झोपेत घोरण्याचा त्रास, मग जाणून घ्या हे थांबवण्याचे उपाय

फोटो स्रोत, Getty Images
या जगात नेमके किती लोक झोपल्यावर घोरतात, हे ठामपणे कोणीच सांगू शकणार नाही. पण झोपेत घोरणाऱ्यांची संख्या वाढतेय.
या घोरण्यामुळे त्या माणसाच्या झोपेत अडथळा येतोच पण शेजारी झोपलेल्याही शांत झोप लागू शकत नाही.
अनेकदा तर या घोरण्यामुळेच लग्नंही मोडलेली आहेत.
आपण का घोरतो?
आपण जेव्हा झोपेत श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपली मान आणि डोक्यामधल्या मुलायम टिश्यूंमध्ये कंपनं येतात आणि परिणामी घोरण्याचा आवाज येतो.
आपल्या नाकाद्वारे पुढे जाणाऱ्या भागात, टॉन्सिल आणि तोंडाच्या वरच्या भागात हे सॉफ्ट टिश्यू असतात.
आपण झोपतो तेव्हा हवा आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जोर लावावा लागतो. परिणामी या मऊ टिश्यूंमध्ये कंपनं निर्माण होतात.
मग हे घोरणं थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो?
श्वसन मार्ग खुला ठेवला तर घोरणं थांबवलं जाऊ शकतं. यासाठी अनेक पद्धती आहेत.
1. दारूपासून दूर रहा
दारूमुळे झोपेदरम्यान आपले स्नायू अधिक शिथील पडतात आणि यामुळे श्वसननलिका आकुंचित पावते आणि लहान होते. म्हणूनच झोपण्यापूर्वी दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो.
2. कुशीवर झोपा
तुम्ही पाठ टेकून सरळ झोपता तेव्हा तुमची जीभ, हनुवटी आणि हनुवटीखालचे स्नायू या सगळ्यांमुळे तुमच्या श्वसनमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्हाला झोपल्यावर घोरण्याची सवय असेल तर मग तुम्ही एका कुशीवर झोपा.
3. नाकाला लावायच्या पट्ट्या
घोरणं थांबवण्यासाठी मदत करणारी अनेक उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये नाकाला लावण्याच्या काही पट्ट्याही असतात. या वापरल्याने नाकपुड्या खुल्या राहतात आणि घोरणं कमी होतं, असा यामागचा विचार आहे.
पण या पट्ट्या त्याच लोकांना कामी येतील जे नाकाने घोरतात. शिवाय या पट्ट्या खरंच परिणामकारक ठरतात की नाही याबद्दल ठोस माहिती नाही.
4. तुमचं नाक स्वच्छ ठेवा
तुम्हाला सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल तर तुम्ही घोरण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी झोपण्यापूर्वी नाक साफ करावं. यासाठी नाकाद्वारे वापरण्याचं सर्दीचं औषध कामी येऊ शकतं. नाकातल्या अगदी लहान रक्तनलिकांना जर सूज आली असेल तर ती अशा औषधांमुळे कमी होईल.
अॅलर्जीमुळे अनेकदा अशी सूज येऊ शकते. नाकात फवारण्याच्या औषधामुळे चोंदलेलं नाक मोकळं होऊ शकतं.
5. वजन कमी करा
वजन जास्त असणाऱ्यांमध्ये घोरण्याचं प्रमाण अधिक असतं. अनेकदा अशा लोकांच्या हनुवटीखाली चरबी असते. यामुळे श्वसनमार्गात अडथळा येतो, हवा आत यायला - बाहेर जायला जोर लागतो आणि घोरणं वाढतं. म्हणूनच वजनावर नियंत्रण आणलं तर घोरणंही नियंत्रणात येऊ शकतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








