उद्धव ठाकरे: 'मराठा आरक्षण देण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवावी'

फोटो स्रोत, Twitter
काश्मिरात कलम 370 रद्द करताना दाखवलेली हिंमत आणि संवेदनशीलता केंद्र सरकारनं आता मराठा आरक्षणाच्या निर्णयावेळी दाखवावी, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना आणि मराठा आरक्षणा या विषयावर त्यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करतो, हा अधिकार (मराठा आरक्षणाचा) आपला आहे. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. निर्णय घेताना जे पक्ष एकत्र होते, तेच पक्ष आजही एकत्र आहेत"
आता केंद्र सरकारने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जास्त वेळ लावू नये, असं म्हणत याबाबत उद्याच (6 मे) केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
तसंच, मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारला भेटण्याची गरज असेल, तर तेही करू, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले?
- मराठा आरक्षणाची लढाई न्यायालयात आपण लढत होतो.
- राज्यातल्या प्रमुख 4 पक्षांनी एकमुखाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पास केला होता, तेव्हा आम्ही भाजप सोबत होतो.
- दुर्दैवाने आज हा निराशाजनक निकाल लढाईच्या ऐन भरात आलेला आहे
- ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयात विजय मिळवून दिला, त्याच वकीलांनी सुप्रीम कोर्टात लढाई लढली
- महाराष्ट्राने समजंसपणे निकाल ऐकला, त्याबद्दल मराठा समाजाला हात जोडून धन्यवाद देतो
- हे दिवस लढायचे नाहीत. आपली बाजू आपण मजबुतीने सुप्रीम कोर्टात मांडली. अजूनही लढाई संपलेली नाही.
- सुप्रीम कोर्टाने पुढचा मार्ग दाखवलेला आहे. सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे केंद्र आणि राष्ट्रपतींना विनंती करतो की, काश्मीरात 370 रद्द करताना दाखवलेली हिंमत आणि संवेदनशीलता आता हवी आहे
- पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करतो, हा अधिकार आपला आहे. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. निर्णय घेताना जे पक्ष एकत्र होते, तेच पक्ष आजही एकत्र आहेत
- आता केंद्र सरकारने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जास्त वेळ लावू नये
- उद्या (6 मे) अधिकृत पत्र देणार. भेटण्याची गरज असेल, तर तेही करू
- ही मागणी एका समाजाची नाही, तर न्याय हक्काची आहे. तिचा अनादर माननीय राष्ट्रपती आणि केंद्र सरकार करणार नाहीत, याची खात्री आहे.
- काही समाजविघातक व्यक्ती आग लावण्याचा प्रयत्न करतात. सरकार लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय दिला?
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.

फोटो स्रोत, Twitter
मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.
मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
मराठा समाजातील नागरिकांना सार्वजनिक शिक्षण, नोकरीत महाराष्ट्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक मागास गटातून दिलेलं आरक्षण (SEBC) असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
मराठा आरक्षण प्रकरणी निकालाचे वाचन सुप्रीम कोर्टात सुरू झालं आहे. पाचसदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षण प्रकरणी याचिकेवर सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्या. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट यांचा या खंडपीठात समावेश आहे.
याच ऑनलाईन संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावरही भाष्य केलं. राज्यातील कोरोनाच्या स्थितीबद्दल त्यांनी माहिती दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, "रुग्णवाढ खाली यायला लागली आहे. पण आताच्या घडीला आपण धोक्याच्या वळणावर आहोत. आपल्याला गाफिलपणा परवडणारा नाही. काही जिल्ह्यांत रुग्णवाढ उतरायला लागलीय, काही जिल्ह्यात थोडी वाढायला लागली आहे. ही त्या जिल्ह्यांसाठी धोक्याची घंटा आहे"
तिसरी लाट आलीच तर त्याचा घातक परिणाम राज्यावर होऊ द्यायचा नाही, असा आपला प्रयत्न आहे, असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनावर मुख्यमंत्री काय बोलले?
- निर्बंध ही कोरोनाच्या लढ्यातली आवश्यकता आहे
- देशात तिसरी लाट येतेय अशा इशारा केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागारांनी दिलाय.
- आपण आरोग्य व्यवस्थेत वाढ करतोय. साडेचार लाख आयसोलेशन, 1 लाख आयसीयू, 12,000 व्हेंटिलेटर आहेत
- आरोग्यसुविधा वाढीसाठी मंजुरी दिलेली आहे
- लशीचे डोस एकरकमी घेण्याची आपली तयारी आहे. लसीकरणाचा दर 10 लाख किंवा त्यापुढे नेण्याची आपली तयारी आहे
- ज्या प्रमाणात लशीचं उत्पादन हळुहळू वाढतंय, तसा पुरवठा होतोय. पुरवठा वाढेल, तसं लसीकरण आपण वाढवू
- आपल्याला 3000 मे. टन ऑक्सिजनचं उत्पादन आपल्याला करायचं आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. मिशन ऑक्सिजन असं नाव त्याला देण्यात आलंय.
- येत्या काही दिवसांत महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे
- रेमडेसिव्हीरची जितकी आवश्यकता आहे, तितक्यावर आपण पोहोचलेलो नाही. त्यात हळुवार वाढ होतेय.
- काल-परवापासून टास्क फोर्सला जिल्हा आणि शहरांतल्या फॅमिली डॉक्टर्सना झूम कॉलवर मार्गदर्शन करायला सुरुवात केलेली आहे.
- घरच्या घरी कोणती औषध द्यायची व टाळायची, याचं मार्गदर्शन सगळ्या डॉक्टर्सना दिलं जातंय.
- तिसरी लाट आलीच तर त्याचा घातक परिणाम राज्यावर होऊ द्यायचा नाही, असा आपला प्रयत्न आहे
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








