बेनझीर भुट्टो पंतप्रधान असताना त्यांच्या भावाला गोळी घातली गेली, पण हत्येसाठी कोणीच दोषी ठरलं नाही

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जगात जेव्हा घराणेशाहीची चर्चा होते, तेव्हा सर्वांत आधी केनेडी घराण्याचं नाव घेतलं जातं... त्यानंतर भारतात नेहरू-गांधी घराणं आणि पाकिस्तानच्या भुट्टो परिवाराचं नाव घेतलं जातं.

या तिन्ही कुटुंबामध्ये एक गोष्ट समान आहे... ती दुःखद आहे... या कुटुंबातल्या सदस्यांचा झालेला हिंसक शेवट.

जॉन एफ केनेडी, रॉबर्ट केनेडी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, झुल्फिकार अली भुट्टो, बेनझीर आणि त्यांचे दोन भाऊ- शाहनवाझ भुट्टो तसंच मुर्तझा भुट्टो. या सगळ्यांना नैसर्गिक मृत्यू आला नाही. त्यांना अतिशय दुर्दैवी मृत्यू आला.

मुर्तझा भुट्टोंची गोष्ट सुरू होते 4 एप्रिल 1979 पासून. पाकिस्तानचे लष्करी हुकूमशाह जनरल झिया उल हक यांनी झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर लटकवलं. झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानातले निवडून आलेले पहिले शासक होते.

लंडनमध्ये निर्वासित जीवन

भुट्टो यांची मुलगी बेनझीर यांनी पाकिस्तानातच थांबून झिया यांच्याविरोधात संघर्ष करण्याचा निर्णय घेतला.

मात्र , त्यांच्या दोन्ही मुलांनी- शहनवाझ आणि मुर्तझा यांनी पाकिस्तानबाहेर जाऊन आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले.

पण झिया यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. भुट्टो यांना जेव्हा फाशी दिली गेली, तेव्हा मुर्तझा आणि शाहनवाझ भुट्टो हे लंडनमध्ये एका फ्लॅटमध्ये राहात होते.

आपल्या वडिलांच्या फाशीची बातमी मिळाल्यानंतर ते जगभरातील माध्यमांसमोर आले आणि त्यांनी म्हटलं, "त्यांना दोन वर्षं प्रचंड यातना दिल्या गेल्या. त्यांची राजकीय कारकीर्द नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले आणि आता तर त्यांना मारलंच गेलं. आम्हाला कोणत्याही गोष्टीची लाज बाळगण्याचं कारण नाहीये. त्यांनी आज एका शहीदाला दफन केलं आहे.

इंदिरा गांधींशी भेट

भुट्टो यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी शस्त्र हातात घेतली आणि अल-झुल्फिकारची स्थापना केली.

पहिल्यांदा दोघं अफगाणिस्तान आणि सीरियामध्ये सोबत राहिले, मात्र नंतर शाहनवाझ फ्रान्समध्ये आपल्या बायकोसोबत राहायला लागले.

याच दरम्यान दोघं भाऊ गुपचूप भारतात आले आणि त्यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली.

प्रसिद्ध पत्रकार श्याम भाटिया यांनी आपल्या गुडबाय शहजादी या पुस्तकात लिहिलं आहे, "विरोधी पक्षात असताना इंदिरा गांधींनी आपल्या दिल्लीमधील निवासस्थानी दोन वेळा मुर्तझा आणि शाहनवाझ भुट्टो यांची भेट घेतली. भारतीय सूत्रांच्या मते, भुट्टो भावांनी आर्थिक मदतीची मागणी केली आणि इंदिरा गांधींमुळे त्यांना ती मिळाली."

शाहनवाझ यांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू

1985 साली शाहनवाझ भुट्टो यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला.

