नरेंद्र मोदी कुवेत दौऱ्यावर, 'या' 7 कारणांमुळे भारताचे अरब राष्ट्रांशी संबंध होत आहेत घनिष्ठ

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (21 डिसेंबर) दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. कुवेत हा आखातातील कच्च्या तेलानं समृद्ध असलेल्या देशांपैकी एक आहे.
1981 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी कुवेतच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर कुवेतच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. म्हणजे तब्बल 43 वर्षांनी भारताचे पंतप्रधान कुवेत दौऱ्यावर जात आहेत.
2009 मध्ये भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कुवेत दौऱ्यावर गेले होते. इंदिरा गांधी यांच्यानंतर भारतीय राजकारण्यानं केलेला हा सर्वात महत्त्वाचा कुवेत दौरा होता.
पंतप्रधान मोदी कुवेत दौऱ्यावर जाण्याआधी दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकमेकांच्या देशांचे दौरे केले आहेत. याद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाच्या कुवेत दौऱ्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी आधीच तयार केलेली आहे.
भारत आणि कुवेतच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांना मर्यादित स्वरुपातच भेट दिलेली असली. तरी दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत.
कुवेतमध्ये कच्च्या तेलाचे साठे सापडण्या आधीपासून भारत आणि कुवेत या दोन्ही देशांमध्ये सागरी मार्गानं व्यापार होत होता.
ऐतिहासिकदृष्ट्या दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. 1961 पर्यंत कुवेतमध्ये भारताचा रुपया हे चलन चालत असे. यावरून दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध लक्षात येतात.
भारत आणि कुवेतमध्ये 1961 मध्ये राजकीय संबंध प्रस्थापित झाले होते. सुरुवातीच्या काळात भारतानं कुवेतमध्ये ट्रेड कमिशनर म्हणजे व्यापार आयुक्त नियुक्त केले होते.
भारत आणि कुवेतमधील राजकारण्यांचे उच्चस्तरीय दौरे होत आले आहेत. 1965 मध्ये भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती झाकिर हुसैन यांनी कुवेतचा दौरा केला होता.
कुवेतमधील वरिष्ठ नेते देखील भारत दौऱ्यावर येत राहिले आहेत. कुवेतचे पंतप्रधान शेख जाबिर अल मुबारक अल हमाद अल सबाह 2013 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते.
त्याआधी 2006 मध्ये कुवेतचे तत्कालीन अमीर शेख सबाह अल अहमद अल जाबेर अल सबाह यांनी भारताला भेट दिली होती.
तर अलीकडच्या काळात ऑगस्ट 2024 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कुवेत दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर 3-4 डिसेंबरला कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या भारत दौऱ्यावर आले होते.
या दौऱ्यात कुवेतच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेत दौऱ्याचं आमंत्रण दिलं होतं.
दोन्ही देशातील व्यापाराला चालना देण्यासाठी, याच महिन्यात कुवेतच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत दौऱ्याच्या वेळेस संयुक्त सहकार्य आयोग ( Joint Co-Operation Commission) देखील स्थापन केला होता.
भारत आणि आखाती देशांचे संबंध ऊर्जा सुरक्षा (कच्च्या तेलाचा पुरवठा), सहकार्य आणि व्यापारावर आधारित आहेत.
अरब देश भारतासाठी महत्त्वाचे असण्यामागची सात महत्त्वाची कारणं पाहूया.
1. भारताचं व्यवहारी परराष्ट्र धोरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासूनच जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातही आखाती देशांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आखाती देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा कुवेत दौरा हा अरब देशांचा 14 वा दौरा असणार आहे.
नरेंद्र मोदी सात वेळा संयुक्त अरब अमीरात (युएई), दोनवेळा कतार, दोन वेळा सौदी अरेबिया आणि ओमान आणि बहरीनला एक-एक वेळा गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत आखाती देशांशी असलेले संबंध अधिक घट्ट करतो आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणात आखातातील अरब देश व्यूहरचनात्मकदृष्टया आणि राजनयिकदृष्ट्या सर्वात प्राधान्याचे म्हणून उदयाला येत आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणातील त्यांचं महत्त्व वाढतं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात फक्त तीनवेळा आखातातील अरब देशांच्या दौऱ्यावर गेले होते, यावरून भारताच्या परराष्ट्र धोरणातील अरब देशांचं वाढतं महत्त्व लक्षात येतं.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कतार, ओमान आणि सौदी अरेबियाला प्रत्येकी एक-एक वेळा गेले होते. तर कुवेत दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास सर्वच महत्त्वाच्या अरब देशांचा दौरा केलेला असेल.
प्राध्यापक स्वस्ति राव आंतरराष्ट्रीय विषयांच्या जाणकार आहेत. त्या म्हणाल्या, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक पातळीवर भारताचं महत्त्व वाढवण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. आखाती देशांवर विशेष लक्ष देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या देशांशी भारताचे असलेले व्यापारी संबंध. नरेंद्र मोदींनी फक्त शेजारी देशांशीच नाही तर दूरच्या देशांशी देखील संबंध घट्ट करण्यावर भर दिला आहे."
