रशियन सैनिकांना स्पर्म गोठवायला का सांगतंय पुतिन सरकार?

रशिया-युक्रेन युद्धाला दोन महिन्यांनी एक वर्ष पूर्ण होईल. अमेरिकन सैन्याच्या एका अंदाजानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून कमीत कमी एक लाख रशियन आणि एक लाख युक्रेनी सैनिक एकतर मारले गेलेत किंवा जखमी झालेत.

या युद्धात 40 हजार सर्वसामान्य माणसं मारली गेली असल्याचाही अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांनी या युद्धामुळे बेघर झालेल्या लोकांची संख्या 78 लाख सांगितली आहे.

पण इतर देशात न जाता युक्रेनमध्येच डोक्यावरच छप्पर हरवलेल्या लोकांची गणना यात केलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा मोठा असू शकतो.

तरीही या लांबलचक युद्धाचा शेवट कधी होणार हे स्पष्ट नाहीय.

अमेरिकेने नुकतीच त्यांची अत्याधुनिक पेट्रियट क्षेपणास्त्र युक्रेनला पाठवली आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनीही युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेला भेट दिली.

या दौऱ्यात त्यांनी अमेरिकन संसदेसमोर भाषण केलं.

झेलेंस्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत शस्त्रास्त्रांची मागणी केली. जो बायडन यांनी म्हटलंय की ते यावर काम करत आहेत.

अमेरिकने आतापर्यंत युक्रेन रशियाच्या युद्धात 67 अब्ज डॉलरचा निधी युक्रेनला देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पुढच्या वर्षी याच मदत निधीचा आकडा 45 अब्ज डॉलर्स असेल असा अंदाज आहे.

दुसरीकडे रशियानेही या युद्धात मागे हटायचं नाही अशा निर्धाराने कंबर कसलेली आहे. पहिल्यांदा काही झटके लागल्यानंतर रशियाने आता जवळपास तीन लाख आरक्षित सैनिकांची मोर्चेबांधणी केली आहे आणि त्यांना युद्धभूमीवर तैनात केलं आहे.

पुतिन सरकारने हा निर्णय का घेतला?

पुतिन सरकारने रशियन सैनिकांना आपले स्पर्म गोठवण्याची सोय उपलब्ध करून द्यायच्या निर्णयानंतर रशियातून अनेक लोकांनी पलायन केल्याच्या बातम्या आल्या. तसंच रशियन पुरुष आपले स्पर्म गोठवण्यासाठी क्लिनिकमध्ये जात आहेत अशाही बातम्या आल्या.

बीबीसी प्रतिनिधी पॉल किर्बी यांच्या एका रिपोर्टनुसार, पुतिन सरकारने वैद्यकीय इन्शुरन्सच्या नियमांमध्ये बदल करून स्पर्म गोठवण्याची प्रक्रिया मोफत केली आहे.

रशियन वकील महासंघाचे प्रमुख आइगोर ट्रुनोव्ह यांनी सरकारी वृत्तसंस्था तासला सांगितलं की, आरोग्य विभागाने त्यांच्या मोफत क्रायोबणक आणि अनिवार्य वैद्यकीय इन्शुरन्समध्ये बदल करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

यामुळे युक्रेन युद्धात भाग घेणाऱ्या रशियन सैनिकांना क्रायोबँकमध्ये आपले स्पर्म गोठवण्याची सुविधा मिळेल.

ट्रुनोव्ह यांनी ट्विटरवर घोषणा केली होती की, त्यांच्या युनियनने अशा अनेक जोडप्यांच्या वतीने याचिका दाखल केली होती ज्यात पतीला विशेष सैनिक मोहिमेत सहभागी होण्याचा आदेश दिला गेला आहे.

रशियन आरोग्य मंत्रालयाने ट्रुनोव्ह यांच्या वक्तव्यावर अजून काही टिप्पणी दिली नाहीये. पण ट्रुनोव्ह यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांची युनियन आरोग्य विभागाशी बोलून यासंदर्भात काय व्यवस्था केली आहे याची माहिती घेईल.

सैनिकांची चिंता

ट्रुनोव्ह यांनी तासला सांगितलं आहे की, आरोग्य मंत्रालयाने 2022-24 या काळात सैन्याच्या विशेष मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे स्पर्म गोठवण्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळू शकेल का याची चाचपणी केली आहे.

रशियातल्या फोतंका या वेबसाईटनुसार, रशियाच्या नव्या सैन्य मोहिमांची घोषणा झाल्यानंतर देशातलं दुसरं सर्वात मोठं शहर सेंट पीट्सबर्गमध्ये आयव्हीएफ क्लीनिक्समध्ये येणाऱ्या पुरुषांची संख्या वाढली आहे.

हे पुरुष आपले स्पर्म गोठवून त्यांच्याशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करत आहेत, म्हणजे त्यांच्या पत्नी याचा वापर करू शकतील.

याच शहरातल्या मेरिंस्की हॉस्पिटलशी संबंधित असलेल्या आंद्रे इवानोव्ह यांनी म्हटलं की, सैन्यात भर्ती होणाऱ्या पुरुषांसह, जे पुरुष देश सोडून जात आहेत तेही आपले स्पर्म गोठवण्याठी मोठ्या संख्येने जात आहेत.

फोतंकानुसार, रशियन पुरुष आणि महिलांनी कधी या क्लीनिक्सचा वापर केला नव्हता. त्यांनी कधी स्पर्म गोठवण्याचा विचार केला नव्हता.

असं केल्याने जे पुरुष सैन्यात भर्ती झाल्यानंतर मारले जातील किंवा प्रजननासाठी सक्षम राहाणार नाहीत, त्यांनाही मुलं जन्माला घालण्याचा पर्याय उपबल्ध राहील. आयव्हीएफ क्लीनिक्समध्ये सुरुवातीला फार गर्दी झाली होती. आता ती गर्दी ओसरताना दिसतेय.

बीबीसी प्रतिनिधी ह्युगो बाचेगा यांनी आपल्या बातमीत म्हटलं होतं की, या युद्धाचा शेवट अजून नजरेत टप्प्यात आलेला नाही कारण ना रशिया ना युक्रेन कोणालाच यश मिळताना दिसत नाहीय.

युक्रेनच्या सैन्य गुप्तचर संस्थेचे प्रमुख किरिलो बुदानोव यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, “हे युद्ध पुढे सरकत नाहीये. ते आम्हाला प्रत्येक बाजूंनी हरवू शकत नाहीत, आणि आम्ही त्यांना हरवू शकत नाही. आम्ही नवी शस्त्रास्त्र, दारूगोळा आणि अत्याधुनिक हत्यारांच्या प्रतिक्षेत आहोत.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)