You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान ISI प्रमुखांच्या नियुक्तीत इम्रान खान यांना माघार का घ्यावी लागली?
- Author, हुदा इकराम
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला नवीन महासंचालक मिळाल्यानं याठिकाणच्या देशांतर्गत राजकारणात मोठा बदल होईल, अशी शक्यता नाही.
मात्र, लेफ्टनेंट नदीम अंजुम हे आयएसआयचे नवे महासंचालक बनले असून, ही पाकिस्तानसाठीच नव्हे तर शेजारी देशांसाठीदेखील एक मोठी बातमी मात्र नक्कीच आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची देशातील प्रमुख गुप्तचर संस्था आयएसआयच्या प्रमुख पदी नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
पाच ऑक्टोबर 2021 ला याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नदीम अंजुम 20 नोव्हेंबरपासून पद सांभाळणार आहेत.
आयएसआयचे प्रमुख बनण्यापूर्वी नदीम अंजुम कराची कोरचे कमांडर होते. ते लेफ्टनंट जनरल फैज हमीदची जागा घेणार आहेत.
अडीच वर्ष आयएसआयचे प्रमुख राहिलेले हमीद आता पेशावर मध्ये 11व्या कोरचे कमांडर असतील.
कोण आहेत लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम?
28व्या पंजाब रेजिमेंटचे नदीम अंजुम यांना शांत आणि कडक अधिकारी म्हणून ओळखलं जातं. ब्रिगेडियरच्या भूमिकेत त्यांनी पाकिस्तानच्या आदिवासी भागांत लष्करी अभियानाचं नेतृत्व केलं होतं.
ते कराची कोरचे कमांडरही होते. जनरल अंजुम यांनी रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. पाकिस्तानचे माजी लष्करी हुकुमशहा जनरल परवेझ मुशर्रफ आणि लष्कर प्रमुख जनरल रहील शरीफही याच कॉलेजमधून शिकलेले आहेत.
त्यांना उत्तर बलुचिस्तानमध्ये फ्रंटियर कोरचे महानिरीक्षकही बनवण्यात आलं होतं. त्याशिवाय त्यांनी स्टाफ कॉलेजमध्ये सेवाही बजावली. कराचीमध्ये लष्कराचे आयजी सिंध यांचं अपहरण केल्याच्या तथाकथिक प्रकरणानंतर त्यांना जनरल हुमायूं अजिज यांच्याऐवजी कराचीचे कोर कमांडर बनवण्यात आलं होतं.
पाकिस्तानात आसएसआयचं महत्त्व
आयएसआयचे प्रमुख हे पाकिस्तानातील सर्वांत शक्तीशाली लोकांपैकी एक असतात. त्याचं कारण म्हणजे, देशातील आणि बाहेरची महत्त्वाची माहिती, त्यांच्याकडे असते.
ज्येष्ठ पत्रकार उमर फारुख यांच्या मते, पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण तीन प्रकारे विभागलं जाऊ शकतं. पहिलं अमेरिका-पाकिस्तान संबंध, दूसरं पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध आणि सर्वात महत्त्वाचे पाकिस्तान-भारत संबंध.
"सरकारसाठी खऱ्या अर्थानं काम करणारी संस्था म्हणजे, आयएसआय. अफगाणिस्तानात परराष्ट्र विभागाचं कार्यालय फार काही करू शकत नाही, मात्र आयएसआय प्रत्यक्षात काही ना काही तरी करू शकते. भारत-पाकिस्तान संबंधांवर आयएसआय आणि लष्कराचा प्रभाव कामय असतो.
"पाकिस्तान-अमेरिकेच्या संबंधांमध्ये अमेरिकेला प्रत्यक्षात काही करायचं असेल तर आयएसआय आणि लष्कराच्या मार्फत ते करते. त्यांच्याकडे केवळ माहितीच असते असं नाही, तर ते धोरणांवरही प्रभाव टाकतात," असं फारुख म्हणाले.
यावेळी काय वाद झाला?
पाकिस्तानात लष्कर प्रमुख आयएसआयच्या नव्या महासंचालकांचं नाव सुचवतात अशी परंपरा आहे. पंतप्रधान त्या नावावर शिक्कामोर्तब करत असतात.