मुर्तझा भुट्टो यांची मुलगी फातिमा भुट्टो यांनी आपल्या 'साँग्स ऑफ ब्लड अँड स्वोर्ड' या पुस्तकात लिहिलं आहे, "जेव्हा माझे वडील खोलीत आले तेव्हा शहनवाझ हे सोफा आणि कॉफी टेबलच्या मध्ये पडले होते. त्यांच्याकडे पाहिल्याबरोबरच ते आता जिवंत नाहीत हे कळत असल्याचं मुर्तझा यांच्या लक्षाच आलं."

"जेव्हा मुर्तझा यांनी त्यांच्या शरीरावर नीळे व्रण पाहिले, तेव्हा त्यांना जाणवलं की शाहनवाझ यांच्यासोबत काहीतरी अनैसर्गिक घडलं आहे. त्यांना विष दिलं गेल्याचा संशय मुर्तझा यांना आला. मुर्तझा यांनी त्यानंतर सगळं घर धुंडाळलं. त्यांना स्वयंपाकघरातल्या कचराकुंडीत एक बाटली मिळाली. त्यावर लिहिलं होतं- पेंट्रेक्साइड."

"नंतर पोलिसांनीही शाहनवाझ यांच्या शरीरात विषाचा अंश मिळाल्याचं म्हटलं. हे विष रक्तातून नाही, तर नाकपुड्यांमधून त्यांच्या शरीरात पोहोचलं होतं. पण त्यांना विष दिलं कसं गेलं हे मात्र कोणालाही सांगता आलं नाही."

शाहनवाझ यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी बहीण बेनझीर भुट्टो यांनी म्हटलं, "त्यांचा मृत्यू कौटुंबिक भांडणामुळे झाला असेल यावर माझा विश्वास नाहीये. ते एक राजकीय कार्यकर्ते होते आणि मार्शल लॉचे विरोधकही होते. ज्यापद्धतीचं आयुष्य ते जगत होते, ते खूप धोकादायक होतं. माझ्या मते त्यांचा मृत्यू हा एका व्यापक राजकीय कटाचा भाग म्हणून पाहायला हवा."

बेनझीर यांना राजकीय वारसा आणि मुर्तझा यांची नाराजी

जनरल झिया उल हक यांच्या मृत्यूनंतर जेव्हा बेनझीर भुट्टो पंतप्रधान बनल्या तेव्हा मुर्तझा हे सीरियामध्ये होते. पाकिस्तानमध्ये त्यांच्याविरोधात विमान अपहरणाचा खटला सुरू आहे, त्यामुळे त्यांचं तिथे येणं योग्य ठरणार नाही, असं मुर्तझा यांना सांगण्यात आलं.

मात्र मुर्तझा या सगळ्या घटनाक्रमामुळे खूश नव्हते.

त्यांचे जुने मित्र श्याम भाटिया यांनी आपल्या 'गुडबाय शहजादी' या पुस्तकामध्ये लिहिलं, "मुर्तझा आणि माझा परिचय ऑक्सफर्डच्या दिवसांपासून होता. जेव्हा आम्ही भारत आणि पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमासंबंधी संशोधन करत होतो, तेव्हा आमचे सुपरवायझर एक होते."

"1989 साली जेव्हा ते मला दमिश्कमधल्या शेरेटन हॉटेलमध्ये भेटले आणि आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत गप्पा मारत एकमेकांसोबत अकरा तास घालवले होते. मुर्तझा यांनी मला सांगितलं होतं की, त्यांच्या वडिलांनी बेनझीरला नाही, तर त्यांना आपला राजकीय वारसदार म्हणून निवडलं होतं. 1977 साली भुट्टो यांनीच त्यांना लारकाना मतदार संघाकडे लक्ष देण्यासाठी निवडलं होतं."

"मुर्तझा यांच्या दाव्याला भुट्टो यांचे निकटवर्तीय युसूफ बुच यांनी आपले पत्रकार मित्र खालिद हसन यांनीही दुजोरा दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की, भुट्टो आपल्या मुलीला राजकारण्याच्या काटेरी मार्गावर आणू इच्छित नव्हते. त्यांना शक्य असतं तर त्यांनी बेनझीर यांना पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकारी म्हणून नियुक्त केलं असतं."

