You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान: इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर अजून मतदान नाही
पाकिस्तानातील इम्रान खान सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज (9 एप्रिल) संसदेत मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र रात्री उशीरापर्यंत मतदान झाले नाही.
पाकिस्तानी संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी आपापली बाजू मांडली. मात्र, थोड्याच वेळात सभागृह दीड तासांसाठी म्हणजे दुपारी 12.30 वाजेपर्यंत (पाकिस्तानी वेळेनुसार) तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर नंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं.
याआधी इम्रान खान यांनी संसद बरखास्त करून नव्यानं निवडणुका घेण्याची शिफारस केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं संसद बरखास्त करण्यास नकार दिला. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.
इम्रान खान यांच्यावर भडकलेल्या मरियम नवाझ म्हणतात, 'एक व्यक्ती संपूर्ण देशाला अडवून धरतेय'पाकिस्तानातल्या विरोधी पक्ष नेत्या मरियम नवाझ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर ताशेरे ओढलेयत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिलाय.
इम्रान खान यांची संसदेत किती ताकद आहे?
पाकिस्तानात सत्तास्थापनेसाठी 172 जागांची आश्यकता असते.
2018 साली ज्यावेळी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षानं सत्ता स्थापन केली, तेव्हा त्यांच्याकडे 155 जागा होत्या. मात्र, तीन इतर पक्षांसोबत त्यांनी युती केली. आताच्या स्थितीत युती केलेल्या तीनपैकी दोन पक्षांनी इम्रान खान यांची साथ सोडलीय. या दोन पक्षांकडे 17 जागा आहेत.
इतकंच नव्हे, तर इम्रान खान यांच्या पक्षातीलही 20 जणांनी पीटीआयला सोडचिठ्ठी दिलीय.
त्यामुळे एकूणच संसदेत इम्रान खान यांच्या सरकारचं बहुमतच धोक्यात आहे.
मतदान कसं पार पडेल?
पाकिस्तानच्या संसदेत ओपन बॅलट पद्धतीनंच अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल. पंतप्रधान निवडीवेळी ज्या पद्धतीनं मतदान होतं, तसंच हे असेल.
संसदेचे सभापती मतदानानंतर अधिक मतं कुणाच्या बाजूनं आहेत, हे जाहीर करतील.
ही प्रक्रिया पार पडल्यानंतर याबाबतची स्थिती सभापती पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना कळवतील.
इम्रान खान मतदानात पराभूत झाले तर काय होईल?
इम्रान खान हे या मतदानात पराभूत झाल्यास ते पंतप्रधानपदावर राहणार नाहीत, मात्र संसदेचे सदस्य म्हणून ते राहतील. तसंच, पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्ष इम्रान खान यांना पुन्हा एकदा सभागृह नेता म्हणून इम्रान खान यांची निवड करू शकतं.
इम्रान खान आजच्या मतदानात पराभूत झाल्यास, संसदेतील इतर सदस्य पंतप्रधानपदासाठी आपलं नाव पुढे करू शकतात आणि त्या नावांवर मतदान पार पडेल.
इम्रान खान यांना भारत आवडत असेल तर तिथंच जाऊन राहावं - मरियम नवाज
"भारत इतका आवडत असेल तर तिथेच जावं," असं म्हणत पाकिस्तानातील PML-N चे नेते मरियम नवाज यांनी ट्वीट करून पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केलीय.
इम्रान खान यांनी रात्री उशिरा देशवासियांना उद्देशून भाषण केलं आणि याच भाषणात त्यांनी पाकिस्तानातील विरोधी पक्षांवर टीका करताना, भारताचं कौतुक केलं. यावरूनच विरोधक आता आक्रमक झालेत.
"कुठल्याही परदेशी शक्तीमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करण्याची हिंमत नाहीय, भारत स्वाभिमानी देश आहे," असं इम्रान खान म्हणाले होते.
यावर मरियम नवाज म्हणाल्या, "ज्या भारताचं ते कौतुक करतायेत, त्या भारतात अनेक पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इतिहास आहे. एकानेही राज्यघटना, लोकशाही आणि धोरणांबाबत खेळ केले नाहीत. वाजपेयी एका मतान पराभूत झाले आणि घरी गेले. तुमच्याप्रमाणे देश, राज्यघटना आणि जनतेला ओलीस ठेवलं नाही."
