्हते. अरुण नरके आणि महाडिक यांचा गट होता. जसं सहकारी संस्थांचा राजकारणावर प्रभाव पडतो तसाच राजकारणाचा सहकारवर देखील प्रभाव पडतो. यातूनच 1990 ला अरुण नरकेंकडे दूध महासंघाची सत्ता आली. पुढे दहा वर्षांनंतर गोकुळ महाडिकांच्या हाती आले आणि तब्बल 30 वर्षं त्यांचीच सत्ता होती.

अरुण नरके, पीएन पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्या आघाडीला मनपा आघाडी म्हटलं जायचं असं, गुरुबळ माळी सांगतात, "या तिघांनी मिळून जिल्हा बॅंका, बाजार समिती महानगर पालिकांवर सत्ता मिळवली. त्यात आप्पा महाडिकांना 90 च्या दशकात महानगर पालिकेत लक्ष द्यायला सुरुवात केली.

विजयी होऊ शकेल, त्या ताकदीचा अपक्षा उमेदवार असेल तर ते त्याला आर्थिक सहकार्य करायचे. अट फक्त एकच निवडून आल्यावर फक्त गटात यायचं. त्यातून त्यांची महानगर पालिकेवर 15-20 वर्षं सत्ता राहिली."

जसं विविध सहकारी संस्थांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाडिक गटाचं वर्चस्व स्थापित होत जाऊ लागलं तसं ते विधान परिषदेवर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून निवडून जाऊ लागले.

कुठल्याही पक्षात जाण्यापेक्षा किंवा गेल्यानंतरही त्यांचं राजकारण हे प्रामुख्याने गटकेंद्रितच राहिलं आहे.

'माझ्या राजकारणाचा कोल्हापूर हाच केंद्रबिंदू आहे,' असं ते म्हणतात.

आप्पा महाडिकांची या वयातही व्यायाम करण्याची शिस्त, घडाळ्याच्या काट्यावर ठरलेला त्यांचा रुटीन. एकटंच आपल्या लाडक्या '7474 नंबराच्या' मर्सडिजमधून फिरण्याची त्यांची सवय, त्यांचं बोलणं या सर्वांचंच कोल्हापूरकरांना जाम कौतुक आहे आणि हजारवेळा ते या गोष्टी तुम्हाला सांगतील.

कोल्हापूरकरांच्या या कौतुकाची परतफेड करताना ते माध्यमांसमोर म्हणतात, "मी मदत करुन कुणावर मेहरबानी केली का, हे त्यांचंच आहे. त्यांना देतोय. त्यांनी जितकं दिलंय त्याला झोळी अपुरी पडती माझी.'

आपल्या नावाबद्दल बोलताना म्हणतात 'माझ्या आई-वडिलांनी माझं नाव महादेव ठेवलं आहे'. आकाशाकडे पाहून म्हणतात, 'फक्त तोच मला संकटात आणू शकतो.'

'कुटं बी हुडिक मुन्ना महाडिक'

निवडणुकीच्या प्रचारावेळी राज्यभर काय घोषणाबाजी होत असते. पण कदाचितच कोल्हापुरात वापरली जाणारी घोषवाक्यं राज्यात इतरत्र पाहायला मिळत असतील. 'कुटं बी हुडिक मुन्ना महाडिक' ही धनंजय महाडिकांच्या प्रचाराची टॅगलाईन ठरलेली.

आप्पांच्या तालमीत वाढलेले त्यांचे 51 वर्षीय पुतणे धनंजय महाडिकांच्या राजकारणाची सुरुवात कॉलेज-विद्यापीठाच्या राजकारणापासून झाली.

2004 ला शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकी लढवणाऱ्या महाडिक यांनी 2009 ला शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला.

धनंजय महाडिक

फोटो स्रोत, Facebook

शरद पवार आपल्याला तिकीट देतील अशी अपेक्षा त्यांना होती पण शरद पवारांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली.

सदाशिवराव मंडलिक आणि धनंजय महाडिक या दोघांची निराशा झाली. त्या दोघांनीही अपक्ष निवडणूक लढवली सर्वांत अधिक मतं सदाशिवराव मंडलिकांना पडली आणि अपक्ष खासदार लोकसभेत पोहोचला.

2009 ला त्यांनी दक्षिण कोल्हापूरमधून अपक्ष उभं राहून विधानसभा निवडणूक लढवली. पावणे सहा हजार मतांनी त्यांचा सतेज पाटील यांनी पराभव केला.

त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवत 2014ला लोकसभा निवडणूक लढवली. संपूर्ण देशात मोदी लाट आलेली असताना धनंजय महाडिक विजयी झाले.

'सतेज पाटील काँग्रेसमध्ये असूनही आपल्याला त्यांची काहीच मदत नाही झाली,' असं धनंजय महाडिक निवडणुकीनंतर म्हणाले आणि महाडिक कुटुंब-सतेज पाटील यांच्यातील अंतर पुन्हा वाढले.

2019 मध्ये धनंजय महाडिकांना पुन्हा राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले पण सदाशिवरावांचे पुत्र संजय मंडलिकांना शिवसेनेनी उमेदवारी दिली.

