मोदी चीनमधून परतताच पुतिन यांनी शरीफ यांना जे सांगितलं ते भारताची किती चिंता वाढवणारं?

फोटो स्रोत, @CMShehbaz
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यानंतर रशिया आणि पाकिस्तानच्या संबंधांवर लक्ष केंद्रीत झालं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाकिस्तानला त्यांचा पारंपरिक भागीदार मानलं, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांना रशियाशी चांगले संबंध हवे असल्याची इच्छा व्यक्त केली.
भारतासाठी ही मैत्री चिंता वाढवणारी मानली जात आहे, परंतु रशियाशी भारताचे संबंध मजबूत राहिले आहेत. इतिहास आणि तज्ज्ञांचं मत पाहता, पाकिस्तान–रशिया संबंध हा विषय भारतासाठी नेहमीच संवेदनशील राहिला आहे.
हा संपूर्ण विषय जाणून घेण्याआधी इतिहासात भारत-रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबतचा आढावा सुरूवातीला घेऊया...
सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे प्रथम सचिव निकिता एस. ख्रुश्चेव्ह 1955 मध्ये श्रीनगरला आले होते. निकिता ख्रुश्चेव्ह यांना जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन युवराज करण सिंह यांनी आमंत्रित केलं होतं.
या दौऱ्यावेळी निकिता ख्रुश्चेव्ह म्हणाले होते की, पाकिस्ताननं त्यांना आणि सोव्हिएत पंतप्रधान निकोलाय बुगेनन यांना काश्मीरला जाऊ नये, असं सांगितलं होतं.
निकिता ख्रुश्चेव्ह म्हणाले होते की, "पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने कराचीतील सोव्हिएत राजदूतांना करण सिंह यांचं आमंत्रण स्वीकारू नये, अशी विनंती केली होती."
पाकिस्तानच्या या विनंतीवर निकिता ख्रुश्चेव्ह म्हणाले होते की, ''पाकिस्तानची ही वर्तणूक वैरभावाची आहे. पाकिस्तान स्वतःवर खूप जबाबदारी घेत आहे. दुसऱ्या देशाच्या अंतर्गत कामात पाकिस्तानाचा हा अभूतपूर्व हस्तक्षेप आहे.
पूर्वी कुठलाही देश असं सांगण्याचं धाडस करत नव्हता की, आम्ही काय करावं आणि कोणास मित्र बनवावं. भारतासोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत.''

फोटो स्रोत, Getty Images
या दौऱ्यात ख्रुश्चेव्ह यांनी काश्मीर वादावरही सविस्तर चर्चा केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "मी त्या देशांचं नाव घेऊ इच्छित नाही, जे काश्मीर मुद्दा फक्त चर्चेत असल्यामुळे उचलतात."
"जे लोक काश्मीर मुद्द्याला खतपाणी घालत आहेत, ते भारत आणि पाकिस्तानमध्ये द्वेष पेरत आहेत. अनेक देशांना वाटतं की, काश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून पाकिस्तानच्या बाजूने जावा.
परंतु, काश्मीरच्या लोकांनी भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीरचे लोक साम्राज्यवादी शक्तींच्या हातातील खेळणी बनू इच्छित नाहीत," असं ख्रुश्चेव्ह यांनी म्हटलं होतं.
ख्रुश्चेव्ह यांचा पाकिस्तानवर राग
या दौऱ्यात ख्रुश्चेव्ह यांनी भारताच्या फाळणीवरही टीका केली होती आणि म्हटलं होतं की, फाळणी धर्मामुळे नाही, तर एका तिसऱ्या देशामुळे झाली, जे 'फोडा आणि राज्य करा' या धोरणावर चालत होते.
ख्रुश्चेव्ह यांनी पाकिस्तानची अमेरिकेबरोबर असलेल्या जवळीकतेवरही टीका केली होती. तेव्हा पाकिस्तान बगदाद करारामध्ये (बगदाद पॅक्ट) होता आणि ख्रुश्चेव्ह यांना हे आवडलं नव्हतं. त्यांनी बगदाद कराराला सोव्हिएत विरोधी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, @narendramodi
1955 मध्ये तुर्कीये, इराक, ब्रिटन, पाकिस्तान आणि इराणने एकत्र येऊन 'बगदाद पॅक्ट' तयार केला होता. याला त्या वेळी डिफेन्सिव्ह ऑर्गनायझेशन म्हटलं जात असत. या पाच देशांनी आपलं समान राजकीय, लष्करी आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची योजना मांडली होती. हे नाटोच्या धर्तीवर होतं.
श्रीनगर दौऱ्यावेळीच निकिता ख्रुश्चेव्ह यांनी भारतासाठी म्हटलं होतं की, ''आम्ही तुमच्या खूप जवळ आहोत. तुम्ही आम्हाला पर्वताच्या शिखरावरूनही बोलवलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी राहू.''
पण आता ना सोव्हिएत संघ राहिला आहे आणि ना 1955 चा काळ. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतरही रशियाचा काश्मीरवरील दृष्टिकोन बदलला नाही, पण पाकिस्तानबद्दल रशियाचा दृष्टिकोन ख्रुश्चेव्ह यांच्यासारखा राहिलेला नाही.
