भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यानची ती प्रेमकहाणी

खालील फोटोमध्ये तुम्हाला एक नक्षीदार जॅकेट आणि एक ब्रिफकेससारखी बॅग दिसत असेल. या फोटोतील जॅकेट आणि बॅग अत्यंत सामान्य दिसत असले तरी त्यामागे एक खास गोष्ट आहे.

हे जॅकेट आणि ही बॅग अशा स्त्री आणि पुरुषाची आहे जे अखंड पंजाबमध्ये राहत होते. त्या दोघांची भेट त्यांच्या आई-वडिलांनी घडवून आणली होती.

1947 मध्ये फाळणी दरम्यान भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये हिंसाचार सुरू होता. त्यावेळी त्या दोघांचा साखरपुडा झाला होता.

या फाळणीत जवळपास दहा लाख लोकांचा मृत्यू झाला तर लाखोच्या संख्येने लोक बेघर झाले होते.

हिंदू आणि मुस्लीम दोघांमध्ये संघर्ष पेटला होता. आपला देश अशा पद्धतीनं सोडून जाण्याची वेळ देशवासियांवर यावी ही इतिहासातील मोठी शोकांतिका होती.

अशा संवेदनशील आणि धोकादायक वातावरणात आपला जीव वाचवण्यासाठी दोघांनाही घर सोडावं लागलं. त्यावेळी हे जॅकेट आणि ही बॅग घेऊन बाहेर पडलेल्या या दोघांसाठी हा एक अनमोल ठेवा आहे.

मार्च 1948 मध्ये दोघांचे लग्न झाले. अगदी साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडला. त्यावेळी दोन्ही कुटुंबांसाठी एका नवीन आयुष्याची सुरुवात करणं आव्हानात्मक होतं.

भगवान सिंह मैनी यांनी पंजाब कोर्टात नोकरी करण्यास सुरुवात केली. आपली पत्नी प्रितम कौर यांच्यासोबत ते लुधियानाला गेले.

दोघांनाही दोन मुलं आहेत. दोघंही प्रशासकीय अधिकारी आहेत. मैनी यांचा 30 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर प्रितम कौर 2002 साली हे जग सोडून गेल्या.

कुकी मैनी सांगतात, "हे जॅकेट आणि ही बॅग त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याचे साक्षीदार आहेत. ही त्यांच्या मिलन आणि दुराव्याची कथा आहे."

त्यांची हीच कहाणी आता अमृतसरमधल्या संग्रहालयात वारसा म्हणून जतन केली जाईल.

फाळणीच्या साक्षीदार राहिलेल्या गोष्टी या संग्रहालयात जोपासल्या जात आहेत. हे संग्रहालय शहरातील भव्य अशा टाऊन हॉलमध्ये उभं राहिलं आहे.

त्यावेळची छायाचित्रे, ऑडियो रेकॉर्डिंग्ज, शरणागती पत्करलेल्या लोकांचं सामान, अधिकृत कागदपत्रं, मानचिन्ह आणि वृत्तपत्रांची कात्रणं या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.

या फाळणी संग्रहालाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिका अहलुवालिया यांनी सांगितलं, "फाळणी संदर्भातील हे संग्रहालय भव्यदिव्य असेल. जगातील एक अनोखं संग्रहालय म्हणून याकडे पाहिलं जाईल."

फाळणीच्या वेळेस दोन्ही कडील रेल्वे रक्त माखलेल्या आणि मृतदेहांनी खच्चून भरलेल्या असायच्या. लष्करातील खूप कमी लोक दंगलींना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यानुसार, "त्यावेळी ब्रिटीशांचे प्राण वाचवणं ही इंग्रजांची प्राथमिकता होती."

संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. शेतकरी आपली जमीन सोडून बेघर झाले होते. याबदल्यात त्यांना काही प्रमाणात भरपाई मिळाली होती.

फाळणीनंतर कित्येक महिने दोन्ही बाजूने रक्तपात होत होता.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये लिहिलं होतं, "इथलं आयुष्य भयावह होत आहे. प्रत्येक गोष्टीत गडबड आहे असं वाटतं."

या परिस्थितीमध्येही भगवान सिंह मैनी आणि प्रितम कौर यांच्या सारख्या कहाण्या नव्याने आयुष्य जगण्याची प्रेरणा देत राहिल्या.

अमृतसरमध्ये सुरू झालेलं हे संग्रहालय नागरिकांना लेखक सुनील खिलनानी यांनी लिहिलेल्या शब्दांची आठवण करून देणारं आहे.

फाळणीविषयी बोलताना त्यांनी लिहिलं होतं, "भारताच्या हृदयाची कधीही न सांगितली जाणारी ही उदासिनता आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)