You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ISI : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय कसं काम करते?
- Author, उमर फारूक
- Role, संरक्षण तज्ज्ञ, बीबीसी उर्दूसाठी
1 मार्च 2003 साली पाकिस्तानची पहिली गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या दोन डझन अधिकाऱ्यांनी खालिद शेख मोहम्मदला रावळपिंडी शहरातल्या एका घरातून अटक केली. खालिद शेखवर अमेरिकेवर झालेल्या 9/11 हल्ल्यांचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप झाला होता.
त्याच संध्याकाळी पाकिस्तानी आणि परदेशी पत्रकारांना इस्लामाबादस्थित आयएसआयच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेसाठी आमंत्रण देण्यात आलं.
आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मोहिमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावणं, त्यात परदेशी पत्रकारांना बोलावणं ही दुर्मीळ घटना होती.
या घटनेने एका वादाला तोंड फुटलं.
या परिषदेत उपस्थित असणाऱ्या पत्रकारांपैकी अनेकांना खालिद मोहम्मद शेखच्या अटकेविषयी आधीच कल्पना होती, कारण ही अटक रावळपिंडी शहरात झाली होती. ज्या घरातून त्याला अटक झाली ते घर जमात-ए-इस्लामी पाकिस्तानशी जवळचे संबंध असणाऱ्या एका प्रसिद्ध धार्मिक कुटुंबाचं होतं.
मोहम्मदचे यजमान अहमद अब्दुल कुद्दूस होते, त्यांच्या आई जमात-ए-इस्लामीच्या एक सक्रिय नेत्या होत्या.
परिषदेदरम्यान पत्रकारांनी आयएसआयच्या उपमहासंचालकांना जमात-ए-इस्लामी आणि अल-कायदा या इतर दहशदवादी संघटनांशी असणाऱ्या संबंधांविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
आयएसआयचे उपमहासंचालक, जे एक नौदल अधिकारी होते, म्हणाले की, "एका पक्ष या नात्यातने जमात-ए-इस्लामीचा अल-कायदा किंवा कोणत्याही दहशदवादी संघटनेशी काहीही संबंध नाही."
या मोहिमेनंतर आयएसआयने एकीकडे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए आणि एफबीआय यांच्याबरोबर संयुक्तरित्या अनेक मोहिमा पाकिस्तानात राबवल्या तर दुसरीकडे पाकिस्तानातच धार्मिक गटांसोबत जवळीक वाढवली.
9/11 चा हल्ला झाल्यानंतर लगेचच अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान 'इंटेलिजन्स करार' झाला होता पण हा करार कधीही सार्वजनिक केला गेला नाही. हा करार लागू झाला तेव्हा अफगाणिस्तानात तालिबानची राजवट संपुष्टात येत होती आणि अल-कायदाशी संबधित लोक अफगाणिस्तानातून पळून जाऊन शेजारच्या राष्ट्रात शरण घेत होते.
सुरुवातीच्या काळात अल-कायदाच्या बहुतांश नेत्यांना पाकिस्तानच्या प्रमुख शहरी केंद्रांमधून अटक केली होती. 9/11 च्या हल्ल्यांशी संबधित आरोपी खालिद शेख मोहम्मदला रावळपिंडीतून तर रमजी बिन-अल-शीबाला कराचीतून अटक केली.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, इंटेलिजन्स कराराला यश आलं कारण अमेरिका-पाकिस्तान दोन्ही देश शहरी भागात अल-कायदाच्या हस्तकांचा शोध घेत होते.
पाकिस्तानच्या कथित दुहेरी मापदंडावर टीका
पण जेव्हा टोळ्यांचं प्राबल्य असणाऱ्या ग्रामीण भागात कट्टरवादाविरोधी हालचाली सुरू झाल्या तेव्हा पाकिस्तान-अमेरिका यांच्यात गुप्त माहितीची देवाण-घेवाण करायला अडचणी यायला लागल्या. या अडचणींचं सगळ्यांत मोठं उदाहरण पाकिस्तान सरकार आणि कट्टरवाद्यांमध्ये टोळ्यांचं प्राबल्य असणाऱ्या भागात होणारे शांतता करार होते.
या करारांमुळे या भागात लपलेले अल-कायदाचे हस्तक आणि स्थानिक लोक यांच्यात दरी आली होती. व्यावहारिक स्तरावर अमेरिकन सैन्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी सहमत नव्हतं. पाकिस्तान 'दुहेरी मापदंडाची' नीती राबवतोय अशी टीकाही अमेरिकन सैन्याकडून झाली.
वॉशिंग्टनही आयएसआयची कथित दुहेरी नीती आणि त्या भागात अमेरिकनांच्या उपस्थितीचा विरोध करणाऱ्या धार्मिक शक्तींशी आयएसआयचा असणारा संवाद यावरून नाखूश होतं.
