पाकिस्तानातील 'या' रस्त्यावर अलेक्झांडरचे 15 हजार सैनिक मरण पावले होते

    • Author, सायमन उर्विन
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

जगज्जेता मानल्या जाणाऱ्या अलेक्झांडरचं सैन्य एके काळी ज्या मार्गाने भारतातून परत गेलं होतं, त्याच ठिकाणी आज मकरान समुद्रतटीय महामार्ग आहे आणि दक्षिण आशियातील सर्वांत सुंदर रस्त्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

मध्य कराचीपासून पश्चिमेला तीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर बलुचिस्तान प्रांताच्या हद्दीपाशी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाचे सैनिक आमच्या समोर आले. हातात एके-47 बंदुका घेऊन ते माझ्या कारजवळ आले आणि त्यांनी माझं पासपोर्ट आणि ना-हरकत प्रमाणपत्र तपासलं.

हे प्रमाणपत्र परवान्यासारखं असतं; ते सोबत असेल तर परदेशी व्यक्ती पाकिस्तानातील संवेदनशील भागांमध्ये प्रवास करू शकते.

सैनिकांनी तपासणी केल्यानंतर मी माझ्या गाइडसोबत आणि दहशतवादविरोधी पथकातील जवानांसोबत मकरानच्या दिशेने रवाना झालो. तिथून इराणच्या सीमेपर्यंत मला रस्त्याने प्रवास करायचा होता.

माझा गाइड आमिर अक्रम म्हणाला, "कित्येक दशकांपासून मकरान, किंबहुना सगळा बलुचिस्तान प्रांत पाश्चात्त्य लोकांपासूनच नव्हे तर या प्रांताबाहेरच्या पाकिस्तानी लोकांपासूनसुद्धा तुटल्यासारखा झाला आहे."

कराचीच्या उपनगरीय भागांमधून बाहेर पडल्यावर आजूबाजूला अधिकाधिक झाडी दिसू लागली, तेव्हा अकरम म्हणाला, "इथलं फुटीरतावादी आंदोलन आणि इस्लामी अतिरेक्यांच्या कारवाया, यामुळे आधी मी इथे यायचं धाडसच करायचो नाही. पण अलीकडे बलुचिस्तान सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे, म्हणून आपण सुरक्षित आहोत. पण इथे सुरक्षेच्या नियमांनुसार वावरणं बंधनकारक आहे. मकरानचा समुद्रकिनारा बघण्याचा हा एकच पर्याय आहे. पाकिस्तानातील सर्वांत सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या सर्वांत संपन्न प्रदेशाची वैशिष्ट्यं इथे तुम्हाला बघायला मिळतील."

दक्षिण आशियातील सर्वांत रोमांचकारी प्रवास

पण या भागात प्रवास करणं अजूनही खूप कटकटीचं असतं, हेसुद्धा अक्रमने स्पष्ट केलं.

आम्ही 'राष्ट्रीय महामार्ग 10'च्या दिशेने जात होतो. याचंच नामकरण 'मकरान समुद्रतटीय महामार्ग' असं झालेलं आहे.

बलुचिस्तानच्या दक्षिण भागात असणारा हा महामार्ग सुमारे 584 किलोमीटर लांब आहे आणि इराणच्या सीमेवर जाऊन तो थांबतो.

या महामार्गावरून होणारा प्रवास दक्षिण आशियातील सर्वांत नाट्यमय प्रवास मनाता येईल. या रस्त्याचा बहुतांश भाग अरबी महासागराच्या किनारपट्टीजवळून जातो.

या रस्त्यावरून समुद्राचं निळंशार नि चमकतं पाणी दिसतं, आणि त्यावर ईल, सार्डिन व झिंगा असे लहानमोठे मासे पकडायला आलेल्या असंख्य नौका दिसतात.

अक्रमने म्हणाला, "पूर्वीपासूनच मासेमारी हा मकरानमधील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार राहिलेला आहे. खरं तर मकरान हे नावसुद्धा 'मासे खाणारे' या अर्थाच्या फार्सी शब्दाचा अपभ्रंश होऊन आलेलं आहे. आजही इथे मासेमारीला तितकंच महत्त्व आहे, पण स्थानिक लोकांनी आता समुद्री जहाजांशी संबंधित जोडधंदे आणि तस्करी अशा गोष्टीही सुरू केल्या आहेत."

कराचीपासून सुमारे 200 किलोमीटर दूर आल्यानंतर आम्ही या महामार्गावरील आमच्या मुख्य थांब्यापाशी पोचलो. हिंगोल नॅशनल पार्क, या पाकिस्तानातील सर्वांत मोठ्या अभयारण्याचा थोडा भाग या ठिकाणी आलेला आहे. समुद्राचे वेगवान वारे आणि दमट हवामान इथे अनुभवायला मिळतं. काही वेळा या भागाला समुद्री वादळांचाही फटकाही बसतो.

