रशिया-युक्रेन वाद : 5 दिवसांच्या युद्धात घडल्या या 10 घडामोडी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 5 दिवसांपूर्वी, म्हणजे 24 फेब्रुवारीच्या सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर गेल्या पाच दिवसात बऱ्याच मोठ्या घडामोडी युक्रेनच्या भूमीवर घडत आहेत.

बीबीसीचे अनेक पत्रकार यूक्रेनच्या भूमीवरून वाचक आणि प्रेक्षकांसाठी या घडामोडींचं वार्तांकन करत आहेत. लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतही आहोत.

अत्यंत संवेदनशील वळणावर रशिया-युक्रेनचा संघर्ष पोहोचला आहे. याचे कारण, रविवारी (27 फेब्रुवारी) रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या आण्विक दलाला 'स्पेशल अलर्ट'वर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर जगभरात एकप्रकारची भीती निर्माण झाली.

त्यानंतर सोमवारी रशिया-युक्रेनची शिष्टमंडळं चर्चेसाठी बेलारुसमध्ये दाखल झाली आहेत. या चर्चेतून काय समोर येतं, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

तर आजपर्यंत म्हणजे, गेल्या पाच दिवसात काय काय घडलं, हे 10 मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया.

1) जेव्हा युक्रेनवर आक्रमणाची पुतिन यांनी घोषणा केली...

24 फेब्रुवारीच्या सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली. त्यांनी टीव्हीवर एका भाषणात ही घोषणा केली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पुतीन यांना रोखण्यासाठी विनंती केली जात असतानाच, त्यांनी मात्र अशा प्रकारे लष्करी कारवाई सुरू करत असल्याचं जाहीर केलं.

सत्य आणि न्याय हे रशियाच्या बाजूनं आहे. रशियाला घेरण्याचा प्रयत्न कोणीही करत असेल, तर रशिया तत्काळ प्रतिक्रिया देईल, असंही पुतीन म्हणाले होते. ही कारवाई स्वसंरक्षणासाठी असल्याचंही पुतीनं म्हणाले होते.

युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामधील हा संघर्ष अपरिहार्य असून हा केवळ वेळेचा मुद्दा आहे, असंही पुतीन म्हणाले.

पुतिन यांच्या घोषणेच्या काही मिनिटांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला होता की, कोणत्याही प्रकारची कारवाई ही मोठ्या प्रमाणावर मानवी विनाशाला कारणीभूत ठरू शकते.

2) चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ताबा

रशियाच्या आक्रमणानंतर सर्वात धक्कादायक घडामोड घडली, ती चेर्नेबिल अणुभट्टीवर रशियानं ताबा मिळवल्याची. 25 फेब्रुवारीला रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला.

1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या परिसरातील संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय आण्विक घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे.

3) नाटोचे सैन्य सज्ज, मात्र युक्रेनमध्ये जाणार नाही

अमेरिका आणि ब्रिटननं रशियावर कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केलीच आहे. त्याचबरोबर रशियाला मदत करणाऱ्या बेलारूसवरही निर्बंध लावले आहेत.

युरोपीयन संघाच्या अधिकाऱ्यांनी रशियन मालमत्ता गोठवणार असल्याचं सांगितलं आहे. युरोपातील आर्थिक बाजारांमध्ये त्यांच्यावर निर्बंध घालणार असल्याचंही ते म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याची विनंती त्यांनी केली.

रशियाच्या-युक्रेनच्या या संकटाच्या पार्शवभूमीवर नाटोच्या हजारो सैनिकांना नाटोचे सदस्य असलेल्या लात्विया, इस्टोनिया, लिथुआनिया, पोलंड आणि रोमानिया या देशात तैनात करण्यात आलं आहे.

युरोपीयन संघाचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी नेटोनं पूर्व किनाऱ्यावर 100 लढाऊ विमानं सज्ज ठेवल्याचं सांगितलं आहे. मात्र, युक्रेनमध्ये सैन्य तुकड्या पाठवण्याचा विचार नसल्याचंही ते म्हणाले.

अमेरिकेचं लष्कर युक्रेनमध्ये लढणार नाही. मात्र, नाटोच्या सदस्य देशांचं संरक्षण करत राहील, असं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलं.

4) तेलाच्या किंमती वाढल्या

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईचा थेट परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला.

वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलवर गेल्या. गेल्या सात वर्षांत पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत.

5) रशियावर निर्बंधाचा परिणाम

युरोपियन युनियनने रशियावर निर्बंध लादणं सुरूच ठेवलं आहे. आर्थिक निर्बंधांनंतर युरोपियन युनियनने रशियाच्या विमानांना त्यांची हवाई हद्द नाकारली आहे. तसंच रशियाच्या प्रसारमाध्यमांवरसुद्धा बंदी आणण्याच आली आहे.

तसंच पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा परिणाम रशियात दिसू लागलाय. रशियाच्या सेंट्रल बँकेनं व्याजदरात मोठी वाढ केलीय.

