मूड कसा सुधारायचा? तुमचा मूड आणि जेवण यांचा काय संबंध आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एमिली थॉमस,
- Role, बीबीसी न्यूज, द फूड चेन.
आपल्या घरातल्या कोणाचं निधन झालं, तर त्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासासोबतच आपलं जगणंही थांबून गेल्यासारखं वाटतं. त्या वेळी काही खायचं किंवा प्यायचं भान उरत नाही. पण अशा वेळी खाण्यामुळे आपलं दुःख कमी होण्याची शक्यता असते का?
एखाद्या व्यक्तीच्या निधनामुळे आपल्याला झालेलं दुःख किंवा मनावर आलेला ताण कमी करण्यासाठी चांगलं खाणं उपकारक ठरू शकतं, असं मानलं जातं.
अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात राहणारी लिंडसे ऑस्ट्रोम साडेपाच महिन्यांची गरोदर होती, तेव्हा तिने पुरेशी वाढ न झालेल्या बालकाला जन्म दिला. तिने या मुलाचं नाव एफ्टन असं ठेवलं, पण जन्मल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एफ्टन मरण पावला.
एफ्टनच्या मृत्यूमुळे लिंडसेवर शारीरिक आणि मानसिक आघात झाला. ती दिवस-रात्र तिच्या घरात रडत राहायची, धड काही खायची नाही, कोणाशी बोलायची नाही.
त्या दुःखद दिवसांची आठवण काढत लिंडसे सांगते, "माझा मुलगा गमावल्यानंतर मला आयुष्यात काही अर्थच वाटत नव्हता."
हा दुःखाचा डोंगर पार करण्यासाठी लिंडसेला खाद्यपदार्थांची मदत झाली. ती 'पिंच ऑफ यम' या नावाचा एक फूड-ब्लॉग चालवते. मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या जिभेची चवच गेली होती, असं तिने ब्लॉगवर लिहिलं आहे. तिच्या पोटात दुःखाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला जणू काही जागाच नव्हती.

फोटो स्रोत, A PINCH OF YUM
ती म्हणते, "वास्तविक मला खूप तिखट, मसालेदार आणि रंगीबेरंगी खाद्यपदार्थ खायला आवडत होते. पण त्या घटनेनंतर मला फक्त बटाट्याचं सपक सार आणि ब्रेड-बटर एवढंच खावंसं वाटत होतं."
खाण्यापिण्यावरची इच्छाच उडालेल्या त्या काळात आपल्या घरी वेगवेगळे खाद्यपदार्थ पाठवणाऱ्या मित्रमैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे लिंडसे आता खूप आभार मानते. तिला पुन्हा खाण्यात रुची वाटावी यासाठी तिच्या मित्रमैत्रिणी कूकर आमि ब्रेड घेऊन तिच्या घरी येत असत.
लिंडसे सांगते, "त्या वेळी हे खाद्यपदार्थ लाइफलाइनसारखे होते. मी एका वेळी एक वाटीभर सार प्यायचं एवढंच ठरवलेलं. माझ्या आत अजून प्राण आहे, आणि तो टिकवून ठेवण्यासाठी मला खावं लागेल, याची जाणीव मला यातून झाली."
अतिशय प्रेमाने बनवलेला साधाचा खाद्यपदार्थही आपल्यासाठी किती खास ठरू शकतो, हे लिंडसेला या काळात कळलं. तिने तिच्या मैत्रिणींना व नातलगांना या खाद्यपदार्थांची रेसिपी विचारली आणि मग त्याबद्दल स्वतःच्या ब्लॉगवर लिहिलं.
'दुखावलेल्या मनासाठी उपकारक पदार्थ' या शीर्षकाची एक लेखमालाच तिने ब्लॉगवर लिहिली आहे. दुःखाने ग्रासलेल्या माणसासाठी खाणं कसं तयार करायचं, हे त्यात तिने लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या खाद्यपदार्थांची छायाचित्रं तिने #feedingabrokenheart या हॅशटॅगसह इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केल्यावर ती सर्वदूर पसरली. हे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे मी नैराश्यातून बाहेर आले, असं या पोस्टसोबत लिंडेसने लिहिलं आहे.
अमेरिकेतील मॅरीलँड विद्यापीठात न्यूरॉलॉजीच्या प्राध्यापक असणाऱ्या लीसा शलमेन म्हणतात, "आपल्या आयुष्यात काही आघातजनक घटना घडली, तर अशा स्थितीत आपण आधी निराशेत जातो. या दुःखद काळात आपण स्वतःला त्रास देऊ लागतो, त्यामुळे आपली भूक मरते."
पती बिल यांचं निधन झाल्यावर प्राध्यापक शलमेन यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्या वेळी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी या दुःखद काळाचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो हेही लिहिलं आहे.
दुःखद काळात आपल्या शरीरावर कोणते परिणाम होतात आणि त्या परिस्थितीत खाद्यपदार्थ आपली मदत कशी करतात, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.
प्राध्यापक शलमेन म्हणतात, "आपल्या अतिशय जवळची व्यक्ती गमावल्यानंतर आपल्याला जोराचा धक्का बसतो. त्या वेळी आपलं डोकं बचावात्मक पवित्र्यात जातं. ते आपल्या वेदनादायक आठवणींनी थोपवून ठेवतं आणि मग आपण भावनिक पातळीवर दुबळे होत जातो."
या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या आठवणींकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज असते, असं प्राध्यापक शलमेन म्हणतात. अशा वेळी खाण्याची भूमिका महत्त्वाची असू शकते.