डॉक्टर फज्जुर्रहमान इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सशी संबंधित सीनियर फेलो आहेत. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी एका वेगळ्याच ऊर्जेनं आखाती देशांशी असलेले संबंध पुढे नेले आहेत. पंतप्रधान मोदींना भारताच्या आधीच्या नेत्यांपेक्षा स्वत:ला वेगळंदेखील सिद्ध करायचं आहे. जागतिक स्तरावरील बदलत्या राजकारणानुसार त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल केले आहेत."


2. आखातात स्थलांतरित भारतीयांची मोठी संख्या
भारतातून आखाती देशांमध्ये स्थलांतरित झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. भारताचे आखाती देशांबरोबरचे संबंध घनिष्ठ करण्यामागचं हे मोठं कारण आहे.
कुवेतमध्ये जवळपास दहा लाख भारतीय राहतात. तर संयुक्त अरब अमीरातीत (युएई) जवळपास पस्तीस लाख तर सौदी अरेबियात जवळपास सव्वीस लाख भारतीय राहतात.
आखाती देशांमध्ये राहणारे भारतीय तिथून भारतात मोठी रक्कम पाठवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकसंख्येला आपल्याशी जोडण्याचे प्रयत्न केले आहेत.
कुवेतमध्ये राहणारे भारतीय लोक दरवर्षी जवळपास 4.7 अब्ज डॉलर भारतात पाठवतात. परदेशात राहणारे भारतीय लोक भारतात दरवर्षी जितकी रक्कम पाठवतात त्याच्या ही रक्कम 6.7 टक्के इतकी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक राव म्हणतात, "यात कोणतीही शंका नाही की परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्याशी जोडण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे आणि परदेशात स्थलांतरित झालेल्या भारतीयांमध्ये पंतप्रधान मोदींची लोकप्रियता देखील वाढते आहे. याचा देशातील राजकारणावर भलेही मोठा परिणाम होत नसेल, मात्र जागतिक स्तरावर स्थलांतरित भारतीयांना आपल्याशी जोडण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले आहेत."
प्राध्यापक फज्जुर्रहमान देखील म्हणतात की भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आखातात राहणारे स्थलांतरित भारतीय अत्यंत महत्त्वाचे आहेत.
प्राध्यापक फज्जुर्रहमान म्हणतात, "आखाती देशांमध्ये राहणारे स्थलांतरित भारतीय हे भारतासाठी उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत आहेत या गोष्टीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणीव आहे. आखाती देशांशी संबंध घनिष्ठ करून त्यांनी या स्थलांतरित भारतीय लोकांमधील विश्वास दृढ केला आहे."
3. भारताची इंधनाची गरज
आपली इंधनाची गरज (कच्चे तेल) भागवण्यासाठी भारत अरब देशांवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षितपणे आणि सातत्यानं व्हावा यासाठी भारतानं संयुक्त अरब अमीरात, सौदी अरेबिया, कुवेत आणि कतारबरोबरचे आपले संबंध दृढ केले आहेत.
भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या एकूण पुरवठ्यापैकी तीन टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा कुवेतमधून होतो. भारत जरी रशियाकडून सर्वाधिक प्रमाणात कच्चे तेलाची आयात करत असला तरी विश्लेषकांना वाटतं की कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी भारत आखाती देशांवर अवलंबून राहील.
प्राध्यापक फज्जुर्रहमान म्हणतात, "भारत आपल्या इंधनाच्या गरजांसाठी (कच्चे तेल) आखाती देशांवर अवलंबून आहे, हे आखाती देशांशी संबंध घनिष्ठ करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे."

फोटो स्रोत, Getty Images
तर प्राध्यापक राव म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशातील राजकीय नेतृत्व, शासक यांच्याबरोबर वैयक्तिक पातळीवर देखील उत्तम संबंध प्रस्थापित करत आहेत. भारत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी आखाती देशांवर अवलंबून आहे, हे यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे."
कुवेत आणि भारत या दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि व्यापारी संबंध भक्कम करण्यासाठी 26 करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत.
2023-24 च्या आकडेवारीनुसार, भारत आणि कुवेतमध्ये 10.47 अब्ज डॉलरचा व्यापार झाला.
अर्थात या व्यापारातील बहुतांश भाग हा कुवेतमधून भारतात येणारं कच्चं तेल आणि इंधनाशी निगडीत इतर उत्पादनांचा आहे.
भारतानं कुवेतला जवळपास दोन अब्ज डॉलरची निर्यात केली. कुवेत भारताचा सहावा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. भारत आपल्या आवश्यकतेपैकी तीन टक्के कच्चं तेल कुवेतमधून आयात करतो.
इतकंच नाही, तर भारतानं कुवेतमध्ये जवळपास दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक देखील केली आहे.
4. अरब देशांची आर्थिक ताकद
कुवेत, कतार, संयुक्त अरब अमीरात, सौदी अरेबिया आणि बहरीन आर्थिकदृष्ट्या ताकदवान देश आहेत. या देशांची लोकसंख्या जरी कमी असली तरी जागतिक पातळीवर या देशांची एक वेगळी आर्थिक ताकद आहे.
