आरोग्य झोप : आपण का झोपतो आणि आपल्याला किती झोप गरजेची असते? वाचा

झोप, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

    • Author, जेसन जी गोल्डमन
    • Role, विज्ञानविषयक पत्रकार

तंत्रज्ञानामुळे आपली झोप कमी होत असल्याची भीती व्यक्त होत असली तरी आपण आधीपेक्षा जास्त वेळ झोपत असण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर झोप कशासाठी असते याबद्दल आपला गैरसमज असण्याचीदेखील शक्यता आहे.

हत्ती कधी काही विसरत नाही, असं म्हटलं जातं. स्मृती दृढ करणं हे झोपेचं एक कार्य असल्याचंही बरेचदा नमूद केलं जातं. या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील, तर हत्ती खूप झोपत असणार, असं वाटणं स्वाभाविक आहे- पण जमिनीवर वावरणाऱ्या सस्तन प्राण्यांपैकी सर्वांत मोठा मेंदू असलेला हा महाकाय स्थूलदेही प्राणी रोज रात्री केवळ दोन तास झोपतो, ही वस्तुस्थिती आहे.

आपण आयुष्यात जवळपास प्रत्येक रात्र झोपून काढतो, पण आपल्या वर्तनाबाबत सर्रास आढळणाऱ्या अनेक गैरसमजुतींपैकीच ही एक आहे. वर नमूद केलेल्या गोष्टीप्रमाणे झोपेसंबंधी सर्रास व्यक्त केले जाणारे बरेच विचार चुकीचे असल्याचं दिसतं.

उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक प्रकाशामुळे आणि स्मार्टफोनच्या पडद्यांवरून बाहेर पडणाऱ्या अंधुक चकाकीकडे झोपी जाण्यापूर्वी बराच वेळ टक लावून पाहत राहिल्यामुळे आपण आपल्या शिकारी-संकलक पूर्वजांपेक्षा कमी वेळ झोपतो, हे तुमच्या कानावर आलेलं आहे का?

"अनेक लोकांनी माध्यमांद्वारे हे इतक्या वेळा ऐकलेलं असतं की यावर त्यांचा विश्वास बसतो," असं कॅलिफोर्निया लॉस अँजेलीस विद्यापीठातील सेंटर फॉर स्लीप रिसर्चचे संचालक जेरी सिजेल म्हणतात. अशा गोष्टी पटकन पटतात, पण त्या बहुधा पूर्णतः खोट्या असतात, हे ते नमूद करतात.

"हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणताही डेटा नाही, ही अडचण आहे," असं ते म्हणतात. "झोप मोजण्यासाठी आम्ही वापरतो ती उपकरणं इलेक्ट्रिक प्रकाशाच्या शोध लागल्यावर खूप काळाने तयार झाली."

झोप, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

आपले पूर्वज किती वेळ झोपत होते, याचा अंदाज बांधणं अशक्य असल्यामुळे सिजेल यांनी त्या खालोखाल जे काही करणं शक्य आहे ते केलं.

ते टान्झानिया, नामिबिया व बोलिव्हियाला गेले, तिथल्या सद्यकालीन शिकारी-संकलक समूहांसोबत वेळ घालवला. आपले पूर्वज ज्या वातावरणात राहिले असतील, त्याच्या जवळपास जाणारं वातावरण असलेल्या परिसरात हे लोक जन्मले.

आपल्या विश्रांतीचा कथित भंग करणारी आधुनिक उपकरणं अस्तित्वातही नव्हती त्या काळात हे शिकारी-संकलक समूह जगले व झोपले. आफ्रिकेतल्या (टान्झानिया व नामिबिया इथल्या) अशा दोन गटांमध्ये काही हजार मैलांचं अंतर आहे, तर तिसरा गट (बोलिव्हियातला गट) आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्यांचा वारसदार आहे- हे लोक आशियातून मार्गक्रमणा करत, अलास्का प्रदेश ओलांडून उत्तर अमेरिकेत गेले व तिथून दक्षिण अमेरिकेत पोचले.