नुसरत भुट्टो यांचं मुर्तझा यांना समर्थन

बेनझीर यांची आई नुसरत भुट्टो यांनीही आपल्या मुलाची, मुर्तझा यांचीच बाजू घेतली. मुर्तझा यांना परत आणण्यासाठी त्यांनी मोहीमच चालवली.

मुर्तझा परतही आले आणि आल्याबरोबर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, "मला माझ्या देशापासून खूप काळापर्यंत दूर ठेवलं गेलं. मला दोन गोष्टी सांगितल्या गेल्या- एक म्हणजे इथं माझ्या जीवाला धोका आहे आणि दुसरं म्हणजे मी परत आलो तर माझ्या बहिणीची राजकीय कोंडी होईल."

"सांगण्याचा अर्थ हा आहे की, मला भीती दाखवण्याचा तसंच माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. भीतीला मी थारा दिला नाही, कारण मी निर्दोष असल्याचं मला माहीत होतं. मला थोडं अपराधी वाटलं हे खरं आहे. कारण ती पहिल्यांदा पंतप्रधान बनली आहे. मी परत आलो तर तिचं सरकार अस्थिर होऊन पडेल आणि त्यासाठी मला जबाबदार ठरवलं जाईल, ही गोष्ट मला सहन होणारी नव्हती."

"पण एक वेळ अशी आली की, माझ्यासाठी अधिक काळ देशाबाहेर राहणं शक्य नव्हतं. मी परत यायला हवं हे माझी आई सुरुवातीपासूनच सांगत होती."

नुसरत यांचा राग

मुर्तझा परत आल्यानंतर लगेचच लारकाना शहरात पोलिसांनी त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला.

या गोष्टीमुळे त्यांची आई नुसरत भुट्टो यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी आपली मुलगी बेनझीरलाच यासाठी जबाबदार धरलं. त्या बेनझीर यांना 'मिसेस झरदारी' म्हणून संबोधू लागल्या.

नुसरत यांनी म्हटलं, "नवाझ शरीफ यांचं सरकार हे पोलिस सरकार असल्याची टीका बेनझीर करायची. मग आता हे सरकार काय वेगळं आहे? जे नवाझ शरीफ आणि झिया उल हक यांच्यासारखे हुकूमशाह करायचे, बेनझीरही तेच करत आहे."

मुर्तझा आणि त्यांच्या बहिणीमधली कटुता वाढत होती. मुर्तझा यांची भाषा दिवसेंदिवस अधिक कडवट होत होती आणि त्यांच्या निशाण्यावर बेनझीर यांचं सरकार होतं.

मुर्तझा यांनी म्हटलं, "तुम्ही आता विचार करा. आपल्या कर्मांचा हिशोब करा. माझ्या समर्थकांना हात लावू नका, त्यांना त्रास देऊ नका. एका गालावर थप्पड मारली, तर मी दुसरा गाल पुढे करणारा ख्रिश्चन नाहीये. कोणी आम्हाला मारलं, तर आम्ही त्यांचे हातपाय तोडू."

गोळ्यांचा आवाज

20 सप्टेंबर 1996 ला त्यांनी अजून एक पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांवर अत्याचाराचा आरोप केला.

मुर्तझा यांनी म्हटलं, "पोलिस अधिकारी सरकारी वर्दी घालण्याच्या लायकीचे नाहीयेत. ते स्वतःच अपराधी आहेत. त्यांनी कराचीमध्ये नरसंहार केलाय. त्यांच्या पापांचा घडा आता भरत आलाय. त्यांनी मला अटक करावी, असं आव्हान मी त्यांना देतो. त्यांच्यात याचे राजकीय परिणाम झेलण्याची ताकद असेल तर त्यांनी हे करूनच दाखवावं."

त्यादिवशी रात्री आठ वाजता मुर्तझा भुट्टो एक रॅली करून आणि आपली पत्रकार परिषद संपवून घरी परतत होते.