हा कथित संवाद तेव्हाही चालू होता जेव्हा वॉशिंग्टनने तालिबानसोबत चर्चेला सुरुवात केली होती आणि तिथून सैन्य मागे घेण्याच्या करारावर सही केली.
याच काळात देशांतर्गत विरोधी पक्षाने आयएसआय आणि त्याच्या नेतृत्वावर राजकीय इंजिनिअरिंग (मोडतोडीचं राजकारण) केल्याचाही आरोप केला. त्यावेळी आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या महासंचालकांवर 2018 च्या संसदीय निवडणुकांमध्य इम्रान खान यांच्या विजयाचे शिल्पकार असल्याचाही आरोप झाला.
आयएसआय हे काय समीकरण आहे की या संस्थेवर पाकिस्तानात आणि देशाबाहेरही कायम टीका होते? कोणतीही राजकीय हत्या, अपहरण, धमकी किंवा अन्य कोणत्याही बाबतीत आयएसआयचं नाव का घेतलं जातं?
या प्रश्नांचं उत्तर देणं सोपं नाहीये पण आयएसआयच्या एका अधिकाऱ्याने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं की आयएसआय पाकिस्तानची 'प्रमुख' गुप्तचर संस्था आहे. या संस्थेला त्या क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक हालचालीची खबर असते.
त्यांनी म्हटलं, "अफगाणिस्तानात शांतता चर्चा होते तर तिथे पाकिस्तान असतो. जर काबुलमध्ये तालिबान सत्तेत आलं तरीही जग आमच्याकडे पाहतं. अफगाणिस्तानातून पाश्चिमात्य राजदूतांना बाहेर पडायचं असेल तर आमची मदत लागते. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, तुम्हाला आमचं महत्त्व कळेल."
माजी महासंचालकांनी अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर दोनदा तिथला दौरा केला आहे. तिथे त्यांनी तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याच वेळी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवरून पाकिस्तान अमेरिकेशी चर्चा करत होता.
1979 ते 2021 या काळात आयएसआय अफगाणिस्तानातली स्थिती आणि पाकिस्तानवर पडणारा त्याचा प्रभाव या गोष्टी निस्तरण्यात व्यग्र होती.
आयएसआयच्या एका माजी उपमहासंचालकांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "आम्ही पाकिस्तानाला कोणतीही मोठी हानी किंवा अफगाणिस्तानातल्या परिस्थितीमुळे पडणाऱ्या नकारात्मक प्रभावापासून वाचवलं हे आयएसआयचं सर्वात मोठं यश आहे."
आयएसआयची संस्थात्मक रचना
आयएसआयची प्राथमिक जबाबदारी देशाच्या संरक्षण दलांची व्यावहारिक आणि वैचारिक सुरक्षा सुनिश्चित करणं आहे. संस्थेचं नाव - इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स - यावरूनच ते कळतं. नागरी अधिकारीही आयएसआयमध्ये उच्च पदांवर आहेत पण संस्थेच्या संस्थात्मक रचनेत त्यांच्याकडे फारसे अधिकार नसतात.
लेखक डॉक्टर हेन एच केललिंग यांनी आपलं पुस्तक 'आयएसआय ऑफ पाकिस्तान' मध्ये या संस्थेचा संस्थात्मक तक्ता दिलेला आहे.
केसलिंग यांच्या पुस्तकानुसार ते 1989 ते 2002 पर्यंत पाकिस्तानात राहिले. ते आपल्या पुस्तकात म्हणतात की, ही एक आधुनिक संस्था आहे आणि आपल्याला गुप्त माहिती कशी मिळेल याकडे या संस्थेचं लक्ष असतं. त्यांच्यानुसार कोणत्याही आधुनिक गुप्तचर संस्थांप्रमाणे आयएसआयमध्येही सात निदेशालयं आणि अनेक विभाग आहेत. या खेरीज तिथे वेगवेगळ्या विंगही आहेत.
आयएसआयच्या संस्थात्मक रचनेवर भूसेनेचं जास्त वर्चस्व आहे पण नौसेना आणि वायूसेनेचे अधिकारीही या संघटनेचा भाग आहेत.
आयएसआयचे महासंचालक परदेशी गुप्तचर संस्था आणि इस्लामाबादस्थित परदेशी दुतावासात तैनात असलेल्या सैन्यादरम्यान संपर्ककेंद्राची भूमिका निभावतात. त्याबरोबरच ते पडद्यामागे गुप्त घडामोडींवर पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार म्हणूनही काम करतात.
एक वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यानी बीबीसी सांगितलं की सशस्त्र सैन्य दलं - आर्मी, नेव्ही, एयर फोर्समध्ये वेगवेगळ्या इंटेलिजन्स एजेन्सी असतात. या संस्था आपआपल्या संबंधित सैन्यांशी संबधित आवश्यक माहिती गोळा करत असतात आणि कर्तव्यांचं पालन करत असतात.
