You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2024 च्या जानेवारीत अयोध्येत राम मंदिर तयार असेल – अमित शाह #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1) 2024 च्या जानेवारीत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार असेल – अमित शाह
“एक जानेवारी 2024 रोजी अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार असेल,” असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरातील सबरूम इथल्या सभेत केला. हा दावा करताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली आणि राहुल गांधींना उद्देशून दावा केला. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
त्रिपुरामध्ये येत्या मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह त्रिपुरा दौऱ्यावर असताना, एका सभेत ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले, “बाबर राम मंदिर उद्ध्वस्त करून गेल्यानंतर आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं राम मंदिराचा मुद्दा लटकवत ठेवला. पण मोदी आले, कोर्टाने निकाल दिला आणि मोदींनी तातडीनं भूमीपूजन केलं.”
“2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी म्हणत असत की, मंदिर वहीं बनायेंगे, लेकीन तारीख नहीं बतायेंगे. पण राहुल गांधींनी कान देऊन ऐकावं, एक जानेवारी 2024 पर्यंत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बनलेलं असेल,” असंही अमित शाह म्हणाले.
यावेळी अमित शाहांनी त्रिपुरावासियांना मोदींवर विश्वास कायम ठेवण्याचं आवाहन केलं.
2) माझा घात-अपघात होऊ शकतो – सुषमा अंधारे
“माझा घात-अपघात होऊ शकतो,” अशी भीती ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
“तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने तुमचा अपघात होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालीय,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
चंद्रपुरात व्याख्यानानिमित्त आल्या असताना अंधारेंनी ही माहिती दिली.
चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात ‘महापुरुषांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर सुषमा अंधारे यांचं व्याख्यान होते. चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
सुषमा अंधारेंच्या या वक्तव्यावर अद्याप राज्याच्या गृहमंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय.
3) पोलीस भरतीत डॉक्टरसह 40 अभियंत्यांची धाव
औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागातील 39 पोलीस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी तब्बल 5 हजार 725 उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
त्यात एक बीएचएमएस एमडी डॉक्टरसह 40 अभियंते, वकील, एमबीए आदी एक हजार 661 उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस मुख्यालयामागील मैदानावर सध्या पोलीस शिपाईपदासाठी धावण्यासह शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस शिपाईपदासाठी अर्ज करण्याची किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, या भरतीसाठी उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे.
या भरती प्रक्रियेत अन्य उच्चशिक्षितांसह एलएलबी, एलएलएमची पदवी घेतलेल्या दोन उमेदवारांनीही अर्ज केले आहेत.
पोलीस शिपाईपदासाठी 12 महिलांचीही भरती करण्यात येणार असून, त्यासाठी दीड हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत.
4) परदेशी विद्यापीठांना भारताची वाट मोकळी
विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) प्रमुख एम. जगदेश कुमार यांनी परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्यासाठीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यास सुरूवात केलीय.
या नियमांशिवाय परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मिंटनं ही बातमी दिलीय.
माध्यमांना याबाबत माहिती देताना यूजीसी प्रमुखांनी सांगितलं की, परदेशी विद्यापीठांना ऑनलाईन आणि डिस्टंट लर्निंग प्रोग्रामच्या सुविधेची परवानगी देण्यात आली नाहीय.
केवळ पूर्णवेळ प्रत्यक्ष शिक्षणच ते देऊ शकतात.
परदेशी विद्यापीठांना सध्या पुढील दहा वर्षांसाठीच परवानगी देण्यात आलीय. तसंच, या विद्यापीठांच्या निधीबाबतही स्पष्ट करण्यात आलंय की, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्यान्वयेच परदेशी निधीचे व्यवहार केले गेले पाहिजेत.
5) ‘पठाण’विरोधातील बजरंग दलाच्या आंदोलनावर पूजा भट्ट म्हणतात...
अभिनेता शाहरूख खानच्या आगामी ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन केल्यानं गुजरातमधील अहमदाबादस्थित मॉलमध्ये बजरंग दलानं आंदोलन केलं. आंदोलकांनी बरीच नासधूस केली.
या आंदोलनावर बोलताना अभिनेत्री पूजा भट्ट म्हणाल्या की, आंदोलन आणि दंगल यातील फरक लोकांना यातून कळेल. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.
बजरंग दलाच्या हिंसक आंदोलनाचा व्हीडिओ ANI वृत्तसेवा संस्थेनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केलंय. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसतायेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)