पाकिस्तानच्या लष्करानं 6 ऑक्टोबरला लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम आयएसआयचे प्रमुख बनणार अशी घोषणा केली होती. पण त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना तीन आठवड्यांनी निघाली.
दरम्यान, आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीबाबत माध्यमांमध्ये चर्चा होत होत्या. या पदावर नियुक्तीचा अधिकार नेमका कुणाला आहे, यावरही चर्चा झाली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात लष्करप्रमुख जनरल कमर जावे बाजवा यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन आयएसआय प्रमुखांच्या निवडीबाबत चर्चा केली, असं म्हटलं होतं.
पंतप्रधानांनी संरक्षण मंत्रालयानं पाठवलेल्या यादीतील सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि नंतर चर्चा करून लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांना आयएसआय प्रमुख बनवलं, असंही निवेदनात म्हटलं होतं.
मात्र, लष्कर आणि सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, तशा शंकाही आधी व्यक्त करण्यात येत होत्या. पत्रकार उमर फारुख यांच्या मते, या प्रकारानंतर पंतप्रधान आणि लष्करप्रमुख एकमेकांवर विश्वास करणार नाहीत.
"त्यांनी काहीही दावा केला आणि सर्वकाही ठिक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी या परिस्थितीनंतर तुम्ही पूर्वीप्रमाणे एकमेकांवर विश्वास ठेवू शकणार नाहीत, असं म्हणावं लागेल," असं फारुख म्हणाले.
काय परिणाम होणार?
"हे सर्व घडण्याचं कारण म्हणजे, पंतप्रधानांना त्यांच्या आवडीचा व्यक्ती या पदावर हवा होता. त्यांना काही फायदे घ्यायचे होते किंवा हितसंबंध त्याच्याशी जोडलेले होते. पण याचे काही ना काही परिणाम नक्कीच होतील. राजकारणात अशाप्रकारचे प्यादे बदलले जाऊ शकतात," असं राजकीय विश्लेषक वजाहत मसूद म्हणाले.
इम्रान खान यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता त्यांच्याकडे राजकीय दृष्टीकोन नाही, हे लक्षात येतं. "त्यांना फार दूरवरचा अंदाज लावता येत नाही. केवळ सत्तेवर पकड मजबूत होईल, अशा गोष्टींचाच ते विचार करतात," असं मसूद म्हणाले.
''पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे स्वतःचीच शक्ती ओळखण्याची क्षमता नाही. ते स्वतःला सर्वोच्च मानतात. सर्वकाही आपणच करत आहोत, असं त्यांना वाटतं. पण लोकशाहीत एक व्यक्ती नव्हे, तर सर्वांना महत्त्वं असतं,'' असं प्राध्यापक मसूद म्हणाले.
तर, या संपूर्ण वादात सरकारनं नव्या आयएसआय प्रमुखांची निवड करण्याचा अधिकार पंतप्रधानांना असून, लष्करांशी त्यांचे मतभेद नसल्याचं वारंवार सांगितलं.
लेफ्टनंट फैझ हमीद वादात का होते?
मावळते आयएसआय प्रमुख आणि बलुच रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल फैझ हमीद आयएसआयचे प्रमुख असताना अनेक वादांत अडकले होते.
अफगाणिस्तानचं तालिबान सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेदरम्यान फैझ हमीद अचानक काबूलला पोहोचले होते. त्याठिकाणी त्यांचे अनेक फोटो, व्हीडिओ व्हायरलही झाले होते.
त्यापूर्वी त्यांचं नाव 2017 मध्ये तहरीक लब्बैक पाकिस्तानच्या आंदोलनात चर्चेत आलं होतं. त्यावेळी ते आयएसआयच्या काऊंटर-इंटलिजन्स विंगमध्ये होते.
त्यावेळी टीएलपी आणि सरकारमध्ये जो सहा कलमी करार झाला होता, तो हमीद यांच्या मध्यस्थीनेच झाला होता. तर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही त्यांच्यावर इम्रान खान यांच्या राजकीय पक्षाला फायदा पोहोचवल्याचे आरोप केले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)