You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन युद्ध : पुतिन यांना समर्थन देणारे लोकही आता त्यांची साथ सोडत आहेत, कारण...
- Author, सारा रेंसफोर्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पूर्व यूरोप
मागच्या आठवड्यात मॉस्कोच्या प्रसिद्ध रेड स्क्वेअरवर एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात बोलताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचे चार मोठे प्रदेश रशियामध्ये विलीन केल्याचं सांगितलं.
त्यावेळी बोलताना पुतिन यांनी म्हटलं, "सत्य आमच्यासोबत आहे आणि हेच सत्य आमचं सामर्थ्यसुद्धा आहे. शेवटी विजय आमचाच असेल!"
पण तसं बघायला गेलं तर परिस्थिती नेमकी याउलट असल्याचं दिसतं.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनचा भाग रशियाला जोडण्यासाठी ज्या करारांवर सह्या केल्या आहेत तो बेकायदेशीर आहे आणि रशियाच्या ताब्यात युक्रेनचा जो प्रदेश आहे त्यातही युक्रेनच्या सैन्याची आगेकूच सुरूच आहे.
हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशियाला मोठ्या सैन्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रशियन तरुणांची सैन्यात भरती सुरू आहे. मात्र सैन्यात भरती होण्याऐवजी हे तरुण देश सोडून पळून चालले आहेत. तिकडे युद्धक्षेत्रात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि यामुळे पुतिन यांना समर्थन देणारे लोकही त्यांना सोडून जाताना दिसत आहेत.
सुरुवातीला असं म्हटलं जातं होतं की, युक्रेनला नाझी विचारसरणीपासून मुक्त करण्यासाठी आणि रशियन भाषिक लोकांच्या संरक्षणासाठी हे युद्ध लढलं जात आहे. आता मात्र या युद्धाला 'पाश्चिमात्यांच्या विरुद्ध अस्तित्वाचा लढा' अशी किनार देण्यात आली आहे. आणि वास्तविक पाहता हेच खरं कारण आहे
दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात पुतिन स्वतःच पडले
रशियन न्यूज वेबसाइट रिडल रशियाचे संपादक एंटन बारबेशिन म्हणतात की, 'ते अजूनही अंधारातच आहेत. प्रत्यक्षात जे काही सुरू आहे ते पुतिन यांना दिसतं नाहीये.'
बारबेशिन सांगतात की, युक्रेनला पाश्चिमात्य देशांनी जे समर्थन दिलंय आणि युक्रेनने जो प्रतिकार केलाय ते पाहून पुतिन आश्चर्यचकित झालेत.
गेले वीस वर्ष सत्तेवर असणारे पुतिन आज सत्तर वर्षांचे आहेत. त्यांच्या हुकूमशाही स्वभावामुळे त्यांना ज्या गुप्त बातम्या मिळायला हव्यात त्या मिळत नाहीयेत. त्यामुळे स्वतःच उभ्या केलेल्या यंत्रणेचा ते स्वतःच बळी ठरतायत.
फर्म आर. पॉलिटिक या विश्लेषक संस्थेच्या प्रमुख तात्याना स्टेनोवाया या परिस्थितीबद्दल सांगतात की, "तुम्ही त्यांच्या विचारांना आव्हान देऊ शकत नाही."
त्या पुढे सांगतात, "पुतिन यांचा युक्रेनविषयीचा दृष्टिकोन काय आहे हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे. या विषयाला घेऊन त्यांच्या अपेक्षा काय आहेत ही हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते लोक त्यांना त्यांच्या दृष्टिकोनाच्या विरुद्ध असलेली माहिती द्यायला जात नाहीत. आणि अशाप्रकारे सगळं काम चालतं."
पुतिन यांच्या नजरेतून जग
रशियन सत्तेचं केंद्र असलेल्या क्रेमलिनमध्ये काही दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतिन यांनी भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी त्यांचा जागतिक व्यवस्थेबद्दलचा दृष्टिकोन मांडला होता.
जगाच्या या नव्या व्यवस्थेत रशिया एक शक्तिशाली देश म्हणून उदयाला आला आहे. पाश्चात्य जगाला त्याचा आदर करणं भाग पडलं आहे आणि आता युक्रेनही रशियाच्या अधीन झाला आहे.
ही व्यवस्था उभी करण्यासाठी युद्धभूमी म्हणून पुतिन यांनी युक्रेनचा वापर केला आहे.
भले ही पुतिन यांच्या महत्त्वाकांक्षा भ्रामक असतील, पण ते आता माघार घेण्याच्या स्थितीत दिसत नाहीत.
