श्रीलंकन नागरिक सांगतात, ‘रशियन सैन्याने आमच्या पायाची नखं उपटली’

इजियम शहरावर युक्रेनने ताबा मिळवल्यावर रशियन सैन्याने अत्याचार केल्याचे आरोप समोर येत आहेत. तिथे शहरात राहणाऱ्या श्रीलंकेच्या लोकांवर रशियन सैन्याने अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.

रशियन सैनिकांनी श्रीलंकन नागरिकांना एक महिना कैद करून ठेवलं होतं.

या कैद्यांपैकी एक असलेल्या दिलुजान पताथिनाजकन म्हणतात, "असं वाटत होतं की आम्ही इथून जिवंत बाहेर पडणार नाही."

दिलुजान त्या सात लोकांपैकी एक आहे ज्यांना रशियन सैनिकांनी मे महिन्यात कैद केलं होतं. रशियन सैन्याच्या हल्ल्यात जिवाला धोका उत्पन्न झालेला पाहून हा गट कुपियांस्कमध्ये त्यांच्या घरापेक्षा जास्त सुरक्षित असलेल्या खारकीव्हच्या दिशेने निघाला होता. कुपियांस्क ते खारकीव्हमध्ये 120 किमीचं अंतर आहे.

मात्र पहिल्याच चेक पोस्टवर श्रीलंकेच्या लोकांना रशियन सैन्याने पकडलं. त्या सैनिकांनी यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यांचे दोन्ही हात मागे बांधले. त्यांना रशियाच्या सीमेवरील वोवचांस्क येथील एका फॅक्टरीत नेलं.

श्रीलंकेच्या लोकांचा हा गट युक्रेनमध्ये शिकायला आला होता. मात्र आता ते कैदी होते. ते रशियाच्या ताब्यातील अगदी नाममात्र जेवणावर जिवंत होते. या कैद्यांना दोन दिवसात एक दोन मिनिटं फक्त प्रसाधनगृहात जाण्याची परवानगी होती.

तिशीतल्या या पुरुषांना एका खोलीत बंद केलं होतं. तर 50 वर्षांची महिला मेरी उथाजकुमार यांना त्यांच्यापासून वेगळं ठेवलं होतं.

त्या सांगतात, "त्यांना एका खोलीत बंद ठेवलं होतं. आम्ही जेव्हा अंघोळीला जायचो तेव्हा रशियन सैनिक आम्हाला मारहाण करायचे. त्यांना मला दुसऱ्या कैद्यांशी भेटू दिलं नाही. आम्ही तीन महिन्यापर्यंत आत फसलो होतो."

मेरीचा चेहरा श्रीलंकेमध्ये झालेल्या एका स्फोटात विद्रुप झाला आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना कोणतंही औषध दिलं गेलं नाही. खोलीत एकटं राहिल्याने त्यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला आहे.

ते सांगतात, "मला कैद केल्यामुळे मी तणावात यायची. रशियन सैनिकांनी मला सांगितलं की माझं मानसिक आरोग्य चांगलं नाही. मला औषध दिलं जायचं पण मी घेतलं नाही."

पायाची नखं उपटली

या केदैते क्रौर्याची परिसीमा गाठली गेली. कैदेतील एका व्यक्तीनं बूट काढून त्याच्या पायाचा अंगठा दाखवला. अंगठ्याची नखं उपटली होती. आणखी एका व्यक्तीला असंच छळण्यात आलं होतं.

ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना कारण नसताना मारहाण करण्यात आली. रशियन सैनिकांनी मद्यधुंद अवस्थेत मारहाण केली.

35 वर्षीय थिनेश गगनथिन सांगतात की, "एका सैनिकानं माझ्या पोटावर बुक्का मारला. यानंतर दोन दिवस मी तडफडत राहिलो. त्यानंतर त्याने माझ्याकडे पैसे मागितले."

25 वर्षीय दिलुकशान रॉबर्टक्लाइव्ह यांनी सांगितलं की, "आम्हाला खूप राग येतोय. आम्ही रोज रडत होतो. आम्हाला केवळ एका गोष्टीनं जिवंत ठेवलं, ती म्हणजे आमची प्रार्थना. दुसरी गोष्ट आमच्या कुटुंबाच्या आठवणी."

रशियाने युक्रेनवर हल्ल्यादरम्यान नागरिकांना निशाणा बनवल्याचं नाकारलं आहे. मात्र, श्रीलंकन नागरिकांवरील अत्याचाराची घटना अशावेळी समोर आली, ज्यावेळी रशियन सैनिकांवर असे आरोप लागत आहेत.

'मृतदेहांवर छळ केल्याच्या खुणा'

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्कींनी म्हटलं की, "खारकीव्हमध्ये स्वतंत्र केले गेलेल्या भागात आणि इतर काही शहरात दहाहून अधिक टॉर्चर चेंबर सापडले आहेत."

रशियन सैनिकांच्या कैदेतून या श्रीलंकन नागरिकांना जेव्हा सोडवलं गेलं, तोव्हा युक्रेनी सैनिकांनी या महिन्यात वोवचांस्कसह काही भागांवर पुन्हा कब्जा मिळवला.

सुटका कशी झाली?

रशियन सैनिकांच्या कैदेतून सुटल्यानंतर काहीजणांना लोकांनी ओळखलं आणि पोलिसांना फोन केले.

40 वर्षीय अंकरनाथन गणेशमूर्ती फोन स्क्रीनवर पत्नी आणि मुलीचा फोटो पाहून रडू लागले. फोन येत होते आणि त्यांचं रडणं अधिक वाढत होतं. पोलिसांनी अनेकांना मिठी मारली.

त्यानंतर या नागरिकांना खारकीव्हला नेण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आले, नवे कपडे देण्यात आले. त्यांना पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं, जिथं स्विमिंग पूल आणि जिम आहे.

आता चेहऱ्यावर हास्य असलेले दिलुकशान म्हणतात की, आता मला बरं वाटतंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)