प्राध्यापक फज्जुर्रहमान म्हणतात, "बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. भारताला असे सहकारी हवे आहेत ज्यांचं जागतिक अर्थव्यवस्थेत भक्कम स्थान आहे आणि आवश्यक पडल्यास ते भारतासोबत उभे राहतील. आखाती देशांची आर्थिक ताकद हे देखील भारताच्या आखाती देशांबरोबरच्या संबंधांना अधिक भक्कम करण्यामागचं एक कारण आहे."

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक राव म्हणतात, "आखाती देश भारताचे दूरचे शेजारी आहेत. भारत आखातात विशिष्ट परराष्ट्र धोरण अंमलात आणतो आहे. ते म्हणजे भारत एकाच वेळी अनेक देशांशी संबंध बळकट करतो आहे."
"आखाती देशांच्या बाबतीत भारताचं परराष्ट्र धोरण संतुलित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी कोणताही भारतीय पंतप्रधान संयुक्त अरब अमीरातीत गेला नव्हता. आज भारताचा युएईबरोबर व्यापारी करार आहे. युएई आज भारताचा महत्त्वाचा सहकारी आहे."
"पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाला दोन वेळा गेले आहेत. जी-20 मध्ये अरब देशांच्या नेत्यांना बोलावलं. यातून दिसून येतं की भारताला आखाती देशांचं महत्त्व लक्षात येतं. तसंच जागतिक पातळीवर आपलं स्थान बळकट करण्यासाठी भारत आखाती देशांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करतो आहे."
5. इस्रायल आणि अरब देशांमधील घटता तणाव
गाझातील युद्धाआधी आणि अमेरिकेतील ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अरब देश आणि इस्रायल यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न झाले. युएई आणि बहरीन यांचे इस्रायलशी संबंध प्रस्थापित झाले.
सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात राजनयिक संबंध सुरू होण्यासंदर्भात पावलं टाकण्यात आली.
इस्रायल भारताचा महत्त्वाचा सहकारी देश आहे. विशेष करून संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशात महत्त्वाचे संबंध आहे. अरब देश आणि इस्रायलचे सुधारत असलेल्या संबंधाचा भारतानं फायदा घेतला. तसंच इस्रायलबरोबर आपले संबंध आणखी दृढ करण्याबरोबरच भारतानं अरब देशांशी असलेले संबंध देखील घनिष्ठ करण्याचे प्रयत्न केले.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक फज्जुर्रहमान म्हणतात, "भारतानं एक संतुलित धोरण अंमलात आणलं आणि इस्रायल बरोबरच्या संबंधांना उघडपणे बळकटी दिली. अब्राहम करारांचा देखील भारताला फायदा झाला."
तर प्राध्यापक राव म्हणतात, "गाझा युद्धामुळे आज भारत-आखात-युरोप कॉरिडॉर मागे पडला आहे. मात्र तो एक अतिशय महत्त्वाचा करार आहे. भारतानं इस्रायलला देखील सोबत घेतलं आणि आखातातील अरब देशांशी देखील संबंध वाढवले. यातून दिसून येतं की भारत व्यवहार्य परराष्ट्र धोरण अंमलात आणतो आहे."
6. सुरक्षा आणि सहकार्य
हिंदी महासागरातील सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि अरब देशांबरोबर सुरक्षेच्या बाबतीत सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं देखील भारतानं अरब देशांबरोबरचे संबंध वाढवले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक फज्जुर्रहमान म्हणतात, "आज जागतिक पातळीवर सर्वच देशांसमोर सामाईक आव्हानं आहेत. यात पर्यावरण, दहशतवाद आणि संरक्षण या आव्हानांचा समावेश आहे. बहरीन, युएई आणि इतर अरब देशांबरोबर भारत सुरक्षाविषयक माहितीची देवाण-घेवाण करतो."
प्राध्यापक राव म्हणतात, "दहशतवाद हे एक सामाईक आव्हान आहे. एका बाजूला जसे भारताचे इस्रायलशी चांगले संबंध आहेत, तसंच दुसऱ्या बाजूला अरब देशांशी देखील भारताचे चांगले संबंध आहेत. असं करणं भारताच्या हिताचं देखील आहे."
7. जागतिक पातळीवर पाकिस्तान कमकुवत होणं
गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर पाकिस्तान कमकुवत झाला आहे. त्यामुळे आता आखाती देश आणि भारतातील संबंध घनिष्ठ होण्यामध्ये पाकिस्तानचा अडथळा राहिलेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक फज्जुर्रहमान म्हणतात, "आखाती देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ होण्यामागे हे देखील एक मोठं कारण आहे की आता भारत आणि आखाती देशांमधील संबंधांमध्ये पाकिस्तानचा अडथळा नाही."
तर स्वस्ति राव यांचं म्हणणं आहे की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे आणि भारताची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आता अरब देश पाकिस्तान ऐवजी स्वत:च्या हितांना प्राधान्य देत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