झोप, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

ही लक्षणीय भिन्नता असली, तरी हे तीनही समूह दररोज रात्री साधारण सारखाच वेळ झोपतात: सरासरी साडेसहा तास. सिजेल यांच्या म्हणण्यानुसार, आपले पूर्वज याहून अधिक झोपत असतील, असं मानायला कोणतंही कारण नाही.

तंत्रज्ञान व वीज यांच्या व्यामिश्र जंजाळात जगणाऱ्या आधुनिक समाजांमधील बहुतांश माणसं रोज रात्री सहा ते आठ तास झोपतात. त्यामुळे आपले पूर्वज आपल्यापेक्षा जास्त झोपत असण्याची शक्यता कमी आहे, उलट आपल्यातील काही लोकांपेक्षा ते कदाचित थोडं कमीच झोपत असतील.

शिवाय, सर्वसाधारणतः आपण आपल्या वातानुकूलित घरांमध्ये निवांतपणे, मऊ गाद्या-उश्यांवर झोपतो, पांघरूण कोण घेतोय याची चिंता आपल्याला असते आणि घरातल्या कुत्र्याला पलंगावर येऊ द्यायचं की नाही याचाही निर्णय घ्यावा लागतो. पण आपले मानवी पूर्वज दगडांवर, धुळीत किंवा बहुधा झाडांच्या फांद्यावर झोपायचे. त्यात वातानुकूलनाची सोय नव्हती की अंगाखाली अंथरूणं नव्हती.

सूर्य माथ्यावर येईपर्यंत झोपता येण्यासाठी डोळ्यांवर ओढायच्या काळ्या पट्ट्याही त्यांच्याकडे नव्हत्या, त्यांना हवामान किंवा कीटकांपासून बचाव करणंही शक्य नव्हतं. क्वचित प्रसंगी कोणी शिकारी प्राणी आला तर त्याला बळी पडण्याची किंवा झोपेत असताना वैरी गटातील कोणी हल्ला करण्याची चिंताही त्यांना सतावत असे. त्यामुळे त्यांना दर रात्री सहा तासांहून किंचितच जास्त झोप लागायची यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही.

झोप, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

पण आपल्या पूर्वजांच्या झोपेविषयी आणखी एक मिथकदेखील आहे- रात्री एकच दीर्घ झोप घेण्याऐवजी ते अनेक छोट्या डुलक्या काढायचे, असंही म्हटलं जातं. पण ही समजूतदेखील चुकीची असल्याचं सिजेल म्हणतात. आपल्या पाळीव प्राण्यांमुळे आपण ही समजूत करवून घेतली असावी, असं ते सुचवतात.

"लोकांकडे मांजरं नि कुत्रे असतात आणि ते अशा प्रकारे- छोट्या डुलक्या काढत झोपतात, त्यातच या कल्पनेचा उगम असावा," असं ते म्हणतात. "पण नरवानर गटातले प्राणी असे झोपत नाहीत."

दर रात्री दीर्घ, अखंड झोप घेणाऱ्या अनेक प्रजातींपैकी आपण अगदी अलीकडचे लोक आहोत. एप व माकडं दुपारच्या दरम्यान क्वचित प्रसंगी झोप घेत नाहीत किंवा रात्री अधूनमधू त्यांना जाग येतच नाही, असा या म्हणण्याचा अर्थ नाही. पण आपल्या प्रजातीप्रमाणे त्यांच्यात हा नियम झालेला नाही.

सिजेल यांनी केलेल्या आंतरसांस्कृतिक अभ्यासानुसार, आधुनिक काळातील शिकारी-संकलक समूह हिवाळ्यात जवळपास कधीच डुलक्या काढत नसत आणि उन्हाळ्यात थोड्या अधिक वेळा मधल्या डुलक्या काढत- बहुधा दिवसाचा उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी ते असं करत असावेत. तरीही, या समूहांमध्ये सरासरी व्यक्ती सुमारे दर पाचव्या दिवशी मधल्या वेळची डुलकी घेताना दिसते, असं ते म्हणतात.

