मराठा आरक्षण ज्यामुळे रद्द झालं, तो इंद्रा साहनी खटला काय होता?

मराठा आरक्षण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे आणि नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आणि पुन्हा एकदा इंद्रा सहानी यांचं नाव चर्चेत आलं आहे. कारण इंद्रा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती, ती ओलंडण्यास आज (5 मे) सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे.

यापूर्वी म्हणजे, 8 मार्च 2021 रोजीच्या सुनावणीवेळीही सुप्रीम कोर्टानं देशात आरक्षणावर 50 टक्क्यांच्या मर्यादेच्या मुद्दयासंदर्भात सर्व राज्यांना नोटीस जारी केली होती. त्यावेळी 102व्या घटनादुरुस्तीसंदर्भात राज्यसरकारांचं म्हणणं काय आहे, हे सर्वोच्च न्यायालयाला जाणून घ्यायचं होतं.

आता ही सर्व माहिती घेतल्यानंतर, इंद्रा सहानी खटल्याचाच दाखल देत, मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मुळात ही 50 टक्क्यांची मर्यादा कुठून आली? हे इंद्रा सहानी खटल्याचं प्रकरण आहे तरी काय? आपण या बातमीतून या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ.

सर्वप्रथम ज्या मर्यादेमुळे मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळला, ती 50 टक्क्यांची अट कुठून आली, हे पाहू. मग त्या अटीचा इतिहास पाहू.

50 टक्क्यांची मर्यादा कुठून आली?

1992 साली इंद्रा साहनी खटल्यानुसार भारतात सरकारी नोकरीतील आरक्षणावर 50 टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली.

मराठा आरक्षण

फोटो स्रोत, Getty Images

नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती. त्या निर्णयामागचा तर्क घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी समजावून सांगितला आहे.

"राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये समानतेचा मूलभूत अधिकार देण्यात आला आह. तर कलम 15(4) आणि 16(4) नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी विशिष्ट व्यवस्था असावी, असं सूचित करण्यात आलं आहे.

म्हणजे अशा घटकांसाठी आरक्षणाची तरतूद ही समानतेला अपवाद म्हणून करण्यात आली आहे. अपवाद हा कधीही नियमापेक्षा म्हणजे इथे समानतेच्या मूलभूत अधिकारापेक्षा मोठा असू शकत नाही. त्यामुळेच 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही, असा या मर्यादेमागचा तर्क आहे," असं बापट यांनी सांगितलं.

इंद्रा साहनी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं "केंद्र किंवा राज्य सरकारनं आरक्षण 50 टक्क्यांच्या वर नेलं तर ते कमी करण्यात येईल," असं निरीक्षणही मांडलं होतं.

इंद्रा साहनी खटला नेमका काय होता?

वर्ष होतं 1992. एकीकडे बाबरी मशिदीचा मुद्दा पेटला होता. दुसरीकडे अभूतपूर्व आर्थिक संकट ओढावल्यामुळे पंतप्रधान नरसिंह राव उदारीकरणाच्या मार्गावर भारताला नेत होते.

त्यात तिसरी मोठी घटना घडत होती ती सुप्रीम कोर्टात. झालं असं होतं की नरसिंह रावांच्या आधीच्या व्हीपी सिंग सरकारने पहिल्यांदाच इतर मागसवर्गीयांसाठी म्हणजे ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षणाची घोषणा केली होती.

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, PTI

त्यानंतर जनरल कॅटेगिरीतल्या लोकांमध्ये नाराजी होती. ते म्हणत होते की आम्हालाही आरक्षणाची गरज आहे. म्हणून नरसिंह रावांच्या काँग्रेस सरकारने जनरल कॅटेगिरीतल्या गरिबांसाठी 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे एकूण आरक्षण 60 टक्क्यांपर्यंत गेलं. वाढत चाललेल्या आरक्षणांना अनेक जण विरोध करत होते.

असाच एक मोर्चा पाहून दिल्लीतल्या वकील इंद्रा साहनींनी कोर्टात याचिका दाखल केली. हीच ती प्रसिद्ध इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकारची केस, ज्यामुळे देशाचा इतिहास बदलणार होता.

सुप्रीम कोर्टात 1992 साली या केसचा निकाल द्यायला बसले होते एकूण 9 न्यायमूर्ती. 6 विरुद्ध 3 अशा निकालात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं -

  • आरक्षणाचं एकूण प्रमाण 50 टक्क्यांवर जाता कामा नये
  • अतिविशिष्ट परिस्थितींमध्येच ते 50 टक्क्यांवर जाऊ शकतं
  • सामाजिक आणि शैक्षणिक आधारांवरच आरक्षण मिळू शकतं
  • केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकत नाही

त्यामुळे जनरल कॅटेगिरीतल्या गरिबांसाठीचं 10 टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. या इंद्रा साहनी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हटलं की "केंद्र किंवा राज्य सरकारनं आरक्षण 50 टक्क्यांच्या वर नेलं तर ते कमी करण्यात येईल."

मुळात 50 टक्क्यांची मर्यादा कुठून आली, याविषयी इंद्रा साहनी निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने फारसं स्पष्टीकरण दिलं नाही. भारतीय घटनेतलं 16वं कलम सर्वांना संधींचा समान अधिकार देतं. या कलमाच्या 4च्या क्लॉजमध्ये म्हटलं आहे की समान संधी मिळावी म्हणून आरक्षण दिलं जाऊ शकतं. इंद्रा साहनी निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की या चौथ्या क्लॉजचा म्हणजे आरक्षणाचा वापर न्याय्य पद्धतीने आणि वाजवी मर्यादांमध्ये करावा.

