You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान : दुसरी बायको शोधायच्या वेबसाईटवरून पाकिस्तानात पेटला वाद
- Author, उमर दराज नंगियाना
- Role, बीबीसी उर्दू, लाहोर
पुरुष आणि महिलांना एकमेकांशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी अनेक वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्स आहेत. यांना डेटिंग साईट्स म्हटलं जातं. या माध्यमातून एकमेकांना भेटलेले लोक एकमेकांशी लग्नही करू शकतात.
पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश नागरिक आझाद चायवाला यांनी चार वर्षांपूर्वी अशीच एक वेबसाईट सुरू केली आणि तिला 'सेकंड वाईफ डॉट कॉम' असे नाव दिले.
या वेबसाईटमुळे आणि तिला दिलेल्या नावामुळे आझाद चायवाला यांच्यावर यूकेमध्येही प्रचंड टीका करण्यात आली. आता पाकिस्तानातही सोशल मीडियावर या वेबसाईट्सची चर्चा सुरू झालीय.
या वेबसाईटवर आधारित मोबाईल अॅपही आझाद यांनी सुरू केलंय.
आझाद चायवाला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "त्यांनी मुळात ब्रिटन आणि पश्चिमेकडे राहणाऱ्या मुस्लीम पुरुषांसाठी ही वेबसाइट तयार केली आहे. जेणेकरून ते कायदेशीररित्या त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतील."
"इस्लाम पुरुषांना एकापेक्षा जास्त म्हणजे एकाचवेळी चार लग्न करण्याची परवानगी देतं आणि सून्नतची ही परंपरा सुरू करणं आवश्यक आहे," असे त्यांचे मत आहे. आझाद चायवाला सांगतात की, ते पाश्चिमात्य देशांमध्ये राहत होते आणि त्यांनी पाहिले की , "स्त्री-पुरुषांना डेटिंग आणि लैंगिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु मुस्लीम पुरुष तसं करू शकत नाहीत."
"इस्लाममध्ये यावर कायदेशीर उपाय आणि कायदेशीर मार्ग आहे. पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार आहे आणि सेंकड वाईफ डॉट कॉम त्यांना अनैतिक मार्ग टाळून दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्यांदा लग्न करण्याची संधी देतं," असंही ते म्हणाले.
पुढे ते सांगतात, घटस्फोटित किंवा विधवा झालेल्या अनेक मुस्लीम स्त्रिया आहेत. पण सामाजाच्या भीतीमुळे त्यांना पुनर्विवाह करता येत नाही किंवा स्वत:साठी जोडीदार शोधणं कठीण जातं. तेव्हा त्यांची वेबसाइट अशा महिलांसाठीही संधी उपलब्ध करून देते.
वेबसाईटवर नोंदणी केलेल्या पुरुष आणि महिलांची संख्या 40 लाखांहून अधिक असल्याचा दावा आझाद चायवाला यांनी केलाय. यात बहुतेक पाश्चिमात्य देशांशी, विशेषत: यूके, अमेरिका,कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीशी संबंधित आहेत.
पाकिस्तानात त्यांचे नोंदणीकृत वापरकर्ते सुमारे 2,300 आहेत. ही संख्या कमी आहे कारण आमचा फोकस किंवा लक्ष्य पाकिस्तान नव्हते असं आझाद चायवाला सांगतात.
पण सोशल मीडियावर त्यांच्या वेबसाईटवर प्रचंड टीका केली जात आहे. विशेषत: मोठ्या संख्येने महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
'एकापेक्षा अधिक लग्न करणं पुरुषांचा अधिकार नाही'
फेसबुकवर स्टार्टअप पाकिस्तान नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या सेकंड वाईफ डॉट कॉम या बातमीवर भाष्य करताना अझरा पठाण म्हणाल्या, "पुरुष पहिल्या पत्नीच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यांना आणखी एक (लग्न) करायचं आहे."
त्यांच्या मते, "बहुतेक पहिली पत्नी कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करत असते. तुम्ही त्यांच्यासोबत बरोबरीचा व्यवहार कसा करू शकता? केवळ कायदेशीर लैंगिक संबंधाची बाजू भक्कम केली जात आहे."
