You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया आणि इराण एकमेकांचे मित्र कसे झाले?
- Author, नॉरबर्ट पॅरेडेस
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातून रशियावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र आता रशियाने यातून बाहेर पडण्यासाठी काही देशांसोबत नव्याने संबंध प्रस्थापित करण्यावर भर द्यायला सुरुवात केलीय.
कधीकाळी शत्रुत्वाचे संबंध असणाऱ्या इराणसोबत आता मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यावर रशिया भर देत आहे.
यापूर्वी रशिया आणि इराणचे संबंध तणावपूर्ण होते. यामागं बरीच कारण आहेत. जसं की, अनेक मुद्द्यांवरून या दोन्ही देशांदरम्यान ऐतिहासिक मतभेद होते.
रशियन साम्राज्य तसेच सोव्हिएत युनियन अस्तित्वात असताना इराणी लोकांवर अत्याचार झाले, दडपशाही झाली. या सगळ्या आठवणी आजही ताज्या आहेत.
सोबतच आर्थिक कारण असो वा ऊर्जा क्षेत्र हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. पण पाश्चात्यांचा विरोध करायची वेळ येते तेव्हा हे दोन्ही देश एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात.
युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाच वेळा परदेश दौरा केला आहे. हे सर्व दौरे रशियाचे शेजारी आणि सोव्हिएत संघातून फुटून बाहेर पडलेल्या देशांमध्ये आयोजित करण्यात आले होते.
इराण मात्र या सगळ्याला अपवाद आहे. पुतीन यांनी जुलैमध्ये तेहरानचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सीरियाचा उल्लेख करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
या दौऱ्यावर असताना पुतिन यांनी सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, एकता आणि प्रादेशिक अखंडता ही चार मूलभूत तत्त्व लक्षात घेऊन सीरियन संघर्षावर मुत्सद्दीपणे तोडगा काढण्याचं आवाहन केलं.
पुतीन यांनी यावेळी हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की, भले किती ही विरोध होऊ दे, रशियाकडे आजही सहकारी देश आहेत. तसेच जागतिक मंचावर रशियाच्या मताला महत्व आहे.
पण राजकीय दृष्टिकोनातून बघायचं झालं तर रशिया एकटा पडल्याचं अनेकांना वाटतं.
इराणची रशियाला लष्करी मदत
अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी सांगतात की, "हे सगळं बघता पुतीन आणि रशिया एकटे पडलेत हेच दिसून येतं. आता मदत मिळावी म्हणून ते इराणकडे वळलेत."
हल्लीच प्रकाशित झालेल्या काही रिपोर्ट्सनुसार, रशियाला इराणकडून लष्करी मदत मिळत असल्याचं दिसून आलं.
युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हवर सोमवारी हल्ले करण्यात आले होते.
यात इराण बनावटीच्या शहीद- 136 ड्रोनचा वापर करण्यात आला. शहीद- 136 ड्रोनला रशियामध्ये 'गेरॅनियम-2' म्हणतात.
हा एक प्रकारचा फ्लाइंग बॉम्ब आहे. हा बॉम्ब दोन हजार किलोमीटर इतकं अंतर सहज कापू शकतो.
पण आम्ही रशियाला हे ड्रोन पुरवले नाहीयेत असं इराणचं म्हणणं आहे. मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणने 'शहीद-136' ची पहिली खेप ऑगस्टमध्येच पाठवलीय.
अमेरिकन थिंक टँक 'इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर' च्या नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, रशियन सैनिकांना 'शहीद-136' च्या वापराबाबत ट्रेनिंग देण्यासाठी इराणी लोकांचा एक गट रशिया-व्याप्त युक्रेनियन प्रदेशात गेला असण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनमधील सद्यस्थिती
युक्रेनच्या खेरसन प्रदेशात जे हजारो रशियन लोक आहेत त्यांना बाहेर काढलं जातंय. रशिया नियुक्त स्थानिक अधिकारी व्लादिमीर साल्डो यांनी यासंबंधीची माहिती दिलीय.
ते सांगतात, 50 ते 60 हजार नागरिक नीपर नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या शहरातून बाहेर पडत आहेत.
रशियाने नियुक्त केलेले प्रादेशिक अधिकारी किरिल स्ट्रेमोसोव्ह सांगतात की, युक्रेनियन सैन्य खेरसनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आणि लोकांना तसा इशाराही देण्यात आलाय.
इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गॅंट्झ बुधवारी म्हणाले की, आम्हाला युक्रेनला कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्रे पुरवायची नाहीत. मात्र आम्ही त्यांना मिसाइल अटॅक वॉर्निंग सिस्टममध्ये सुधारणा करण्यास मदत करू शकतो.
युक्रेनच्या किव्ह आणि विनित्सा शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आलेत. यावर किव्हचे महापौर सांगतात की, शहराच्या दिशेने जे मिसाईल येत होते ते त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टमने हवेतचं उडवून टाकलेत.
मागच्या काही दिवसांपूर्वी खेरसनसह चार युक्रेनियन प्रदेशांच रशियामध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं. या भागात आता मार्शल लॉ लागू करण्याच्या आदेशावर पुतीन यांनी स्वाक्षरी केलीय.
मैत्री आणि शत्रुत्व
जगात ज्या दोन देशांवर सर्वाधिक निर्बंध लादण्यात आलेत त्यात रशिया आणि इराणचा समावेश होतो.
व्लादिमीर पुतिन आणि इब्राहिम रायसी हे दोघे या देशांच नेतृत्व करतात.
आंतरराष्ट्रीय निर्बंध लादलेल्या देशांमध्ये सीरिया, बेलारूस आणि व्हेनेझुएलाचाही समावेश होतो.
या देशांना सुद्धा पाश्चिमात्य देशांच्या विरोधाचा सामना करावा लागलाय. पण रशिया आणि इराणचा विषय आणखीनच गुंतागुंतीचा आहे. रशिया आणि इराणमधील संबंध त्याहून गुंतागुंतीचे आहेत.
जर्मन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी अफेअर्सचे हमीद रझा अझीझी सांगतात की, रशिया आणि इराण या दोन्ही देशांच्या संबंधात बऱ्याचदा चढ उतार येत असतात.
बीबीसी मुंडोशी बोलताना ते सांगतात की, "रशिया आणि इराणच्या नेतृत्वांना असं दाखवून द्यायचंय की त्यांच्यात सामरिक आणि सोबतच मित्रत्वाचे संबंधही आहेत."
"पण तेच दुसरीकडे उर्जेच्या मुद्द्यावरून रशिया आणि इराण यांचे संबंध शत्रुत्वाचे असल्याचं दिसतं."
यात सीरियाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा सीरियाची कमान बशर-अल-असद यांच्याच हातात राहिली पाहिजे यावर दोन्ही देशांच एकमत होतं. पण हितसंबंधांचा मुद्दा येतो तेव्हा मात्र हे दोन्ही देश वेगवेगळ्या दिशेला तोंड करून उभे असतात.
या दोन्ही देशांना सीरियातील काही भागांवर नियंत्रण हवंय. जेव्हा युद्ध संपेल तेव्हा सीरियाचे भवितव्य काय असेल, यावरही या दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत.
ऐतिहासिक मतभेद
रशिया आणि इराण यांच्यात नेहमीच ऐतिहासिक मतभेद राहिल्याचं हमीद रझा अझीझी सांगतात. ते पुढे सांगतात की, "इराणी लोक रशियाकडे संशयी नजरेने पाहतात. कारण इराणच्या ज्या अंतर्गत बाबी आहेत त्यात रशियाने बऱ्याचदा हस्तक्षेप केलाय, आणि याचा इतिहासही बराच मोठा आहे."
19 व्या आणि 20 व्या शतकात रशियाने बऱ्याचदा इराणवर हल्ले केलेत.
इराणचं देशांतर्गत राजकारण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले होते. आणि यात रशियाला काही अंशी यशसुद्धा मिळालं. 1979 मध्ये जेव्हा इराण मध्ये क्रांती झाली तेव्हा सोव्हिएत युनियनच्या हस्तक्षेपालासुद्धा विरोध झाला.
1943 मध्ये जोसेफ स्टॅलिन यांनी तेहरानला भेट दिली होती. रशियन नेत्याचा हा पहिलाच इराण दौरा होता. 2007 मध्ये पुतीन यांनी जेव्हा इराणला भेट दिली तेव्हापासून रशिया आणि इराणचे संबंध पुन्हा बिघडू लागले.
