You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्रान खान आणि विरोधकांमधील संघर्षात पाकिस्तानचं लष्कर कोणाच्या बाजूने?
- Author, हारुन राशिद
- Role, मॅनेजिंग एडिटर, इंडीपेंडंट उर्दू (इस्लामाबाद)
पाकिस्तानमध्ये विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास ठराव संसदेत मांडण्यात आला आहे. नॅशनस असेंब्लीमध्ये विरोधी नेते शहबाज शरीफ यांनी हा प्रस्ताव मांडला. 31 मार्चला या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होईल.
मात्र पाकिस्तानात रंगलेल्या या राजकीय सामन्यात शक्तिशाली असं लष्कर कुठे आहे हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळतोय.
पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की, लष्कर तटस्थ असल्याचं दिसत आहे. लष्कराकडून अत्यंत सावध अशी भूमिका घेतली जात आहे. मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या राजकीय गदारोळात लष्कराच्या बाजूने कोणतेही संकेत किंवा विधान आलेलं नाही.
10 मार्चला, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी एकचं पण अतिशय संतुलित असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, त्यांची संस्था तटस्थ आहे आणि त्यांना राजकारणात ओढल जाऊ नये.
पण गोष्टी दिसतात तितक्या साध्या आणि सरळ नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीलाच इम्रान खान सरकारने विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीगच्या (नवाझ) डिलविषयी दावा केला होता. यामुळे पाकिस्तानच्या राजकीय क्षेत्रात नव्याने अटकळी बांधल्या जाऊ लागल्या.
विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांची चार लोकांसोबत 'डील' सुरू असल्याचा दावा पंतप्रधानांचे राजकीय प्रकरणातील विशेष सहाय्यक शाहबाज गिल यांनी केला होता. ज्या चार लोकांसोबत 'डील' झाली त्यात शाहबाज शरीफ, त्यांचा मुलगा हमजा शाहबाज, नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा समावेश आहे.
यात ज्या अटकळी बांधल्या जात होत्या त्यावर 5 जानेवारी 2022 रोजी पत्रकार परिषदेत उत्तर देताना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार म्हणाले की "कोणासोबतही कोणती डील सुरू नाहीये. जो व्यक्ती अशा व्यवहारांबद्दल दावे करतोय त्याच्याकडूनच या डीलमागे असणाऱ्या गोष्टीचं स्पष्टीकरण घेतलं पाहिजे."
पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाज) या अफवांच खंडन केलंय. मात्र तेव्हापासूनचं इम्रान खान यांच्या विरोधात राजकीय वारं वाहू लागलं.
इम्रान खान यांच्या विरोधात एकवटले विरोधक
मागील काही वर्षांपासून अविश्वास ठरावासाठी एकजूट होऊ न शकलेले विरोधक अचानक एकवटलेले दिसतात. आपल्या वडिलांप्रमाणेच अँटी स्टॅब्लिशमेंट समजल्या जाणाऱ्या मरियम नवाज यांनी इम्रान खानविरोधातील आंदोलनात दुसरं स्थान पटकावलं. अधिक संतुलित समजले जाणारे शाहबाज शरीफ यावेळी आघाडीवर आले.
पाकिस्तान पीपल्स पार्टीसारखे वेगळ्या वाटेवर चालणारे विरोधी पक्ष यावेळी एकाच व्यासपीठावर आले. मौलाना फजलुर रहमान यांच्या जमियत उलेमा-ए-इस्लामला तर इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार होताना पाहायचं होतं.
पण पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी चौधरी शुजात हुसैन यांची पीएमएल-क्यू, कराची स्थित मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि बलुचिस्तान अवामी पार्टी (बीएपी) या तीन प्रमुख आणि सर्वात मोठे सहयोगी असलेल्या पक्षांची जाहीररीत्या नाराजी, सर्वात धोकादायक सिद्ध झालं. इम्रान खान यांना संसदेत पाठिंबा द्यायचा की नाही हे या तिन्ही मित्रपक्षांनी अद्याप ठरवलेलं नाही.
थोडं आणखी मागे गेलं तर, गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीवरून लष्करासोबतचे मतभेद समोर आले. तत्कालीन चीफ लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना आणखीन काही काळ पदावर ठेवावं अशी पंतप्रधान इम्रान खान यांची इच्छा होती. पण लष्कराचे मनसुबे वेगळे होते. या वादावर दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले.