अंबरिन रब यांनी उपरोधिक पद्धतीने आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, "माझा विश्वास आहे की (पैगंबर साहेबांच्या मार्गाचे अनुसरण करत) लोक या वेबसाईटवर केवळ विधवा असलेल्या स्त्रियांशी किंवा त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या, घटस्फोटित किंवा त्यांच्या भूतकाळामुळे त्यांना कोणीही स्वीकारत नाही अशा स्त्रिया किंवा पुरुषांच्या पाठिंब्याची खरोखर गरज असलेल्या स्त्रियांसाठी येत असावेत. बरोबर?"
नसीर मोहम्मद यांनी याबाबत अधिक विस्ताराने आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "बहुपत्नीत्व हा इस्लाममध्ये व्यक्तीचा अधिकार नाही किंवा तो पर्यायही नाही.
"हा फक्त एक पर्याय आहे जो अत्यंत गरज असेल तेव्हाच वापरला जाऊ शकतो. पुरुष याचा फायदा चुकीच्या कारणांसाठी घेत आहेत. पहिल्या पत्नीला ब्लॅकमेल करणे, पहिल्या पत्नीचा ताबा घेण्यासाठी, वासनेसाठी, आनंदासाठी याचा वापर केला जातोय."
ही वेबसाईट कसं काम करते?
आझाद चायवाला यांच्यानुसार, वेबसाईटला भेट द्यायची असल्यास वापरकर्त्यांना सुरुवातीला नोंदणी करावी लागते. ही नोंदणी विनामूल्य केली जाऊ शकते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आपला खरा फोटो अपलोड (लावणे) करणं अपेक्षित आहे. त्यांची टीम या फोटोची पडताळणी करते.
फोटोची पडताळणी झाल्यानंतरच वापरकर्ता वेबसाईटवर जोडीदाराचा शोध घेऊ शकतो. एखाद्या जोडीदाराशी ओळख झाली किंवा त्यांना कोणी आवडलं तर ते एकमेकांना संपर्क साधू शकतात. पण संपर्क साधण्यासाठी त्यांना वेबसाईटची प्रिमीयम सेवा घेणे बंधनकारक आहे.
याची किंमत दर महिन्याला 20 डॉलर एवढी आहे. पाकिस्तानच्या नोंदणीकृत वापरकर्त्यांमध्ये प्रिमीयम सेवा ही 30 जणांनी घेतली आहे.
हे केवळ एक डेटिंग अॅप आहे का?
आझाद चायवाला सांगतात, "पुरुष किंवा स्त्रिया यांनी स्वत:साठी योग्य जोडीदार शोधल्यानंतर ते एकमेकांशी लग्न करू शकतात." पण वेबसाईट वापरकर्त्यांनी लग्न केले की नाही हे त्यांना कसे कळते?
"ही माहिती मिळवण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नसल्याचं आझाद चायवाला सांगतात. वेबसाईटचे नोंदणीकृत वापरकर्ते लग्न करतात की केवळ भेटतात हे कळण्याचा देखील मार्ग नाही हे ते स्वीकारतात.
तसं असेल तर त्यांची वेबसाईटही हे सुद्धा एक डेटिंग अॅप आहे आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या इतर असंख्य डेटिंग अॅप्सपेक्षा ते वेगळं कसं?
आझाद चायवाला सांगतात, "केवळ लग्नासाठी याचा वापर करणं ही जबाबदारी केवळ वेबसाईट वापरकर्त्याची आहे."
"एकापेक्षा अधिक लग्न केलेल्या लोकांना संधी मिळते आणि वेबसाईटवर नोंदणी करत असलेले वापरकर्ते यासाठीच येतात," असंही आझाद यांना वाटतं.
ही वेबसाईट केवळ एक डेटिंग अॅप असून पैसे कमवण्याचा मार्ग आहे अशी टीका सोशल मीडियावर केली जात आहे.
'पैसे कमवायचे असल्यास डेटिंग अॅप सुरू करा'
मुदस्सिर हुसैन नावाचे एक यूजर सांगतात, "ते फक्त डेटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत." नसीर अमीर म्हणतात, "बाजारात आणखी एक ब्रँड आला."
राव असीम सरदार यांनी लिहिलं की, "टिंडर (डेटिंग अॅप) काय बंद झालं लोक काहीही सुरू करत आहेत."