एंटन बारबेशिन सांगतात की, "रशियन सरकारने ज्या योजना आखल्या होत्या त्या उपयोगी असल्याचं दिसत नाहीये. आणि रशियन लोकांना युद्धात ढकलण्याखेरीज पुतिन यांच्याकडे प्लॅन बी नाहीये. आपल्याकडे सैन्याचं संख्याबळ आहे आणि त्या जोरावर आपण युक्रेनला रोखू असं त्यांना वाटतंय."
लोकांना युद्धात सामील होण्यास भाग पाडणं
लोकांना युद्धात सामील होण्यास भाग पाडणं हा ही एक मोठा बदल आहे.
व्लादिमीर पुतिन यांनी आक्रमणाला 'विशेष लष्करी ऑपरेशन' असं नाव दिलंय. त्यांना असं वाटतंय की, हे ऑपरेशन अल्पकालीन आहे आणि ते तसं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या युद्धाचा थेट परिणाम जोपर्यंत लोकांच्या आयुष्यावर होत नव्हता तोपर्यंत रशियन लोकांनी याला पाठिंबा समर्थन दिलं.
पण रशियन सरकार राखीव सैन्याची जमवाजमव करू लागल्यावर मात्र लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. जोपर्यंत हे युद्ध लांबवर होतं तोपर्यंत कोणालाही याचा फरक पडत नव्हता मात्र जेव्हा हे युद्ध आपल्या घरापर्यंत आपल्या प्रियजनांपर्यंत आलं तेव्हा मात्र या युद्धाचा अर्थ बदलला.
रशियातील स्थानिक नेतेमंडळी जुन्या सोव्हिएत नेत्यांची उदाहरण देऊन तरुणांना सैन्यात भरती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एंटन बारबेशिन सांगतात, "ही सर्वात मोठी गोष्ट आहे.रशियातील बहुतेक लोकांसाठी तर युद्धाची सुरुवात काही आठवड्यांपूर्वी झाली आहे."
"सुरुवातीला युद्धात मारले गेलेले लोक हे सीमाभागातील होते. पण आता मोठ्या सैन्यभरतीमुळे मृतदेहांची रांग मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग लागण्याची शक्यता आहे."
बिकट परिस्थिती
सैन्यात नवी भरती करण्याचा निर्णय घेतल्यापासून रशियाच्या निरनिराळ्या भागातून तरुण भरती होत आहेत. या नव्या सैनिकांच्या पत्नी, माता यांच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत.
यातल्या काही पोस्ट नव्याने भरती झालेल्या रशियन तरुणांनी पाठवल्या आहेत. यात युद्धात जी बिकट परिस्थिती उदभवली आहे ते दिसून येतंय. तसेच काही व्हिडिओंमध्ये खराब अन्न, जुनी हत्यारे, वैद्यकीय सुविधांचा अभाव असं चित्र समोर आलं आहे.
पुरुषांच्या शूजमध्ये ठेवण्यासाठी सॅनिटरी टॉवेल आणि त्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी लागणाऱ्या पट्ट्या पाठवाव्यात असा मुद्दा काही महिलांनी उचलून धरला आहे.
कर्स्क या एका रशियन शहराचे गव्हर्नर सांगतात की, सैन्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. काही ठिकाणच्या सैनिकांकडे तर घालण्यासाठी सैन्यातले कपडे सुद्धा नाहीयेत.
ही माहिती समोर आल्याबरोबर पुतिन यांनी रशियन सैन्य व्यावसायिक लष्करी दलात बदलणार असल्याचं बोलून दाखवलं. तसेच ज्या तरुणांना देशाची सेवा करायची आहे ते या दलात भरती होऊ शकतात असंही पुतिन यांनी म्हटलंय.
त्यामुळे बहुतांश सैनिकांच्या पत्नी सैन्यासोबत उभ्या असल्याचं दिसून येतंय.
एंटन बारबेशिन यांनी या आठवड्यात ट्विट करत म्हटलंय की, "बहुतांश रशियन लोकांना वाटतंय की, रशिया एक महान साम्राज्य आहे जे युक्रेनमध्ये असलेल्या नाटोचा सामना करत आहे. त्यामुळे सीमेवर रक्षणासाठी उभ्या असणाऱ्या सैनिकांसाठी मौजे, मलमपट्ट्या, टूथब्रश पाठवणं हे देशभक्तीचे लक्षण आहे."