"सत्तेसाठी कुणाला अशा पद्धतीने रडताना पहिल्यांदाच पाहतेय. आपल्यासाठी कुणीच बाहेर पडलं नसल्याचं कळल्यानं ते रडतायेत. डोळे उघडून पाहा, गरीब जनतेला तुम्ही साडेतीन वर्षांपासून रडवलंय. तुमच्यापासून सुटका झाल्यानं जनतेला बरं वाटतंय. जाता जाता राज्यघटनेचीही पायमल्ली केलीत," अशीही टीका मरियम नवाज यांनी इम्रान खान यांच्यावर केली.
'भारत स्वाभिमानी देश, भारताला बोलण्याची कुणाची हिंमत नाही'
पाकिस्तानच्या संसदेबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांना संबोधलं. या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं.
इम्रान खान म्हणाले, "26 वर्षांआधी मी तहरिक-ए-इन्साफची स्थापना केली. तेव्हापासून माझे सिद्धांत बदलले नाहीत. पक्षाच्या नावातच 'इन्साफ' शब्द ठेवला. प्रामाणिकपणा, न्याय आणि जनतेच्या भल्यासाठीच्या सिद्धांतांवर चाललोय. आज मी प्रामाणिकपणा आणि न्यायावर बोलणार आहे."
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं मी नाराज झालोय, मात्र मी पाकिस्तानच्या न्यायालयांचा आदर करतो, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "मी आतापर्यंत एकदा तुरुंगात गेलोय. मला या गोष्टीवर विश्वास आहे की, कुठल्याही समाजाची उभारणी न्यायावर होते आणि न्यायालयं न्यायाचे राखणदार असतात. मला हे सांगताना खंत वाटते की, न्यायालयाचा जो काही निर्णय असेल, त्याचा स्वीकार करतो. मात्र, खंत आहे हे नक्की."
"पाकिस्तानच्या संसदेतील डेप्युटी स्पिकरनं आर्टिकल 5 आधारे संसद बरखास्त केली होती. हा गंभीर आरोप आहे की, एक बाहेरील देश कट रचून सरकार पाडतं. किमान सुप्रीम कोर्टानं तरी या आरोपांची चौकशी केली पाहिजे होती. त्या कागदपत्रांना पाहण्यासाठी तरी सुप्रीम कोर्टानं बोलावलं पाहिजे होते," असंही इम्रान खान म्हणाले.
इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक
इम्रान खान म्हणाले, "मी हिंदुस्तानातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो. मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले."
"भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही. कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल. भारत एक स्वाभिमानी देश आहे," असं ते पुढे म्हणाले.
भारताचं परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून, दबावाकडे दुर्लक्ष करून भारत रशियाकडून तेल खरेदी करतंय, असंही इम्रान खान म्हणाले
शांततापूर्ण निदर्शनांचं आवाहन
इम्रान खान यांनी पाकिस्तानवासियांना निदर्शनाचं सुद्धा आवाहन केलं.
इम्रान खान म्हणाले, "रविवारी नमाजानंतर सर्वांनी बाहेर पडा आणि शांततेनं आंदोलन करा. या निदर्शनांदरम्यान तोडफोड करायची नाही. तुम्ही दाखवून द्यायचं आहे की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बाहेर पडला आहात."
"हे जे बाहेरील लोक कट रचून नाटकबाजी करतायेत, त्यांचा तुम्ही विरोध केला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. यामुळे कळेल की पाकिस्तान हे एक जिवंत राष्ट्र आहे. इतिहास कधीच माफ करू शकत नाही. कोण काय भूमिका घेतोय, याची दखल इतिहास घेतो. सुप्रीम कोर्टाचे कोणते निर्णय चांगले आहेत आणि कोणते देशहिताचे नाहीत, हे इतिहास सांगतो," असं इम्रान खान म्हणाले.
तसंच, इम्रान खान म्हणाले की, "मीही लोकांमध्ये राहीन आणि कुठल्याही परिस्थितीत हे मान्य करणार नाही की, बाहेरील कुणी ताकद पाकिस्तानात हस्तक्षेप करेल. पाकिस्तान जिंदाबाद."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)