त्यांची मुलगी फातिमा भुट्टो यांनी आपल्या 'साँग्ज ऑफ ब्लड अँड स्वोर्ड'मध्ये लिहितात, "माझी आई स्वयंपाक करत होती. मी माझ्या छोट्या भावाबरोबर बेडरुममध्ये टीव्ही पाहात होते. तेव्हा माझी मैत्रीण नूर्या हिचा फोन मला आला. आम्ही दोघी बोलत होतो, तेव्हाच मला गोळी चालवल्याचा आवाज ऐकू आला."

"त्यानंतर गोळ्यांचा वर्षावच सुरू झाला. मी नूर्याला थोड्यावेळात फोन करते असं सांगितलं. झुल्फीला उचलून मी बाहेर पळाले. आई पण पळत बाहेर आली. आम्ही आमच्या चौकीदाराला काय घडलं हे पाहायला पाठवलं. त्यानं सांगितलं की, बाहेर पोलिस आहेत. पोलिसांनी आम्हाला घरातून बाहेर पडू दिलं नाही. बाहेर दरोडा पडल्याचं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत त्यानं आम्हाला घरी थांबायलाच सांगितलं."

बेनझीर भुट्टोंना फोन

वेळ जात होता तशी फातिमा आणि त्यांच्या आईची बैचेनी वाढत होती. जेव्हा हा सगळा ताण असह्य झाला तेव्हा फातिमा यांनी आपल्या आईला म्हटलं की, मी इस्लामाबादला आत्याला फोन करते.

नंतर त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं, "आमच्या घराच्या आजूबाजूला खूप पोलिस होते. जेव्हा खूप वेळ माझे वडील परत आले नाहीत, तेव्हा मी माझ्या आत्याला फोन करण्याचा निर्णय घेतला. खूप वेळ गेल्यानंतर बेनझीर यांचे पती आसिफ अली झरदारी फोनवर आले."

"मी माझ्या आत्यासोबत बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. हे खूप महत्त्वाचं आहे, असं सांगितल्यावरही त्यांनी तिला फोन दिला नाही. मी खूप हट्ट केल्यावर त्यांनी अत्यंत थंडपणानं म्हटलं की, तुझ्या वडीलांना गोळी लागलीये हे तुला माहीत नाही का?"

फातिमा आणि त्यांची आई गिनवा कारमध्ये बसून मिडईस्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

फातिमा भुट्टो यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं, " मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा सगळ्यांत आधी मला वडिलांचे पाय दिसले. मी खाली पडेन असं मला वाटलं. आई धावतच वडिलांकडे गेले. ते बेशुद्धच होते. माझ्या आईनं त्यांना हलवून म्हटलं, "जागो मीर जागो!"

"मी वडिलांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. माझ्या बोटांना रक्त लागलं. त्यांचं चेहरा गरम होता. मी इतकी घाबरले की, मला श्वासही घेता येत नव्हता. नंतर डॉक्टर गफ्फार यांनी मला सांगितलं की, माझे पप्पा श्वास घ्यायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना श्वास घेता येत नव्हता."

"त्यांच्या गळ्यात इतकं रक्त भरलं होतं की, त्यांच्या फुफ्फुसापर्यंत हवा जावी म्हणून ट्यूबही टाकता येत नव्हती. नंतर मग त्यांच्या गळ्यापाशी ट्यूब घालता यावी म्हणून एक छिद्र केलं गेलं, जेणेकरून त्यांना श्वास तरी घेता येईल. हे सगळं सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला."

हॉस्पिटलमध्येच मृत्यू

डॉक्टर मुर्तझा यांना वाचवू शकले नाहीत.