सेन्सॉरशिप संपण्याकडे वाटचाल
पण सैन्यात नवी भरती करण्यात येणाऱ्या अडचणी आणि रशियन सैन्यावर ओढवलेली नामुष्की यामुळे रशियातील मोठ्या लोकांनीही याविरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे.
काही उदारमतवादी लोकांनी युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला तेव्हा त्यांना पकडून तुरुंगात डांबण्यात आलं. असे बरेच लोक आजही तुरुंगात आहेत.
रशियन सरकारच्या या मोहिमेला युद्ध म्हणणं आता गुन्हा आहे. क्रेमलिन समर्थकांमध्ये हा शब्द सामान्य झाला असला तरी रशियाच्या सैन्यावर टीका सुरूच आहे.
खासदार आंद्रे कारतापोलोव यांनी संरक्षण मंत्रालयाला उद्देशून म्हटलंय की, रशियाला ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतंय त्यासंबंधी खोटं बोलणं सोडून द्या. लोक हे न समजण्याएवढे मूर्ख नाहीयेत.
आरटी टीव्हीच्या संपादक मार्गरिटा सिमोनयन सांगतात की, रशियन शासक स्टॅलिनच्या काळात अशा 'भित्र्या' आणि 'अक्षम' जनरल्सना शिक्षा दिल्या जायच्या.
पण या युद्धावर जाहीरपणे प्रश्नचिन्ह अजूनतरी उपस्थित झालेलं नाही. किंबहुना व्लादिमीर पुतिन यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही.
मार्गरिटा सिमोनयन पुतिन यांना 'बॉस' असं संबोधतात. तसेच युक्रेनचा जो भाग रशियाने आपल्या ताब्यात घेतलाय तो एक ऐतिहासिक विजय असल्याचं वर्णन करतात.
तात्याना स्टेनोवाया सुद्धा असंच सांगतात की, "यावेळी या युद्धाला राजकीय विरोध झालेला नाही."
"जे लोक सैन्याच्या विस्ताराचा विरोध करतायत ते एकतर पळून जात आहेत किंवा लपून बसत आहेत. काही लोक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. पण कुठंही या युद्धाला राजकीय विरोध होताना दिसत नाही."
पण जर रशियन सैन्य युद्धाच्या आघाडीवर सातत्याने पराभवाला सामोरं जात असेल तर मात्र परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.
"त्यामुळे आपण हे युद्ध जिंकतोय हे पुतिन यांना येनकेनप्रकारेण दाखवावंच लागेल."
पाश्चात्य देशांबरोबर युद्धाचा पावित्रा
या आठवड्यात पुतिन यांनी सांगितलं की, युक्रेनचा जो भाग रशियामध्ये विलीन करण्यात आलाय त्या भागात अशांतता आहे. मात्र रशियाच्या या अपयशासाठी पाश्चात्य देशांना जबाबदार धरण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रशियन सरकारची माध्यम या युक्रेनच्या विलिनीकरणाला महान घटना म्हणून दाखवण्याचं काम करत आहेत आणि देशाला युद्धासाठी सज्ज करताना दिसत आहेत.
असेच एक मीडिया अँकर व्लादिमीर सोलोव्योव सांगतात की, "आपण सैतानांसोबत युद्ध करतोय."
ते पुढे म्हणतात, "हा युक्रेनचा मुद्दा नाहीये. पाश्चिमात्य लोकांना रशियाचं सरकार उलथवून टाकायचं आहे जेणेकरून रशियाचं अस्तित्व संपुष्टात येईल."
व्लादिमीर पुतिन यांनी हे सत्य स्वीकारलयं आणि हा क्षण रशियासाठी जोखिमपूर्ण आहे.
तात्याना स्टेनोवाया म्हणतात, "हे युद्ध म्हणजे रशिया आणि पुतिन अशा दोघांच्याही अस्तित्वाचा सवाल आहे. त्यामुळे हे युद्ध त्यांना जिंकायलाच हवं."
त्या पुढं सांगतात की, "त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की, जेव्हा अण्वस्त्र वापराचा मुद्दा पुढं येईल तेव्हा पाश्चात्य देश या युद्धातून काढता पाय घेतील."
तात्याना अशा एकट्याच नाहीयेत ज्यांना असं वाटतंय.
तर एंटन बारबेशिन सांगतात की, "पुतिन यांना वाटतंय की, ही रशियन साम्राज्याची पश्चिमी देशांसोबतची अंतिम लढाई आहे."
त्यामुळे रशिया हे युद्ध जिंकू अथवा हरू देत पण हे युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे.
आणि पुतिन यांना वाटतंय की हे सत्य पाश्चात्य जगाने स्वीकारायला हवं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)