पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंग उन यांची खुर्ची स्वच्छ करण्यामागचं कारण काय?

चीनमधील एससीओ बैठकीच्या आधी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनमधील एससीओ बैठकीच्या आधी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली.
    • Author, भरत शर्मा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

चीनची राजधानी बीजिंगमध्ये नुकतीच एक हाय-प्रोफाइल भेट झाली. यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन सहभागी झाले होते. सध्या या भेटीची मोठी चर्चा सुरू आहे.

या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या बैठकीत काय घडलं याची तर चर्चा होत आहेच, परंतु, त्यापेक्षा जास्त चर्चेत आली ती एका वेगळ्या घटनेची.

बैठकीनंतर लगेच, ज्या खुर्चीवर किम जोंग उन बसले होते, त्या खुर्चीकडे उत्तर कोरियाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

या कर्मचाऱ्यांच्या हातात कापड होतं आणि त्यांचा उद्देश एकच, किम जोंग उन यांनी स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू व्यवस्थितपणे स्वच्छ करणं. त्यांनी बसलेली खुर्चीही काळजीपूर्वक पुसून काढली. पण प्रश्न असा आहे की, असं का करण्यात आलं?

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, तज्ज्ञ सांगतात की, ही साफसफाई उत्तर कोरियाच्या नेत्याच्या सुरक्षेचा भाग आहे. परदेशी किंवा शत्रूराष्ट्रांच्या गुप्तहेरांचे कोणतेही मनसुबे उधळून लावण्याचा या मागचा उद्देश असतो.

किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतिन यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत, तरी ही भेट चीनमध्ये झाली होती. चीन हा उत्तर कोरियाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक आहे.

टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये क्रेमलिनचे पत्रकार अलेक्झांडर युनाशेव्ह यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे.

यात उत्तर कोरियाचे दोन कर्मचारी किम जोंग उन आणि पुतिन यांच्या बैठकीसाठी वापरलेली खोली स्वच्छ करताना दिसत आहेत.

किम जोंग उन बसलेली खुर्चीही त्यांनी नीट पुसली, खुर्चीचा मागचा भाग (बॅकरेस्ट) आणि हात ठेवायची जागाही (आर्मरेस्ट) साफ केली.

किम जोंग उन यांच्या खुर्चीजवळ ठेवलेले टेबलही स्वच्छ करण्यात आले. टेबलवर ठेवलेला ग्लासही तिथून काढला.

पत्रकाराने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, "बैठकीनंतर किम जोंग उन यांच्यासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी खूप काळजीपूर्वक त्यांच्या उपस्थितीशी संबंधित सर्व गोष्टी नष्ट केल्या."

किम जोंग उन यांच्या खास रेल्वेत टॉयलेटसुद्धा असतं का?

जपानच्या निक्केई या वर्तमानपत्रानं दक्षिण कोरिया आणि जपानच्या गुप्तचर संस्थांचा हवाला देत वृत्त दिलं की, आधीच्या परदेश दौर्‍यांप्रमाणेच यावेळीही किम जोंग उन यांचं खास टॉयलेट हिरव्या रेल्वेत (ग्रीन ट्रेन) पॅक करून चीनमध्ये आणण्यात आलं होतं.

अमेरिकेतील स्टिमसन सेंटरमधील उत्तर कोरियाच्या नेतृत्वावर अभ्यास करणारे तज्ज्ञ मायकेल मॅडन म्हणतात की, किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांच्या काळापासून असे सुरक्षेचे उपाय हे उत्तर कोरियाचे ठरलेले नियम (स्टँडर्ड प्रोटोकॉल) आहेत.

त्यांनी रॉयटर्सला सांगितलं की, "हे विशेष टॉयलेट, मल, कचरा आणि सिगारेटचे थोटके ठेवण्यासाठी असलेल्या पिशव्या यासाठी वापरल्या जातात, कारण परदेशी गुप्तचर संस्था यांचे नमुने घेऊन तपास करू नयेत.

अशा वस्तूंमधून किम जोंग उन यांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळू शकते. यात केस किंवा त्वचेचे अंशसुद्धा असू शकतात."