सर्व काही ठीक असल्याचं सार्वजनिकरित्या दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्यक्षात तसं काही घडलंच नव्हतं. त्यावेळी जे घडलं ते घडलं. पण आता येत्या काही महिन्यांतच पंतप्रधानांना अधिक संवेदनशील आणि महत्त्वाचा असा नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय घ्यायचाय.
लवकरच नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती होईल
असं म्हटलं जातं की, लष्करामध्ये जनरल फैज यांच्यासाठी फैसलाबादच्या धरणे आंदोलनात पैसे वाटणे आणि काबूलमध्ये कॉफी पितानाचे फोटो काढणे यापेक्षा काहीही चांगलं काम नाहीये. ते नव्या लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीत असतील, तर मात्र इम्रान खान यांचा त्यांच्याकडे असलेला कल त्यांच्यापुढे आणखीन अडचणी निर्माण करू शकतो.
त्यानंतर लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी लाहोरमधील एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत साधलेल्या संवादातूनही सरकार आणि लष्कर यांच्यातील संबंधांवर प्रकाश पडला. वृत्तानुसार, जनरल बाजवा यांनी त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितलं की, "ज्यांना असं वाटतं की माझ्या मर्जीने निर्णय घेतले जातात, तर तुम्ही इम्रान खानला ओळखत नाहीत."
इम्रान खान यांनी आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीवेळी सांगितलं होतं की, या पदावर एखाद्याची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यावेळी मतभेद समोर आले होते. याशिवाय युक्रेन युद्धासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत तटस्थ राहण्याच्या निर्णयावर लष्कराचं मत काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
इम्रान खान सरकारच्या या निर्णयाविरोधात कोणतंही वक्तव्य आलेलं नसलं तरी, पण समर्थनार्थही काहीही बोलण्यात आलेलं नाही. पण हे सर्व ठोकताळे आहेत. यासाठी ठोस पुरावे नाहीत. आणि पाकिस्तानात अशा ठोकताळ्यांचा पडताळा करण्याची परंपरा ही नाही.
सैन्याच्या तटस्थतेने अस्वस्थता वाढवली आहे
लष्कराने तटस्थ राहणं सरकारला शोभत नाही आणि केवळ प्राणीच तटस्थ राहू शकतात, असं इम्रान खान म्हटले. त्यावर त्यांचे प्रवक्ते फवाद चौधरी म्हणतात की, संविधानानुसार लष्कर सरकारच्या पाठीशी आहे. यावर पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. मात्र तोवर बाण सुटला होता.
यानंतर इम्रान खान यांनी भरसभेत त्यांच्या समर्थकांना सांगितलं की, जनरल बाजवा यांनी मौलाना फजलुर रहमान यांच्यासाठी 'डिझेल' हा शब्द वापरू नका असा सल्ला मला दिलाय. पण आजही ते सतत मौलानासाठी 'डिझेल' हा शब्द वापरतात.
इम्रान खान यांचे लष्कराशी संबंध कसेही असो, पण सरकारने केलेली खराब कामगिरी त्यांच्यासमोर नक्कीच अडचणी निर्माण करू शकते. चोर, डकैत अशी जाहिरात करणाऱ्या एकाही राजकारण्याला शिक्षा झाली नाही, तर दुसरीकडे ढिम्मपणा आणि वाढत्या महागाईमुळे अर्थव्यवस्था सुधरण्याचं नाव घेत नाहीये.
मात्र, बरेच निरीक्षक सांगतात त्याप्रमाणे इम्रान खान यांच्या राजकीय मित्रपक्षांच्या नाराजीचं कारण काहीतरी वेगळं असावं. एमक्यूएम कदाचित इम्रान खानच्या विरोधात मतदानात भाग घेणार नाही. हा पक्ष या निर्णयाचा गांभीर्याने विचार करतोय.याचा फायदा पंतप्रधानांना नंबर गेममध्ये मिळू शकतो. पीएमएल-क्यू आणि बीएपीवर आरोप आहेत की त्यांना स्टेब्लिशमेंटचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचा एक निर्णय इम्रान खान यांना तारू शकतो किंवा सत्तेवरून पायउतार व्हायला लावू शकतो.
हे प्रकरण 4 एप्रिलपर्यंत निकाली निघेल, असा विश्वास गृहमंत्री शेख रशीद यांनी व्यक्त केला आहे. पीएमएल-क्यू आणि बीएपीच्या मतदानाने स्टेब्लिशमेंट केवळ सरकारवर नाराज आहे की इम्रान खान यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होईलच.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)