साजिदा शाह लिहितात, "हा केवळ एक ट्रेंड आहे. त्यांना माहित आहे की पाकिस्तानात हा एक संवेदनशील विषय आहे आणि नफा देणारा व्यवसाय आहे. जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर हा ट्रेंड सुरू करा आणि डेटिंग अॅप सुरू करा."
"मला खात्री आहे की या माध्यमातून कोणीही दुसरे, तिसरे किंवा चौथे लग्न करणार नाही. ते केवळ या वेबसाईटचा आनंद घेतील. ज्याला दुसरी, तिसरी किंवा चौथी पत्नी करायची आहे तो अशा प्रकारे डिजिटल गुलामी न करता प्रत्यक्षात शोधूनच लग्न करेल."
ही वेबसाईट पुरुषांना त्यांच्या पत्नीला धोका देण्यासाठी आणि गोपनीय पद्धतीने लग्न करण्याची संधी देत आहे असंही काही यूजर्सचे म्हणणे आहे. ते सांगतात, हे नैतिक आणि कायदेशीर दोन्ही दृष्टीने योग्य नाही. ज्याला जास्त समस्या आहेत त्याने घटस्फोट घ्यावा. सेकंड वाईफ डॉट कॉमवर एक इशारा देण्यात आला आहे. बहुतांश देशात बहुपत्नीत्व हा कायदेशीर गुन्हा आहे. यानुसार "आम्ही निश्चयाने धर्म आणि विश्वासाच्या आधारावर एकाहून अधिक लग्न समारंभांना पाठिंबा देत आहोत."
आझाद चायवाला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "इस्लाममध्ये कोणत्याही पतीला दुसरे लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीची परवानगी घेणे आवश्यक नाही."
ते असंही सांगतात, "हे सुन्नत आहे आणि कोणत्याही महिलेला यावर आक्षेप घेण्याचा अधिकार नसावा. एखाद्या महिलेला जास्त समस्या होत असल्याने त्यांनी घटस्फोट घ्यावा. पण एकाहून अधिक लग्न करण्याचा अधिकार प्रत्येक मुस्लीम पुरुषाला आहे. यापासून त्यांना थांबवता येणार नाही."
हे लक्षात घ्या की इस्लामच्या विविध पंथांमध्ये याबद्दल वेगवेगळी मतं आहेत.
'एक पत्नी आणि चार मुलं तर सांभाळता येत नाहीत'
पाकिस्तानात एक पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणं तर पुरुषांसाठी कठीण जातं, अशाही काही प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.
पश्मिना अली नावाच्या एका यूजरने सोशल मीडियावर यासंदर्भात लिहिले, "एक पत्नी आणि चार मुलं तर सांभाळली जात नाहीत आणि चार लग्न करण्यासाठी निघाले आहेत. हे खरंच इस्लाम मानतात का? आपल्या सर्व बायका-मुलांचे हक्क समान पूर्ण करत आहेत अशा एका व्यक्तीचे उदाहरण मला द्या.
मोहम्मद रझा मुनव्वर नावाचे यूझर लिहितात, "पाकिस्तानमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या लग्नाचा खर्च करणं कसं शक्य आहे?"
"तुम्ही तुमच्या घरगुती गरजा पूर्ण करू शकत नाहीत. तुमच्याकडे साधनं असतील तर ते चांगलंच आहे, पण पाकिस्तानात 80 टक्क्यांहून अधिक लोकांचे आयुष्य 'परिवर्तनवादी सरकार'अंतर्गत काही चांगलं सुरू नाहीय.
आझाद चायवाला म्हणतात की, ते कोणालाही दुसरे लग्न करण्यास भाग पाडत नाहीत. सेकंड वाईफ डॉट कॉमच्या माध्यमातून ते केवळ अशा लोकांना संधी देत आहे ज्यांना दुसरे लग्न करायचे आहे आणि त्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्याची त्यांची तयारी आहे.
हे काम आपण दान म्हणून करत नाही तर हा माझा व्यवसाय आहे. यातून आम्ही पैसे कमवतो असंही आझाद मान्य करतात.
आमच्याकडे आतापर्यंत 6 लाख नोंदणी अर्ज आले आहेत असा दावाही आझाद चायवाला करतात. ते सांगतात, सेकंड वाईफ डॉट कॉमचा मोबाईल अॅपही नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ते पाकिस्तानात वापरकर्ते वाढवण्यासाठी नियोजन करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)