महाराष्ट्रात सरकारनं 1 डिसेंबर 2018 पासून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गामध्ये म्हणजे SEBC कॅटेगरीत शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरींत 13 टक्के आरक्षण दिलं. पण त्यामुळे राज्यातलं एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेलं. आणि त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

सोमवारच्या (8 मार्च 2021) सुनावणीदरम्यान 102 व्या घटनादुरुस्तीचा मुद्दाही उपस्थित झाला आणि राज्यांना पाठवलेल्या नोटिशीचा विषय हाच मुद्दा होता. आपण त्याबद्दलही जाणून घेऊ.

102व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा काय आहे?

11 ऑगस्ट 2018 रोजी केंद्र सरकारनं 102 वी घटनादुरुस्ती करून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. या घटनादुरुस्तीमध्ये अनुच्छेद 338 (ब) चा समावेश करण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला.

तसंच, अनुच्छेद 342 (अ) नुसार, सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करायचा याचे अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला देण्यात आला.

मराठा आरक्षण

फोटो स्रोत, Getty Images

घटनेच्या अनुच्छेद 15 आणि 16 नुसार हे अधिकार राज्यांना आहेत. हा अधिकार नाकारला तर राज्यांनी स्थापलेले मागासवर्ग आयोग निर्थक ठरतील, अशी भीती व्यक्त केली जातेय. त्याचा परिणाम महाराष्ट्रात देण्यात आलेल्या मराठा आरक्षणावरही होऊ शकतो.

मात्र, विधिज्ज्ञ दिलीप तौर सांगतात, "102 वी घटनादुरुस्ती राज्यांचे मागास आयोग स्थापन करण्याचे किंवा मागासलेपण शोधण्याचे अधिकार काढून घेतेय का? मुळीच नाही. हे अधिकार घटनेच्या कलम 15 आणि 16 ने राज्यांना दिले आहेत. ज्यांना शंका आहे त्यांनी एकदा संसदेच्या स्टँडिंग (125 वी दुरुस्ती) समितीचा अहवाल वाचावा."

पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टात हा मुद्दा उपस्थित कुणी केला? तर महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं की, 102 व्या घटनादुरुस्तीमुळे सर्व राज्यांच्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग निश्चित करण्याच्या अधिकारावर परिणाम होत असल्याने हा मुद्दा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही. त्यामुळे इतर राज्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं पाहिजे. त्यासाठी इतर राज्यांना नोटीस पाठवावी.

मुकुल रोहतगी यांच्या या विनंतीला अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनीही सहमती दर्शवली. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्यांना नोटीस पाठवली.

पण इथं दिलीप तौर सांगतात, "जर केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून हे स्पष्ट केलं की, मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा अधिकार राज्यांकडे अबाधित आहे, तर हा प्रश्न इथेच मिटेल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेलच, त्याचसोबत इतर राज्यांमधील आरक्षणांनाही दिलासा मिळेल."

102 व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग ठरवण्याच्या राज्यांच्या अधिकारांवर गदा येते का, असं विचारत सुप्रीम कोर्टानं सर्व राज्यांना नोटीस पाठवली आहे.

आरक्षणाचा कोटा वाढवता येईल का?

एक प्रश्न नेहमी चर्चिला जातो, तो म्हणजे कोटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवता येईल का? त्याबाबत बीबीसी मराठीनं दिवंगत न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना 25 जुलै 2018 रोजी प्रश्न विचारला होता. त्यांनी सांगितलं होतं, "हा कोटा वाढवता येऊ शकतो. कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणी या नियमाला छेद आधीच गेला आहे. खरं म्हणजे या देशातल्या सामाजिक वास्तवाचा विचार करता 50 टक्क्यांची अट अव्यवहार्य आहे."

निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत
फोटो कॅप्शन, दिवंगत न्यायमूर्ती पी.बी.सावंत

"आपल्या देशातल्या विविध मागास जातीसमूहांची एकूण लोकसंख्या 85 टक्के आहे, म्हणजे 85 टक्क्यांसाठी 50 टक्के आणि उरलेल्या 15 टक्क्यांसाठी 50 टक्के जागा आहेत, इथंच मोठी विषमता आहे," असं सावंत म्हणाले होते.

"महाराष्ट्रातही राखीव जागांच्या कोट्याची मर्यादा ओलांडता येईल. जास्तीत जास्त काय होईल तर त्याला कोर्टात आव्हान मिळेल. पण तिथे चांगले वकील देऊन आपली बाजू भक्कमपणे मांडता येईल आणि कोर्टाकडून हवा तसा निकाल मिळवण्याचा प्रयत्न करता येईल," असं सावंत यांनी सांगितलं होतं.

तामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण कसं?

तामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण आहे. जेव्हाही आरक्षणाच्या मर्यादेचा विषय निघतो तेव्हा तामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण का आहे? असा प्रश्न विचारला जातो.

भारतीय राज्यघटनेनुसार जर नवव्या परिशिष्टात एखादा कायदा टाकायचा असेल तर राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागते. तामिळनाडूमध्ये मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे, असं म्हणत तामिळनाडू सरकारनं घटनादुरुस्तीद्वारे ही तरतूद करून घेतली.

9व्या परिशिष्ठात जर एखादा कायदा असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येत नव्हतं, पण सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की नवव्या परिशिष्ठात असलेला कायद्याचं पुनर्वालोकन करता येईल. त्यानुसार तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातलं आरक्षणक्ष प्रकरणही सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)