You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलच्या मोसादनं इराण सरकारला असं पोखरलंय
नोव्हेंबर 2020. इराणचे सुप्रसिद्ध अणु वैज्ञानिक मोहसिन फखरीजादेह यांच्या गाड्यांचा ताफा आगीच्या लोळात अडकला. काहीवेळातच त्यांचा जीव गेला.
त्यांच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत रिमोट मशीनगनने गोळीबार करण्यात आला होता. एखाद्या हलत्या सावजाला अशा प्रकारे हेरण्यासाठी सर्जिकल अॅटक म्हणजे नेमका हल्ला करायला खात्रीशीर गुप्त माहिती म्हणजे रियल इंडेलिजन्स असणं गरजेचं आहे.
गर्दीच्या ठिकाणी इतर कोणाही नागरिकाला इजा होऊ न देता हल्ला करण्यासाठी तर अशाप्रकारची खात्रीलायक माहिती अतिशय गरजेची असते.
फखरीजादेह यांच्यावर अशाप्रकारचा हल्ला होणाची शक्यता असल्याचा इशारा आपण दोन महिन्यांपूर्वीच सुरक्षा यंत्रणांना दिला होता आणि ज्या जागी हल्ला होण्याचा इशारा दिला होता, तिथेच हा हल्ला झाल्याचा दावा नंतर इराणच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख मंत्री महमूद अलावी यांनी केला.
ज्या व्यक्तीने हे हत्याकांड घडवून आणलं तो इराणच्या सैन्याशी निगडीत असल्याचंही अलावी यांनी म्हटलं होतं. सोबतच हा कट प्रत्यक्ष अंमलात आणणारी व्यक्ती ही द इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ची सदस्य असल्याचंही त्यांनी म्हटलं. हे इराणमधलं सर्वात प्रतिष्ठित सैन्य दल आहे.
फखरीजादेह यांच्या ताफ्यावर हल्ला झाला याचा अर्थ असा की हल्लेखोर या IRGC मध्ये अतिशय मोठ्या पदावर असणार. म्हणूनच गुप्तचर यंत्रणांनी दिलेला इशारा बाजूला सारत त्यांना हल्ल्याची तारीख, वेळ आणि जागा ठरवता आली. मोहसिन फखरीजादेह हे देखील IRGC चे माजी सदस्य होते.
इराणचे बडे कमांडर इतर देशांसाठी हेरगिरी करतात का?तेहरानच्या इविन तुरुंगातल्या सिक्युरिटी वॉर्डमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारी IRGC च्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना, कमांडर्सना इथे ठेवण्यात आलंय.
त्यांच्यावर दुसऱ्या देशांसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. पण यामुळे IRGC ची म्हणजेच इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डची प्रतिष्ठा डागाळली जाण्याची शक्यता असल्याने या लोकांची नावं आणि पदं इराण सरकारने जाहीर केलेली नाहीत.
तर गुप्तचर यंत्रणांनी इराणच्या अनेक राजदूर आणि IRGC कमांडर्सच्या विरोधातले पुरावे गोळा केले असल्याचं IRGC कुद्स फोर्स (परदेशी ऑपरेशन युनिट)च्या माजी गुप्तहेरांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. या लोकांचे काही महिलांशी संबध असल्याचे पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.
जेव्हा मोसादने इराणची आण्विक कार्यक्रम माहिती चोरली
जानेवारी 2018 मधली एक रात्र. तेहरान पासून 20 मैलांवर असलेल्या एका औद्योगिक जिल्ह्यातल्या (Business District) एका स्टोअर फॅसिलिटीमध्ये जवळपास डझनभर लोक घुसले. तिथे एकूण 32 कपाटं होती. पण आपल्याला हवी ती मौल्यवान गोष्ट नेमकी कुठे आहे, ते या लोकांना माहिती होतं.
7 तासांपेक्षा कमी वेळात या लोकांनी 27 कपाटांची कुलुपं तोडली आणि तिथे लपवण्यात आलेलं अर्धा टन वजनाचं आण्विक साहित्य चोरलं. या लोकांनी आपल्या कोणत्याही खाणाखुणा मागे ठेवल्या नाहीत.
इराणच्या इतिहासातली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी चोरी मानली जाते. पण अधिकाऱ्यानी याबाबत मौन बाळगलं होतं. तीन महिन्यांनी या मूळ जागेपासून दोन हजार किलोमीटरवर असणाऱ्या इस्रायलची राजधानी तेल अव्हिवमध्ये चोरीला गेलेले हे सामान आढळलं.