किम जोंग उन यांच्या खास रेल्वेत त्यांचं टॉयलेटही आणण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Disney via Getty Images

फोटो कॅप्शन, किम जोंग उन यांच्या खास रेल्वेत त्यांचं टॉयलेटही आणण्यात आलं होतं.

परंतु, उत्तर कोरिया आपल्या नेत्यांशी संबंधित कोणतीही माहिती का उघड करत नाही, याबद्दल दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कोरियन भाषा व अभ्यास विभागाच्या निवृत्त प्राध्यापक वैजयंती राघवन म्हणतात की, "उत्तर कोरिया खूप गुप्त देश आहे. ते स्वतःबद्दल आणि आपल्या सर्वोच्च नेत्याबद्दल कोणतीही माहिती बाहेर देऊ इच्छित नसतात."

वैजयंती यांनी बीबीसीला सांगितलं की, "हे स्पष्ट आहे की, उत्तर कोरियासाठी त्यांच्या सर्वोच्च नेत्याशी संबंधित माहिती ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते मलमूत्रापर्यंत कोणतीही माहिती इतरांच्या हाती लागू नये असंच त्यांना वाटतं.

किम जोंग उन ज्या प्रकारचं राजकारण करतात आणि त्यांच्या देशाची जशी धोरणं आहेत, त्यावरून देशांतर्गत आणि बाहेरून त्यांना काही धोके असण्याची भीती कायमच असते. म्हणूनच ते इतर देशांना जेव्हा भेट द्यायला जातात तेव्हा आपल्या खास रेल्वेनेच प्रवास करतात."

डीएनए म्हणजे नक्की काय?

आता आपण परत येऊया किम जोंग उन यांची खुर्ची साफ करण्याच्या प्रश्नाकडे.

खरं तर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नक्की काय साफ केलं आणि का? माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, कुणालाही किम जोंग उन यांच्या डीएनएचा नमुना तिथून घेता येऊ नये, त्यासाठी असं करण्यात आलं.

पण यातून आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, डीएनए म्हणजे नक्की काय आणि तो इतका महत्त्वाचा का आहे?

डीएनएचं पूर्ण स्वरूप हे डीऑक्सीरिबोन्यूक्लिक अ‍ॅसिड असं आहे. हा एक जनुकीय कोड असतो जो जीन्स तयार करतो. हेच जीन्स प्रत्येकाला खास ओळख देतात.

डीएनए हा एक रासायनिक घटक आहे. तो दोन लांब साखळ्यांपासून बनतो आणि त्याचा आकार हा सर्पिल (स्पायरल) सारखा असतो.

याची रचना डबल-हेलिक्स म्हणजे दोन वळणदार साखळ्यांसारखी असते. यातच जनुकीय माहिती असते, तिला जेनेटिक कोड म्हटलं जातं. हाच डीएनए आई-वडिलांकडून मुलांकडे हस्तांतरित होतो.

डीएनए हा एक जनुकीय कोड (जेनेटिक कोड) आहे, जो कोणत्याही सजीवाला त्याची खास ओळख देतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डीएनए हा एक जनुकीय कोड (जेनेटिक कोड) आहे, जो कोणत्याही सजीवाला त्याची खास ओळख देतो.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तज्ज्ञ डीएनएला 'जीवनाचा नकाशा' किंवा 'जीवनाची ब्ल्यू प्रिंट' असंही म्हणतात. जसं प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे वेगळे असतात, तसंच प्रत्येकाचा डीएनएही वेगळा असतो.

प्रत्येक व्यक्तीमध्ये तब्बल तीन अब्जांहून जास्त डीएनए बेस पेअर्स (जोड्या) असतात. त्यामुळे प्रत्येकाचा डीएनए खास आणि वेगळा असतो. फक्त आयडेंटिकल जुळे याला अपवाद आहेत, कारण त्यांचा डीएनए सारखाच असतो.

दिल्ली विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजी शिकवणारे सहाय्यक प्राध्यापक डॉ. हरेन राम सियारी म्हणतात की, साध्या भाषेत सांगायचं तर डीएनए म्हणजे काही गुणधर्म किंवा वैशिष्ट्यं एका पिढीकडून पुढच्या किंवा दुसऱ्या पिढीकडे नेणारी गोष्ट.