पण या संदर्भातील मिथक टिकून राहण्याला एक किंचितसा आधार आहे. सिजेल यांनी अभ्यासलेले सर्व लोक विषुववृत्ताच्या बऱ्यापैकी जवळ राहतात. अक्षवृत्ताच्या जवळ गेलं की हिवाळ्यात रात्र 16 तासांचीही असू शकते आणि अशा प्रकारच्या वातावरणात राहिल्याने उत्तर युरोपीय पूर्वज वर्षाच्या अशा काळात दुपारी थोडा वेळ झोपत असावेत.

पण आपण नैसर्गिक ऋतुचक्रापासून आपलं झोपेचं वेळापत्रक बाजूला काढलेलं असल्युळे उत्तर युरोपातही आधुनिक काळातील बहुतांश माणसं रात्री झोपतात, कदाचित मधेच रात्री उठून बाथरूमला जाऊन तेवढं येत असतील.

झोपेसंदर्भात सर्वत्र आढळणाऱ्या दोन मिथकांची कारणमीमांसा करून झाल्यावर सिजेल यांनी झोपेच्या स्वरूपाशी निगडित अधिक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. मुळात आपण झोपतोच का?

झोप, आरोग्य

फोटो स्रोत, iStock

स्मृती दृढ करण्यासाठी किंवा मेंदूच्या इतर काही कार्यासाठी झोप घेतली जात असेल, तर तपकिरी वटवाघूळ दिवसाचे तब्बल 20 तास झोपतं आणि त्याहून बराच मोठा व बोधात्मकतेच्या दृष्टीने अधिक व्यामिश्र असलेला आफ्रिकी हत्ती मात्र जेमतेम दोन तास झोपून जगत राहतो, याची संगती कशी लावणार?

झोप ही कदाचित मूळ जैविक गरज नसेल, तर उत्पादकता वाढवण्याची उत्क्रांतीतून विकसित झालेली रीत असेल, अशी शक्यता सिजेल मांडतात. नेचर रिव्ह्यूच न्यूरोसायन्समध्ये 2009 साली त्यांनी लिहिल्यानुसार, बहुधा झोपेमुळे "वर्तनाच्या वेळेचं नियमन करून आणि कृती उपकारक नसेल तेव्हा ऊर्जेचा वापर कमी करून कार्यक्षमता वाढत असावी."

प्राणी व वनस्पती या दोन्ही सजीवांमध्ये ही रणनीती सर्रास आढळते. काही झाडं शरद ऋतूमध्ये पानं गाळतात, प्रकाशसंश्लेषण थांबवतात, हीसुद्धा वनस्पतींची झोप असण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. अस्वलं हिवाळ्यात दीर्घ काळ झोपी जातात- अन्न फारसं उपलब्ध नसताना शिकारीत व अन्न शोधण्यात वेळ वाया घालवणं त्यांना परवडत नाही, हे यामागचं एक कारण आहे.

साळींदरासारखे इतर काही सस्तन प्राणी सुस्तावस्थेत जातात, तिथे त्यांची चयापचय क्रिया अतिशय मंदावते, आणइ याद्वारे ते कठीण काळातही तग धरून राहतात. कदाचित 'अनुकूल राहण्यासाठीची निष्क्रियता' म्हणून आपण झोप घेत असू, त्यामुळे आपल्याला अतिकष्ट टाळून दिवसाउजेडी उत्पादक काम करणं शक्य होत असेल. यातून गतकाळामध्ये शिकारी प्राण्यांपासून रात्री सुरक्षित राहता येत असावं, शिवाय आवश्यक असेल तेव्हा जागंही राहणं शक्य होत असावं किंवा निराळ्या शब्दांत सांगायचं तर हा निवडक आळशीपणाचा प्रकार असेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)