रशिया-युक्रेन संघर्ष: व्लादिमीर पुतिन 'न्युक्लिअर बटन' दाबतील का?

    • Author, स्टीव्ह रोजनबर्ग
    • Role, बीबीसी न्यूज, मॉस्को

एक गोष्ट मला मान्य करायलाच हवी...अनेकदा मी विचार केला की पुतिन ही गोष्ट कधीच करणार नाहीत. मात्र, पुतिन यांनी नेमक्या त्याच गोष्टी केल्या.

"ते कधीही क्रायमियाचा ताबा घेणार नाहीत," त्यांनी घेतला.

"ते दॉनबसमध्ये युद्ध सुरू करणार नाहीत," त्यांनी केलं.

"युक्रेनवर ते कधीही पूर्ण क्षमतेनं हल्ला करणार नाहीत." त्यांनी तेही केलं.

शेवटी मी या निष्कर्षापर्यंत आलो की, 'एखादी गोष्ट कधीच करणार नाही' हे व्लादिमीर पुतिन यांना लागू होत नाही. आणि त्यामुळेच आता अजून एक अस्वस्थ करणारा प्रश्न सतावतोय- "ते पहिल्यांदा कधीच आण्विक हल्ल्यासाठी बटन दाबणार नाहीत. नाही ना?"

हा कोणताही सैद्धांतिक प्रश्न नाहीये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन लष्कराला आदेश दिलाय की, "आण्विक दलाला 'स्पेशल अलर्ट'वर ठेवावं." नेटोच्या नेत्यांनी युक्रेन मुद्द्यावर 'आक्रमक वक्तव्यं' केल्याप्रकरणी पुतिन यांनी नाराजी व्यक्त केली.

पुतिन काय म्हणत आहेत, हे बारकाईनं ऐका. गुरुवारी (24 फेब्रुवारी) जेव्हा पुतिन यांनी टीव्हीवरून संबोधित करताना 'विशेष लष्करी मोहिमे'बद्दल (वास्तवात युक्रेनवर पूर्ण क्षमतेनं केलेलं आक्रमण) सांगितलं, तेव्हा त्यांनी एक गोठवणारी धमकीही दिली-

"जे कोणी बाहेरून या विषयात हस्तक्षेप करण्याचा विचार करत आहेत त्यांना इतिहासात कधीही भोगले नसतील अशा परिणामांना तोंड द्यावं लागेल."

"पुतिन यांची भाषा आण्विक युद्धाचा थेट इशारा आहे असं वाटतंय," शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी आणि नोवाया गॅझेट वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दिमित्री मुरातोव्ह यांना वाटतं.

"टीव्हीवरच्या भाषणादरम्यान पुतिन यांची भाषा, वर्तन क्रेमलिनच्या प्रमुखांसारखं नव्हतं तर जगावरच सत्ता असल्यासारखं होतं. एखाद्या महागड्या गाडीचा मालक ज्याप्रमाणे किल्ली बोटात गरागरा फिरवत तिचं प्रदर्शन करतो, त्याचप्रमाणे पुतिन हे अण्वस्त्रांबाबत करत आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेकदा म्हटलं आहे की, जर रशियाच नसेल, तर हे जग तरी काय कामाचं? पण त्यावेळी कोणी त्यांच्या विधानांकडे लक्ष दिलं नाही. पण ही सरळसरळ धमकी होती- रशियाला त्यांना हवी तशी वागणूक दिली नाही, तर सर्वांनाच परिणाम भोगावे लागतील," दिमित्री सांगतात.

2005 साली पुतिन यांचा क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचं निरीक्षण करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. आता जर युक्रेन संघर्षाची परिणती आपल्या मनाप्रमाणे होत नाहीये, हे लक्षात आलं तर पुतिन उतावीळपणे पुढचं पाऊल उचलू शकतात.

2018 साली प्रदर्शित झालेल्या एका माहितीपटात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं होतं, "जर कोणी रशियाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हालाही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. ही गोष्ट मानवतेला आणि जगासाठीही विनाशकारक असेल, हे निश्चित. पण मी रशियाचा नागरिक आणि देशाचा प्रमुख आहे. रशिया नसेल तर जगाचीही गरज काय?"

आता आपण 2022 मध्ये येऊया. पुतिन यांनी युक्रेनविरोधात पूर्ण क्षमतेनं युद्ध पुकारलं आहे, पण युक्रेनच्या लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. क्रेमलिनला धक्का देणारी अजून एक गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशही रशियावर आर्थिक आणि वित्तीय निर्बंध लादण्यासाठी एकत्र आले. पुतिन यांच्या अधिपत्याखालील व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची वेळ आली.

"पुतिन हे सध्या अडचणीच्या परिस्थितीत आहेत," मॉस्कोमधील संरक्षणतज्ज्ञ पावेल फेलनॉर सांगतात.

"जर पाश्चिमात्य देशांनी रशियन सेंट्रल बँकेची मालमत्ता गोठवली आणि रशियाची आर्थिक व्यवस्था कोसळली तर पुतिन यांच्याकडे आता फारसे पर्याय उपलब्ध नसतील. सगळी व्यवस्थाच कोलमडू शकते.

पुतिन यांच्याकडे युरोपचा नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबवणं हा एक पर्याय आहे, जेणेकरून युरोपियन देश काहीसे नरमतील. दुसरा पर्याय म्हणजे ब्रिटन आणि डेन्मार्कच्या दरम्यान नॉर्थ सी मध्ये आण्विक शस्त्रांचा वापर करायचा आणि काय परिणाम होतील याचा अंदाज घ्यायचा."

जर व्लादिमिर पुतिन यांनी अण्वस्त्र वापरण्याचा पर्याय निवडला तर त्यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील कोणी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल का? किंवा त्यांना थांबवतील का?

"रशियातील राजकीय वर्तुळातील लोक हे कधीही नागरिकांच्या बाजूने नसतात. ते नेहमीच सत्ताधीशांच्याच बाजूने असतात," दिमित्री मुरातोव्ह सांगतात.

आणि व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात सत्ताधीश हा सर्वशक्तिमान आहे. इथे सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा फारशा प्रभावी नाहीयेत. क्रेमलिनकडेच सर्व सत्ता आहेत.

"पुतिन यांच्यासमोर उभं राहायला कोणी तयार नाही," पावेल फेलनॉर सांगतात. "सध्याच्या घडीला आपण अतिशय धोकादायक परिस्थितीत आहोत."

युक्रेनमधलं युद्ध हे व्लादिमीर पुतिन यांचं युद्ध आहे. जर त्यांना त्यांची लष्करी उद्दिष्टं साध्य करण्यात यश आलं, तर सार्वभौम देश म्हणून युक्रेनचं भवितव्य हे धोक्यात आहे. पण जर पुतिन यांना अपयश येतंय असं चित्र निर्माण झालं आणि रशियाची मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली तर ते अजूनच आक्रमक होतील. त्यावेळी 'अमुक गोष्ट पुतिन कधीही करणार नाहीत' असं खात्रीने सांगताच येणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)