You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
योगी आदित्यनाथ म्हणाले, मुंबईची फिल्मसिटी घेऊन जाणार नाही, पण...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल 4 जानेवारीपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. विविध भेटींबरोबर ते आज मुंबईत रोड शो करणार आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्यावर राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवीकिशन तसेच उत्तर प्रदेशचे उद्योगमंत्री नंदगोपाल गुप्ता आहेत. फिल्मसिटीसाठी आदित्यनाथांनी सुरू केलेले प्रयत्न आणि मुंबई दौऱ्यामध्ये रवी किशन यांचा समावेश यामुळे याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
उत्तर प्रदेशात लखनौ येथे 10 ते 12 जानेवारी या काळात ग्लोबल इन्व्हेस्टर समिट होणार आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ दौरा करत आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली.
या भेटीत एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी त्यांच्याकडे केली, त्याला आदित्यनाथ यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.
या दौऱ्यात योगी आदित्यनाथ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लि.चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची भेट घेणार आहेत.
तसेच टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन, पार्ले अॅग्रोचे चेअरमन प्रकाश चौहान आणि एमडी शवना चौहान, अदानी पोर्ट्स लि.चे करण अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ मुकेश अंबानी आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर काल त्यांनी विविध लोकांशी संपर्क साधला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, मुंबई ही अर्थभूमी आहे आणि उत्तर प्रदेश ही धर्मभूमी आहे. या दोन्हींचा चांगला संगम होऊ शकतो. मुंबईतली फिल्मसिटी आम्ही घेऊन जाणार नसून आमची स्वतःची वेगळी फिल्मसिटी तयार करत आहोत. उत्तर प्रदेशात 1200 एकर जागेवर फिल्मसिटी तयार होत आहे.
जगभरातील सर्वोत्तम गोष्टी तिथं असतील असंही आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. या भेटीत त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली, या भेटीत त्यांनी फिल्मसिटीवर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले आता उत्तर प्रदेशात 9 विमानतळं कार्यरत आहेत. 10 विमानतळांवर काम सुरू आहेत, त्यातले पाच पूर्ण झाले आहेत. आझमगड, चित्रकूट, सोनभद्र, अलिगड, मुरादाबाद, सहारणपूर, श्रावस्ती इथं विमानतळांचं काम सुरू आहे. आशियातला सर्वात मोठा विमानतळ जेवरमध्ये होत आहे.
1 ट्रिलियन डॉलरचं लक्ष्य
महाराष्ट्राने 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य ठेवलं आहे, त्यात उत्तर प्रदेश महत्त्वाचं योगदान देईल, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर होण्यासाठी प्रयत्न करू असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
बुलडोझर विकासाचं प्रतीक
मुंबईतल्या कार्यक्रमात त्यांनी बुलडोझर बाबा प्रतिमेबद्दल आपलं मत मांडलं. बुलडोझर हा पायाभूत गोष्टी आणि विकासकामांत महत्त्वाची भूमिका बजावतो असं ते म्हणाले.
त्यामुळे तो शांतता आणि विकासाचं प्रतिक होऊ शकतो. लोकांनी कायद्यांचं उल्लंघन केलं तर कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो, असंही आदित्यनाथ यांनी सांगितलं.
योगी आदित्यनाथांच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.
‘शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा 1.54 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पासह इतर महत्वाचे प्रकल्प गुजरातला भेट देऊन महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान केले, लाखो तरुणांचे रोजगारही गेले. आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा’, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करायची काय गरज आहे? असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विचारला आहे. ते म्हणाले, "गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची काय गरज आहे? राजकारणाचे धंदे बंद करा, सन्मानाने आलात, सन्मानाने परत जा. मुंबईतला चित्रपट उद्योग इथेच राहिल. इथली फिल्मसिटी सगळ्या देशाची आहे. एखाद्या राज्याने सिनउद्योगासाठी प्रयत्न केले तर देशाला त्याची मदतच होईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)