अभयारण्याचा परीघ ओलांडून आत गेल्यावर चढ-उतार असणाऱ्या रस्त्यावरून आम्ही एका अडनिड्या ठिकाणी पोचलो. इथे एकाच ठिकाणी दोन ज्वालामुखी आहेत, आणि त्यातून लाव्हारसाऐवजी चिखल बाहेर पडतो. भूगर्भवैज्ञानिकांच्या दृष्टीने हा एक अतिशय दुर्मिळ प्रकारचा ज्वालामुखी आहे.

हिंदू धर्माचं पवित्रस्थळ

दर वर्षी हिंदू यात्रेकरूंचं एक पथक या ज्वालामुखीच्या शिखरापर्यंत चढत जातं. हिंदूंसाठी हे एक पवित्र स्थळ आहे.

अक्रम म्हणाला, "माता हिंगलाज यात्रेसाठी बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांमधून हजारो लोक येतात. ते इथे मेणबत्त्या लावतात आणि नारळ खड्ड्यात फेकतात, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल बोलतात आणि हिंगोल नदीत पापक्षालनासाठी आंघोळ करतात. चांगली तब्येत असणारे लोक हिंगलाज मातेच्या मंदिरापर्यंत जाऊ शकतात."

आमचा रस्ता एका शांत व अंधारलेल्या घाटातून जात होता. तिथे आम्हाला महाराज गोपाळ नावाचे एक ज्येष्ठ गृहस्थ भेटले. सुसज्ज काचेच्या चौकोनासारख्या दिसणाऱ्या हिंगलाज माता मंदिराबाहेर ते पहारा देत होते.

त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं आणि मग मंदिराची गोष्ट सांगितली.

गोपाळ म्हणाले, "लाखो वर्षांपूर्वी सती देवीचा मृत्यू झाल्यावर विष्णूने तिच्या शरीराचे 51 भाग केले."

"हे सर्व भाग पृथ्वीवर पडले आणि त्यातील बहुतांश भाग भारतातच पडले. तिच्या डोक्याचा एक भाग मकरानमध्ये पडला. ही सगळी ठिकाणी शक्तिपीठ म्हणून ओळखली जातात. इथे हिंदू देवीची प्रार्थना करण्यासाठी यात्रा भरते आणि जगाच्या अंतापर्यंत हे सुरूच राहील."

निराशेच्या सुरात गोपाळ म्हणाले, "आता तो दिवस तसा फारसा दूर राहिलेला नाही. सध्या आपण चौथ्या नि अंतिम युगात आहोत. हे युग संपलं की, मकरानमध्ये आपल्याला दिसतंय हे सगळं, सगळ्या जगातल्याच सगळ्या गोष्टी पूर्णपणे नष्ट झालेल्या असतील."

त्यांची ही भविष्यवाणी आम्ही धडपणे समजून घ्यायच्या आधीच त्यांनी हसत आमच्या हातात नारळ ठेवला आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

ओझरतं जीवनदर्शन

त्यानंतर आम्ही या भागातील प्राचीन गडकिल्ल्यांना व डोंगरांना वळसा घालून जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे निघालो. या दरम्यान आम्हाला पाकिस्तानातील सर्वांत कमी लोकसंख्या असणाऱ्या प्रांतातील लोकजीवनाचं ओझरतं दर्शन झालं. मधेच कोणीतरी शेतकरी गाढवावरून दूरच्या बाजारात जाताना दिसत होता, काही ठिकाणी गावातली मुलं तात्पुरत्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळताना दिसत होती.

मग पुन्हा महामार्गावरचा चढ सुरू झाला. इथे गाडीची कसोटीच पाहिली जात होती. या रस्त्यावरून जाणाऱ्या रंगीबेरंगी ट्रकच्या चालकांसाठी मात्र हा पट्टा जास्तच आव्हानात्मक होता.

"आजच्या या चांगल्या पक्क्या रस्त्यावरून प्रवास करणं इतकं अवघड आहे, पण अलेक्झांडरने त्या काळी स्वतःचं सैन्य घेऊन पायी आणि घोड्यांच्या पाठीवरून या खडतर भागातून प्रवास केला होता," अक्रम म्हणाला.

