युक्रेन-रशिया युद्ध 36 तासांसाठी थांबवण्याची पुतीन यांची घोषणा

रशियाकडून युक्रेनसोबतचं युद्ध शुक्रवार ते शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत युद्ध थांबवलं जाणार आहे. या दरम्यान ऑर्थोडॉक्स ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.

युक्रेननं मात्र रशियाच्या या शस्त्रसंधीच्या घोषणेला फेटाळलं असून, ही घोषणा म्हणजे ‘जाळ्यात अडकवण्याचा प्रकार’ असल्याचं युक्रेननं म्हटलंय.

AFP या आंतरराष्ट्रीय वृत्तसेवा संस्थेच्या माहितीनुसार, पेट्रिएक किरिल यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या निमित्तानं शस्त्रसंधीचं आवाहन केलं होतं.

76 वर्षीय पेट्रिएक किरिल हे रशियान ऑर्थोडॉक्स बिशप असून, ते पुतिन आणि त्यांनी पुकारलेल्या युद्धाचे समर्थक आहेत.

रशियन चर्चच्या वेबसाईटवरून करण्यात आलेल्या आवाहनात पेट्रिएक किरिल यांनी म्हटलंय की, “मी किरिल, मॉस्को आणि संपूर्ण रशियाचा पेट्रिएक, या युद्धात सहभागी झालेल्यांना शस्त्रसंधीचं आवाहन करतो. मी 6 जानेवारी दुपारी ते 12 वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ‘ख्रिसमस ट्रूस’ सादर करतो, जेणेकरून ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पहिल्या रात्री आणि ‘नेटिव्हिटी ऑफ ख्राईस्ट’च्या दिवशी लोक सेवेत भाग घेऊ शकतील.”

एक जानेवारीला अनेक रशियन सैनिकांचा मृत्यू

युक्रेनने एक जानेवारीच्या रात्री रशियाच्या ताब्यात असलेल्या दोनेतस्क भागातील माकिएवका शहरातल्या एका कॉलेजवर रॉकेट हल्ला केला होता. या कॉलेजच्या इमारतीत रशियन सैनिक होते.

रशियाच्या माहितीनुसार, रात्री सुमारे एक वाजता अमेरिकन बनवाटीच्या हिमार्स रॉकेट सिस्टमने कॉलेजच्या छतावर रॉकेट डागण्यात आले होते. यातील दोन रॉकेट नष्ट करण्यात आले.

रशियन सैन्याच्या माहितीनुसार, फोनचा वापर बंद करण्यास सांगण्यात आला असूनही फोन वापरला गेला होता, त्यामुळे शत्रू देशाला त्यांच्या जागेचा अंदाज लावता आला.

या हल्ल्यात नेमके किती सैनिक मारले गेले, याची नेमकी आकडेवारी पुढे आली नाहीय. कारण रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश वेगवेगळे आकडे सांगत आहेत.

रशियाच्या आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास, आतापर्यंत युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी हा सर्वात मोठा आकडे आहे, तर युक्रेनच्या आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास, या हल्ल्यात 400 रशियन सैनिक मारले गेले असून, 300 सैनिक जखमी झाले आहेत.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या हल्ल्यात रेजिमेंटचे डेप्युटी कमांडर लेफ्टनंट कर्नल बचूरिन यांचाही मृत्यू झाला. रशियातलं एक आयोग या हल्ल्याची चौकशी करत आहे.

रशियानं म्हटलंय की, युक्रेनच्या हल्ल्यात मोठ्या संख्येत मृत्यू झालेल्या सैनिकांच्या प्रकरणात हा आयोग ‘बेजबाबदार अधिकाऱ्यांना’ शोधेल आणि त्यांच्यावरील बेजबाबदारपणा निश्चित करेल.

रशियन सैन्याच्या मते, “अमेरिकेने युक्रेनला जे हिमार्स मिसाईल्स दिलेत, त्यांच्या रेंजमध्ये मोबाईलचा वापर धोकादायक ठरू शकतो. सैनिकांना याबाबतची माहिती देण्यात आली होती.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)