डॉ. गिरिकुमार पाटील यांना युक्रेनमध्येच बिबट्या आणि जग्वारला सोडावं लागलं आणि...

युक्रेनचे डॉक्टर गिरीकुमार पाटील यांना आपल्या पाळीव श्वापदांना एकटं सोडलं आहे. त्यांना आता पैसे कमवण्यासाठी पोलंड गाठावं लागलं आहे.

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये आपल्या घराच्या तळघरात लपून राहाणाऱ्या गिरीकुमार पाटील या डॉक्टरांनी बिबट्या आणि जग्वार पाळले होते.

साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांनी हे प्राणी किव्ह प्राणी संग्रहालयातून आणले होते.

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर, अविवाहित डॉ. गिरीकुमार सकाळी तळघरातून बाहेर पडायचे आणि कर्फ्यू उठल्यावर आपल्या पाळीव प्राण्यांसाठी अन्न विकत घ्यायचे.

त्यांच्याकडे साधारण दोन वर्षांचा नर जग्वार आहे तर बिबट्याचं पिल्लू 13 महिन्यांचं असून मादी आहे.

त्यांनी या आधी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की त्यांच्याकडे असलेला जग्वार हा नर बिबट्या आणि मादी जग्वारचा एक दुर्मिळ प्रकारचा संकर आहे.

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा डॉ. पाटील म्हणाले होते की ते आपल्या पाळीव प्राण्यांना सोडून कुठेही जाणार नाहीत.

डॉ. गिरीकुमार पाटील हाडांचे डॉक्टर होते आणि पूर्व युक्रेनमधल्या लुहांस्क प्रदेशातल्या एक लहान शहर स्वावतोफमधल्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते.

2016 साली त्यांनी युक्रेनचं नागरिकत्व घेतलं होतं.

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडचे पैसे संपले तेव्हा त्यांनी शेजारच्या पोलंड देशात आश्रय घेतला आणि तिथे काम करू लागले जेणेकरून त्यांना पैसे मिळत राहातील आणि त्यांच्या दोन लाडक्या पाळीव प्राण्यांना खायला घालता येईल.

याआधी युक्रेनमध्ये ते ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते ते हॉस्पिटल युद्धाच्या सुरुवातीच्या काळातच बंद झालं. आतातर हे हॉस्पिटल बॉम्ब हल्ल्यात नष्ट झालं आहे.

सध्या गिरीकुमार पोलंडची राजधानी वॉर्सामधल्या एका वसतीगृहात अन्य युक्रेनी निर्वासितांसह राहात आहेत.

इथे काम करून ते पैसे कमवायचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना आता आपल्या प्राण्यांची काळजी भंडावून सोडते आहे.

ते म्हणतात की दोन आठवड्यांपूर्वी स्वावतोफमध्ये इंटरनेट बंद झालं आणि त्यामुळे त्यांना आता आपल्या जनावरांची ख्याली खुशाली जाणून घ्यायची असेल तर रोज एका स्थानिक शेतकऱ्याला फोन करावा लागतो.

हाच शेतकरी त्यांच्या प्राण्यांची देखभाल करतो आहे.

वॉर्साहून फोनवर बोलताना पाटील यांनी बीबीसीला सांगितलं, "त्यांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यानी मला सांगितलं की माझे प्राणी माझी आठवण काढतात. त्यांना मी नाहीये हे कळलंय. गेल्या एक आठवड्यापासून ते नीट खातपित नाहीयेत. मला त्यांना तिथून काढायचं आहे, माझ्या प्राण्यांचा जीव वाचवायचा आहे, पण मला कळत नाहीये की मी हे कसं करू."

डॉ. गिरीकुमार पाटील म्हणतात की परिस्थिती फारच बिघडली होती, त्यांनी नेसत्या कपड्यांनिशी हातात फक्त एक बॅग आणि खिशात 100 डॉलर्स घेऊन घर सोडलं.

या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही हजार रूबल्स होते.

पाटील यांचे साठवलेले पैसे, बचत सगळी संपली आहे. त्यांनी आपल्या जमिनीचा काही भागही विकला. याशिवाय त्यांनी आपले दोन फ्लॅट, दोन कार, मोटारसायकल आणि कॅमेरा सगळं विकलं आहे. यासगळ्यातून त्यांना फक्त 1 लाख डॉलर्सच मिळाले.

ते म्हणतात युद्ध सुरू झाल्यापासून ते रोज आपल्या प्राण्यांच्या जेवणावर 300 डॉलर्स खर्च करतात. त्यांना दरदिवशी पाच किलो मांस खायला घालावं लागतं.