"इसवीसनपूर्व 325मध्ये अलेक्झांडर त्याच्या 30 हजार सैनिकांसह भारतातून परतत असताना त्याने या मार्गाची निवड केली होती. बॅबिलॉनपर्यंत (आजचा इराक) पोचेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या भागात उकाड्याने हैराण होऊन त्याच्या सैनिकांची वाताहात झाली. त्याच्या सैन्यातील अर्धेच लोक इराणपर्यंत पोचले, असं सांगितलं जातं."

अलेक्झांडर ज्या रस्त्याने भारतातून परत गेला तोच आजचा मकरान महामार्ग असल्याचं मानलं जातं. या दाव्याची ठाम पुष्टी करणं शक्य नाही.

आमचा शेवटचा थांबा इराणच्या सीमेपासून 50 किलोमीटर अलीकडील जिवानी या शहरात होता. धुळीने भरलेल्या या शहरात मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पगडीधारी सरदाराची छबी दिसत होती.

बलुचिस्तानातील प्राचीन आदिवासी नेत्यांपैकी ते एक होते. ते पारंपरिक विधीद्वारे स्वतःची पगडी स्वतःच्या मोठ्या मुलाला देत असत. हा एक प्रकारचा राज्याभिषेकच होता.

इथे आम्ही एका विशेष राजेशाही स्मारकाचा शोध घेत होतो. ही इमारत ब्रिटीश महाराणी व्हिक्टोरियासाठी तयार केलेली होती.

आज त्यावर पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या ताबा आहे आणि हा परिसर अतिसुरक्षा क्षेत्रामध्ये येतो.

सर्वसामान्य लोकांना या इमारतीपर्यंत जायला परवानगी नाही, पण आम्ही खूप आग्रहाने विनंती केल्यावर पाकिस्तानी सैन्याच्या एका कॅप्टनने आम्हाला सुरक्षारक्षकांच्या गराड्यासह ही इमारत बघायची परवानगी दिली.

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलेला हा एक मोठा महालच आहे.

मकरानमधून खूप सुंदर सूर्यास्त दिसतो, असं महाराणी व्हिक्टोरियाने ऐकलं होतं. त्यामुळे तिच्यासाठी 1876 साली ही इमारत बांधण्यात आली, असं कॅप्टनने आम्हाला सांगितलं.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार व्हिक्टोरिया राणी कधीच मकरानला आली नाही, पण ती इथे येऊन गेल्याचा दावा स्थानिक वृद्ध मंडळी करतात.

सर्वांत सुंदर सूर्यास्त

आम्ही या महालाच्या पायऱ्या चढून आत गेलो, तर तिथे केवळ तीन लहान खोल्या होत्या. एक शयनकक्ष, एक भोजनकक्ष आणि एक बैठकीची खोली.

या इमारतीतून सेवकांच्या निवासगृहांमध्ये संपर्क साधण्यासाठी तिथे एक फोन आहे, त्या व्यतिरिक्त बाकी मूळच्याच गोष्टी टिकवून ठेवलेल्या आहेत. अलीकडे किनारपट्टी भागातील तस्करीविरोधी कारवायांसाठी ही इमारत सज्ज करण्यात आली आहे.

आमच्या सोबतचे कॅप्टन म्हणाले, "इथे जास्तकरून पेट्रोलियम पदार्थांची तस्करी होते, शिवाय अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रंही असतात. पण या ठिकाणावरून आम्ही सीमेवरील आणि ओमानच्या खाडीमधील अवैध हालचालींवर लक्ष ठेवू शकतो."

आम्हाला सूर्यास्त बघण्यासाठी थांबायची परवानगी नव्हती, पण कॅप्टननी आम्हाला जिवानी किनाऱ्यावरून एका ठिकाणी जाऊन सूर्यास्त बघता येईल असा सल्ला दिला.

आम्ही सिबी शहरात पोचलो तेव्हा तिथे सूर्यास्त बघायला आधीपासूनच खूप गर्दी झालेली होती. यातील काही जण तर हजारो किलोमीटरांचा प्रवास करून आलेले होते.

तिथे उपस्थित एक मनुष्य म्हणाला, "एवढा लांबचा प्रवास करून इथे आलो, ते वाया नाही गेलं. मकरानहून जसा सूर्यास्त दिसतो तसा इतर कुठूनच दिसत नाही.

सूर्य आकाशातून मावळत जातो, तसतसे सुंदर रंग पसरत जातात- पिवळा रंग जाऊन नारंगी होतो, त्यातून मग लालसर रंग आणि अखेरीस जांभळट रंग येतो. मग काळोख पसरतो.

दुसऱ्या दिवशीसुद्धा ईश्वरकृपेने सूर्योदय होऊ दे आणि आम्हाला तो बघायला जिवंत असू दे, अशी आम्ही प्रार्थना करतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)