सतेज पाटील: गोकुळ दूधसंघाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर का गाजली?

- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या संस्थेवर अखेर 30 वर्षांनी सत्तांतर झाले.
गोकुळ दूध संघाचं कोल्हापूरसाठी आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. 2300 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूधसंघाबद्दल असं म्हटलं जातं की ज्याच्या हाती गोकुळ असतं त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे 21 पैकी 17 उमेदवार निवडून आले. त्यामुळं जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळवर सत्ता कुणाची याची उत्सुकता अखेर संपली.
कोल्हापूरमध्ये आनंदराव पाटील चुयेकर यांनी 1963 साली हा सहकारी दूध संघ स्थापन केला. ग्रामीण भागातील दूधउत्पादक शेतकऱ्यांना या दूध संस्थेच्या माध्यामातून आर्थिक स्त्रोत निर्माण झाला. पश्चिम महाराष्ट्रातील इतर सहकारी संस्थांप्रमाणे गोकुळ हे देखील आर्थिक सत्ताकेंद्र झाले. त्यामुळं गोकुळ दूध संघावर ज्याची सत्ता त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असं समीकरण तयार झालं.
यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गेली 30 वर्षं गोकुळ संस्थेवर सत्ता राखत जिल्ह्याच्या राजकारणात आपलं स्थान मजबूत केलं हा इतिहास आहे.
पण या निवडणूकीत राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्मुला कोल्हापूरमध्ये राबवत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संस्थेत सत्ताबदल घडवून आणला.
गोकुळ दूध उत्पादक संस्थेचा कारभार चालवण्यासाठी संचालक मंडळाची निवड ही संस्थेच्या गावोगावी असणारे ठरावधारक हे मतदान करुन करतात.
यावेळी 3650 ठरावधारक मतदार होते. यात 3639 मतदारांनी मतदान केले. तर संचालक पदासाठी 21 जागांवर 45 उमेदवार उभे होते. यात सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी विरुद्ध राजर्षा शाहू शेतकरी आघाडीने उमेदवार उभे केले होते.

फोटो स्रोत, facebook
निकालानंतर विरोधी आघाडीला तब्बल 17 जागा मिळाल्या तर सत्ताधारी असलेल्या गटाला अवघ्या 4 जागावर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे कोरोनाबाधित 40 मतदारांना पीपीईकीट धालून केंद्रावर आणण्यात आले होते.
गोकुळवर सत्ता इतकी महत्त्वाची का?
गोकुळं संस्थेसाठी इतर निवडणुकांप्रमाणे सामान्य मतदार मतदान करू शकत नाहीत. केवळ ठरावधारकांना मतदान करता येते. तरीसुद्धा इथं कुणाची सत्ता येणार यावर जिल्ह्यातील इतर राजकीय समीकरणं ठरतात. यामागचं कारण म्हणजे गोकुळ संस्थेवर सत्ता यावी यासाठी ज्या राजकीय आघाड्या तयार होतात.
या आघाड्या का महत्त्वाच्या असतात या बाबत कोल्हापूर आवृत्तीचे दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी सांगितलं, "की आघाड्यांच्या माधमातून जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्या संस्था, जिल्हा बॅंक, बाजार समित्या, साखर कारखाने यांच्या निवडणुका लढवल्या जातात. त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभा या निवडणुकातही पाहायला मिळतात. त्यामुळं गोकुळवरची सत्ता ही राजकारणाचा पाया म्हणून पाहिली जाते."