अमल महाडिक

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, अमल महादेवराव महाडिक

2019ला शिवसेना-भाजप युती होती. पहिल्या लाटेहून तितकीच तीव्र मोदींची लाट होती आणि त्यात संजय मंडलिकांचा विजय झाला.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाडिक यांनी सप्टेंबर 2019 मध्ये भाजप प्रवेश केला. भाजपने त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक केली.

2019 मध्ये महाडिकांना आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण कोल्हापूरमधून धनंजय यांचे चुलत भाऊ अमल यांना सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी हरवलं होतं.

'आमचं ठरलंय - कंडका पाडायचाय'

22 ऑक्टोबर 1935. या दिवशी ज्ञानेदव यशवंतराव पाटील यांचा जन्म झाला.

ते 1957 ला कोल्हापूर महानगर पालिकेत नगर सेवक म्हणून गेले. त्यानंतर ते 1967ला काँग्रेस पक्षाकडून पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले.

त्यांना स्वतःलाही शिक्षणाची आवड होती आणि आपल्या भागातील मुलांनी शिकावे असंही त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी 1983 मध्ये त्यांनी इंजिनिअरिंग विनाअनुदानित कॉलेज सुरू केलं. यानंतर त्यांनी अनेक शाळा कॉलेजं स्थापन केली. पुढे त्या कॉलेजचांची अभिमत विद्यापीठं झाली.

त्यांच्या सामाजिक-शैक्षणिक योगदानाबद्दल 1991 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. ते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अर्थात ज्ञानदेव यशवंतराव पाटील.

सतेज पाटील

फोटो स्रोत, Facebook

2009 मध्ये डी. वाय. पाटील हे त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आणि नंतर 2012 मध्ये ते बिहारचे राज्यपाल झाले.

सतेज पाटील उर्फ बंटी हे डॉ. डी. वाय पाटील यांचेच सुपुत्र आहेत.

ज्या वेळेस डी. वाय. पाटील शिक्षण क्षेत्रात नवीनवी शिखरं पादाक्रांत करू लागले त्याच वेळी आपल्या आप्पा महाडिकांचे राजकारण देखील आकार घेत होते.

दोघांच्याही वाटा स्वतंत्र होत्या. या दोन दिग्गजात कधी संघर्ष नव्हता. एकाने सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवला तर दुसऱ्याने शिक्षण क्षेत्रात.

डीवाय पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात नाव इतकं मोठं झालं की ते सक्रिय राजकारणापासून दोन हात दूर राहताना दिसू लागले.

त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा फायदा सतेज पाटील यांना झाला आणि 1991-1992 मध्ये विद्यार्थी राजकारणाच्या माध्यमातून ते कोल्हापूरच्या राजकारणात पहिल्यांदा आले.

92-93 साली त्यांची विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षणाच्या समितीच्या सल्लागारपदी निवड झाली. नंतर ते सिनेटवर निवडून गेले. याच काळात त्यांची आणि मुन्ना महाडिकांची मैत्री घट्ट झाली.

एकेकाळचे मित्र आताचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी

एकेकाळच्या मित्रांमध्ये पक्षीय राजकारणामुळे दुरावा आल्याचं जाणकार सांगतात.

32 वर्षांच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेकडून तिकीट घेत 2004ची लोकसभा निवडणूक लढवली. सतेज पाटील हे त्यांच्यासोबत होते.

धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना जोरदार टक्कर तर दिली पण ते 14,000 मतांनी जिंकून आले. धनंजय महाडिकांचा पराभव झाला तरी या दोन तरुण नेत्यांकडे सर्वांचे लक्ष गेले.

त्याच वर्षी 2004 मध्ये सतेज पाटील करवीर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढून निवडून आले. या निवडणुकीसाठी धनंजय महाडिकांनी त्यांना सहकार्य केलं होतं. निवडून आल्यावर सतेज पाटील काँँग्रेसमध्ये गेले. यानंतर पाटील आणि महाडिक कुटुंबाच्या वाटा वेगळ्या झाल्या.

आमदार झाल्यावर जिल्ह्याच्या राजकारणावर आपल्याला पकड मिळवायची आहे हा विचार करतच सतेज पाटील राजकारण करू लागले आणि त्यामुळे महाडिकांच्या वर्चस्वाला त्यामुळे उघड धक्का बसणार होता. त्यातून ही दुरावा वाढतच गेला.

'सतेज पाटलांना आमदार करणं ही सर्वांत मोठी चूक'

ही निवडणूक 19 वर्षांपूर्वी झाली होती पण त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, त्यामुळेच तर साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारावेळी आप्पा महाडिक म्हणतात, "जर सर्वांत पहिल्यांदा याला( सतेज पाटलांना) आमदार कुणी केलं असेल तर या महाडिकानी केलं."