कधी कधी आयएसआय आणि या सेनांच्या गुप्तचर संस्था यांच्याव्दारे एकाच प्रकारची माहिती गोळा केली जाते. पण अन्य गुप्तचर संस्थांच्या तुलनेत आयएसआय सगळ्यांत मोठी, सगळ्यांत परिणामकराक आणि शक्तीशाली संस्था मानली जाते. तरीही स्थानिक माध्यमं आणि गैर-सरकारी संस्थांमध्ये तिच्या क्षमतेविषयी अंदाज नाहीये.
आयएसआयचं बजेट कधीही सार्वजनिक केलं गेलेलं नाही पण वॉशिंग्टन स्थित फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार आयएसआयमध्ये 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यात खबरे आणि माहिती देणारे लोक नाहीत.
आयएसआयचे सहा ते आठ विभाग आहेत.
काऊंटर इंटेलिजन्स ऑपरेशन
सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे की, आयएसआयची रचना त्या संस्थेला 'काउंटर इंटेलिजन्स ऑपरेशन' वर केंद्रित गुप्तचर संस्था बनवते.
ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) फिरोझ एच खान यांनी पाकिस्तान सिक्युरिटी एस्टाब्लिशमेंटमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. त्यांनी 'इटिंग ग्रास' या नावाने पुस्तक लिहिलं आहे.
ते आपल्या पुस्तकात लिहतात की, "पाकिस्तानचे तिसरे सैन्य शासक जनरल झिया-उल-हक अफगाणिस्तानात सोव्हियत युनियनच्या हस्तक्षेपामुळे वैतागले होते. सत्तेचा माज असलेली एक शक्ती आमच्या दरवाजावर उभी होती. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या कार्टर प्रशासनकडून मिळणारी सैनिकी आणि आर्थिक मदत मिळत होती, त्यामुळे थोडं ओझं हलकं झालं पण या सैनिकी हुकूमशहाला एक वेगळी काळजी भेडसावत होती."
"अमेरिकन मदत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करेल, सैन्य क्षमताही वाढेल पण अमेरिकेबरोबर गुप्तचर सहकार्यामुळे पाकिस्तानची राष्ट्रीय रहस्य गुप्त ठेवणं मुश्कील होईल."
फिरोझ खान लिहितात की, जनरल झियांनी अमेरिका पाकिस्तानात जी गुप्त माहिती गोळा करेल त्याला निष्फळ करण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांची क्षमता वाढवणं आणि विकसित करण्यावर भर दिला.
"याचा अर्थ होता की 'इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स' च्या काऊंटर-इंटेलिजन्स विंगला भलमोठं बजेट उपलब्ध करून देणं."
त्याकाळात अमेरिकन गुप्तचर मोहिमा पाकिस्तानाच्या गुप्त अणुकार्यक्रमाबद्दल होते. दुसरीकडे अफगाण युद्धामुळे अनेक पाश्चिमात्य गुप्तचर कर्मचारी इस्लामाबादमध्ये स्थायिक झाले होते. याकाळात पाकिस्तानने या गुप्तचर संस्थाना उत्तर म्हणून आपली आयएसआयची स्थापना केली होती.
"काऊंटर इंटेलिजन्स म्हणजे गुप्तचर संस्था, परदेशी सरकारं, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना किंवा त्यांचे एजंट जे गुप्तहेरी करतात त्यापासून वाचण्यासाठी केल्या जाणाऱ्या कृती." सैन्य शब्दांचे अर्थ सांगणाऱ्या डिक्शनरीत 'काऊंटर इंटेलिजन्स' ची व्याख्या अशी दिलीये.
फिरोझ एच खान लिहितात की, "झिया उल हक यांच्याकडे पुढे जाण्याचा मार्ग नव्हता पण त्यांना रिस्क घ्यायची होती. अण्वस्त्रांच्या मुद्द्याला मुत्सदीपणाने सोडवलं जाऊ शकत होतं पण अमेरिकन इंटेलिजन्स एजेन्सी माहिती मिळवेल ही भीती होतीच. पण या मुद्द्याचं उत्तर काऊंटर इंटेलिजन्सने मिळू शकत होतं."
'जॉईंट काऊंटर इंटेलिजन्स ब्युरो'
आयएसआयमध्ये काऊंटर इंटेलिजन्स निदेशालय आहे जे सगळ्यांत मोठं आहे.
जर्मन मुत्सदेगिरी तज्ज्ञ डॉ हेन जी केसलिंग यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, उपमहासंचलकांकडे बाह्य संयुक्त प्रत्युत्तर गुप्तचर विभागाची जबाबदारी असते.