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने ही कारवाई घडवून आणल्याचं इस्रायलचे तेव्हाचे पंतप्रधान बेंजामिन न्येतन्याहू यांनी हे चोरीला गेलेलं साहित्य दाखवत म्हटलं होतं.
इराणची कोणतीही कागदपत्रं, साहित्य चोरीला गेलं नसून हे दस्तावेज नकली असल्याचं त्यावेळी इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
पण इस्रायलने आपल्या देशाचं आण्विक साहित्य चोरल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांत ऑगस्ट 2021 मध्ये मान्य केलं.
अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना त्यांनी याविषयीचे पुरावे दिले. एप्रिल 2018 मध्ये एक खास पत्रकार परिषद घेत बेंजामिन न्येतन्याहू यांनी हे आण्विक साहित्य दाखवलं.
इराणच्या या अघोषित आण्विक कार्यक्रमामध्ये मोहसिन फखरीजादेह यांची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं. या पत्रकार परिषदेत बोलताना न्येतन्याहू म्हणाले, "मोहसिन फखरीजादेह यांचं नाव तुमच्या लक्षात आहे का?" यानंतर बरोबर दोन वर्षांनी फखरीजादेह यांची हत्या करण्यात आली.
'बोलू नका, थेट गोळी झाडा'
इराणमधल्या अनेक प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञांची गेल्या दोन दशकांत हत्या करण्यात आली आहे. इराणच्या आण्विक आणि सैनिकी इमारतींची तोडफोड होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण आतापर्यंत इराणची सुरक्षा दलं हे हल्ले आणि कट रोखण्यात यशस्वी ठरलेले नाहीत.
2013 मध्ये महमद अहमदीनेजाद इराणचे राष्ट्राध्यक्ष असताना एक अफवा पसरली. मोसादसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून IRGC कमांडर, गुप्तहेर आणि मध्यस्थी करणाऱ्या मौलानांना पकडण्यात आल्याची चर्चा होती.
पण, त्याची पुष्टी कधीही होऊ शकली नाही. आरोपींमध्ये इराणच्या गुप्तचर विभागातले इस्रायल विरोधी कारवायांची जबाबदारी असणारे अधिकारीही होते. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड कोर्टने गुप्तपणे त्यांच्यावर खटला चालवला आणि कोणतीही बातमी फुटू न देता त्यांना फाशी देण्यात आली.
मोसादने आपल्या गुप्तचर विभागाशी संबंधित मंत्रालयात घुसखोरी केल्याचं अहदमदीनेजाद यांनी मान्य केलं. इस्रायली हेरांना काबूत आणण्याची आणि इराणमधल्या त्यांच्या कारवाया रोखण्याची जबाबदारी असणारा सर्वांत मोठा अधिकारीच इस्रायली एजंट व्हावा ही साधी गोष्ट आहे का, असं त्यांनी म्हटलं होतं.
इस्रायलकडून मोसादच्या कारवायांचा उल्लेख फारसा केला जात नाही. इस्रायलच्या लष्कराचे रिटायर्ड जनरल आणि संरक्षण मंत्रायलाचे अधिकारी अमॉस गिलाड यांनी बीबीसीला यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, "मी कोणत्याही प्रसिद्धीच्या विरोधात आहे. जर तुम्हाला गोळी घालायची असेल तर घाला. त्याबद्दल बोला. कोणताही बोलबाला न करता मोठ्या कारवाया करण्यासाठी मोसादला ओळखलं जातं."
मोसादने कुठवर घुसखोरी केली आहे?
मोसादने इराणच्या संरक्षण आणि गुप्तचर संस्थांमध्ये वरपर्यंत घुसखोरी केली असून हीच चिंतेची मोठी बाब असल्याचं इराण सरकारमध्ये पूर्वी काम केलेल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
इराणच्या गुप्तचर विभागाचे माजी मंत्री आणि राष्ट्राध्यक्ष रूहानींचे प्रमुख सल्लागार अली युनुसी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, "देशात मोसादचा इतका प्रभाव आहे की इराणी नेत्यांमधल्या प्रत्येकाला कायमच आपला जीव आणि सुरक्षा यांची काळजी असते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)