पाकिस्तानची इच्छा अन् रशियाची संमती
पंतप्रधान मोदी चीनमधून परतताच मंगळवारी (2 सप्टेंबर) रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट झाली.
पाकिस्तान अजूनही रशियाचा पारंपरिक भागीदार आहे, असं या बैठकीत पुतिन यांनी शाहबाज शरीफ यांना सांगितलं.
शाहबाज शरीफ यांनी पुतिन यांना सांगितलं की, ते भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांचा आदर करतात, पण पाकिस्तानलाही रशियासोबत मजबूत संबंध हवे आहेत. शाहबाज शरीफ हे बोलत असताना पुतिन मान हलवत त्यांना होकार देत होते.
थिंक टँक ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या सीनियर फेलो तन्वी मदान यांनी शाहबाज शरीफ आणि पुतिन यांच्या भेटीचा व्हीडिओ 'एक्स'वर शेअर करत लिहिलं की, "मीम्सच्या दुनियेशिवायही खरं जग आहे. पुतिन कोणत्याही एका देशाशी बांधले गेलेले नाहीत.
त्यांनी शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आणि पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे असल्याचं सांगितलं. हे काही नवीन नाही. पहलगाम हल्ल्यानंतर रशियाच्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष गेलं नाही, कारण सगळे ट्रम्प यांच्यामध्येच गुंतलेले होते."
पहलगाम हल्ल्यानंतर रशियाने भारताला निराश केलं, पण याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही, असं तन्वी मदान यांना वाटतं.
तन्वी मदान यांनी 4 मे रोजी 'एक्स'वर लिहिलं होतं की, "12 वर्षांपेक्षा कमी कालावधीत रशियाने युक्रेनवर दोनदा हल्ले केले, आणि आता ते भारताला पाकिस्तानसोबतचा वाद चर्चेतून मिटवा," असं सांगत आहेत.
थिंक टँक ओआरएफमधील भारत-रशिया संबंधाचे तज्ज्ञ ॲलेक्सी झाखारोव्ह यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "मोदी हे चीनमधून परतल्यानंतर पुतिन आणि शाहबाज शरीफ यांनी द्विपक्षीय विषयांवर चर्चा केली.
पुतिन यांनी पाकिस्तानला पारंपरिक भागीदार म्हटलं, व्यापार वाढवण्याची मागणी केली, यूएनएससीमध्ये सहकार्य वाढवण्यास सांगितलं आणि शाहबाज शरीफ यांना मॉस्कोला येण्यासाठी आमंत्रित केलं. शाहबाज शरीफ यांनीही पुतिन यांचे दक्षिण आशियामध्ये संतुलन राखण्याच्या धोरणासाठी आभार मानले."

फोटो स्रोत, @narendramodi
रशिया पाकिस्तानचा पारंपरिक भागीदार आहे का?
पुतिन यांनी पाकिस्तानला पारंपरिक भागीदार म्हटलं आहे. खरंच, पाकिस्तान रशियाचा पारंपरिक भागीदार राहिला आहे का?
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील रशियन आणि मध्य आशिया अभ्यास केंद्राचे प्राध्यापक डॉ. राजन कुमार म्हणतात, "पाकिस्तान कधीही रशियाचा पारंपरिक भागीदार राहिलेला नाही. ते सोव्हिएत संघाचा काळ असो किंवा त्यानंतरचा काळ. ब्रिटिश भारतातही त्यांचं झार बरोबरचं वैर स्पष्ट होतं. आता पुतिन पाकिस्तानला पारंपरिक भागीदार म्हणत आहेत, परंतु हे ऐतिहासिक तथ्यांपासून खूप दूर आहे."
प्रा. राजन कुमार म्हणतात, "भारताने रशियाला स्पष्ट सांगितलं आहे की, जर तुमची पाकिस्तानशी जवळीक वाढली तर नक्कीच आपले संबंध प्रभावित होतील. पण पाकिस्तान नेहमीच चीनच्या माध्यमातून रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आला आहे."
" हे स्पष्ट आहे की, पाकिस्तान आणि रशिया दोन्ही चीनचे महत्त्वाचे भागीदार आहेत. पाकिस्तानाची रणनीती अशी आहे की, ते या खंडात भारताचं संतुलन अस्थिर करतील.
भारताने यूरेशियन खंडात रशियाशी चांगले संबंध ठेवून पाकिस्तानला नियंत्रणात ठेवलं आहे. भारतासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे पाकिस्तान, रशिया आणि चीन एकत्र येणं. रशिया आणि चीन तर आधीच एकत्र आहेत."
प्रा. राजन कुमार म्हणतात, "हे फक्त माझं मतं नाही, तर थिंक टँक कार्नेगी एंडोमेंटचे सीनियर फेलो अॅशले जे टेलीस यांचाही असा विश्वास आहे. त्यांचं म्हणणं आहे की, भारत पूर्णपणे अमेरिकाच्या पक्षात जाऊ शकत नाही, कारण भारताला खंडीय (महाद्वीपीय) धोका आहे.