फोटो स्रोत, facebook
गेली 30 वर्षं महादेव महाडिक यांच्या माध्यमातून गोकुळ संस्थेवर महाडिक घराण्याचं वर्चस्व राहिलं त्यांना साथ दिली ती कॉंग्रसचे माजी आमदार पी. एन. पाटील आणि गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी. पण यावेळी कॉंग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी एकत्र येत हा सत्ताबदल घडवून आणला.
तर गेल्या काही वर्षात महादेव महाडिक यांनी गोकुळच्या सत्तेच्या जोरावर अनेक विरोधकांना चितपट केले. हा इतिहास आहे. जिल्ह्याच्या राजकारणाची सुत्रं आपल्या हातात ठेवण्यासाठी गोकुळचा महत्त्वाचा वाटा असल्याचं अनेक वेळा दिसून आलं आहे.
"गोकुळ हे आर्थिक सत्ताकेंद्र आहे, याच सत्ताकेंद्रावरुन जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी नेत्यांची चढाओढ असते," असं दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी सांगितलं.
गोकुळवरची सत्ता जाण्यामागे काय कारण?
कोरोना काळामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न केले गेले. तर विरोधी गटाकडून निवडणुका होण्यासाठी प्रयत्न केले गेले. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व काळजी घेत ही निवडणूक घेण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. दरम्यानच्या काळात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी मतदारांपर्यत पोहचण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.

फोटो स्रोत, facebook
निवडणुकीसाठी प्रचार कसा करण्यात आला याबाबत वसंत भोसले सांगतात की "सतेज पाटील, हसन मुश्रिफ यांच्या गटाने लोकांना संघटित करुन नियोजनबद्ध काम करत बदल घडवण्याचा प्रचार केला. ज्यात त्यांना यश आलं तर सत्ताधारी गटाकडून केवळ निवडणूक पुढ ढकलण्याच्या प्रयत्नात वेळ खर्ची गेला. त्याचा परिणाम असा झाला की, सत्ताधारी असलेल्या महाडिक गटाला मतदारांपर्यंत आपलं काम पोहचवता आलं नाही. बरीच वर्ष सत्तेत असल्यानं ठराव धारकांची नाराजी दूर करण्यात अपयश आले."
"त्यातच विरोधकांकडून घराण्याभोवती सत्ता असल्याचा प्रचार केला गेला. त्याचाही फटका सत्ताधारी गटाला बसला. याउलट राज्यात सत्ता असल्यानं भविष्यात सगळकडे फायदा होईल असा प्रचार केला गेल्यानं विरोधी गटाचं पारडं जड झालं. आणि अखेर गोकुळमध्ये सत्तांतर घडलं," असं भोसले यांनी सागितंलं.
गोकुळच्या सत्तेचा भविष्यातील फायदा कुणाला?
या निवडणुकीचा जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होईल असं विचारलं असता भोसले सांगतात, "सध्या गोकुळ दूध उत्पादक संस्थेवर सत्ता येण्यामागे राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्मुला कारणीभूत आहे. त्यामुळं याच जोरावर भविष्यातील निवडणुका लढवल्या जातील ही शक्यता आहे."
"येत्या वर्षभरात जिल्ह्यात नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यावेळी सध्या झालेली कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी कायम राहिल आणि त्याचा त्यांना यश मिळवण्यासाठी फायदा होईल," असं भोसले यांना वाटतं.
नवी राजकीय समीकरणं तयार
तर गोकुळच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात नवी राजकीय समीकरणं तयार झाली आहेत, असं साळुंखे यांना वाटतं. ते सांगतात, आधी भाजपसोबत जाणारी शिवसेना आता आघाडीसोबत आहे. त्याचा फटका भविष्यात भाजपला बसण्याची चिन्ह आहेत.
"गोकुळवर सत्ता आल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहचणं आणखी सोपं झालं आहे. त्याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील," असं साळुंखे यांनी म्हटलंय.
याबाबत बोलताना हा विजय दूध उत्पादकांचा आहे. भविष्यात अपेक्षित कारभार करत उत्पादकांना आश्वासन दिल्याप्रमाणे दोन रुपये ज्यादा दर देण्यासाठी प्रयत्न करू असं सतेज पाटील यांनी म्हटलं. तर पारदर्शी कारभार दोन रुपये ज्यादा दर देण्यासाठी कटीबद्ध राहू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.
दरम्यान, शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य असून आमच्यापेक्षा चांगला कारभार त्यांच्या हातून होईल या पुढील काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत कायम राहू असं कॉंग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