"युनिव्हर्सिटी निवडणुकीत चेअरमन बनण्यासाठी माझा पुतण्या मुन्ना तयार होता. पण मी त्याला बनवलं नाही. मी किती चूक वागलो त्याच्यासोबत. कारण त्याला (सतेज पाटलांना) मी शब्द दिला होता," असं आप्पा महाडिकांनी राजाराम कारखान्याच्या प्रचाराच्या भाषणावेळी म्हटलं होतं.

सतेज पाटील

2004 नंतर तीव्र राजकीय स्पर्धा सुरू झाल्यावर, महाडिकांचे आपल्या गटाचे लोक निवडून आणण्यावर आणि सतेज पाटील यांचे आपल्या पक्षाचा विस्तार करण्यावर भर होता. पुढील पाच वर्षं हेच चित्र राहिलं.

पहिल्यांदा थेट एकमेकांविरोधात

2009 च्या निवडणुकांची घोषणा झाली आणि एकेकाळी कोल्हापुरकांनी जोडगोळी म्हणून ओळखलेले मुन्ना आणि बंटी एकमेकांविरोधात उभे राहिले.

दोघांनीही आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. कांटे की टक्कर, उन्नीस-बीस, शेरास सव्वाशेर अशा ज्या काही म्हणी आणि वाक्प्रचार असतील या सर्वच गोष्टींचा वापर या लढतीचे स्वरूप सांगण्यासाठी केला असावा. अवघ्या पावणे सहा हजार मतांनी महाडिकांची पराभव झाला.

2010 मध्ये 38 वर्षांचे सतेज पाटील विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांचा आप्पा महाडिकांचे चिरंजीव अमल महाडिक यांनी पराभव केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते विधान परिषदेवर गेले.

'गोकुळ गेलं पण खासदारकी आली'

म्हणजे 2019 ला होणाऱ्या निवडणुकात सतेज पाटील उभे राहणार नव्हते. पण दक्षिण कोल्हापूरवरचा आपला दावा त्यांनी सोडला असा त्याचा अर्थ नव्हता. 2019 ला त्यांचे पुतणे सतेज यांचे पुतणे ऋतुराज पाटलांनी अमल यांना पाडलं.

त्यांना जो सर्वांत मोठा घाव सतेज पाटलांनी घातला तो 2021 मध्ये. गोकुळ महासंघाची सत्ता आणून त्यांनी महाडिकांचा 'कंडका पाडला'.

महाडिक

फोटो स्रोत, Facebook

2019 मध्ये खासदारकी, मग आमदारकी आणि 2021 मध्ये गोकुळ महासंघ असे तीन मोठाले पराभव झाल्यानंतर आता महाडिकांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड सैल होत चालली आहे का, असं वाटत असतानाच 2022 मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले धनंजय महाडिक राज्यसभेवर गेले.

त्यांच्या या विजयानंतर कोल्हापुरात इतकी भव्य मिरवणूक निघाली की आतापर्यंत राज्यसभेची निवडणूक जिंकल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात कदाचितच निघाली असेल.

या विजयाचं वर्णन आप्पा महाडिक यांनी 'उच्च कोटीचा विजय', असं केलं, कारण यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात आपला कमबॅक झाला आहे याची त्यांना जाणीव होती.

'कंडका पाडायचंय विरुद्ध शोलेतलं नाणं'

महाडिक आणि पाटलांच्या संघर्षाचं केंद्रबिंदू फक्त एक मतदारसंघ नाही. गोकुळ दूध महासंघ, राजाराम साखर कारखाना, महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदा, या सगळ्याच गोष्टींवर दोन्ही कुटुंबाचा प्रभाव पडत राहतो.

पाटील असो की महाडिक एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीच्या तयारीत असतात. महादेवराव महाडिक म्हणतात की 'माझ्याकडे शोलेतलं नाणं आहे, कसंही फेकलं तरी मीच जिंकतो.'

त्यांच्या या डायलॉगबाजीला बंटी पाटील उत्तर देतात की 'आमचं ठरलंय, कंडका पाडायचाय.'

जेव्हा गोकुळ सतेज पाटलांनी खेचून आणलं त्यानंतर पाटील पुन्हा चमत्कार करून राजाराम आणतील का? याकडे कोल्हापूरकांचे लक्ष होते. या निवडणुकीच्या काळात हा शब्द इतका प्रचलित झाला की दैनिक पुढारीने 26 एप्रिलच्या कोल्हापूर आवृत्तीत 'महाडिकांनीच पाडला कंडका' असा मथळा दिला होता.

एका वर्षावरच विधानसभा-लोकसभा निवडणूक आलेली असताना पुन्हा महाडिक आणि पाटलांची कुस्ती पाहायला मिळेल. कोण कुणाचा कंडका पाडतं की कोण कुणाचा शिक्का खोटा ठरवतो हे पुन्हा त्या निवडणुकीच्या वेळी कळेल.

राजकीय वर्चस्वासाठी टिकवण्यासाठी सहकारी संस्था मिळवणं आणि सहकारी संस्थावरील वर्चस्वासाठी राजकीय पदं मिळवणं हे समीकरण जोपर्यंत राहील तोपर्यंत हा संघर्ष पाहायला मिळेलच.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)