ते लिहितात, "परदेशात तैनात असलेल्या पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवणं तसंच मध्यपूर्व, दक्षिण आशिया, चीन, अफगाणिस्तान, माजी सोव्हिएत संघ आणि मध्य आशियात गुप्तचर मोहिमा चालवणं यांची जबाबदारी असते."
जॉइंट काऊंटर इंटेलिजन्स ब्युरो (संयुक्त प्रत्युत्तर गुप्तचर विभाग)मध्ये चार निदेशालयं आहेत आणि त्यापैकी प्रत्येक निदेशालयाकडे एकेक जबाबदारी आहे.
एक संचालक परदेशात तैनात असलेल्या पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवतात.
एक संचालक परदेशी राजदूत, राजनैतिक अधिकारी आणि मुत्सदी यांची माहिती गोळा करण्याचं काम करतात.
तिसरे संचालक आशियाला लागून असलेला युरोपचा भाग आणि मध्यपुर्वेची गुप्त माहिती गोळा करण्याचं काम करतात.
चौथे संचालक गुप्त माहिती संदर्भात पंतप्रधानांचे सहायक म्हणून काम करतात. हे सगळ्यांत मोठं निदेशालय आहे. या निदेशालयाच्या जबाबदारीत आयएसआय कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणं, सगळ्या राजकीय घडमोडींचा लेखा-जोखा ठेवणं अशा गोष्टीही येतात. पाकिस्तानच्या सगळ्या महत्त्वाच्या शहरात या निदेशालयाचं अस्तित्व आहे.
इतर निदेशालयं
डॉ केसलिंग यांच्या पुस्तकानुसार, "आयएसआयचा दुसरं सगळ्यात मोठं निदेशालय जॉइंट इंटेलिजन्स ब्युरो आहे. हा विभाग राजकीय पक्ष, अफगाणिस्तान, दहशतवादविरोधी मोहिमा, कामगार युनियन, आणि व्हीआयपी सुरक्षा असे विषय हाताळतो. परदेशात तैनात असलेल्या पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी तसंच सैन्य अधिकाऱ्यांची प्रकरणही या विभागाकडे येतात."
डॉ केसलिंग पुस्तकात लिहितात की, "जम्मू-काश्मीरची जबाबदारी जॉईंट इंटेलिजन्स नॉर्थची जबाबदारी आहे. या विभागाची प्राथमिक जबाबदारी गुप्त माहिती मिळवणं आहे. काश्मिरी फुटीरतावाद्यांना पैसे, प्रशिक्षण, आणि शस्त्रास्त्र मिळवून द्यायची जबाबदारी या निदेशालयाकडे आहे."
पाकिस्तान काश्मिरी कट्टरवाद्यांना मदत करतो असे आरोप अनेकदा झाले आहेत, होतात पण पाकिस्तानने याचा नेहमीच इन्कार केला आहे.
आणखी एक निदेशालय म्हणजे जॉइंट इंटेलिजन्स मिसलेनियस (विविध). या विभागाकडे युरोप, आशिया, अमेरिका, मध्यपूर्वेत गुप्तचर मोहिमा राबवणं ही जबाबदारी आहे. याच देशातली गुप्त माहिती जमा करण्याचं कामही हा विभाग करतो. भारत आणि अफगाणिस्तानात आपल्या आक्रमक मोहिमा पार पाडण्यासाठी ते आपल्या गुप्तहेरांचा वापर करतात.
अंतर्गत संघर्ष
एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यानुसार आयएसआय पाकिस्तानी सैन्याच्या अंतर्गत काम करते. या संस्थेकडे प्रचंड सैनिकी ताकद आहे. पण कधीकधी सैन्य आणि आयएसआय यांच्यात अंतर्गत संघर्ष दिसून येतो. हा संघर्ष भूतकाळात अनेकदा समोर आला आहे.
त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं होतं की सैन्य विश्लेषकांनी सांगितलं होतं की 12 ऑक्टोबर 1999 ला जे बंड झालं ते नवाज शरीफ यांच्या विरोधात तर झालंच पण आयएसआयच्या विरोधातही हे बंड झालं होतं. आयएसआय तेव्हा आपले महासंचालक लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जियाउद्दीन बट यांच्या बाजूने होती. बट यांना तत्कालीन पंतप्रधानांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्त केलं होतं.
सैन्य आणि आयएसआयमधली दुसरी दरी तेव्हा दिसली जेव्हा मुशर्रफ यांच्या काळात मीडियाने आयएसआयने आपली मीडिया विंग सुरू केली होती. या विंगने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी संबंध प्रस्थापित केले होते.
एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की अनेकदा मीडिया विंग स्वतंत्रपणे का करते आणि आयएसपीआर जे करत असते त्याच्या बरोबर उलट काम करते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)