जर चीन, रशिया आणि पाकिस्तान एकत्र आले तर तीच ग्रेट गेम सुरु होईल, ज्याची चर्चा ब्रिटिश भारतात होत होती. परंतु, भारत अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही."
जेव्हा 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तेव्हा रशियाने खूप संतुलित भूमिका घेतली होती. ताश्कंदमध्ये रशियाने केलेले करार देखील भारतविरोधी ठरले. या करारानंतर रशिया पूर्णपणे त्यांच्याविरुद्ध नाही, असं पाकिस्तानला वाटलं.
1991 मध्ये संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने 'साऊथ आशिया न्यूक्लियर फ्री झोन' प्रस्ताव सादर केला, ज्याचा भारताने विरोध केला होता.
जोपर्यंत यात चीनचा समावेश होत नाही, तोपर्यंत हा प्रस्ताव काहीच उपयोगी नाही, असं भारताचं म्हणणं होतं. असं म्हटलं जातं की, पाकिस्तानचा हा प्रस्ताव भारताच्या आण्विक कार्यक्रमांवर अडथळा आणण्यासाठी होता. परंतु, त्यावेळी सोव्हिएत संघाने पाकिस्तानच्या या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पुतिन कधीही पाकिस्तानला गेले नाहीत
रशियासोबतच्या भारताच्या मैत्रीबाबत अमेरिका अस्वस्थ आहे. पण भारत अमेरिकाच्या या अस्वस्थेसमोर कधीही झुकलेला नाही.
अमेरिकेनं भारतावर रशियाशी मैत्री तोडण्याचा दबाव आणला तर पुतिन यांचे हात अधिक मजबूत होतात, असं अनेक विश्लेषकांचं मत आहे.
अमेरिकेने भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी दिली, तेव्हा थिंक टँक अनंता सेंटरच्या सीईओ इंद्राणी बागची यांनी लिहिलं होतं, ''हे खूप धोकादायक आहे. पाश्चिमात्य मानतात की, भारत रशियासाठी खास आहे, त्यामुळे पुतिन यांना गाठण्यासाठी भारताला शिक्षा द्या.
पुतिन आपल्याला हवं तसं करतात आणि भारताला होणाऱ्या नुकसानीची त्यांना पर्वा नाही किंवा त्यांना त्याचा काही फरकही पडत नाही. अशा परिस्थितीत भारत एक पंचिंग बॅग बनेल आणि अशा परिणामांपासूनही प्रभावित होईल ज्यात त्याचा काही हात नाही."
इंद्राणी बागची यांचा मुद्दा पुढे नेत तन्वी मदान यांनी लिहिलं, "जर ट्रम्प यांनी भारताला त्रास दिला, तर पुतिन यांना फायदा होईल. भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडले तर भारतात रशियाशी संबंध अधिक मजबूत करण्याची मागणी होईल. अशा परिस्थितीत भारत चीनसोबत करार करण्यासाठी अधिक तयार दिसेल."

तन्वी मदान यांच्या मते, "भारतातील काही लोक विचार करत आहेत की, आपण धोरणात्मक स्वायत्ततेकडे परत जाऊ किंवा चीनच्या जवळ जाऊ. मला नाही वाटत की, ट्रम्प भारताबाबत असं विचार करतात. सध्या ट्रम्प यांना चीनच्या स्पर्धेची काही पर्वा नाही."
या सर्वांनंतरही प्रा. राजन कुमार यांना वाटतं की, पुतिन हे पाकिस्तानच्या बाबतीत भारताची चिंता समजतात. याचं समर्थन म्हणून सांगता येईल की, पुतिन हे मागील 25 वर्षांपासून रशियाच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत आणि आतापर्यंत ते एकदाही पाकिस्तानला गेलेले नाहीत.
आजपर्यंत रशियाच्या एकाही राष्ट्राध्यक्षाने पाकिस्तानला भेट दिलेली नाही. सोव्हिएत संघ अस्तित्वात असताना देखील एकही राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानला गेलेला नव्हता. सोव्हिएत संघाच्या पतनानंतर 16 वर्षांनी म्हणजे 11 एप्रिल 2007 रोजी रशियाचे पंतप्रधान मिखाईल फ्रादकोव्ह पाकिस्तानला गेले होते.
दक्षिण आशियातील भारत हा एकमेव देश आहे जिथे पुतिन येतात. 17 मार्च 2016 रोजी पाकिस्तानमध्ये रशियाचे तेव्हाचे राजदूत अलेक्सी देदोव्ह यांनी इस्लामाबादमधील इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये पाकिस्तान–रशिया संबंधांवर बोलताना म्हटली होतं की, "समस्या ही आहे की दौरा फक्त औपचारिक नसावा. दौऱ्यास ठोस कारण असावं. जर ठोस कारण असेल तर दौरा नक्की होईल. त्यासाठी तयारी आणि करार असणे आवश्यक आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)