रशियाच्या सेंट्रल बँकेनं व्याज दर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवलंय.

6) पुतिन यांनी आण्विक दलाला दिला 'स्पेशल अलर्ट'

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन लष्कराला आदेश दिलाय की, "आण्विक दलाला 'स्पेशल अलर्ट'वर ठेवावं."

अमेरिकेनं पुतिन यांच्या या आदेशावर म्हटलंय की, "हे अस्वीकारार्ह पाऊल आहे."

याआधी पुतिन यांनी संरक्षणमंत्री सेर्गेई आणि लष्करातील दुसरे सर्वोच्च अधिकाऱ्यांशी बोलताना म्हटलं होतं की, पाश्चिमात्य देशांनी 'मैत्रीपूर्ण व्यवहार केला नाही' आणि त्यांच्यावर'चुकीचे निर्बंध लावले गेले'.

आण्विक दलाला पुतिन यांनी दिलेल्या आदेशावर नेटो संघटना आणि या संघटनेतील सदस्य देशांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

7) युक्रेनच्या खनिज तेल, नैसर्गिक वायूसाठ्यांवर रशियाचे हल्ले

रशियाने युक्रेनच्या खनिज तेल आणि गॅस संसाधनांवर 27 फेब्रुवारीला आक्रमण केलं.

युक्रेनची राजधानी कीव्ह पासून 30 किलोमीटरवर असलेल्या वासिलकीव ऑईल टर्मिनलला रशियाच्या क्षेपणास्त्राने लक्ष्य केलं. हल्ल्यानंतर समोर आलेल्या व्हीडिओ फुटेजनुसार ऑईल टर्मिनलला लागलेली आग दिसत होती.

या हल्ल्यानंतर लागलेल्या आगीमुळे सगळीकडे धुराचे लोट उठल्याचं दिसले. राजधानी कीव्ह शहरात नागरिकांना विषारी हवेपासून वाचण्यासाठी घरातच राहण्याचं आणि दारंखिडक्या बंद करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

युक्रेनमधील दुसरं सगळ्यात मोठं शहर खारकीव्हमध्ये नैसर्गिक वायूची ने-आण करणाऱ्या पाईपलाईनवर रशियाने हल्ला चढवला. हे शहर रशियाच्या सीमेपासून अगदी जवळच आहे.

या पाईपलाईनवर हल्ल्या केल्यानंतर रशियातून युरोपला जाणारा नैसर्गिक वायू पोहोचू शकेल का याविषयी साशंकता आहे.

8) रशियासंदर्भात भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती एकत्र

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त परिषदेत रशियाने नकाराधिकार वापरत आपल्याविरोधातील प्रस्ताव पारित होण्यापासून रोखला होता.

या प्रस्तावात युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाचा निषेध नोंदवण्यात आला होता. रशियाने कोणत्याही अटीशर्तींविना युक्रेनमधून लष्कराला परत बोलवावं असं आवाहन यामध्ये करण्यात आलं.

सोमवारी संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा न्यूयॉर्कमध्ये होत आहे.

रविवारी युक्रेनवरील हल्ल्याबाबत मतदानावेळी भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. भारत आणि संयुक्त अरब अमिराती हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे हंगामी सदस्य आहेत.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी भारताने घेतलेली भूमिका योग्यच असल्याचं सांगत युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती अतिशय दु:खद असल्याचं म्हटलं आहे.

9) युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले

युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय नागरिक आहेत. परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल (24 फेब्रुवारी) दिली.

युक्रेनमध्ये घडामोडी वेगाने घडत आहेत. या परिस्थितीशी निपटण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. तिथं राहत असलेल्या भारतीयांची नोंद घेण्याचं काम सध्या सुरू आहे. हे काम एका महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आलं होतं.

ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय राहत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांत 4 हजार भारतीयांना युक्रेन सोडलं आहे.

युक्रेनमधून भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन काही फ्लाईट्स भारतात दाखलही झाल्या आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 219 जणांना घेऊन भारताचं पहिलं विमान मुंबईत दाखल झालं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचं विमानतळावर जाऊन स्वागत केलं होतं. त्यानंतर आणखीही काही विमानं भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन भारतात दाखल झालं.

10) भारतातील चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी देशात जाणार

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आखण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा मोहिमेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार आहेत.

आतापर्यंत रोमानिया आणि पोलंड इथून भारतीय विद्यार्थी मायदेशी रवाना झाले आहेत.

हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरण रिजीजू आणि जनरल व्ही.के.सिंग हे केंद्रीय मंत्री ऑपरेशन गंगा मोहिमेत समन्वय असावा यासाठी रवाना होत आहेत.

ज्योतिरादित्य सिंदिया रोमानिया-मोल्दोव्हाला, किरण रीजीजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला तर व्ही.के.सिंग पोलंडला जाणार आहेत.

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)