You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान : विद्यापीठात प्रेम व्यक्त केलं म्हणून प्रेमी युगुलाला शिक्षा
पाकिस्तानातल्या लाहोर विद्यापीठाने एका प्रेमी युगुलाला निलंबित केलं आहे. त्यांचा गुन्हा हा होता की त्या विद्यार्थिनीने सर्वांसमोर गुडघ्यावर बसून मुलाला गुलाबाची फुलं देत लग्नाची मागणी घातली आणि त्या मुलानेही होकार देत तिला मिठी मारली.
तिने त्याला मागणी घातली त्यावेळी कॉलेजमधले अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी तिथे हजर होते आणि म्हणून विद्यापीठाने 'तात्काळ कारवाई' करत दोघांनाही निलंबित केलं आहे.
दोघांनाही शिस्त समितीने बोलावलं होतं, पण दोघेही हजर झाले नाही आणि म्हणून कारवाई केल्याचं विद्यापीठाने एक निवेदन जारी करत स्पष्ट केलं. दोघांनी विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचंही प्रशासनाचं म्हणणं आहे. कॉलेजमधून निलंबनासोबतच विद्यापीठाच्या सर्वच कॅम्पसमध्ये त्यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.
बीबीसीने या मुद्द्यावर संबंधित विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला. पण त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही.
मात्र, दोघांनीही आपापल्या ट्वीटर अकाउंटवर एकमेकांना मेंशन करत 'आम्ही काहीही चुकीचं केलं नसल्याचं' म्हटलं आहे.
सोशल मीडियावर चर्चा
ट्विटरवर या घटनेवर बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रतिक्रिया केवळ पाकिस्तानातून नाही तर शेजारील देशांमधूनही येत आहेत. यात अनेकांनी विद्यापीठाने केलेली कारवाईला योग्य असल्याचं म्हटलंय तर अनेकांनी त्याचा विरोध देखील केलाय.
वकील जैनब मजारी हाजीर लिहितात, "या देशातली विद्यापीठं लैंगिक शोषण, जमावाकडून होणारा हिंसाचार, ब्लॅकमेल करण्यासाठी लावलेले छुपे कॅमेरे, हे सगळं सहन करतात. मात्र, त्यांनी लक्ष्णरेषा कुठे आखली आहे - तर परस्पर सहमतीने दोन व्यक्तींच्या मिठी मारण्यावर."
गेल्या काही वर्षात पाकिस्तानातल्या अनेक विद्यापीठांमध्ये तिथल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. इतकंच नाही तर अनेक विद्यापीठांमध्ये राजकीय आणि धार्मिक संघटनांमध्ये हिंसाचाराच्याही अनेक घटना घडल्या.
पाकिस्तानातील क्रिकेटवर भाष्य करणारे क्रिकेट विश्लेषक डेनिस फ्रिडमॅन यांनी ट्वीटरवर स्वतःचं नाव बदलत डेनिस लाहोर विद्यापीठ, असं केलं आहे.
विद्यापीठ म्हणजे मॅरेज ब्युरो नाही. त्यांना त्यांचं काम करू द्या, अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे. याचं उत्तर देताना डेनिस लिहितात, "बरोबरच आहे. कॅम्पसमध्ये जेवणाचीही परवानगी द्यायला नको. कारण विद्यापीठ म्हणजे हॉटेल थोडंच आहे."
अफझल खान जमाली नावाचे यूजर लिहितात, "तुम्ही मुलींवर बलात्कार करू शकता. त्यांना ठार करू शकता, त्यांचं शोषण करू शकता. मात्र, प्रेमाचा मुद्दा आला की 'हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे', असं तुम्ही सांगता. सार्वजनिकरित्या लग्नाची मागणी घालण्यात चूक कसली?"
एजाज अली लिहितात, "एका तरुण जोडप्याला एका क्षुल्लक कारणावरून निलंबित करण्यात आलं, हे बघून फार वाईट वाटतंय. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्यासमोर आहे. लाहोर विद्यापीठ आपला निर्णय मागे घेईल, अशी आशा मी करतो."
दुसरीकडे काही यूजर याला, "मूल्यांचा ऱ्हास" म्हणत आहेत.
मोमिना नावाच्या यूजर लिहितात, "अशाप्रकारे आपण वेगाने तरुणांच्या विनाशाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि हे आपल्या समाजाला 'नैतिक आणि धार्मिक'दृष्ट्या अधिक मोठ्या विनाशाकडे नेईल."
तर आपल्याला लग्नाच्या प्रस्तावाची अडचण नाही. मात्र, त्यासाठी जी जागा निवडली ती चुकीची होती, असं अदनान काकर लिहितात.
अशाप्रकारच्या गोष्टींसाठी विद्यापीठ ही योग्य जागा नाही, असं त्यांचं मत आहे.
अनेकांनी या घटनेवर मिम्सही शेअर केले.
मोहम्मद आदिल मेमन नावाच्या यूजरने 'मोहब्बते' या बॉलीवुड सिनेमातल्या अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर करत "हे लाहोर विद्यापीठाचे नवे प्राचार्य आहेत", असं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)