सोप्या भाषेत सांगायचं तर डीएनए आपल्या शरीरासाठी इन्स्ट्रक्शन मॅन्युअलसारखं आहे. शरीराची वाढ, पुनरुत्पादन आणि प्रत्येक कामासाठी ते आवश्यक असतं. आपल्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग अशा अनेक गोष्टी डीएनए वरूनच ठरतात.

आपलं शरीर कोट्यवधी पेशींनी बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीच्या केंद्रकात (न्यूक्लियस) डीएनए असतो. हा डीएनए ए, टी, सी, जी अशा चार अक्षरांपासून तयार होतो. ही अक्षरं जोड्यांमध्ये असतात- जसं ए-टी आणि जी-सी. यांनाच बेस पेअर्स असं म्हटलं जातं.

किम जोंग उन एका बैठकीदरम्यान.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किम जोंग उन एका बैठकीदरम्यान.

जर उत्तर कोरियाचे नेते आपला डीएनए सुरक्षित ठेवण्यासाठी खुर्ची आणि इतर वस्तू स्वच्छ करत असतील, तर प्रश्न असा निर्माण होतो की तिथं डीएनए होता तरी कुठं?

वास्तविक केसांची मुळं (हेअर फॉलिकल), त्वचेच्या पेशी आणि लाळ यांतून एखाद्याचा डीएनए मिळवता येतो. हेअर फॉलिकल म्हणजे केसाचा खालचा मुळासारखा भाग.

केस गळतात तेव्हा हा भागही त्यासोबतच निघून जातो.

डॉ. हरेन राम सियारी म्हणतात की, "तुमच्या केसाचा एखादा भाग खुर्चीवर राहिला, तर त्यातून डीएनए मिळवता येतो. याशिवाय आपल्या शरीराच्या अगदी सूक्ष्म त्वचेचे कण जरी खाली पडलं, तरी त्यातूनही डीएनए मिळवता येऊ शकतो.

या दोन गोष्टींशिवाय माणूस बोलताना तोंडातून थुंकी किंवा लाळ बाहेर पडते. त्यातूनही डीएनए मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो."

डीएनए वाचवण्यासाठी एवढी धडपड का?

यावर डॉ. सियारी सांगतात की, जर कुणाकडे एखाद्या व्यक्तीचा डीएनए असेल, तर त्या व्यक्तीला एखादा जनुकीय (अनुवांशिक) आजार आहेत का? हे शोधता येऊ शकतं. तसंच कुटुंबात एखादा आजार असेल आणि तो पिढ्यान्‌पिढ्या संक्रमित होत असेल, तर त्याचाही शोध घेता येतो.

डॉ. सियारी म्हणाले, "याशिवाय शरीरात एखाद्या औषधाला किंवा अँटिबायोटिकला (प्रतिजैविक) प्रतिकारशक्ती आहे का, हेही डीएनएमधून कळू शकतं.

डीएनएवरून खूप गोष्टी शोधता येतात, परंतु सर्वात आधी अनुवांशिक आजार समजतात. डीएनएमधून कुटुंबाची माहिती मिळू शकते, अनुवांशिक आजार, दोष किंवा इतर जनुकीय कमतरता यांचीही माहिती मिळू शकते."

किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात चांगला समन्वय दिसून येतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात चांगला समन्वय दिसून येतो.

डीएनएवरून एखाद्या व्यक्तीची सध्याच्या आरोग्याची स्थिती कळू शकते का, या प्रश्नावर ते म्हणाले की, "एखादा व्यक्ती आत्ता निरोगी आहे की आजारी, हे अचूक सांगणं कठीण आहे. कारण डीएनएमध्ये सतत बदल होत असतात.

त्यामुळे सध्याची आरोग्याची स्थिती नेमकेपणानं समजणं अवघड आहे. परंतु, आजारांची माहिती नक्कीच मिळवता येऊ शकते."

किम जोंग उन यांची टीम फक्त नंतरच नाही तर त्यांच्याकडून त्या वस्तू वापरण्यापूर्वीही अतिशय काळजीपूर्वक स्वच्छ करते.

2018 मध्ये दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी भेट असो किंवा 2023 मध्ये रशियाच्या राष्ट्राध्यांशी, त्यांच्या टीमला खुर्चीवर स्प्रे करून साफ करताना आणि मेटल डिटेक्टरने स्कॅन करतानाही पाहण्यात आलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)