पण हमीद रझा अझीझी सांगतात त्याप्रमाणे, आज रशिया आणि इराण एकमेकांचे मित्र नसतील ही, मात्र या दोन्ही देशांमध्ये सामरिक संबंध वाढत आहेत.
ते म्हणतात, "सीरियाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही देश आमने सामने येत असले तरी यांच्यात लष्करी सहकार्य होताना दिसतंय. रशियन सैनिक इराणी ड्रोनचा वापर करतायत हे खूप अभूतपूर्व आहे."
युक्रेन संघर्षात इराणला ओढायचा प्रयत्न
2014 मध्ये क्रिमिया प्रांत रशियात विलीन झाला. रशियाच्या या कृतीमुळे पाश्चात्य देशांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली रशियावर निर्बंध लादले.
यावर ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील 'सेंटर फॉर अरब अँड इस्लामिक स्टडीज'चे तज्ञ आलम सालेह सांगतात की, या घटनेनंतर अमेरिकेचा प्रभाव कमी व्हावा म्हणून रशिया एका सहयोग्याच्या शोधात आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की, रशियाला इराणसोबत जवळीक साधता येईल. आणि तशा प्रकारच्या वातावरणाचीही निर्मिती झालीय.
बीबीसी मुंडोशी बोलताना ते म्हणाले की, "युक्रेन संघर्षात रशियाकडून इराणलाही ओढायचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं. यामुळे असं होईल की, पाश्चात्य देश इराणवर टीका करतील आणि इराण पाश्चात्य जगापासून अजूनच लांब सरकेल."
ते पुढे सांगतात की, "तसं बघायला गेलं तर रशियाला इराणच्या शस्त्रास्त्रांची अजिबात गरज नाहीये. पण एकटं पडण्यापेक्षा कोणाचा तरी पाठिंबा हवाय म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत."
2018 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या आण्विक कराराला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून इराणलाही रशियाच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे.
हमीद रझा अझीझी सांगतात की, "त्यावेळी इराण अडचणीत होता आणि त्यांना रशियाच्या सहकार्याची गरज होती."
आलम सालेह यांना वाटतं की, इराणला संयुक्त राष्ट्रात रशियाच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यात भरीस भर म्हणून इराणच्या सरकारला देशांतर्गत विरोध वाढलाय. त्यामुळे इराणला रशियाच्या आर्थिक आणि लष्करी पाठिंब्याची गरज आहे.
पुतीन यांनी जेव्हा इराणचा दौरा केला तेव्हा त्यांनी आर्थिक सहकार्याचं आश्वासन दिलं. तसेच इराणच्या तेल आणि वायू क्षेत्रात गुंतवणूकीचे करार सुद्धा केलेत.
एकमेकांना पूरक भूमिका नाही
आता एवढं असूनही बऱ्याच जणांना वाटतंय की, रशिया इराणला आर्थिक बाबतीत जास्त अशी काही मदत करू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, रशियन अर्थव्यवस्था यावर्षी 3.5 तर पुढच्या वर्षी 2.3 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
हमीद रझा अझीझी सांगतात की, रशिया आणि इराणमध्ये आर्थिक हितसंबंधांचा फार मोठा अँगल दिसत नाही.
आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर रशिया आणि इराण हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही देशांना हायड्रोकार्बनच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहावं लागतं."
त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहयोग होण्याची शक्यता तशी कमीच आहे.
हमीद रझा अझीझी पुढे सांगतात की, "रशियाला जी उत्पादन विकायची आहेत त्याच्यासाठी इराण ही काही मोठी बाजारपेठ नाहीये. तेच इराणच्या बाबतीतही लागू होतं. या दोन्ही देशांना आपली गरज भागविण्यासाठी एकतर चीन किंवा पाश्चात्य देशांवर अवलंबून रहावं लागतं, कारण आजवर त्यांनी हेच केलंय."
इराण आणि रशियामध्ये जे द्विपक्षीय संबंध वाढीस लागलेत त्याचं भवितव्य इराणच्या देशांतर्गत परिस्थितीवर अवलंबून असल्याचं अझीझी सांगतात. ते सांगतात की, "महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शन सुरू झाली आहेत. या परिस्थितीत जर देशाच्या राजकीय व्यवस्थेत काही बदल झाले तर मात्र रशिया सोबतचे हे मित्रत्वाचे संबंध संपुष्टात येतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)