इस्रायलने उत्तर गाझात केलेल्या हल्ल्यात किमान 34 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हफसा खलील
- Role, बीबीसी न्यूज
इस्रायलने उत्तर गाझातील बैत लाहिया शहरातील एका रहिवासी इमारतीवर हवाई हल्ला केला. त्यात किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक संरक्षण एजन्सीने सांगितले आहे.
AFP या वृत्तसंस्थेने हमासच्या संरक्षण एजन्सीच्या हवाल्याने हे वृत्त दिले. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक मुलं आणि महिलांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. या हल्ल्यात अन्य सात जण जखमी झाले आहेत असे संरक्षण एजन्सीने सांगितले.
इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, त्यांनी उत्तर गाझातील कट्टरतावाद्यांच्या तळांवर हल्ले केले आहेत. यात बैत लाहिया शहराचा समावेश देखील आहे. हमासने पुन्हा संघटीत होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे इस्रायली संरक्षण दलाने सांगितले.
या हवाई हल्ल्यातील पीडितांबाबत बोलताना हमासच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते महमूद बस्सल यांनी सांगितले की सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि शेलिंगच्या माऱ्यामुळे जखमींवर उपचार करणे आणि त्यांचा जीव वाचवणे कठीण झाले आहे.
या हल्ल्यानंतर आता संबंधित इमारतीचे केवळ अवशेष राहिले आहेत. सिमेंट-क्राँक्रिटचा ढिगारा आणि काही लोखंड्याच्या सळ्यांव्यतिरिक्त त्या ठिकाणी आता काही दिसत नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images
काही दिवसांपूर्वीपर्यंत एक व्यक्ती त्याच इमारतीत राहत होता. पण सध्या ते त्या इमारतीत राहत नव्हते, त्या व्यक्तीने AFP वृत्तसंस्थेला सांगितले की, "आम्ही अगदी थोडक्यात बचावलो आहोत. आमचा मृत्यू उंबरठ्यावरच होता असं आम्हाला वाटलं."
"या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर हादरला होता," असं त्या व्यक्तीने सांगितले.
इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की त्यांनी उत्तर गाझातील जबालिया भागात मोहीम सुरू केली आणि नंतर ती मोहीम बैट लाहियापर्यंत वाढवण्यात आली. या भागात असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करणे हा आमचा उद्देश होता असं संरक्षण दलाने सांगितलं.


'ज्या ठिकाणी युद्ध सुरू आहे, अशा भागातील नागरिकांना त्या ठिकाणाहून सुरक्षितपणे हलवण्यासाठी आम्ही उपाय योजना केल्या आहेत,' असे संरक्षण दलाने म्हटले आहे.
पण अनेकांना आपले घर सोडायचे नव्हते. बस्सल सांगतात की बैत लाहियातील या इमारतीत सहा कुटुंब राहत होती.
एका महिलेने त्वेषाने आपले म्हणणे बीबीसी न्यूजसमोर मांडले. ती सांगते, "आम्ही लोकांनी तुमचं काय बिघडवलं आहे. आम्ही काय नुकसान केलंय तुमचं? काय गुन्हा आहे आमचा? आम्ही आमच्या घरात आहोत, इथून का काढलं जातंय आम्हाला?"
गेल्या आठवड्यात जबालियातील एका घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 13 लहान मुलांचाही समावेश होता. गाझा शहरात अन्य पाच जणांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या पाच आठवड्यात इस्रायली लष्कराने केलेल्या कारवाईमुळे उत्तर गाझातील किमान 1,30,000 लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.
संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की जबालिया, बैत लाहिया आणि बैत हनॉन या ठिकाणातील किमान 75,000 जणांना अन्न-पाण्याची टंचाई जाणवत आहे.
गाझातील पॅलेस्टिनींना बळाचा वापर करून हुसकावून लावले जात आहे. यातून इस्रायलने युद्धकालीन नियमांचा भंग केला आहे आणि त्यांनी मानवतेविरोधात गुन्हा केला आहे, असे ह्युमन राइट्स वॉचने आपल्या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात गाझातील 90 टक्के लोकसंख्या म्हणजेच अंदाजे 19 लाख जणांना स्थलांतर करावे लागले आहे. 79 टक्के भूभागातील नागरिकांना आपलं घर-दार सोडून सुरक्षितस्थळी जाण्याचा आदेश इस्रायलने दिलेला आहे.
7 ऑक्टोबर 2023 मध्ये दक्षिण इस्रायलवर जो भीषण हल्ला झाला होता. त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने ही कारवाई सुरू केली आहे. हमासने केलेल्या या हल्ल्यात किमान 1200 जणांचा मृत्यू झाला होता आणि 251 जणांना ओलीस ठेवण्यात आले होते.
त्यानंतर सुरू झालेल्या युद्धात गाझातील 43,000 हजार जणांचे प्राण गेले असल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