आपली परिस्थिती कथन करताना ते म्हणतात, "जशी जशी परिस्थिती बिघडली, युद्ध आमच्या घराकडे सरकलं तसे माझ्याकडचे पैसेही संपले. मी प्राण्यांना एका केअरटेकरकडे सोडून युक्रेनच्या बाहेर जाऊन नोकरी करायचं ठरवलं. पैसे कमवायचा एवढा एकच मार्ग होता माझ्याकडे."

जवळपास तीन महिन्यांचं मांस फ्रीजमध्ये ठेवून तसंच केअरटेकरला तीन महिन्यांचा 2400 डॉलर्स इतका पगार देऊन त्यांनी घर सोडलं आहे, अशी माहिती ते देतात.

रशियन सैनिकांनी केली चौकशी

गिरीकुमार पाटील सांगतात की त्यांनी एका मिनीबसमधून युद्धग्रस्त भागात प्रवास केला. ते तब्बल 12 तास प्रवास करत होते, पण सीमेजवळ पोहचताच त्यांना रशियन सैनिकांनी उतरवून घेतलं.

तीन दिवस त्यांना तळघरात ठेवलं होतं आणि त्यांची चौकशी होत होती.

ते सांगतात, "डोळ्यावर पट्टी बांधून मला बसमधून उतरवून घेतलं. मग एका तळघरातल्या चौकशी कक्षात घेऊन गेले. त्यांनी मला खायला सूप आणि ब्रेड दिला आणि मग माझी चौकशी केली. त्यांनी किव्हमध्ये बनलेली माझी ओळखपत्रं पाहिली त्यामुळे त्यांना संशय आला की युक्रेनच्या सैन्याचा हेर आहे."

गिरीकुमार यांनी रशियन सैनिकांना सांगितलं की त्यांनी युद्धात कोणाची बाजू घेतली नाही. त्यांनी आपलं युट्यूब चॅनलही दाखवलं ज्यावर ते प्राण्यांचे व्हीडिओ टाकतात. यावर त्यांना जवळपास 60 हजार फॉलोअर्स आहेत.

ते म्हणतात, "मला पकडलं त्याच्या तिसऱ्या दिवशी एक रशियन अधिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला की त्याच्या बायकोने माझे प्राण्यांवरचे व्हीडिओ पाहिलेले आहेत. त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की तो एक पशुप्रेमी आहे आणि हेर नाहीये."

पाटील म्हणतात, त्यादिवशी मला शांत झोप लागली.

पण रशियन सैनिकांनी पाटील यांचा पासपोर्ट जप्त केला आणि त्यांना एक ओळखपत्र दिलं. मग सैनिकांनी त्यांना पोलंडच्या सीमेवर सोडून दिलं. तिथे बायोमेट्रिक तपासणीत त्यांची ओळख पटली. त्यांनी आपली आपबिती सांगितली आणि त्यांना सीमा ओलांडून पोलंडमध्ये प्रवेश करू दिला.

कुटुंबाने केली मदत

पोलंडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पेपर व्हीजा दिला आहे ज्याअंतर्गत ते 90 दिवस पोलंडमध्ये राहू शकतात.

ते युक्रेनमध्ये राहात होते त्या शहराची अवस्था आजही वाईटच आहे. पाटील म्हणतात त्यांना कल्पना नाही की ते कधी आपल्या पाळीव प्राण्यांकडे परत जाऊ शकतील.

गिरीकुमार पाटील यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला होता. त्यांचं कुटुंब तिथेच आहे. ते आता गिरीकुमारांना आर्थिक मदत पाठवत आहेत.

पाटील म्हणतात, "मी अनेकदा किव्हमधल्या भारतीय दुतावासाला फोन केला. त्यांना विनंती केली की माझ्या प्राण्यांना तिथून काढून भारतात घेऊन जा. पण मला सांगितलं गेलं की दूतावास जंगली प्राण्यांची प्रकरणं हाताळत नाही."

पाटील यांनी याच आठवड्यात वॉर्सामधल्या एका प्राणीसंग्रहालयाचा दौरा केला आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी आपले प्राणी ठेवून घेण्याची विनंती केली.

"मला काहीही करून माझे पाळीव प्राणी परत आणायचे आहेत. जर भारत सरकारने त्यांना तिथून काढलं आणि भारतातल्या कोणत्याही प्राणी संग्रहालयात ठेवलं किंवा जंगलात सोडलं तरी मला त्यात आनंद आहे. मला फक्त त्यांचा जीव वाचवायचा आहे."

हेही वाचलंत का?