You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियात झालेली ‘ही’ हत्या पुतिन यांच्यासाठी धोक्याची घंटा का मानली जातेय?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे निकटवर्तीय असलेल्या अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी दारिया दुगिनाची मॉस्कोमध्ये हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर रशियामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा आरोप रशियाने केला आहे. रशियाच्या एफएसबीनं याचा तपास पूर्ण केला असून त्यामागे युक्रेन असल्याचं स्पष्ट झालंय, असं रशियानं म्हंटलंय.
तर या हल्ल्यात युक्रेनचा सहभाग असल्याचे आरोप युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलेत. रशियातील राजकीय हाडवैर याला कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
"या घटनेशी युक्रेनचा काहीही संबंध नाहीये. उलट रशियाचं गुन्हेगार देश आहे," असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखाइलो पोडोलिक यांनी म्हटलंय.
अलेक्झांडर यांची ओळख पुतिन यांचे कट्टर समर्थक, व्लादिमीर पुतिन यांचा 'ब्रेन' अशी आहे. दारिया दुगिन ही अलेक्झांडर यांची मुलगी होती.
अलेक्झांडर दुगिन आणि त्यांची मुलगी दारिया दुगिना यांना झाखारोवो इस्टेट येथील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अलेक्झांडर दुगिन यांनी व्याख्यानही दिलं.
रशियन तपास समितीने दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रम आटोपल्यावर दारिया दुगिना ही आपल्या वडिलांच्या म्हणजेच अलेक्झांडर दुगिन यांच्या कारने घराकडे निघाली होती. मात्र वाटेतच कारचा स्फोट झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
हा हल्ला नियोजित असल्याचेही संकेत मिळत आहेत. कारण ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती कार अलेक्झांडर दुगिन यांची होती. कार्यक्रम पार पडल्यावर त्या कारने अलेक्झांडरच प्रवास करणार होते. पण ऐनवेळी त्यांच्या मुलीने आपल्या वडिलांची कार घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि मॉस्कोमध्येच कारचा स्फोट झाला.
शनिवारी रात्री मॉस्कोजवळ झालेल्या या हल्ल्यात अलेक्झांडर दुगिन टार्गेटवर असावेत असा अंदाज रशियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पण अद्याप तपास सुरु आहे.
दरम्यान कार पार्क केलेल्या पार्किंग एरियातील सीसीटीव्ही कॅमेरेही यावेळी बंद असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बोलशिये व्याझेमी गावाजवळ या कारचा स्फोट झाला.
आपत्कालीन सेवा जेव्हा घटनास्थळावर पोहोचली तेव्हा दुगिन यांची कार जळत होती. या हल्ल्यातील फोटो टेलिग्रामवर प्रसिद्ध झाले असून अलेक्झांडर दुगिन अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत.
तपास कुठपर्यंत पोहोचलाय?
स्फोट नेमका कसा घडला याबाबत रशियन अधिकाऱ्यांना अजूनतरी कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाहीये.
दारिया दुगिना स्वतः कार चालवत होती आणि बोल्शेई व्याझेमी गावाजवळ तिचा मृत्यू झाल्याचं तपासात उघड झालं आहे.
कारखाली स्फोटकं पेरण्यात आली होती आणि स्फोटानंतर कारने पेट घेतल्याचंही तपासात समजलं आहे. फॉरेन्सिक आणि ब्लास्ट एजंट पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.
रशियातल्या उदारमतवादी विरोधकांनी रशियन स्पेशल सर्व्हिसेसकडे बोट दाखवलंय. पण याबाबतही काही पुरावे मिळालेले नाहीत.
दरम्यान हल्लेखोरांना अलेक्झांडर दुगिन यांनाच ठार मारायचं होतं का? असा प्रश्न काही रशियन राजकीय तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.
या घटनांमुळे रशियन अधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः क्रायमियन पट्टा आणि युक्रेनजवळील रशियन भागात अशा हल्ल्यांची आणि स्फोटांची संख्या वाढत चालली आहे. 2014 मध्ये क्रायमिया रशियात विलीन झाला.
1990 च्या दशकात रशियामध्ये बॉम्बस्फोट आणि राजकीय हत्या सामान्य होत्या. पण व्लादिमीर पुतिन सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशात सुरक्षा आणि स्थिरता आणली असा प्रोपोगंडा सध्या रशियात सुरू आहे.
मात्र मॉस्कोजवळ दुगिन यांच्या कारचा जो स्फोट झाला त्यामुळे हा प्रोपोगंडा कसा चुकीचा आहे हे सिद्ध होतं.
बीबीसीचे प्रतिनिधी विल वरनॉन यांचं विश्लेषण
अलेक्झांडर दुगिन यांच्याकडे कोणतंही अधिकृत पद नाहीये. मात्र ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निष्ठावंत मानले जातात. त्यांना 'पुतिनचे रास्पुतिन' असं ही म्हटलं जातं.
रास्पुतिन कोण होते?
तर ग्रिगोरी रास्पुतिन हे रशियन साम्राज्याचा शेवटचा झार निकोलस दुसरा याचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. झारने घेतलेल्या निर्णयांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असायची. निकोलसची पत्नी अलेक्झांड्रावरही रास्पुतिनचा मोठा प्रभाव होता.
रास्पुतिन सायबेरियातील टोबोल्स्कचा रहिवासी होता. झरीनाला वाटायचं की, रास्पुतिन त्याच्या जादुई सामर्थ्याने रशियन सिंहासनाचा वारस असलेल्या अलेक्सीला म्हणजे तिच्या मुलाला आजारातून बरं करू शकेल.
दारिया दुगिना ही रशियन पत्रकार होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं ती उघडपणे समर्थन करायची.
29 वर्षीय दारिया दुगिनावर इंटरनेटवर खोट्या बातम्या पसरवल्याचे आरोप होते. त्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीलाचं अमेरिका आणि ब्रिटनने तिच्यावर निर्बंध लादले होते.
मेमध्ये तिची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात तिने या युद्धाला 'सभ्यतेसाठीचा संघर्ष' असं म्हटलं होतं. आणि यासाठी पाश्चिमात्य देशांनी तिच्यावर आणि तिच्या वडिलांवर जे निर्बंध घातले, त्याचा तिला अभिमान आहे असं ती म्हटली होती.
क्रायमिया रशियात विलीन करण्यामागे अलेक्झांडर दुगिनचा हात असल्याचे आरोप अमेरिकेने केले होते. त्यामुळे 2015 साली अलेक्झांडर दुगिन यांच्यावर निर्बंध लादण्यात आले.
अलेक्झांडर दुगिन यांच्या लेखनाचा व्लादिमीर पुतिन यांच्यावर मोठा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे क्रायमियाच्या कट्टर-राष्ट्रवादी विचारसरणीच्या मागेही अलेक्झांडर दुगिन यांची मुख्य वैचारिक भूमिका असल्याचं म्हटलं जातं.
रशियाने जागतिक स्तरावर आक्रमक भूमिका घ्यावी म्हणून मागील काही वर्षांपासून अलेक्झांडर दुगिन सक्रिय होते. ते यासाठी रशियन सरकारला सल्लेही द्यायचे. युक्रेनमध्ये रशियाने जी लष्करी कारवाई केली त्याचंही अलेक्झांडर यांनी समर्थन केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)