इ. कोलाय जिवाणूच्या उद्रेकानंतर अमेरिकेत सेंद्रिय गाजरांवर बंदी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ॲलेक्स बॉयड
- Role, बीबीसी न्यूज
इश्चेरिया (इ.) कोलाय जिवाणूच्या उद्रेकाने एकाचा जीव घेतल्यानंतर अमेरिकेतल्या दुकानांत विकल्या जाणाऱ्या सेंद्रिय गाजर आणि छोट्या आकाराच्या गाजरांवर बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) आत्तापर्यंत 18 राज्यातून 39 रुग्णांची नोंद झालीय आणि त्यातल्या 15 लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
ग्रीमवे फार्म्सकडून ट्रेडर जोस, होल फूड्स 365, टार्गेट्स गुड अँड गॅदर, वॉलमार्ट्स मार्केटसाईड, वेगमान्स अँड अदर्स अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये पॅक करून पाठवलेली गाजरं परत मागवली आहेत.
या दुकानांमधून आधीच गाजरं विकत घेतलेल्यांनी ती फेकून द्यावीत किंवा दुकानात परत करून पैसे मागून घ्यावेत असं आवाहन अधिकारी करत आहेत.
संसर्ग झालेले बहुतेक लोक हे न्यूयॉर्क, मिनेसोटा, वॉशिंग्टन या भागात राहतात. शिवाय, कॅलिफोर्निया आणि ओरिगॅनो या भागातल्याही काही लोकांना लागण झाली असल्याचं एपी वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
या मागे घेण्यात आलेल्या गाजरांवर वापरायच्या मुदतीची तारीख दिलेली नाही. पण 14 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबरपर्यंत ही विक्रीसाठी उपलब्ध होती, असं सीडीसीने सांगितलं आहे. शिवाय, 11 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबरमधली मुदतीची तारीख असणारी छोटी सेंद्रीय गाजरंही मागे घ्यायला सांगितलं आहे.
ही बंदी घातलेली उत्पादनं फेकून देण्यासोबतच ती ठेवली होती तो परिसर आणि त्याचा स्पर्श झाला असेल अशा सगळ्या जागा स्वच्छ आणि निर्जंतूक कराव्यात असंही सीडीसीने सांगितलं आहे.


तीव्र पोटदुखी, जुलाब आणि उलट्या अशी ओ 121 इ. कोलाय या जिवाणूची लागण झाल्याची लक्षणं आहेत. हा जिवाणू पोटात गेल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ही लक्षणं दिसू लागतात.
बहुतेक लोक कोणत्याही उपचाराविना बरे होतात. पण काहींच्या किडनीवर गंभीर परिणाम होतो आणि रुग्णालयात भरती करण्याची गरज पडू शकते.
सध्या गाजरातून इ. कोलाय संसर्गाचा उद्रेक होतोय. मात्र काही दिवसांपुर्वीच मॅकडोनल्ड्सच्या बर्गरमध्ये वापरल्या जाणाऱ्या बारीक कापलेल्या कांद्यामुळेही इ. कोलायचा उद्रेक झाला होता. त्यावेळी 104 लोकांना त्याची लागण झाल्याचं नोंदवलं गेलं होतं.
यावेळी उद्रेकामुळे ऑक्टोबर महिन्यात एकाचा मृत्यू झाला असल्याचं आणि 34 लोकांना रुग्णालयात भरती केलं असल्याचं अमेरिकेच्या फुड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) जाहीर केलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