फातिमा यांनी त्यांच्या शेवटच्या घटकांचं वर्णन "साँग ऑफ ब्ल़ड अँड स्वोर्ड'मध्ये केलं आहे, "पप्पा, खोलीच्या मधोमध झोपले होते. एका पातळ पांढऱ्या चादरीनं त्यांचा गळ्यापर्यंतचा भाग झाकलेला होता. त्यांचे डोळे मिटलेले होते. चेहऱ्यावर आणि केसांवर रक्त सुकलं होतं."

"त्यांचे केस नेहमी विंचरलेले असायचे. सकाळी झोपेतून उठल्यानंतरचा थोडाफार वेळच ते विस्कटलेले असायचे. मी त्यांच्या मृतदेहाशेजारी गुडघ्यांवर बसले आणि त्यांच्या चेहऱ्याचं, गालाचं आणि ओठांचं चुंबन घेतलं. मी जाणूनबुजून त्यांच्या पापण्याचं चुंबन घेतलं नाही. कारण लेबनॉनमध्ये अशी अंधश्रद्धा आहे की, जर तुम्ही कोणच्या पापण्यांवर ओठ टेकले तर ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते. मला माझ्या पप्पांपासून दूर जायचं नव्हतं."

बेनझीर भुट्टो अनवाणीच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या

आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर बेनझीर भुट्टो तातडीने कराचीला पोहोचल्या आणि तशाच अनवाणी आपल्या मृत भावाला पाहण्यासाठी मिड ईस्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.

त्यानंतर लारकानामध्ये त्यांनी अतिशय भावनिक भाषण देताना म्हटलं, "1977 मध्ये जेव्हा मार्शल लॉ लागू झाला आणि लष्कर सत्तेत आलं तेव्हा मुर्तझा तरूण होता. त्याला आपला देश सोडून जावं लागलं होतं आणि लष्करामुळेच तो आपल्या मायदेशी परतू शकला नाही. त्याला आपल्या वडिलांचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही.

तो आपल्या धाकट्या भावाला, शाहनवाजला दफन करण्यासाठीही येऊ शकला नाही आणि तो स्वतःही आता या जगात राहिला नाही. मीर मुर्तझा या जगात नाहीये, मात्र तो आपल्या मनात जिवंत राहील. कारण शहीद कधीच मरत नाहीत."

पोलिसांवर मारण्याचा आरोप

मुर्तझा यांना कराचीला बोलावून मारण्याची योजना पोलिसांनी आखल्याचा आरोप मुर्तझा समर्थकांनी केला.

पोलिसांनी आधी रस्त्यावरचे दिवे विझवले आणि त्यानंतर मुर्तझा यांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला. पोलिसांनी मात्र या आरोपाचं खंडन केलं.

वरिष्ठ पोलिस अधिकारी शोएब सडल यांनी म्हटलं, "पोलिसांनी भुट्टो यांच्यासोबत येत असलेल्या बंदूकधाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा त्यांना थांबायला सांगितलं, तेव्हा त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांना स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर द्यावं लागलं."

अनेक प्रश्न अनुत्तरित

मुर्तझा यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यांची उत्तरं अजूनपर्यंत मिळाली नाही.

5 डिसेंबर 2013 ला या हत्याकांडाशी संबंधित अनेक व्यक्तिंना सोडण्यात आलं. मात्र, मुर्तझा यांची मुलगी फातिमा यामागे सत्ताधाऱ्यांशी संबंधित काही लोकांना दोषी मानतात.

त्यांचं म्हणणं आहे, "झुल्फिकार अली भुट्टो यांची हत्या 1979 साली झाली, पण त्यांना कधी न्याय मिळाला नाही. शाहनवाझ 1985 साली मारले गेले, पण कोणालाच त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं गेलं नाही."

"माझे वडील मुर्तझा यांची हत्या 1996 साली झाली, पण 2009 मध्ये पाकिस्तानातल्या एका न्यायालयाने म्हटलं की, त्यांना कोणीही मारलं नाही. 2007 साली बेनझीर रावळपिंडीतल्या एका रॅलीत मारल्या गेल्या. पण त्यावरही पोलिसांनी कोणता रिपोर्ट दिला नाहीये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)