युक्रेनमधील मराठी विद्यार्थी म्हणतो, 'सैन्याने लाथांनी मारलं, मुलींचे केस ओढले'

"आम्ही युक्रेन-पोलंड सीमेजवळ पोहोचलो होतो पण आम्हाला युक्रेन गार्ड्सने सीमा ओलांडू दिली नाही. याउलट युक्रेन गार्ड्सने आम्हाला मारहाण केली, धक्काबुक्की केली, हवेत गोळीबार केला, गाडी आमच्यावर क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. मी हे सुद्धा पाहिलं की, एक भारतीय विद्यार्थिनी खाली पडली तेव्हा तिचे केच पकडून तिला मागे खेचलं," युक्रेनमध्ये सध्या अडकलेला भारतीय विद्यार्थी जयेश सरमळकरने बीबीसी मराठीशी बोलताना त्याचा हा भयावह अनुभव सांगितला.

जयेश सरमळकर मुंबईतील घाटकोपर येथे राहणारा असून गेल्या तीन वर्षांपासून तो युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. लिव्हिव्ह वैद्यकीय विद्यापीठात तो MBBS तिसऱ्या वर्षाला शिकत आहे.

आम्ही महाराष्ट्रातील 13 विद्यार्थी एकत्र पोलंड सीमेकडे जाण्यासाठी निघालो होतो आणि जाताना मार्गावर आम्हाला शेकडो भारतीय विद्यार्थी भेटले, असंही त्याने सांगितलं.

'आम्हाला युक्रेन सीमेवर मारहाण केली'

बीबीसी मराठीशी बोलताना जयेश सरमळकरने त्यांचा युक्रेन-पोलंड सीमेपर्यंत पोहचण्याचा आणि प्रत्यक्ष सीमेवरील अनुभव सांगितला. याची माहिती देणारा व्हीडिओ सुद्धा त्याने रेकॉर्ड केला आहे.

या व्हीडिओमध्ये जयेश सरमळकर सांगतात, "आम्ही शुक्रवारी (25 फेब्रुवारी) लिव्हिव्ह वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमधून पोलंड सीमेवर जाण्यासाठी निघालो. आमचे हॉस्टेल ते युक्रेन-पोलंड सीमा हे अंतर साधारण 72 किमी आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि पायी चालत असलेल्या भारतीयांची गर्दीही आम्ही पाहिली. 30 किमी चालत आम्ही एका चेकपॉईंटला पोहचलो. तिथे आम्हाला अडवण्यात आलं आणि आम्ही रात्रभर तिथेच थांबलो."

"शनिवारी (26 फेब्रुवारी) आम्ही पुन्हा पोलंड सीमेच्या दिशेने निघालो. युक्रेन सीमा ओलांडल्यानंतर पोलंडमधून भारतीयांसाठी परतण्याची व्यवस्था केली आहे अशी माहिती आम्हाला देण्यात आली म्हणून आम्ही लवकरात लवकर तिथे पोहचण्यासाठी उत्सुक होतो. पण तिथे गेल्यावर वेगळाच अनुभव आला,"

"सीमेवर पोहोचलो तरी युक्रेन गार्ड्सने आम्हाला सीमा ओलांडू दिली नाही. आमच्यासोबत शेकडो भारतीय युक्रेन-पोलंडच्या सीमेवर पोहोचले होते. पण युक्रनेच्या बाजूने पुढे जाऊ दिलं जात नव्हतं. खूप थंडी होती आणि आमच्यापैकी अनेक मुलांना तापही आला."

"आम्ही रात्रभर सीमेजवळ वाट पाहिली. युक्रेन गार्ड्स सीमा ओलांडू देतील असं वाटत होतं, पण नंतर त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. आम्हाला लाथांनी मारलं, हवेत गोळीबार केला, मुलींना ढकललं, हे पाहून आम्ही पुन्हा हॉस्टेलचा रस्ता धरायचं ठरवलं,"

"आमच्याकडील खाद्यपदार्थही संपत आले होते. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला पुन्हा युक्रेनमध्ये परतावं लागलं,"

'आम्हाला तात्काळ मदतीची गरज'

जयेश सरमळकर यांनी युक्रेन-पोलंड सीमेवर पोहचल्यानंतर त्याठिकाणाहून दोन व्हीडिओ रेकॉर्ड केले. या व्हीडिओमध्ये तो सांगतो, "युक्रेन सीमेपासून पोलंडच्या सीमेचे अंतर पाच किलोमिटर आहे. इथे एका चेकपॉईंटजवळ आम्ही पोहोचलो आहोत. पण आम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाहीय. आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं की पोलंड सीमेवर भारतीय अधिकारी थांबले आहेत, पण युक्रेन सीमा ओलांडू दिली जात नसल्याने आम्ही भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही."

या व्हीडिओतील दृश्यांमध्ये मोठ्यासंख्येने भारतीय विद्यार्थी आणि कुटुंब आपल्या सामानासह उभे असलेले दिसतात. थंडीमुळे अनेकांनी जॅकेट्स आणि शाल अंगावर ओढल्याचंही दृश्यांमध्ये दिसतं. जयेशने सांगितलं की याठिकाणी रात्रभर आम्ही उभे होतो.

"भारतीय दूतावासाने तातडीने यावर काही तोडगा काढावा. आम्हाला मदत करावी. आम्ही लिव्हिव्ह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये परतलो आहोत. अनेक मुलं थंडीमुळे आजारी आहेत. सगळे घाबरलेले असून पुढे काय करायचं ते आम्हाला कळत नाहीय," असं सांगत जयेश सरमळकरने भारत सरकारला मदतीचं आवाहन केलं आहे.

खारकीव्हमधील भारतीय विद्यार्थी बंकरमध्ये

रशियाच्या सीमेपासून जवळ असलेल्या खारकीव्ह वैद्यकीय विद्यापीठातही मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही बंकरमध्येच आहोत. इथून बाहेर कसं पडायचं याची काहीच कल्पना आम्हाला नाही."

खारकीव्हमध्ये अजूनही तणावाचं वातावरण आहे. किव्ह तसंच पश्चिमेकडील सीमा या विद्यार्थ्यांसाठी लांब आहेत त्यामुळे विद्यार्थी सलग तिसऱ्या दिवशीही बंकरमध्ये राहत आहेत.

रशियासोबत चर्चेसाठी युक्रेनचं शिष्टमंडळ बेलारुसच्या सीमेवर पोहोचलं

रशियासोबत चर्चेसाठी युक्रेनचं शिष्टमंडळ बेलारुसच्या सीमेवर पोहोचलं आहे. या चर्चेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शस्त्रसंधी लागू करणं आणि युक्रेनमधील रशियन सैनिकांना बाहेर काढणं, हे दोन मुद्दे प्रामुख्यानं युक्रेनच्या अजेंड्यावर आहेत.

याआधी सुरक्षेच्या मुद्द्यावरून रशियासोबत चर्चा करण्यास युक्रेन धजावत नव्हता. मात्र, आता बेलारुसच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)