फोटो स्रोत, A PINCH OF YUM
त्या म्हणतात, "दुःखातून बाहेर येण्यासाठी खाद्यपदार्थ खरोखरच लाभदायक ठरू शकतात. माझ्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर मी त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ खायला लागले, त्यातून मला बरंच बरं वाटू लागलं."
काही वर्षांपूर्वी एमीच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा तिनेही खाद्यपदार्थांच्याच माध्यमातून वडिलांशी असलेली जवळीक टिकवून ठेवली. तिचे वडील रोमन ज्यू होते आणि वास्तुरचनाकार म्हणून ते काम करत असत. शिवाय, ते खाद्यपदार्थांचा एक जोडधंदाही करत असत.
तिथला कच्चा कांदा पाहिल्यावर एमीला तिच्या वडिलांची खूप आठवण येत असे.
एमी सांगते, "ते अनेकदा कच्चा कांदा कापून खाण्यात वरून घ्यायचे."
एमीला कच्च्या कांद्याचा वास आवडत नव्हता, पण वडील गेल्यावर तिने असा कांदा खायला सुरुवात केली. "मी माझ्या वडिलांसाठी कांदा खाते," असं ती म्हणते.
एखाद्या मृत व्यक्तीशी नातं टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट खाद्यपदार्थ खाणं, ही कल्पना नवीन नाही. प्राचीन काळी रोममध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर प्रथेनुसार त्या मृतदेहाच्या तोंडात काही खाद्यपदार्थ आणि वाइन घातली जात असे.

फोटो स्रोत, KATIE HORWICH
हिंदूंमध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर बाराव्या दिवशी जेवण दिलं जातं.
बौद्धबहुल जपानमध्ये 'सुया' नावाची एक परंपरा पाळली जाते. या परंपरेनुसार, मृत व्यक्तीला मधोमधे ठेवून एक छायाचित्र घेतलं जातं. त्या वेळी समोर एक वाडगा भरून भारत आणि चॉपस्टिकची जोडी ठेवली जाते.
मॅक्सिकोमध्ये कोणी मरण पावल्यावर नऊ दिवस त्या समुदायातील लोक आंबटगोड चव असलेला मोल सॉस खातात. या प्रथेला नोवेनारियो असं म्हणतात.
टेक्सासमध्ये बेलर विद्यापीठात धर्मविषयक सहायक प्राध्यापक असणारे कॅन्डी कॅन म्हणतात की, चीनमध्ये मृतदेहाचं दर्शन घेण्यासाठी जाताना खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परंपरा असली, तरी त्यात कालानुसार काही बदल होत आहेत.
त्या म्हणतात, "पूर्वीच्या काळी मृतदेहाच्या दर्शनासाठी जाताना संत्रं, रामफळ, अननस व पोर्क घेऊन जात असत. पण आता काळ बदलला आहे, त्यामुळे लोक फ्रेंच फ्राइज, शेक आणि बिग मॅक असे अमेरिकी खाद्यपदार्थही घेऊन जातात."

फोटो स्रोत, Getty Images
"कधीकधी हे खाणं खाल्लं जातं, तर कधी स्मशानातील कर्मचारी साफसफाई करताना ते फेकून देतात."
पाश्चात्त्य जगात अशी परंपरा सर्वसाधारणतः दिसून येत नाही, पण अमेरिकेच्या दक्षिण भागात मात्र कॅसरोल राखण्याची परंपरा रुजल्याचं दिसतं.
प्राध्यापक कॅन म्हणतात, "अनेक ठिकाणी कोणी मरण पावल्यावर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कॅसरोलचा कार्यक्रम आयोजित केला जातो. थोडक्यात, मेजवानी दिली जाते. या वेळी मृत व्यक्तीशी संबंधित आठवणी सांगितल्या जातात आणि लोक एकत्र येऊन जेवतात. न्यू ऑर्लियान्स इथे अशा जेवणात जम्बालया किंवा बटाट्याचे पदार्थ असतात, तर टेक्सासमध्ये शीट केक असतो."
"कुटुंबातील सदस्याचं निधन झाल्यावरही आपण स्थानिक समुदायाशी मिळून मिसळून राहावं, असं मानलं जातं."

फोटो स्रोत, Getty Images
एखादी व्यक्ती मरण पावली, तरी ती आपल्या आठवणींमध्ये जिवंत असते आणि तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ खाल्ले तर त्या आठवणी आपल्या मनात जाग्या होतात.
प्राध्यापक कॅन म्हणतात की, बहुतांश ठिकाणी शोक व्यक्त करणं असाधारण मानलं जातं, त्यामुळे संबंधित कुटुंबातील लोकांनी त्या स्थितीतून बाहेर पडावं असा लोकांचा प्रयत्न असतो. या प्रक्रियेत मृत व्यक्तीशी संबंधित खाद्यपदार्थ तयार करण्याची संधी घेतलीच जाते असं नाही. पण वास्तविक असे खाद्यपदार्थ खाणं हा दुःखातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








